Home | Editorial | Agralekh | divyamarathi, editorials, agarlekh

मुंडे की दुनिया

दिव्य मराठी | Update - Jun 24, 2011, 03:39 AM IST

गोपीनाथ मुंडेंनी भाजपच्याच बंगल्यात राहून फक्त गडकरींचीच नव्हे तर थेट नागपूरच्या संघाच्या गडाचीच अडचण केली आहे.

  • divyamarathi, editorials, agarlekh

    गोपीनाथ मुंडेंनी भाजपच्याच बंगल्यात राहून फक्त गडकरींचीच नव्हे तर थेट नागपूरच्या संघाच्या गडाचीच अडचण केली आहे.
    गोपीनाथ मुंडेंची ‘सीरियल’ एक आठवडाभर सर्व चॅनल्सवर आणि वर्तमानपत्रांमध्ये चवीचवीने चालविली गेली. या ‘पोलिटिकल सीरियल’चा ‘टीआरपी’ सास-बहू आणि सारेगमपपेक्षाही जास्त होता. शिवाय याच्यात कुणीही नट-नट्या नव्हत्या, तर थेट खरीखुरी कॅरेक्टर्स भाग घेत होती. नाही म्हणायला, हल्ली राजकीय नेतेमंडळी बॉलीवूडपेक्षाही अ‍ॅक्टिंग करण्यात माहिर झाली आहेत. त्यामुळे या ‘मुंडे की दुनिया’ सीरियलमध्ये खरे नाट्य किती होते आणि ‘सच्ची अ‍ॅक्टिंग’ किती हे सांगणे तसे कठीण आहे. त्याचप्रमाणे ही सीरियल कॉमेडी होती की मुंडेंची शोकांतिका हेही सहज सांगता येणार नाही. मुंडेंची स्थिती केविलवाणी होती की गोपीनाथरावांनी पक्षाची अवस्था केविलवाणी केली, यावर ‘तज्ज्ञांनी’ उदंड भाष्य केले. काही तज्ज्ञांना अगदी काही तास अगोदर खात्री होती की मुंडे सोनिया गांधींना भेटणार, त्यानंतर केंद्रीय कॅबिनेटमध्ये जाण्यासंबंधात डॉ. मनमोहन सिंगांना भेटून खाते ठरविणार आणि एकदा ‘डील’ झाले की भाजपचा राजीनामा देणार. या तज्ज्ञांनीच अहमद पटेल यांची मुंडेंबरोबर भेट झालेली असून, आता फक्त औपचारिकता उरली आहे असे जाहीर केले होते. काही पत्रकारांनी तर मुंडेंना द्यायचे खातेही जाहीर करून टाकले होते. अवजड उद्योग (पूर्वी विलासरावांकडे असलेले खाते) किंवा अन्न व नागरी पुरवठा (पूर्वी शरद पवारांकडे असलेले) यापैकी एक मुंडेंकडे जाणार, अशी छातीठोक माहिती मीडियाकडे होती. जे नितीन गडकरींच्या बाजूला होते, त्यांच्या मते मुंडे गेल्यामुळे भाजपला काहीही फरक पडणार नाही, उलट एक कटकट गेली आणि काँग्रेसच्या गळ्यात जाऊन अडकली असे म्हणता येईल! काहींनी तर असा तर्क लावला की गडकरींनीच पडद्यामागे हालचाली करून मुंडे-अहमद पटेल भेट घडवून आणली! पण नंतर मुंडेंनीच टीव्ही कॅमेºयासमोर येऊन जाहीर केले की आपण अहमद पटेल यांना कधीही भेटलो नाही. यावरून अहमद पटेल म्हणजे जुन्या हिंदी चित्रपटातील एक के.एन.सिंगसदृश खलनायक असावा आणि तो कुठेतरी गुप्त ठिकाणी बसून कारस्थानी खलबते करीत असावा, अशीच बहुतेकांची समजूत झाली. अजून अहमद पटेल यांनी स्वत: मुंडेंची भेट झाली की नाही यावर टीव्ही कॅमेºयावर येऊन काहीही सांगितलेले नाही. त्यामुळे ज्या शोध-पत्रकारांच्याा मते, तशी भेट झाली होती, ते आजही सांगतात की ती भेट गुप्त असल्याने पटेल त्याची वाच्यता करणार नाहीत आणि मुंडेंनाही खोटे पाडणार नाहीत. किंबहुना तशी भेट न झाल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जाहीर केले यावरूनच ‘दाल में कुछ काला नहीं तो भगवा है।’ हे सिद्ध होते. काही महिन्यांपूर्वी छगन भुजबळ यांची अशीच गुप्त भेट अहमद पटेल यांच्याबरोबर झाल्याचे शोध-पत्रकार सांगत होते. छगन भुजबळ हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील ओबीसी नेते, तर मुंडे हे हिंदुत्ववादी - ब्राह्मणवादी भाजपमधील ओबीसी नेते. त्या दोन पक्षांतील ज्येष्ठ ओबीसी नेते फोडून काँग्रेसमध्ये आणले की काँग्रेसला बळकट ओबीसी चेहरा मिळेल आणि भाजप व राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष विकलांग होतील, असा अफलातून ‘गेम’ अहमद पटेल यांनी केला आहे! पण मुंडेंनी पक्षातच सुषमा स्वराज यांच्याशीच हातमिळवणी करून गडकरींना काटशह दिला. (आमच्या मते सुषमा स्वराज यांचीच अहमद पटेल यांच्याबरोबर गुप्त भेट झाली असून, स्वराज व मुंडे दोघेही एकत्रितपणे काँग्रेसमध्ये येतील, सुषमा-गोपीनाथ यांच्यातील तोच गुप्त करार आहे!) तसे झाले तर मुंडे वा गडकरींची नव्हे तर भाजपची अवस्था केविलवाणी होऊ शकेल. रामदेवबाबांची स्थिती कशी केविलवाणी झाली हे आपण पाहिलेच आहे. योगमहर्षींच्या बंडाचा असा ‘फियास्को’ झाल्यावर भाजपने पुन्हा अण्णांच्या ‘सिव्हिल सोसायटी’च्या माध्यमातून सरकारला आव्हान दिले आहे. आता भाजप आणि ‘टीम अण्णा’ हे दोघेही केविलवाणे दिसू लागले आहेत. असो. तर आता पुढे मुंडे काय करणार हा प्रश्न नसून, गडकरींचे भवितव्य काय हा मुद्दा आहे. मुंडेंनी तर काँग्रेसमधील दिवाणखान्याच्या किल्ल्या घेऊन भाजपच्याच बंगल्यात राहायचा निर्णय (आज) घेतला आहे.
    आता मुंडेंनी भाजपच्याच बंगल्यात राहून फक्त गडकरींचीच नव्हे तर थेट नागपूरच्या संघाच्या गडाचीच अडचण केली आहे. कितीही अपमान वा कोंडी झाली तरी बेहेत्तर, आपण अखेरीस पक्षशिस्त मोडायची नाही असा पवित्रा घेऊन पक्षातला गनिमी म्हणजे, अर्थातच मुंडे हे संघाच्या चिरेबंदी वाड्यात मुख्य दरवाजाने आत आले. मुंडेंनी वेगळाच गनिमी कावा शोधून काढला आहे. त्यांनी संघाला कात्रजच्या घाटात पाठवण्याऐवजी स्वत:च, आपल्याच शिंगांना मशाली लावून ते घाटात शिरले. नागपूरकरांना वाटले की, मुंडे कात्रजच्या घाटात शिरले. पण आठवडाभरात मुंडे घाटातून परत आले आणि थेट मुख्य दालनात हजर झाले. असे का घडले यावर संघाने एक चौकशी समिती नेमली आहे. समितीच्या प्राथमिक चाचपणीनुसार आता पूर्वीप्रमाणे कात्रजचा घाट उरलेलाच नाही. राष्ट्रवादीच्या बड्या बड्या नेत्यांनी तो घाट आता बिल्डर-काँट्रॅक्टरांकडे सुपूर्द केल्यामुळे त्या परिसरात कुणी श्ािंगांना मशाली लावून शिरले तर त्यांना हाकलण्यात येते. म्हणून हल्ली शरद पवार कुणालाही कात्रजच्या घाटात पाठवण्याऐवजी ‘मातोश्री’वर पाठवितात. पण ‘मातोश्री’वर आठवले होतेच, म्हणून मुंडेंनी जरा दिल्लीला फेरफटका मारून यायचे ठरविले. त्या फेरफटक्यात ते अहमद पटेल यांना भेटले की नाही हे सत्य कधीच बाहेर येणार नाही आणि अहमद पटेल कधीही कशाचीच वाच्यता करीत नाहीत. त्यामुळे मुंडेंचा हा भूलभुलय्या आपल्याला नेहमीच संभ्रमित करीत राहील.

Trending