आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केजरीवाल गोत्यात( अग्रलेख)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दोन कोटी रुपयांची लाच घेतल्याचा सनसनाटी आरोप त्यांच्या मंत्रिमंडळातील निलंबित जलसंधारणमंत्री कपिल मिश्रा यांनी केला आहे. या पद्धतीचे आरोप भारताच्या राजकारणात नवे नाहीत व त्यांची न्यायालयात शहानिशा होण्याचीही शक्यता धूसर असते. पण असे आरोप करून राजकीय प्रतिमा मलिन करता येते. जनतेमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम, संशय निर्माण करता येतो. पक्षात बेदिली माजते, बंडखोरांचा आवाज वाढतो आणि तेवढे डॅमेज साधले तरी खूप काही साध्य होते. 

केजरीवाल यांनी अशा ट्रिक चार वर्षांपूर्वी वापरल्या होत्या. स्वत:ला निष्कलंक, नि:स्पृह, प्रामाणिक, देशप्रेमी घोषित करून त्यांनी लोकपालसाठी यूपीए सरकारच्या विरोधात आंदोलन सुरू केले होते. त्यात मीडियाने बड्या पदावरचा एक प्रामाणिक-नि:स्पृह वरिष्ठ अधिकारी (तोही इन्कम टॅक्स खात्यातला), माहितीच्या अधिकार चळवळीतील योगदानानिमित्त मिळालेले प्रतिष्ठेचे मॅगसेसे अवॉर्ड आणि लोकांना त्यांच्या मूलभूत हक्कांची जाणीव करून देणारा, साधी चप्पल घालणारा अँग्री यंग मॅन अशी त्यांची प्रतिमा उभी केली होती. वाचकांना आठवत असेल - आम आदमी पार्टी स्थापन होईपर्यंत केजरीवाल टीआरपीला चटावलेल्या टीव्ही मीडियाला हाताशी धरून रोज काँग्रेसविरोधात भ्रष्टाचाराचे नवे आरोप करत सनसनाटी निर्माण करत होते. 

टीव्ही पडद्यावर प्रकरण जाण्याअगोदर एखाद्या थ्रिलरप्रमाणे ते व्यवस्थित सस्पेन्स तयार करत असत. तथाकथित पीडित-शोषित जनतेसाठी सविनय कायदेभंगाचा देखावा त्यांनी उभा केला होता. ते स्वतःला ईश्वराने या भारतातील भ्रष्टाचार मिटवण्यासाठी आपल्याला कार्य सोपवल्याचे जाहीरपणे सांगू लागले. त्यांनी तयार केलेल्या आरोपीच्या पिंजऱ्यात केवळ डॉ. मनमोहनसिंग यांचे सरकार नव्हते, तर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा, माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद, भाजपचे नेते नितीन गडकरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी, त्यावेळचे गुजरातचे मुख्यमंत्री मोदी, उद्योजक अंबानी वगैरे वगैरे होते. 

टीव्ही पडद्याची घराघरांत पोहोचणारी क्षमता केजरीवाल यांनी जोखली होती. सातत्याने अपप्रचार, बेलगाम व नकारात्मक बोलण्यामुळे ते मध्यमवर्गात अतिशय लोकप्रिय झाले. यातून दिल्लीच्या जनतेने त्यांना भरभरून मते दिली होती. देशात मोदींची लाट असताना दिल्लीकरांनी मोदींकडे साफ दुर्लक्ष करून केजरीवाल यांच्याकडे दोनदा सत्तेच्या चाव्या दिल्या. पहिले काही दिवस सुरळीत गेले, पण त्यांचा संघर्ष दिल्लीच्या नायब राज्यपालांपासून पंतप्रधानांपर्यंत वाढत गेला. सामाजिक कार्यकर्त्याच्या दृष्टिकोनातून राजकारण करणे व नवा पक्ष स्थापन करून सत्तेत येऊन राजकारण करणे यामध्ये प्रचंड अंतर असते. केजरीवाल आहिस्ते आहिस्ते राजकारण िशकत गेले व ते जेव्हा पूर्ण राजकीय नेते झाले (भाजपची खात्री झाली) तेव्हा त्यांच्या कामाची गोळाबेरीज सुरू झाली. पहिल्यांदा शासकीय कामातील उणिवा व आता थेट भ्रष्टाचाराचा आरोप. 

नुकताच दिल्ली मनपा निवडणुकीतील पराभव व त्यापूर्वी पंजाब, गोवा विधानसभा निवडणुकांमध्ये सोसावी लागलेली मानहानी यांचा फटका केजरीवाल यांना बसला असताना त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप होणे याचा एक अर्थ असा की, भाजपने त्यांची रणनीती अधिक आक्रमक करण्याचे ठरवलेले दिसते. त्याला साथ अर्थातच आपमधल्या अनेक असंतुष्टांची आहे. असे असंतुष्ट भाजपला हवेच आहेत. कारण केजरीवाल यांच्यावर त्यांच्या स्वकीयांच्या बंदुकांमधून सुटलेली गोळी भाजपला राजकीयदृष्ट्या फायद्याची आहे. 

काँग्रेसने केलेले आरोप लोकांनाही पटत नाहीत. त्यात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे तातडीने केजरीवाल यांच्यावर टीका करण्यासाठी सरसावले आहेत. त्याचा फायदा भाजपलाच होणार आहे. कारण अण्णांची भ्रष्टाचाराविरोधातील लढाई भाजपविरोधात नाही हे एव्हाना स्पष्ट झालेले आहे. त्यांच्या लेखी केजरीवाल हे आता खलनायक आहेत. कारण त्यांच्या स्वप्नातला “भ्रष्टाचारमुक्त भारत’ केजरीवाल साध्य करू शकत नाहीत अशी त्यांची खात्री पटलेली आहे. 

एकुणात २०१० ते २०१४ या काळात केजरीवाल यांनी भ्रष्टाचार नावाचे एक अक्राळविक्राळ भूत अराजकीय पद्धतीने देशाच्या राजकारणात जन्मास घातले होते. ते भूत आता त्यांच्या मानगुटीवर बसले आहे. त्यातून सोडवणूक करण्यासाठी ज्या काही राजकीय करामती कराव्या लागतात त्या त्यांच्याकडून ओघाने होणारच आहेत. पूर्वी ते मंत्रिपदावर बसलेल्यांचा राजीनामा मागत होते, आता त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक करत आहेत. केजरीवाल यांची आता खरी राजकीय इनिंग सुरू होत आहे.
बातम्या आणखी आहेत...