आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनोख्या ‘डॉग रेस’चा आँखो देखा थरार...!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मधली मोकळी जागा सोडून दुतर्फा लोकांची गर्दी जमली होती... जो तो मान उंचावून काही दिसते का ते पाहत होता... खांद्यावर बसलेली लहान मुले उगीचच चुळबुळ करत होती... तांबड्या मातीवर पांढ-या चुन्याने लांबलचक रेषा आखण्यात आल्या होत्या. पटांगणाच्या दुतर्फा जमलेल्या गर्दीला आवरता आवरता पोलिसांच्या नाकी नऊ येत होते... 'ए भाड्या, मागं व्ह की' अशी जरब देऊन मागे लोटलेली गर्दी पोलिसाची पाठ फिरताच अतीव उत्सुकतेने पुन्हा पुन्हा वाकून शर्यतीची सुरुवात कधी होणार याचीच आतुरतेने वाट पाहत पुढे पुढे येत होते... अचानक शांतता पसरली... सगळ्यांचेच श्वास रोखले गेले. शिट्टी वाजली आणि एकच गलका उडाला. पाटलांच्या ‘वाघ्या’ने बाजी मारली होती. अत्यानंदाच्या भरात पाटलांनी ‘वाघ्या’ला उचलून घेतले...
सातारा येथील औंध संस्थानात रंगलेली ही बैलांची किंवा घोड्यांची नव्हे तर चक्क कुत्र्यांची शर्यत होती! ही शर्यत संपूर्ण महाराष्ट्राच्या विशेषत: पश्चिम महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात मानाची समजली जाते. महाराष्ट्रातल्या बहुतेक भागांत बागायतदार शेतकरी कुत्रे पाळतात. आवारात घुसणा-या आगंतुकांवर धावून जाणारे कुत्रे शर्यत खेळू शकतात, ही कल्पना पहिल्यांदा ज्याच्या डोक्यात आली, त्याला तर लोकांनी वेड्यातच काढले असेल. 'यमाईदेवी'च्या जत्रेच्या काळात औंध संस्थानात होणारी कुत्र्यांची शर्यत पाहिली आणि त्या बेट्याच्या कल्पनाशक्तीचे कौतुक वाटल्यावाचून राहिले नाही. औंध संस्थानात जत्रेच्या निमित्ताने कुस्ती, शरीरसौष्ठव स्पर्धा, कुत्र्यांची शर्यत असे वेगवेगळे कार्यक्रम राबवले जातात. सातारा जिल्ह्यातल्या औंधसारख्या छोट्याशा संस्थानात मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी कुत्र्यांची शर्यत होणार हे ऐकल्यावर गावातल्या हौशी लोकांनी पाळलेल्या सामान्य कुत्र्यांची शर्यत असेल असा गावात आलेल्या पाहुण्यांचा गैरसमज होतो. सामान्यपणे गावातले पाळलेले कुत्रे हे रस्त्यावर फिरणा-या सामान्य कुत्र्यांसारखेच दिसतात.
ज्या मैदानावर कुत्र्यांची शर्यत होणार होती, तेथे भल्या सकाळी शर्यतीची तयारी सुरू झाली होती. तांबड्या मातीवर पाण्याचा हबकारा मारल्यानंतर दरवळणारा सुगंध पहाटेच्या बोच-या वा-यातही अनोखे सुख देत होता. शाळेतल्या अर्ध्या चड्डीतल्या मुलांनी पटापटा ओल्या मातीवर पांढ-या चुन्याने लांबलचक पट्टा आखण्याचे काम सुरू केले. दोन्ही बाजूंनी गर्दीला आवरण्यासाठी सुतळी लावण्यात आली. लोखंडी स्प्रिंग गुंडाळलेले एक मशीन आणून एका टोकाला ठेवण्यात आले. ते मशीन नेमके कसले आहे, हे काही कळायला मार्ग नव्हता. हारतुरे, नारळ अशी सगळी जय्यत तयारी करण्यात आली. हळूहळू मोठमोठ्या गाड्या भरून लोक येऊ लागले. प्रत्येक गाडीतून उतरणा-यांमध्ये किमान दोन ते तीन रुबाबदार कुत्र्यांचाही समावेश होता. त्यापैकी अधिकतर केवळ शर्यतीसाठी नावाजलेल्या 'ग्रेहाऊंड' जातीचे कुत्रे होते. लांबलचक तोंड, काटक शरीर आणि उंच पायांचे ते कुत्रे पाहून शर्यत किती चुरशीची होणार याचा अंदाज प्रत्येकाला आला होता.
सातारा, कोल्हापूर इतकेच नव्हे तर अगदी परभणीपासून हौशी गड्यांनी आपापल्या कुत्र्यांना या शर्यतीसाठी तयार केले होते. थोडेथोडके नव्हे तर तब्बल 156 कुत्र्यांनी या शर्यतीत भाग घेतला होता. सकाळी आखलेल्या पट्ट्यांच्या मधोमध एक लांबलचक स्प्रिंग जवळपास एक किलोमीटर लांबपर्यंत खेचण्यात आली होती.(त्या वेळी स्प्रिंग गुंडाळलेल्या मशीनचा उलगडा झाला.) या स्प्रिंगवर एका पत्र्याच्या गाडीला खोटा ससा बांधला होता.
ज्या रेषेवर कुत्र्यांना उभे करण्यात आले होते त्या रेषेपर्यंत हा ससा खेचून नेण्यात आला. 'गेट सेट गो' झाल्यावर सशाची दोरी सोडली गेली की स्प्रिंगमुळे तो ससा पटकन दुस-या टोकाला जात असे आणि सतत कसलातरी पाठलाग करायला शिकवलेले ते कुत्रे वा-याच्या वेगाने त्या सशाचा पाठलाग करीत. 'ग्रेहाऊंड' जातीचे कुत्रे चित्त्याच्या खालोखाल वेगात धावू शकतात. त्यामुळे शिट्टी वाजली की ते कुत्रे 'चौखुर' उधळत असत. कुत्र्यांची संख्या जास्त असल्याने ही शर्यत गटागटात खेळली जात होती. एका गटात पहिल्या आलेल्या कुत्र्यांना त्याचे मालक आंजारत गोंजारत होते. काही मालक कुत्र्यांच्या स्नायूंना आराम मिळावा म्हणून पाय दाबत पुढच्या गटात विजयी होण्यासाठी तयार करत होते.
एरवी, 'पेडीग्री', 'अडथळ्यांची शर्यत' तसेच कुत्र्यांना सजवण्याचे कौतुकसोहळे केवळ परदेशातच जास्त लोकप्रिय होतात असे मानले जात होते, मात्र महाराष्ट्रातील औंधसारख्या एका संस्थानात होणारा हा उत्सव नक्कीच लक्ष वेधून घेणारा होता. मुख्य म्हणजे, प्रत्येक श्वानमालकाने केवळ शर्यतीसाठी आपापल्या प्रिय कुत्र्यांना ट्रेनिंग दिले आणि त्यांचे संगोपन केले होते. या स्पर्धेतले 5000 रुपयांचे पहिले पारितोषिक कोणी जिंकले, हे महत्त्वाचे नव्हते कारण आपला कुत्रा शर्यतीत भाग घेतोय याचाच अभिमान प्रत्येक श्वानमालकाच्या चेह-यावर स्पष्टपणे दिसत होता. शर्यत.. मग ती घोड्यांची असो वा कुत्र्यांची, उत्सूकता, धाकधूक आणि जल्लोष मात्र एकसारखाच होता.
bhingarde.namrata@gmail.com