आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादचे शिल्पकार : डॉ. रफिक झकेरिया

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. रफिक झकेरिया एक उत्तम प्रशासक तर होतेच, शिवाय ते भारतातील अग्रगण्य मुस्लिम विचारवंतांपैकी एक होते. 9 जुलै हा त्यांचा स्मृतिदिन. त्यानिमित त्यांना विनम्र अभिवादन.
आशिया खंडातील सर्वाधिक वेगाने वाढणारे शहर म्हणून औरंगाबाद शहराची ओळख आहे. अशा या आधुनिक औरंगाबाद शहराचे शिल्पकार सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व, इस्लामचे गाढे अभ्यासक आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे विचारवंत डॉ. रफिक झकेरिया यांचा 9 जुलै हा स्मृतिदिन. त्यानिमित त्यांना विनम्र अभिवादन.
डॉ. रफिक झकेरिया यांचा औरंगाबाद शहराच्या विकासाचे जनक म्हणून महाराष्ट्रभर परिचय आहे. चिकलठाणा औद्योगिक वसाहत, जायकवाडी पाणीपुरवठा योजना, सिडको-हडकोच्या योजना औरंगाबादकरांच्या मोठ्या उपलब्धी मानल्या जातात. मूळचे नालासोपारा येथील असलेले डॉ. रफिक झकेरिया अतिशय हुशार होते. मुंबई विद्यापीठातून सुवर्णपदक घेऊन ते एमए झाले. नंतर त्यांनी लंडनमध्ये डॉक्टरेट मिळवली. डॉ. झकेरिया यांचा विद्यार्थिदशेतच स्वातंत्र्य चळवळीशी संबंध आला. महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या प्रेरणेने ते सक्रिय राजकारणात आले. 1962 मध्ये त्यांनी औरंगाबादेतून विधानसभेची पहिली निवडणूक लढवली आणि त्यानंतर औरंगाबादमधून तीन वेळा ते निवडून आले. सुमारे 15 वर्षे ते महाराष्ट्रात विविध खात्यांचे मंत्री होते. सिडको, औरंगाबादचे औद्योगिकीकरण आणि राज्यातील नगरपालिकांच्या कारभारात सुसूत्रता आणण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न ही त्यांच्या कार्यकाळातली ठळक कामगिरी मानली जाते.
राज्य मंत्रिमंडळात पंधरा वर्षे प्रतिनिधित्व केल्यानंतर 1978 मध्ये ते राज्यसभेवर निवडून गेले. दिल्लीत डॉ. झकेरिया यांना तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. ते सभागृहाचे उपनेते होते. पुढे 1984 मध्ये भारत सरकारचे विशेष दूत म्हणून त्यांनी मुस्लिम राष्टांचा दौरा केला. डॉ. झकेरिया यांनी संयुक्त राष्टात भारताचे प्रतिनिधी म्हणून 1965, 1990, 1996 या वर्षी यशस्वीपणे कार्य केले. राजकारण, समाजकारण याबरोबरच शिक्षण क्षेत्रातील त्यांची कामगिरीही महत्त्वाची ठरली. औरंगाबाद शहरात मौलाना आझाद महाविद्यालय ही संस्था उभारून त्यांनी मुलींच्या शिक्षणावर प्रामुख्याने भर दिला होता. ते अलिगड मुस्लिम विद्यापीठाचे कुलपतीही होते. तसेच हिंदू-मुस्लिम एकता हे त्यांच्या जीवनाचे ध्येय होते. मुस्लिम समाजाने शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात यावे यासाठी ते सतत प्रयत्नशील होते. जागतिक पातळीवरील अनेक मासिके, वृत्तपत्रांतून त्यांनी लेखन केले. त्यात धर्मनिरपेक्षता, इस्लाम, हिंदू-मुस्लिम ऐक्य, देशाची फाळणी यासंबंधी विषयांचा समावेश आहे.
डॉ. रफिक झकेरिया एक उत्तम प्रशासक तर होतेच, शिवाय ते भारतातील अग्रगण्य मुस्लिम विचारवंतांपैकी एक होते. आंतरराष्टीय पातळीवर त्यांना भारतीय राजकारणातील हुशार व्यक्तिमत्त्व म्हणून संबोधले जाई. सामाजिक क्षेत्रात त्यांनी 50 वर्षे अखंडपणे सेवा केली. विविध भारतीय व परदेशी वृत्तपत्रे, नियतकालिकांतून त्यांचे लेखन प्रसिद्ध झाले आहे. डॉ. झकेरिया यांनी एकूण 17 पुस्तके लिहिली. त्यामध्ये विशेषत: भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावरील ‘ए स्टडी आॅफ नेहरू,’ ‘रझिया : क्वीन आॅफ इंडिया,’ ‘राइज आॅफ मुस्लिम इन इंडियन पॉलिटिक्स,’ ‘हंड्रेड ग्लोरियस इअर्स,’ ‘महंमद अ‍ॅँड कुराण,’ ‘दि वाइडनिंग डिव्हाइड’, भारत-पाक फाळणीवरील ‘प्राइस आॅफ पार्टिशन,’ महात्मा गांधी आणि मुस्लिमांमधील संबंधांवर आधारित ‘गांधी अ‍ॅॅँड द ब्रेकअप आॅफ इंडिया,’ ‘डिस्कव्हरी आॅफ गॉड,’ बॅरिस्टर जीना यांच्याविषयी ‘द मॅन हू डिव्हायडेड इंडिया’ तसेच नुकतेच 2004 मध्ये प्रकाशित झालेले त्यांचे बहुचर्चित ‘इंडियन मुस्लिम व्हेअर हॅव दे गॉन रॉँग,’ इत्यादी पुस्तकांचा समावेश आहे. डॉ. झकेरिया यांनी मुंबई उच्च न्यायालयातही काम केलेले असून दुसºया महायुद्धाच्या वेळी त्यांनी ‘न्यूज क्रॉनिकल व ‘द आॅब्झर्व्हर’(लंडन) या वृत्तपत्रांत लिखाण केले होते. तसेच ‘टाइम्स आॅफ इंडिया’मध्ये त्यांचा स्तंभ अनेक वर्षे चालू होता.
डॉ. झकेरिया यांनी स्थापन केलेली मौलाना आझाद एज्युकेशनल ट्रस्ट ही गुणवत्तेची परंपरा लाभलेली शैक्षणिक संस्था. 1963 पासून आजपर्यंत संस्थेने गुणवत्तेचा दर्जा टिकवून ठेवला आहे. हा दर्जा टिकवून ठेवण्यामध्ये डॉ. रफिक झकेरिया यांच्यानंतर संस्थेच्या विद्यमान अध्यक्षा फातेमा झकेरिया यांनी कोणतीही कसर ठेवली नाही, हे संस्थेच्या भरभराटीवरून दिसून येईल. आज डॉ. झकेरिया यांच्या स्वप्नातील गुणवत्तेची परंपरा सांगणारे महाविद्यालय असा लौकिक मिळवून वटवृक्षाप्रमाणे वाढलेल्या इतर ज्ञानशाखा व अद्ययावत सुविधा पाहून पै. डॉ. रफिक झकेरिया यांना निश्चितच आनंद झाल्यावाचून राहणार नाही. एकूणच मौलाना आझाद महाविद्यालय हे सर्वसामान्य गरीब, होतकरू विद्यार्थ्यांना विचारात घेऊन स्थापन झालेले आहे. येथे संख्यात्मकपेक्षा गुणात्मक दर्जाला महत्त्व आहे, हे आपल्याला महाविद्यालयाच्या शिस्तप्रिय प्रशासनावरून दिसून येईल. तेव्हा डॉ. रफिक झकेरिया यांच्या स्वप्नांना सत्यात उतरवणे हीच त्यांना भावपूर्ण आदरांजली ठरेल.