आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ. रफिक झकेरिया : आश्वासक नेता

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंडित जवाहरलाल नेहरू यांनी अनेकांना राजकारणात आणले आणि त्यांच्याकडून राष्‍ट्रीय हिताची कामे करून घेतली. जसे पंडित नेहरूंनी अनेकांना प्रवृत्त केले तसे अनेकांनी नेहरूंकडे, नेहरूंच्या कामाकडे, त्यांच्या काम करण्याच्या शैलीकडे पाहून राजकारणात प्रवेश केला. अशा अनेकांमध्ये व्ही.के.कृष्णन यांचे नाव होते. त्यांच्याचबरोबर काम करणारे डॉ.रफिक झकेरिया हेही नेहरूंच्या कार्यशैलीच्या प्रभावाखाली येऊन राजकारणात आले व त्यांनी कामास सुरुवात केली. नेहरूंनीही त्यांना नेमके याच वेळी महाराष्‍ट्रात काम करण्याची सूचना कली. लंडनमध्ये सुरू असलेल्या चळवळीतून प्रभावित झालेले डॉ. झकेरिया राजकारणाकडे आकर्षित झाले.


महाराष्‍ट्रात त्या वेळी थोडीबहुत उलथापालथ होत होती, नेहरूंनी त्यांना हेरले आणि औरंगाबादमधून विधानसभेची निवडणूक लढवण्यास सुचवले. त्याप्रमाणे डॉ.रफिक झकेरिया यांनी 1962 मध्ये काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले. त्यांना मंत्रिमंडळात घेण्यात आले. त्यांना मुख्य प्रतोद म्हणून काँग्रेस विधिमंडळ पक्षात स्थान देण्यात आले. 1960 ते 1962 या काळात ते मुख्य प्रतोद होते. त्या काळी मंत्रिमंडळ त्रिस्तरीय असायचे आणि त्यात डॉ.झकेरिया हे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपमंत्री होते. अल्पसंख्याक समाजाचे पुरोगामी विचारांचे आणि बॅरिस्टर झालेले असे हे झकेरिया. त्यांनी आपली राजकीय कारकीर्द अशा प्रकारे सुरूकेली. त्यांचे सर्व शिक्षण मुंबईत झाले.ते इंग्लंडला शिक्षणासाठी गेले. 1943 ते 48 या काळात ते इंडिया लीगमध्ये कार्यरत होते. वसंतराव नाईकांच्या मंत्रिमंडळात त्यांनी नगरविकास, आरोग्य यासह अनेक खात्यांचा कारभार हाताळला.

मराठवाड्याची पार्श्वभूमी त्या काळात वेगळी होती. हा भाग अविकसित होता. निझामाच्या राजवटीखाली होता. त्यामुळे या विभागाला न्याय देताना विकासाभिमुख दृष्टिकोन असलेला एक पुरोगामी नेता देणे आवश्यक होते. या भागात अल्पसंख्याकांचे प्रमाण जास्त होते आणि नेहरूंना हा अल्पसंख्याक समाज काँग्रेसशी निगडित असावा, त्यांच्या प्रभावाखाली असावा असे वाटत होते. मुळात निझामाच्या राजवटीतही अल्पसंख्याकांची भावना वेगळी होती, अल्पसंख्याकांना स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपण विस्थापित झालो, पोरके झालो असे वाटू नये आणि समाज विकसित व्हावा अशी त्यामागची भूमिका होती. औरंगाबाद शहरात नवीन औद्योगिक वसाहत उभारली, नव्या उद्योगांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला गेला. दिल्लीपासून प्रयत्न होत होते आणि राज्य सरकारने त्या धोरणाचा पाठपुरावा करीत औरंगाबाद शहराचा विकास केला.

सिडकोची स्थापना केली, सिडकोसाठी मोठ्या प्रमाणात जमीन संपादन करण्यात आली. सिडकोच्या लगतच औद्योगिक वसाहत स्थापन करण्यात आली. जेणेकरून तरुणांना काम, शिक्षण, औद्योगिक सुधारणा, रोजीरोटी मिळण्याचा पर्याय अशा एक नव्हे तर अनेक बाबी नव्याने निर्माण करण्यात आल्या. स्थानिक नेत्यांना जवळ करून नवनवी धोरणे आखली गेली. मराठवाडा जनता विकास परिषदेचे प्रमुख आणि ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक गोविंदभाई श्रॉफ, अनंतराव भालेराव, माणिकराव पालोदकर, कल्याणराव पाटील, बाळासाहेब पवार, बाबुराव काळे, नामदेवराव सकपाळ अशा अनेकांना जवळ तर करण्यात आलेच आले, शिवाय भिन्न विचारसरणीच्या लोकांचे मराठवाड्याच्या विकासात मोलाचे योगदान कसे प्राप्त होईल, याची आखणीही झकेरिया यांनी केली. चंद्रगुप्त चौधरी, व्ही.डी.देशपांडे अशा साम्यवादी नेत्यांनाही विकासाच्या कामात सहभागी करून घेण्यात आले. शेतकरी कामगार पक्षाची नेतेमंडळीही मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांचाही सहभाग घेण्यात आला.


एक विद्वान, डाव्या विचारांचा, अल्पसंख्याक समाजाचा राहूनही जातिभेदामध्ये न अडकणारा असा हा नेता बाबरी मशिदीच्या विध्वंसानंतर खूपच अस्वस्थ झाला होता. मुंबईत झालेल्या दंगलीच्या वेळी त्यांच्याकडे देशभरातल्या अल्पसंख्याक नेत्यांची बैठक झाली होती. त्या वेळी या समाजाने काही भूमिकाही घेतली होती. त्याची जाहीर वाच्यताही झाली होती. झकेरिया यांनी इंदिरा गांधींच्या निधनानंतर आपले विचार वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या व्यासपीठांवरून व्यक्त केले होते. या वेळी त्यांचा संवाद मात्र पक्षश्रेष्ठींपासून तुटला होता हीच खरी त्यांची शोकांतिका राहिली.

एक दृष्टा नेता मराठवाड्यात येऊन जवळपास 10-15 वर्षे आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करणारे डॉ. झकेरिया हे एक वेगळेच राजकीय मिश्रण होते. त्यामुळे त्यांच्या जाण्याने मराठवाड्याच्या जनतेला एक चुटपुट लागली. अनेक वर्षांचा सहभाग अचानक गायब झाला आणि एक उमदा, दूरदृष्टीचा नेता गेला ही भावना आजही औरंगाबाद शहरात कायम आहे. संस्था उभ्या केल्या, माणसांचा समूह उभा केला, तरुणांमध्ये जागृती निर्माण केली आणि विकासाचे स्वप्न अस्तित्वात आणण्याचा प्रयत्नही केला. बदलत्या राजकारणात कमी पडलो ही भावनाही त्यांच्या मनात कायम राहिली. आजच्या औरंगाबाद शहराला त्यांच्यामुळे एक आगळेवेगळे रूप मिळाले ही बाब नाकारता येत नाही.