आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सचिनची ‘धावती’ भेट!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संपूर्ण देश गेल्या दोन दिवसांपासून ‘सचिनमय’ होऊन गेला आहे. त्याच्या क्रिकेट कारकीर्दीचा लेखाजोखा वाचताना अनेकांना गतकाळातील काही आठवणींना उजाळाही मिळतो आहे. सचिनचे वडील रमेश तेंडुलकर यांच्या सहवासात काही दिवस राहिलेले संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. यू. म. पठाण यांची ही आठवण...
आजकालच्या मनोहर सचिनमय दिवसाचा मीही मनसोक्त आनंद लुटला आहे व लुटतही आहे. या वेळी सचिननं आंतरकीर्तीच्या हिमालयाचं एव्हरेस्ट शिखर गाठलं, याचा जसा आनंद होत आहे व
अभिमानानं ऊर भरून येत आहे. त्याचप्रमाणे आता सचिन क्रिकेटमधून निवृत्त होणार, याचं दु:खही होत आहे.
वृत्तपत्रातून गेले कित्येक दिवस सचिनविषयी रकानेच्या रकाने नव्हे तर पानंच्या पानं भरभरून येत आहेत. तसतसं आपणा सर्वांचं मनही आनंदानं ओसंडत आहे. माझा नि क्रिकेटचा संबंध काय, असा प्रश्न तुमच्या मनात निर्माण होईल व तो मुळीच अप्रस्तुत नाही. संशोधकानं किंवा संतसाहित्याभ्यासकानं चित्रपट जसे पाहू नयेत तसंच क्रिकेटही पाहू नये, असा एक अ-लिखित संकेत आहे, पण मी त्याला अपवाद आहे. चित्रपटाप्रमाणं मला क्रिकेटही आवडतं व त्यामुळंच मी सर्वात मोठं योगदान दिलंय ते हे की, मी क्रिकेट कधीच खेळलो नाही!
सचिन नि त्याचं क्रिकेट याविषयी काहीही लिहिण्याचा मला कोणताही अधिकार नाही, पण आज मी त्याच्याविषयी लेख लिहित आहे, याचं कारण वृत्तपत्रात त्याच्या बालपणाविषयीही आलेले लेख व त्याच्या बरोबर तेंडुलकर वहिनींची म्हणजे सचिनच्या आईची प्रसिद्ध झालेली छायाचित्रं नि सचिनच्या बालपणाचीही चित्रं . विशेषत: ‘दिव्य मराठी’ च्या (14 नोव्हेंबर) अंकातलं रजनीताईंच्या लेखासोबत असलेलं सचिनच्या बालपणीचं चित्र. त्यात वडील नि माझे स्नेही कवी रमेश तेंडुलकरही आहेत. रमेश तेंडुलकर आज आपल्यात नाहीत नि सचिन तर मला ओळखणं शक्यच नाही. कारण या चित्रातील सचिनपेक्षा मी एकदा नि केवळ एकदाच पाहिलेला -सचिन आणखी लहान होता. रजनीताईंची नि माझी भेटही एकदाच झाली. त्यामुळं त्याही मला विसरल्या असणार. मी जो प्रसंग या लेखात सांगत आहे, तोही त्या विसरल्या असणारच.
ही फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. रमेश तेंडुलकरांच्या कविता जरी मी ‘सत्यकथे’ त वाचल्या असल्या तरी त्यांची नि माझी पहिली भेट मात्र मुंबई विद्यापीठातच झाली. एम. ए. (मराठी) च्या परीक्षेचे आम्ही दोघेही प्राश्निक व परीक्षक होतो व या समितीचे ते प्रमुख होते. मी दादरच्या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या अतिथिगृहात राहिलो होतो. तिथं रमेश येत असत. मग आम्ही दोघं बसने विद्यापीठात जात असू. असं दोन-तीन वर्षे घडलं. त्या दरम्यान केव्हा तरी रमेश तेंडुलकर म्हणाले, तुम्ही इतक्यांदा मुंबईला आलात पण आमच्या घरी आला नाहीत. आज तुम्ही आपलं काम संपल्यावर आमच्याकडेच जेवण करा. मग असेच एकदा बसनंच विद्यापीठातून त्यांच्या घरी गेलो. वेळ दुपारची असावी. वहिनी शाळेतून परत आल्या होत्या. आम्ही दोघंच डायनिंग टेबलवर जेवत होतो. वहिनी वाढत होत्या. त्या वेळी लहानगा सचिन कुठून तरी धावत-पळतच आला होता. तो शनिवार असल्यानं शाळा सकाळी अर्धा दिवसच होती. मी त्याला पूर्वी कधीच पाहिलं नव्हतं, तेव्हा वहिनीच म्हणाल्या, ‘हा आमचा सचिन’
‘तो कोणत्या वर्गात आहे?’ असं विचारण्याऐवजी मी चुकून विचारलं, ‘हा काय करतो?’ तेव्हा रमेश तेंडुलकर म्हणाले, ‘हा क्रिकेट खेळतो.’ तेवढ्यात थोडंफार खाऊन सचिन पुन्हा कुठं पसार झाला, ते कळलंच नाही. त्यावर वहिनी म्हणाल्या, ‘क्रिकेट खेळायला गेला असेल!’ असं रात्रंदिवस क्रिकेटमय झालेलं ते घर आठवतच मी दादरला परतलो. पुढं रमेश तेंडुलकर मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या मराठी संशोधन पत्रिकेचे संपादक झाले. त्या वेळी मी पत्रिकेत बरेच शोध-लेख लिहिले. ‘महानुभवांच्या सांकेतिक क्रियांची उत्पत्ति-मीमांसा’ हा त्यातील महत्त्वाचा लेख. या काळात माझा नि रमेश तेंडुलकर यांचा बराच पत्रव्यवहारही होत असे. त्यानंतर ते मला भेटले, ते मी 1990 साली 63 व्या अ. भा. मराठी साहित्य संघाने आयोजित केलेल्या सत्काराच्या वेळी. अध्यक्ष गंगाधर गाडगीळ होते. माझा परिचय करून दिला होता रमेश तेंडुलकरांनी. हीच माझी नि त्यांची शेवटची भेट. आज सचिन ज्या शिखरावर आहे, ते शिखर रमेश तेंडुलकरांनी पाहायला हवं होतं.