आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंधश्रद्धेला लाभलेला राजाश्रय

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंधश्रद्धा हा भारताला लागलेला जुनाट रोग आहे. भल्या-भल्या नास्तिकांचीही यातून सुटका नाही. गंडे, दोरे, काळी बाहुली, ताईत, पेटी, अंगारे, धुपारे, तांत्रिक-मांत्रिक, आसरा, भुताटकी, वारू, अंगात येणे, चालकबाऊ, भानामती, जादूटोणा, मूठ मारणे, सकून बघणे, चेटूक (चेटकीण), गळ टोचून घेणे, नवस फेडणे, प्राणिमात्रांचा बळी देणे आणि नरबळीपर्यंत या अंधश्रद्धेने मजल गाठली आहे. मागील अज्ञानयुगात याची बरीच चलती होती; पण सध्याच्या विज्ञान, संगणकीय युगातही शरीरशास्त्र व वैद्यकशास्त्राला तिलांजली देऊन अंधश्रद्धेतील या विकृती माणसाला अज्ञान व अंधारयुगात घेऊन जात आहेत. यात अजून आश्चर्याचा भाग असा की, खेड्यापाड्यातून या विकृती चालत तर आहेतच; पण शहरात उच्चभ्रू समाजापासून ते थेट राजकीय लोकप्रतिनिधी शासन-प्रशासनातील काही अधिकारी, व्यक्ती यासुद्धा आहारी गेल्याचे सध्याचे चित्र आहे. वैयक्तिक स्वरूपाची भक्ती, श्रद्धा, होमहवन, कर्मकांड याबद्दल कोणाचा आक्षेप असण्याचे कारण नाही, हा तर प्रत्येकास संवैधानिक हक्कच आहे; पण या श्रद्धेतून अंधश्रद्धा, प्राणिमात्रांचा बळी व पुढे थेट नरबळीच्या घटना हा तर मानवतेचा कडेलोट म्हणावे लागेल. हे प्रकार थांबवू पाहणा-या डॉ. नरेंद्र दाभोलकरांचाच अंधश्रद्धेच्या राक्षसांनी कडेलोट केला. एका प्रांजळ शक्तीचा अंधश्रद्धेनेच बळी घेतला. यात शासनाची सर्व बाबतीत असमर्थता प्रकट होत आहे, महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दाभोलकरांच्या हत्येमागे शासनातीलच काही लोक जबाबदार असल्याचा सनसनाटी आरोप केला होता. म्हणूनच जादूटोणाविरोधी वटहुकूम वर्षानुवर्षे लोंबकळत ठेवून एका भल्या, प्रांजळ कार्यकर्त्याचा बळी जाताच अंधश्रद्धाविरोधीचा अध्यादेश काढण्याची तत्परता दाखवणे म्हणजे स्वत:च्या पापावर पांघरूण घालण्याचा हा प्रकार होता. आजपर्यंत तरी मारेक-यांचा शोध लागलेला नाही. हा सगळा शोकात्म प्रकार पाहून बाबा आढावांसारख्या निष्ठावान सामाजिक कार्यकर्त्यांनी जबाबदार राज्यक र्त्यांच्या नामोल्लेख करून त्यांची कधी नाही एवढी लाज काढली आहे.
एक राजकीय गरज, स्वार्थ म्हणून वटहुकूम, अध्यादेश तर निघाला, त्याच्या अंमलबजावणीचे तर सोडाच, विरोधी सूरच जास्त उमटत आहेत. सदरील वटहुकूम, अध्यादेशाला भारतीय धर्मसत्ता, संस्कृतीवरील आक्रमण अशीही ओरड केली गेली. यातून हेच सिद्ध होत आहे की, एकूणच अंधश्रद्ध भारतीय माणूस हा बदल स्वीकारू इच्छित नाही. मग यात अध्यात्मातील वेदांत, सनातन संस्था, कीर्तनकार, वारकरी तरी कसे मागे राहतील? त्यांनी आपले टाळ-मृदंग अध्यादेशाच्या विरोधात जुंपून टाकलेत. परस्परविरोधी दिंड्या निघतच आहेत. संत कबीर, बसवेश्वर, नामदेव, तुकाराम, संत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा यांच्यापासून आताचे प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांच्यापर्यंतच्या कीर्तनकार, वारकरी संप्रदायातील संतांनी बुवाबाजी, ढोंग, पाखंड, हिंसा, सर्व प्रकारची अंधश्रद्धा यावर वज्राघात केले. ही बाब आमचे आताचे वारकरी, कीर्तनकार विसरले आहेत.
याच पुरोगामी महाराष्‍ट्रात पोलिस आरोपी, गुन्हेगारांना पकडण्यासाठी ज्योतिषांची मदत घेत असल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. जोगतीण व देवदासी प्रथा निर्मूलनाचेही हेच त्रांगडे आहे. अंधश्रद्धेत मोडणारं हे एक भलं मोठं विकृत, माणुसकीला काळिमा फासणारं जुनाट प्रकरण आहे. कायदा असूनही या प्रथेला मूठमाती का मिळत नाही? मुळात या देवदासी नसून प्रबळांच्या भोगदासी असल्याचे अनेक वेळा सिद्ध झालेले आहे. हे प्रबळ कोण, हे सांगण्याची गरज नाही. या देवदासी अंधश्रद्धेच्या पारंपरिक, वंशपरंपरागत बळी ठरल्या आहेत. एवढ्यात परवा तर बुवाबाजांच्या स्वप्नावरच देशाचा राज्यकारभार चालत असल्याची प्रचिती येऊन गेली. बुवाच काय प्रत्येक माणसाला काही न काही स्वप्न पडतेच; पण कसलाही गरीब माणूस त्यामागे पळत सुटत नाही. त्यालाही माहीत आहे की, हे काही खरं नसतं, पण आमचं अख्खं शासन, प्रशासन, संबंधित संपूर्ण विभाग स्वप्नातील सोन्याच्या मृगजळामागं दमछाक होईपर्यंत पळालं. खजिन्यावरील हकदारही पुढे आले. पळा पळा कोण पुढे पळे तो! अशी स्थिती निर्माण झाली; पण मृगजळ ते मृगजळच, जगभरात शोभा निघाली, हसे झाले. मोहेंजोदारो-हडप्पा, वेरूळ-अजिंठा यापासून ते 1८-1९, व्या शतकासह अगदी अलीकडच्या काळात पैठण, दौलताबाद रायगड व इतर लहान-मोठी अनेकानेक उत्खनने झालीत; पण ही उत्खनने आख्यायिका व ऐतिहासिक तर्क व विज्ञानाच्या निकषांवर झालेली आहेत वैयक्तिक पातळीवरील कोणतीही श्रद्धा, अंधश्रद्धा, यांची व्याप्ती वाढून व स्वरूप बदलून एकूणच समाजमन बाधित होत असेल. याची मजल थेट नरबळी व शासन व्यवस्थेपर्यंत जात असेल, तर कायद्याने अशा वृत्ती, कठोरपणाने ठेचल्या गेल्या पाहिजेत. संबंधितांवर अंधश्रद्धानिर्मूलन कायद्यांतर्गत खटले का दाखल केले जाऊ नयेत? पण असे होणे नाही, कारण यातले भागीदार व वाटाडे तेच असतील, तर काय शक्य आहे?