आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr.Girish Walawalkar Artical On Sharad Pawar Politics

शरद पवारांचे राजकीय आडाखे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शरद पवारांनी आपण या वेळी लोकसभा किंवा विधानसभेची निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं. आपल्याला पक्षकार्याला अधिक वेळ देता यावा, यासाठी आपण हा निर्णय घेतला आहे, असं पवारांनी सांगितलं असलं, तरीही पवारांच्या या निर्णयावर अनेक तर्क-वितर्क मांडले जात आहेत. राजकीय गणितं मांडण्याचं आणि सत्तेचं राजकारण राबवण्याचं पवारांचं कौशल्य आजही वादातीत आहे. याच कौशल्याच्या बळावर गेली चार दशकं पवारांनी राज्याच्याच नव्हे, तर केंद्रातल्या राजकारणावरसुद्धा संपूर्ण पकड ठेवली आहे. एवढेच नव्हे, तर राष्‍ट्रवादी काँग्रेससारख्या केवळ एका विशिष्ट परिस्थितीमुळे, काही राजकीय आडाखे बांधून जन्माला घातल्या गेलेल्या पक्षाचं एकहाती नेतृत्व करत त्या पक्षाला राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात महत्त्वाचं स्थान प्राप्त करून दिलं आहे.
‘सोनिया गांधींचा विदेशी जन्म’ हा मुद्दा घेऊन शरद पवार, पूर्णो संगमा आणि तारिक अन्वर काँग्रेसमधून बाहेर पडले आणि त्यांनी राष्‍ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. तो मुद्दा मुळात संघ परिवार आणि भाजप यांनी पुढे आणला होता. 14 मार्च 1998 रोजी सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्षा झाल्या. त्यामुळे काँग्रेसच्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांपर्यंत पक्षामध्ये उत्साह आला. त्या पाठोपाठ त्याच वर्षी असणा-या विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी सोनिया गांधींनी घेतलेल्या सभांना लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि दिल्ली, मध्य प्रदेश आणि राजस्थान या भाजपची सत्ता असलेल्या राज्यांत भाजपचा पराभव करून काँग्रेस सत्तेवर आली. सोनिया गांधींचा हा वाढता प्रभाव कोणत्याही परिस्थितीत रोखणं हे भाजपसाठी आवश्यक झालं होतं. त्या वेळी वैचारिक गोंधळात सापडलेल्या संघ परिवाराने सोनिया गांधींच्या विदेशी जन्माचा मुद्दा पुढे आणला. संघाने हातात दिलेल्या मुद्द्याचा स्वत:च्या राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी उपयोग होऊ शकतो, असा आडाखा बांधून हाच मुद्दा काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत चर्चेला घ्यावा, अशी पवारांनी विनंती केली; परंतु काँग्रेस कार्यकारिणीने सोनिया गांधींना पाठिंबा देत ही मागणी धुडकावून लावली आणि पाठोपाठ शरद पवार, त्यांचे सहकारी संगमा, तारिक अन्वर यांची पक्षातून हकालपट्टी केली. त्यानंतर आपण आपले स्वत:चे काही खासदार लोकसभेत आणू शकलो, तर आपल्या इतर पक्षातल्या मित्रांच्या सहकार्याने आपली पंतप्रधान बनायची महत्त्वाकांक्षा पूर्ण होऊ शकते, असा विचार करून शरद पवारांनी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर एका स्वतंत्र पक्षाची स्थापना केली आणि त्याला नाव दिलं- ‘राष्‍ट्रवादी काँग्रेस!’ त्यानंतर गेली चौदा वर्षे या पक्षाची यशस्वी घोडदौड सुरू आहे.
राष्‍ट्रवादी काँग्रेस हा पक्ष, त्या पक्षाचे नेते आणि त्यांचे सर्वेसर्वा स्वत: शरद पवारसुद्धा सतत वेगवेगळ्या वादांच्या केंद्रस्थानी राहिले आहेत. असे असूनही येऊ घातलेल्या निवडणुकांमध्येसुद्धा राष्‍ट्रवादी काँग्रेस आणि त्यांचे नेते शरद पवार हे महत्त्वाची भूमिका बजावणार, अशी चिन्हं स्पष्ट दिसत आहेत. येत्या निवडणुकीत भाजप सर्वाधिक जागा मिळवेल आणि मोदी पंतप्रधान होतील, असं भाकीत सर्वत्र वर्तवलं जात आहे. मोदींचं नेतृत्व हे स्वयंकेंद्रित आणि एकाधिकारशाहीने जाणारं आहे. राज्य पातळीवर त्यांची कार्यशैली चालून गेली; परंतु राष्‍ट्रीय पातळीवर मात्र त्यांची ही शैली हीच त्यांची सर्वात मोठी मर्यादा ठरणार आहे. जर भाजपला निर्णायक बहुमत मिळालं नाही आणि इतर पक्षांचं सहकार्य घेऊन संयुक्त आघाडीचं सरकार बनवायची वेळ भाजपवर आली, तर मोदींचं नेतृत्व ही भाजपची सर्वात मोठी डोकेदुखी ठरू शकते. राहुल गांधींच्या नेतृत्वाबद्दलची आपली नाराजी पवारांनी स्पष्टपणे बोलून दाखवली आहे; परंतु सत्तेसाठी बेरजेचं राजकारण हा पवारांच्या राजकारणाचा स्थायीभाव आहे. सत्तेसाठी कधी फारशा पसंत नसलेल्या लोकांशी युती करणं, काहींशी करार करणं, कधी कधी अनधिकृत हातमिळवणी करणं आणि हाती आलेली सत्ता उत्तमपणे राबवत सामान्यांसाठी विकासाची कामं करत त्यांनाही समाधानी ठेवणं, हे पवारांच्या राजकारणाचं सूत्र आहे. जर इतर पक्षांना बरोबर घेऊन संयुक्त आघाडीचं सरकार बनवण्याइतकी मतं काँग्रेस, राष्‍ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षांना मिळाली, तर आजही मुलायमसिंग, ममता बॅनर्जी, जयललिता, नितीशकुमार, मायावती यांचा पाठिंबा मिळवत भाजपविरहित आघाडीचं सरकार बनवण्यामध्ये पवार अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. पवारांचं धुरीणत्व, त्यांनी आतापर्यंत पचवलेली वादळं, पेललेली आव्हानं आणि त्यातून सतत वाढत गेलेली राजकीय प्रगल्भता, या सर्वांचा जर ते योग्य तो मेळ घालू शकले, तर आयुष्याच्या या वळणावर ते त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षांच्या पूर्तीच्या फार जवळ पोहोचू शकतात!