आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुवादकाची शिदोरी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मराठवाड्यातील बीड येथे 8 व 9 फेब्रुवारी रोजी मनुष्यबळ विकास खात्याच्या वतीने आंतरराष्‍ट्रीय परिषद होत आहे. ‘अनुवाद आणि परिभाषा’ या विषयावरील चर्चेत डॉ. यु. म. पठाण यांच्या बीजभाषणातील संपादित अंश...
माझ्या महाविद्यालयीन काळापासून मी हिंदी, उर्दू आणि इंग्रजी कथांचे भावानुवाद करू लागलो होतो. ते लोकप्रिय मराठी साप्ताहिकांत प्रसिद्धही होत होते. यामध्ये कृष्णचंद्र (किशनचंद), सआदत हसन मंटो, प्रेमचंद, ओ हेन्री इत्यादी नामवंत कथाकारांच्या कथांचा भावानुवाद केल्याचे मला स्मरते. हा काळ गेल्या शतकाच्या पूर्वार्धाच्या शेवटचा आणि उत्तरार्धाच्या प्रारंभीचा असावा. भावानुवाद हा अनुवादाचाच एक प्रकार असून त्यात अनुवादक शब्दश: अनुवाद करत नाहीत याची आपणास कल्पना आहेच. शब्दश: अनुवाद करताना ज्या अडचणी येतात त्या भावानुवाद करताना येत नाहीत. त्यामुळे अनुवादकाला भावानुवाद करताना बरंचसं स्वातंत्र्यही असतं. पण मूळ कथावस्तूला नि कथाकाराला योग्य न्याय देण्याची जबाबदारीही त्याच्यावर असते. स्वतंत्र कथा लिहीत असताना लेखकाला जे स्वातंत्र्य असतं ते अर्थातच भावानुवादकाला नसतं. गेल्या शतकाच्या सहाव्या दशकात मी साहित्य अकादमीसाठी दहाव्या शतकातील अरब सिद्धांत ‘अल्बेरूनी’ याच्या ‘तारीख-उल-हिंद’ या ग्रंथाचा मराठी अनुवाद केला. त्याची दुसरी आवृत्ती एक-दोन वर्षांपूर्वीच साहित्य अकादमीनं प्रकाशित केली आहे. त्यामुळे मला ललित साहित्य आणि वैचारिक साहित्य यांचा अनुवाद करताना कोणकोणत्या अडचणी येतात याची कल्पना आली. अलबेरुनीचा मूळ ग्रंथ अरबी भाषेत असून त्याचा अनुवाद प्रथम जर्मन भाषेत व त्यावरून इंग्रजी भाषेत झाला. मी इंग्रजी अनुवादाचा मराठीत हा अनुवाद केला आहे.
मी पवित्र कुराणाच्या पहिल्या पाच-सहा अध्यायांचा मराठीत अनुवाद करण्याचा प्रयत्न केला होता. त्या वेळी अरबीसारख्या सेमिटिक भाषावंशाच्या भाषेतील ग्रंथाचा मराठीसारख्या आर्य भाषावंशाच्या - खरं तर भारतीय आर्य -इंडो आर्यन-भाषावंशाच्या भाषेत अनुवाद करताना आणखी कोणकोणत्या समस्यांची भर पडते याचीही मला कल्पना आली होती. कारण अरबी भाषेतील शब्द त्रिवर्ण धातूपासूनच निर्माण झालेले असून क्लासिकल वाक्यरचनेचे वैपुल्य हे तिचं आणखी एक जटिलपण लक्षणीय वैशिष्ट्य आहे. माझ्या अनुवादविषयक या लेखाच्या पार्श्वभूमीदाखल हे अनुभवकथन हेतुत: केलं आहे.
कोणत्याही ग्रंथाचा अनुवाद करणं ही एक फार मोठी जबाबदारी आहे, असं मला वाटतं. ही वाटचाल करण्यासाठी अनुवादकाजवळ विविध प्रकारचं पाथेय असणं आवश्यक आहे. त्यासाठी अनुवादकाला त्या दोन्ही भाषांचं केवळ ज्ञान असून भागणार नाही, तर त्याला अन्य अनेक बाबीचं ज्ञान आणि भान असणंही आवश्यक आहे. या अन्य बाबी कोणकोणत्या असाव्यात याचा आलेख पुढीलप्रमाणे रेखाटता येईल. (दोन्ही भाषांचं ज्ञान आणि अन्य बाबींची पर्याप्त जाण ही अनुवादकाची अर्हता होय). दोन्ही भाषांचं भाषावैज्ञानिक ज्ञान, भौगोलिक परिसर, प्रदेशाची ऐतिहासिक पार्श्वभूमी, त्या दोन्ही प्रदेशांचे सांस्कृतिक वैशिष्ट्य, दोन्ही भाषांचे अर्थविज्ञान (विशेषत: अर्थच्छटा), त्या प्रदेशाच्या लोकपरंपरा व लोकसंस्कृती, ज्या भाषेतील ग्रंथाचा अनुवाद करायचा तिच्यातील वाक्प्रचार व म्हणी यांचे लाक्षणिक अर्थ व शैलीविज्ञान (स्टायलिस्टिक्स)
भाषावैज्ञानिक ज्ञान : भाषाविज्ञानाच्या दृष्टीने त्या त्या भाषावंशानुसार प्रत्येक भाषेची नि तिच्या बोलींची काही वैशिष्ट्ये आहेत. ती आपल्याला द्रविड भाषावंशात आढळणार नाहीत. त्यात काही साम्यस्थळं असली तरी त्यापेक्षा वेगळी व लक्षणीय, व्यवच्छेदक आणि त्याची स्वत:ची अशी भाषिक वैशिष्ट्येही असतात. उच्चार प्रक्रिया प्रत्यय प्रक्रिया अर्थप्रक्रिया, शब्दसिद्धी, वाक्यरचना, शब्दसंग्रह, वाक्प्रचार इत्यादींच्या संदर्भात ती ठळकपणे जाणवतात. उदा. द्रविड भाषावंशातील कन्नड, तेलुगू, मल्याळम, तामिळ भाषांत आढळणारा ‘ळ’ हा वर्ण व उच्चार भारतीय आर्यभाषावंशातील हिंदी भाषेत नाही. पण द्रविड भाषावंशाच्या संसर्गामुळे आर्यभाषेतील मराठी भाषेत मात्र आहे.
भौगोलिक परिसर : एकाच भाषावंशातील दोन भाषांचा भौगोलिक परिसर वेगवेगळा असल्यास त्या त्या भौगोलिक पर्यावरणाचा त्या त्या भाषांवर परिणाम होतो. उदा. कोकणीमध्ये जे सानुनासिकत्व आहे तसं मराठीच्या अन्य बोलीमध्ये नाही. दोन वेगवेगळ्या भाषांच्या संदर्भातही असंच म्हणता येईल.
ऐतिहासिक पार्श्वभूमी : कोणत्याही देशाचा सर्वसामान्य स्वरूपाचा इतिहास हा सारखा असला तरी त्यातील वेगवेगळ्या प्रदेशांचा इतिहास काही प्रमाणात वेगळा असू शकतो. सांस्कृतिक वैशिष्ट्य : त्याचप्रमाणे देशाची संस्कृती एक असली तरी त्यातील वेगवेगळ्या प्रदेशांच्या संस्कृतीमध्ये (त्या राष्‍ट्राच्या संस्कृतीसह) प्रादेशिक संस्कृतीचे वेगवेगळे आयाम असू शकतात. त्याचं प्रतिबिंब त्या त्या प्रादेशिक भाषांमध्ये उमटत असतं. अर्थविज्ञानातील वेगळेपण : दोन देशांतील भाषांच्या अर्थविज्ञानामध्ये काही साम्यस्थळं असली तरी बरंचसं वेगळंपण असतं. तसेच लोकसंस्कृती, वाक्प्रचार, शैलीविज्ञान यामुळे अनुवादकांचं कौशल्य पणाला लागत असतं.