आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘आप’मतलबी अराजक : एक सुंदर सपना...!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऊठसूट माध्यमांसमोर येणार्‍या अरविंद केजरीवालांचे एकदम गायब होणे आणि माध्यमांसमोरही न येणे सारेच धक्कादायक! पराभव हा राजकारणाचा अपरिहार्य भाग! परंतु दिल्लीच्या विजयाने, उन्मादाने न्हाऊन निघालेल्या केजरीवालांची फजिती झाली.

भारतीय समाज आणि म्हणूनच भारतीय राजकारणही मोठे गुंतागुंतीचे आहे. या समाजाबद्दल व राजकारणाबद्दल भल्याभल्यांनी केलेले अंदाज अनेकदा कोलमडून पडलेले आपण पाहिले. जनतेच्या शहाणपणापुढे तथाकथित शहाण्यांचे शहाणपण कमी पडते, हे मान्यच करायला हवे! अनेक राजकीय पक्ष आणि राजकीय नेते जनतेला गृहीत धरतात. जनता जणू आपल्या तालावरच नाचणार असे समजून वागतात आणि बोलतात. शेवटी सपाटून मार खाल्ल्यानंतर जमिनीवर उतरतात.

सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांचे 2012 चे भ्रष्टाचारविरोधी पेटलेले आंदोलन, त्या आंदोलनातून भारतात कोणालाही माहीत नसलेला अरविंद केजरीवाल हा चेहरा चमकतो व सर्वज्ञात होतो. त्यातून राजकारणात उतरण्याचे स्वप्न पाहतो. समाजसेवक अण्णा हजारेंचा राजकीय पक्ष काढण्यास पाठिंबा नसला, तरी आम आदमी पार्टीचा हा आंदोलननिर्मित नेता पक्ष काढण्याची भूमिका घेतो आणि राजकारणात झेप घेतो. सुशिक्षित नागरिक, युवक आणि ‘आम आदमी’ या वर्गातून आपकडे सहानुभूतीची, सहयोगाची आणि सक्रिय पाठिंब्याची लाट निर्माण होते. ‘राजकारण बदलता येते,’ नवा व नव्या दमाचा आणि नव्या भारताचा नवा राजकीय वर्ग राजकारणात यशस्वी प्रवेश करू शकतो या अनेक बाबी आपच्या जन्माने लोकांसमोर आलेल्या. अण्णा हजारेंच्या आंदोलनाने निर्माण झालेला सरकारविरोधी व काँग्रेसविरोधी क्षोभ ‘आप’ला लाभदायक ठरला. शिस्तबद्ध, तंत्रज्ञानयुक्त आणि तळमळीच्या (भाडोत्री नव्हे) कार्यकर्त्यांच्या फौजेने दिल्ली विधानसभा निवडणुकीत मिळालेले अपूर्व आणि राजकीय क्षेत्रास राजकीय वर्गास धक्का देणारे यश आले.

‘आप’च्या मुसंडीने काँग्रेस-भाजपसह सर्व पक्षच संभ्रमात पडावेत, असे हे निकाल होते. काँग्रेसला भुईसपाट करत भाजप व आप हे विरोधी पक्ष मोठे पक्ष म्हणून पुढे आले. भाजपसोबत जायला मित्रपक्ष नसल्याने आणि भाजपचे सरकार नको म्हणून काँग्रेसने ‘आप’ला घोषित केलेला पाठिंबा, तोही विनाअट! केजरीवाल मुख्यमंत्री! ‘आप’ला पहिल्या झटक्यात मिळालेली सत्ता आणि त्यामुळे आपोआपच आलेली अहंता व उद्दामता! अरविंद केजरीवालांनी दिल्लीत चांगले सरकार चालवून नवा राजकीय आदर्श निर्माण करण्याची जबाबदारी झटकून सुरू केलेले सूडनाट्य, रस्तानाट्य या सार्‍याच्या परिणामी झालेली प्रतिमा घसरण व लोकसभा निवडणुकीत देशभर उतरण्याचा निर्णय व त्यात झालेली वाताहत! लोकसभेतील अध:पतनानंतर अतिअपेक्षांचा फुटलेला फुगा! मग जमा झालेल्या सहकार्‍यांची टीका, पक्षत्याग, घसरण आणि प्रतिमाहरण! ऊठसूट माध्यमांसमोर येणार्‍या अरविंद केजरीवालांचे एकदम गायब होणे आणि माध्यमांसमोरही न येणे सारेच धक्कादायक! पराभव हा राजकारणाचा अपरिहार्य भाग! तो पचवण्याची क्षमता हवी, परंतु दिल्लीच्या विजयाने, उन्मादाने न्हाऊन निघालेल्या केजरीवालांची पुरती फजिती लोकसभेत झाली.

नव्याने जन्मलेल्या ‘आप’सारख्या नव्याने शुद्ध राजकारणाच्या खळाळाने नागरिक आशावादी झालेले होते. काही नवे, गंभीर परिवर्तन आततायीपणा न करता कृतीने घडेल असे एक ‘सुंदर स्वप्न’ जनतेला पडत होते. मात्र, सामूहिक नेतृत्वाचा अभाव, विसंवाद, एककल्लीपणा, दुराग्रह नि तुच्छताबुद्धी याने ग्रासलेल्या संघटनेला आजच्या दयनीय स्थितीला आणून सोडले आहे. इतर प्रस्थापित पक्षांत असतात त्याप्रमाणे केजरीवाल आणि त्यांचे दोन-तीन खास माणसे हे श्रेष्ठीसारखे वागू लागले. पक्ष एकचालकानुवर्ती केला गेला. ‘आप’ तत्त्वाने भारून आलेल्या बुद्धिमान व जाणकार नेतृत्वाला हा पक्षांतर्गत लोकशाहीच्या अभावाचा मोठा धक्का बसला नि बसतोय.

अराजक निर्मिती पक्षातही
एका व्यक्तीच्या राजकीय लाभासाठी व स्वप्नपूर्तीसाठी ‘आम आदमी पार्टी’ काम करायला लागली, तेव्हा देशात ‘अराजक’ निर्माण करण्याचे ध्येय घेऊन राजकारण करणार्‍या केजरीवालांना हे कळलेच नाही की, यामुळे ‘आप’ पक्षव्यवस्थेतही अराजक निर्माण झाले. माध्यमाचा हा लाडका पक्ष आपल्या कृत्याने माध्यमाच्या चिरफाडीला तोंड देऊ शकला नाही. प्रत्येक बाब जनतेला विचारूनच करण्याचे अवास्तव धोरण ‘आप’ने केव्हा सोडले हे केजरीवालांना कळले नाही. खरे तर आपल्या देशात ‘प्रातिनिधिक लोकशाही’ आहे, लोकप्रतिनिधी हे लोकांच्या वतीने निवडले जातात. त्यांनी लोकांचे प्रश्न मांडावेत व सोडवावेत हे अपेक्षित असते. जनतेने जबाबदारी सोपवल्यानंतर ती निष्ठेने व प्रामाणिकपणे पार पाडणे हे लोकप्रतिनिधींचे काम; ते काम करण्यात केजरीवालांच्या अराजकसृदश निर्णयात त्यांना मुख्यमंत्रिपद निभावता आले नाही. काम करून दाखवण्याची सुवर्णसंधी स्वत:च मोडीत काढली. ‘आप’ मतलबाने हा पक्ष आपल्याच आत्मघातकी व अराजकवादी वृत्तीने नामोहरम झालेला दिसतो आहे. दिल्लीचे सरकार कायम ठेवून चांगले काम करून, जनहित साधून लोकसभा दिल्ली, पंजाब, हरियाणा, राजस्थान या चार राज्यांत जय्यत तयारीने व प्रयत्नाने लढवली असती, तर ‘आप’ला अधिक यश मिळाले असते, परंतु डोक्यात पंतप्रधानपदाची हवा शिरल्यानंतर आणि देशातील जनता आपल्याच पाठीशी आहे, अशा स्वप्नरंजनात गुंग झाल्यानंतर असे धाडकन आपटी खाणे स्वाभाविक होते. आत ‘आप’ने हौशी राजकारण सोडून गंभीर राजकारण करण्याची वेळ आली आहे. देशपातळीवर काम शकणार्‍या काँग्रेस व भाजपनंतर ‘आप’ हा पक्ष होऊ शकतो. त्यासाठी जिल्हा, तालुका, राज्य व देशपातळीवरील संघटन, अधिवेशन, शिबिरे याचे गंभीर काम भारतभर करावे लागेल! पक्षाची विचारसरणी, धोरण ठरवावे लागेल. पर्यायी राजकारणाचा मार्ग सांगावा लागेल. अरविंद केजरीवाल आणि चमूने हे लक्षात घ्यावे की, दुसर्‍या पक्षांना व नेत्यांना वाईट ठरवण्याने, शिव्याशाप दिल्याने ‘ते’ चांगले ठरत नाहीत. त्यांनी चांगले व गंभीर राजकारण व पक्ष संघटन केले, तरच ते टिकतील. ‘आप’ हे भारतीय राजकारणाला पडलेले सुंदर स्वप्न होते! ‘इक सुंदर सपना टूट गया’ म्हणायची वेळ जनतेवर येऊ देऊ नये, अशीच जनतेची अपेक्षा असणार! अद्याप न घेतलले राष्ट्रीय अधिवेशन घेऊन व राज्याराज्यांची राज्य अधिवेशने घेऊ न ‘आप’ने पुन्हा नवी सुरुवात करून ‘आप’चे पाणी हे ‘उथळ पाण्याला खळखळाट फार’ या पद्धतीचे नाही, हे सिद्ध करावे, ही साधी अपेक्षा करायला हरकत नाही!

लेख राजकीय विश्लेषक व माध्यमतज्ज्ञ आहेत.
profgsudhir@gmail.com