आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृक्षतोड, अतिवृष्टीनेच केला घात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अतिवृक्षतोड आणि गेल्या काही दिवसांपासून होत असणार्‍या अतिवृष्टीमुळे काळ्या पाषाणातील भेगा रुंद होऊन खालच्या खडकांवर त्याचा दाब आलेला असावा व माळीण येथे दुर्घटना घडली असावी, असे आजच्या घडीला वाटते.


‘राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा’ अशी ज्या महाराष्ट्राची ओळख आहे, त्या महाराष्ट्राचा 85 टक्के भूभाग हा दख्खनचे पठार म्हणूनच ओळखला जातो. महाराष्ट्रात प्रामुख्याने बेसॉल्ट हा खडक आढळतो. या बेसॉल्टचे असंख्य प्रकार असून त्या सगळ्यांचे गुणधर्म समान नाहीत. पुणे जिल्ह्यातील माळीण येथे घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर या प्रश्नाचे कंगोरे समजून
घेणे आवश्यक आहे.

पुणे जिल्ह्यात प्रामुख्याने दोन प्रकारचे दगड आढळतात. ते म्हणजे भरीतकुहरी आणि काळापाषाण. या खडकांचे वय साधारणपणे 65 दशलक्ष वर्षे असून दख्खनचे पठार याच खडकांनी बनलेले आहे. हे दोन्ही खडक जरी अग्निजन्य असले तरी भरीतकुहरी बेसॉल्टमध्ये संधीच्या भेगा (कॉन्ट्रॅक्शन क्रॅक्स) नसतात. मात्र काळ्या पाषाणामध्ये त्या प्रकर्षाने असतात. अर्थात त्यातही त्यांचे प्रमाण आणि रचना वेगवेगळी असू शकते. या संधीच्या भेगा आणि अशा भेगांनी तयार झालेले खडक हे निसर्गत: उघड्या पडलेल्या कड्यात तुटलेल्या अवस्थेत दिसतात. या थरातील काही संधींच्या भेगा तिरक्या, कलत्या असल्यामुळे त्यातील संधींचे खंड (जॉंइंट ब्लॉक्स) अस्थिर अवस्थेत असतात. (दृश्यस्वरूप पाहण्यासाठी इन्सेट आकृती पाहावी) हे खंड घसरून खाली येतात. तसेच काळ्या पाषाण खडकाच्या थरात पावसाचे पाणी मुरल्याने हे खडक कुजतात. मुसळधार पावसात कुजलेल्या खडकांचे तुकडे, मुरूम आणि माती खाली घसरून येऊन त्यांचा खच होतो. असा ढिगारा खचल्याने माळीण गावासारखी दुर्घटना घडून येते. भरीतकुहरी बेसॉल्ट हा मुख्यत: अपार्य असा खडक असून काही काळानंतर त्याचे पत्र्या मुरमात रूपांतर होते. त्याचे रूपांतरण होताना तो पार्य आणि संतृप्त होऊ शकतो. काळ्या पाषाणात संधीच्या भेगा असल्याने त्यामध्ये पाणी मुरू शकते. असे पाणी जेथून जशी वाट मिळेल तेथून ते बाहेर येते. त्यामुळेच पावसाळ्यात आणि पावसाळ्यानंतर डोंगर उतारावरून जोरात वाहत येणारे पाणी अशा दोन्ही कारणांमुळे डोंगर उतारावरील जमिनींची मोठ्या प्रमाणात धूप होते आणि जमिनीचे आच्छादन निघू शकते, हेदेखील वास्तव आहे.

वाढत्या शहरीकरणामुळे, जंगलतोडीमुळे तसेच प्रामुख्याने बांधकामांसाठी लागणार्‍या दगडांमुळे डोंगर उत्खननाचे धंदे देशभरात खूप वेगाने पसरले आहेत. सामान्य जनतेच्या नजरेसमोर दिवसाढवळ्या होणारा निसर्गावरील हा अत्याचार सारेच जण थंडपणाने पाहत असतात. आपले डोंगर आधी बोडके केले जातात आणि नंतर ते बोडके असल्याचे कारण देत त्यांना सुरुंग लावून ते खणले जातात. देशाच्या प्रत्येक राज्यात आणि प्रत्येक राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात, महानगरांच्या आसपासचे डोंगर पोखरण्याचे काम खूप जोरात सुरू असूनही त्याकडे सर्वच स्तरावरून होत असलेली डोळेझाक घातक ठरणारी आहे. या डोंगर फोडण्याच्या कामासाठी केल्या जाणार्‍या सुरुंग स्फोटामुळे निसर्गाचे संतुलन बिघडण्यासह संधीच्या भेगा वाढत जातात. पाऊस पडून गेल्यानंतर या संधीच्या भेगांमधून जे पाणी झिरपते ते एकप्रकारे वंगण म्हणून काम करते. त्यामुळे भूस्खलन होण्याच्या प्रमाणातही वाढ होते.

सध्या उपलब्ध होत असलेल्या माहिती आणि छायाचित्रानुसार असे दिसते की, माळीण हे गाव छोट्या नदीच्या तीरावर वसलेले आहे. त्याजवळच डिंभे धरणाचा फुगवटा आहे. गेल्या काही दिवसांपासून होत असणार्‍या अतिवृष्टीमुळे काळ्या पाषाणातील भेगा रुंद होऊन खालच्या खडकांवर त्याचा दाब येऊन माळीणची घटना घडली असावी, असे आजच्या घडीला तरी वाटते. अशा घटना पावसाळ्यात आपल्या राज्यातच नव्हे तर हिमाचल प्रदेश किंवा नजीकच्या परिसरातही घडतात. मात्र, त्या भागात इतक्या मोठ्या प्रमाणात वृक्षतोड किंवा डोंगरफोड नसल्याने तसेच डोंगराळ भागात लोकवस्तीचे प्रमाणदेखील अत्यल्प असल्याने अशा दुर्घटना फारशा घडलेल्या नाहीत. परंतु वृक्षतोडीमुळे डोंगर उतारावरून जोरात येणारे पाणी आणि मुरलेले पाणी हे महाराष्ट्रातील दगडात वंगणाचे काम करीत असल्याने दुर्घटना घडत असल्याचा निष्कर्ष काढता येतो. उन्हाळ्यात जे डोंगर स्थिर भासतात ते पावसाळ्यात पाण्यामुळे अस्थिर होऊन त्यांचे स्खलन होते.

भूशास्त्रीयदृष्ट्या या प्रदेशाचे सखोल निरीक्षण होणे आवश्यक असून तसा प्रयत्न करण्याची गरज आहे. आजच्या घडीला ढिगारा उपसणे आणि वैद्यकीय मदत तातडीने उपलब्ध करून देण्याची गरज आहे. काही काळानंतर भूशास्त्रीय विवेचन करून या घटनेवर अधिक प्रकाश पाडणे शक्य आहे. मुसळधार पर्जन्यवृष्टी व दरडी कोसळणे या दोन्ही बाबी एकमेकांशी निगडित आहेत, हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. आपत्कालीन व्यवस्था म्हणून पाणी जमिनीत मुरू नये म्हणून डोंगर उतारावरून तिरके चर खणून त्या पाण्यास योग्य दिशा दिली तर अशा घटना कमी प्रमाणात घडू शकतील, असे वाटते. त्यामुळे महाराष्ट्रात सर्वदूर ठिकाणी जिथे तीव्र डोंगर उतार आहेत, तेथे काही उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यात अशा भागात वृक्षलागवड आणि ड्रेन या साध्या उपाययोजनेने दुर्घटनेचे प्रमाण निश्चितच कमी होईल, असे वाटते. या ड्रेन्सच्या खाली आणि लगत दोन्ही बाजूने वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणात केल्यास जमिनीची धूप कमी होऊ शकते. कोकण रेल्वे ज्या भागातून जाते त्या भागातही मोठ्या प्रमाणात डोंगर आहेत. तेथील पावसाचे प्रमाणदेखील खूप मोठे असल्याने धूप होण्याचे तसेच बोगद्यांमुळे दरडीप्रवण क्षेत्रातही वाढ होण्याची शक्यता असते. त्यामुळेच कोकण रेल्वेच्या लोहमार्गानजीक असलेल्या डोंगरांना जशा जाळ्या बसवण्यात आल्या आहेत, तशा जाळ्या अशा दरडीप्रवण क्षेत्रात बसवण्याची गरज आहे. तसे झाल्यास दरडी कोसळण्यास आणि ढिगार्‍यास अटकाव होऊन जीवित आणि वित्तहानी काही प्रमाणात तरी टळू शकते.

भूशास्त्रीयदृष्ट्या असंख्य अशा निरीक्षणातून धरणांचा आणि बोगद्यांचा अभ्यास करणारे महाराष्ट्रातील पहिले व्यक्तिमत्त्व असणारे डॉ. आर. बी. गुप्ते यांनी यावर प्रचंड काम केले आहे. डॉ. गुप्ते आणि डॉ. डी. एम. करमरकर यांनी लातूर किल्लारीच्या भूकंपापासून विविध विषयांवर अभ्यास केला आहे. राज्यशासनाने नेमलेल्या डीएसआरपी समितीतही त्यांचा सहभाग होता. या समितीने 1993 च्या भूकंपाने राज्यातील धरणांना काही धोका निर्माण झाला आहे का? याबाबतही सविस्तर अभ्यास केला होता. त्यासाठी राज्यातील जवळपास प्रत्येक धरणाचाही त्यांनी अभ्यास करून त्याचा अहवाल शासनाला दिला होता. त्याशिवाय विविध प्रकल्पांसाठी केलेले बोगद्यांचे सर्वेक्षणदेखील त्यांनी केले होते. या सर्व अभ्यासानंतर त्यांनी जे शास्त्रीय निष्कर्ष मांडले आहेत, ते काळाच्या कसोटीवर पुन्हा - पुन्हा सिद्ध होत असूनही त्या अहवालांना, सर्वेक्षणाला गांभीर्याने घेतले गेले नाही, हे खेदाने नमूद करावेसे वाटते.

माळीणला घडलेली दुर्घटना ही अत्यंत भीषण स्वरूपाचीच असल्याने त्याची राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर चर्चा होईल. दु:खाचे कढ काढले जातील, काही काळानंतर का होईना थोड्याफार मदतीचे वाटपही केले जाईल. मात्र, या घटनेतून कोणता बोध घ्यायला हवा, त्यासाठी कोणत्या उपाययोजना करायला हव्या याबाबत काहीच ठोस घडणार नाही. केवळ काही काळ सर्वत्र मोठ्या तावातावाने चर्चा रंगतील, त्याची जबाबदारी एकमेकांवर ढकलली जाईल आणि काही काळानंतर ही बाबदेखील विस्मरणात निघून जाईल. आपत्ती व्यवस्थापन आणि त्यावरच्या उपाययोजना यांची चर्चा झाली तरी त्या कागदावरच राहतील. त्यांच्या अंमलबजावणीची आठवण केवळ पुन्हा अशी दुसरी घटना घडून गेल्यानंतरच होत आल्याचा अनुभव आहे. तसा अनुभव निदान या वेळी तरी सामान्य जनतेला येऊ नये, इतकीच इच्छा आहे.
vmsewlikar@kkwagh.edu.in