आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एंजल इन्व्हेस्टमेंट : नवी कल्पना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देशात एंजल इन्व्हेस्टमेंट ८१ टक्क्यांपर्यंत वाढले आहे, असा अहवाल नुकताच प्राप्त झाला आहे. याचाच अर्थ आपल्या देशातील कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर यश मिळते आहे, असा याचा अर्थ होतो. कारण एंजल इन्व्हेस्टमेंटला हाय रिस्क आणि हाय रिटर्नचे इन्स्ट्रूमेंट मानले जाते. तसे पाहता जगातील ५० टक्क्यांहून कमी प्रकरणांत या गुंतवणुकीस योग्य परतावा मिळू शकतो. नव्या उद्योगात गुंतणारा पैसा फायदा झाल्यास परत मिळतो; पण तोटा झाल्यास सगळे पैसे बुडतातही. एंजल इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत जाणून घ्या -

जर तुमच्याकडे एखादा व्यवसाय करण्यासाठी चांगली योजना असेल आणि यासाठी भांडवल उभारण्यास असमर्थ असाल तर एंजल इन्व्हेस्टमेंट तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो. नव्या उद्योजकाकडे सुरुवातीला फायनान्ससाठी तीन पर्याय असतात - फ्रेंड्स, फॅमिली किंवा फूल्स. गेल्या काही दशकांत नव्या उद्योजकांना फायनान्ससाठी नवा स्रोत उपलब्ध झाला आहे - एंजल इन्व्हेस्टर. कोणताही नवा उद्योग जेव्हा कल्पनेच्या स्तरावर असतो, तेव्हा यात जोखीम खूप असते. बँक आणि अन्य मोठे गुंतवणूकदार यात पैसे गुंतवण्यास कचरतात. अशा वेळी एंजल इन्व्हेस्टमेंट चांगला पर्याय आहे.

आयआयटी, मुंबईच्या दोन विद्यार्थ्यांनी काही वर्षे कंपनीत नोकरी केल्यानंतर रेंटल सर्व्हिस "ओला' सुरू केली. यात दोन एंजल इन्व्हेस्टर्स रेहान यार खान आणि अनुपम मित्तल यांनी ३० लाख रुपये इतकी एंजल इन्व्हेस्टमेंट केली होती. खानचा इक्विटीमध्ये १.८ टक्के इतका हिस्सा होता. याचे मूल्यांकन आता २२५ कोटी रुपये इतके आहे. मित्तलच्या १ टक्का इक्विटीमध्ये गुंतवणुकीचे मूल्यांकन १२५ कोटी रुपये इतके आहे. गेल्या काही वर्षांत भारतात फक्त ६ एंजल इन्व्हेस्टमेंट डील झाल्या. २०१४ मध्ये त्यात वाढ होऊन २०० वर गेली आहे.

एंजल इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय?
एंजल इन्व्हेस्टमेंट धनाढ्य व्यक्तींद्वारे नव्या व्यावसायिक कारखान्यांच्या सुरुवातीच्या काळात केली गेलेली गुंतवणूक आहे. यात गुंतवणूकदारास कर्ज किंवा इक्विटी देण्यात येते. अशा कर्जाला काही वर्षांनंतर इक्विटीमध्ये परिवर्तित करण्याचा पर्याय असतो. यासाठी याला कन्व्हर्टिबल डेब्ट असेही म्हटले जाते. जर व्यवसायात यश मिळाले तर त्याचे मूल्यांकन वाढते आणि एंजल इन्व्हेस्टर्सना ओला कॅबप्रमाणे जबरदस्त परतावा मिळू शकतो.

जर व्यवसाय अयशस्वी ठरला तर गुंतवणूकदारास कर्जाप्रमाणे गुंतवणूक केलेली रक्कम परत मिळते. जर व्यवसायात खूप मोठे नुकसान झाले तर एंजल इन्व्हेस्टर आपली रक्कम गमावून बसू शकतो. एंजल इन्व्हेस्टमेंट एक ‘हाय रिस्क, हाय रिटर्न' गुंतवणूक आहे. जगात ५० टक्क्यांहून कमी प्रकरणांत एंजल इन्व्हेस्टर्सना फायदा मिळू शकतो. सरासरी परताव्याचा दर पाच वर्षांत २५० टक्के इतका होता.

अशी झाली सुरुवात
एंजल शब्दाचा वापर अमेरिकेत थिएटर प्रॉडक्शनसाठी केला जात असे. जेव्हा श्रीमंत लोक नाटकात पैसे गुंतवत असत. या शब्दाचा औपचारिक प्रयोग अमेरिकी प्राध्यापक विल्यम वेटरजेल यांनी १९७८ मध्ये केला होता. अमेरिकेत निवृत्त व्यक्तींना स्वत:च्या व्यवसायात पैसे कमावून विकून टाकणाऱ्या इंटरप्रिन्युअर्स किंवा उद्याेजकांपासून याची सुरुवात झाल्याचा इतिहास आहे. ही अशी मंडळी होती, ज्यांना उद्योगासाठी पूर्ण वेळ न देता, नव्या उद्योगांतून जास्तीत जास्त कमावण्याची योजना होती. त्यांनी नव्या प्रोजेक्टमध्ये पैसे गुंतवणे सुरू केले आणि ते उद्योजकांना सल्लाही देत असत. त्यांच्या संपर्काचा फायदा उद्योजकांना हाेत असे. आज अमेरिकेत सुमारे सातेसात लाख एंजल इन्व्हेस्टर आहेत. प्रत्येक एंजल इन्व्हेस्टर सुमारे १ ते दहा कोटी रुपयांपर्यत गुंतवणूक करतो.

एंजल इन्व्हेस्टर ग्रुप
सुरुवातीला नवे उद्योग अयशस्वी ठरल्याने एंजल इनव्हेस्टर्सना खूप मोठे नुकसान सहन करावे लागले. एकटा एंजल इन्व्हेस्टर एखादा व्यवसाय समजण्यास किंवा सर्व क्षेत्रास सल्ला देण्यास समर्थ नसतो, असा निष्कर्ष काढण्यात आला. म्हणजे, ज्या एंजल इन्व्हेस्टरने संशोधनात काम केले आहे, तो उद्योगाच्या मार्केटिंग व फायनान्सबाबत तज्ज्ञ नसतो. अशा वेळी एंजल इन्व्हेस्टर्सनी सहा किंवा त्याहून अधिक गुंतवणूकदारांचा समूह बनवला. गेल्या १५ वर्षांत हा ट्रेंड वेगाने वाढीस लागला. सध्या अमेरिका आणि कॅनडात ३३० एंजल इन्व्हेस्टर ग्रुप आहेत. अशा प्रकारे ग्रुपमध्ये एखाद्या उपक्रमात पैसे गुंतवणे कमी जोखमीचे असते.

रिस्क कमी आणि पैसे परत
जरी एंजल इन्व्हेस्टमेंटमध्ये रिस्क खूप मोठी असली तरी गुंतवणूकदार आपल्या एकूण पोर्टफोलिओपैकी १० टक्के गुंतवणूक यात करत असतो. प्रत्येक गुंतवणूकदार अनेक उद्योगांत पैसे लावतो, त्यामुळे जोखीम कमी होते. साधारणत: ते उद्योगाच्या विविध पैलूंची व इंटरप्रिन्युअर्सची माहिती आदी बाबींचा तपास घेतात. याला ड्यू डिलिजेन्स असे म्हणतात. जवळपास ५ ते ७ वर्षांत जेव्हा उद्योग नफा कमावू लागतो आणि उद्योगास भांडवल गोळा करण्यासाठी आपले शेअर्स काढतो तेव्हा एंजल इन्व्हेस्टरला व्यवसायात भागीदारीनुसार शेअर्स मिळतात. मग त्याला वाटले तर ते शेअर्स तो विकू शकतो किंवा एखादा मोठा काॅर्पोरेट नवा उद्योग खरेदी करतो. त्याला अक्विझिशन किंवा अधिग्रहण असे म्हणतात. तेव्हा उद्योगाचे मूल्यांकन केले जाते आणि एंजल इन्व्हेस्टरला उद्योगातील भागीदारीनुसार शेअर किंवा पैसे परत मिळतात.

भारतात याची पद्धत कोणती?
भारतात एंजल इन्व्हेस्टर पाच लाख रुपयांपासून तीन कोटी रुपयांपर्यंत रक्कम नव्या उद्याेगात गुंतवतात. साधारणत: एंजल इन्व्हेस्टर ग्रुप ज्या उद्योगाची त्याला माहिती असते त्या एखाद्या उद्योगात गुंतवणूक करतो. असे ग्रुप एखाद्या विशेष सेक्टरमध्येच पैसे लावतात. म्हणजे तंत्रज्ञान, ट्रॅव्हल्स, करमणूक इत्यादी. या गुंतवणूक समूहात एखादा लीड किंवा प्रमुख गुंतवणूकदार असतो त्याला त्या सेक्टरचा अनुभव असतो. जेव्हा तो एखादा उद्योग निवडतो तेव्हा ४ ते ६ अन्य इन्व्हेस्टर त्यात पैसे गुंतवतात. हे गुंतवणूकदार एखाद्या उद्योगाची कल्पना, टीम, बाजारातील संभाव्य परिस्थिती आणि व्यवसायाची क्षमता पाहूनच उद्योगाची निवड करतात.

पुढील भवितव्य
गेल्या काही वर्षांत भारतात एंजल इन्व्हेस्टमेंट वेगाने वाढते आहे. आजकाल भारतात अनेक मॅनेजमेंट व इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्स नोकरी करण्यापेक्षा स्वत:चा उद्योग सुरू करण्यास प्राधान्य देत आहेत. स्टार्टअप्स केवळ तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातच असतात असे नाही, हे यावरून सिद्ध होते. तथापि, टेक्नो स्टार्टअप्समध्ये एंजल इन्व्हेस्टमेंट इतरांच्या तुलनेत जास्त असते. अशा वेळी आगामी वर्षात एंजल इन्व्हेस्टमेंट वाढण्याची खूप शक्यता आहे. विशेषत: आयटी क्षेत्रातील तरुणांना तसेच स्टार्टअप कंपन्यांना वाढीव संधी मिळणार आहे.

(डीन (अकॅडमिक्स) आयबीएस, मुंबई)