आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"तेरजे'चे राजकारण करणारा नेता (डॉ. सदानंद मोरे)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साठ-सत्तरच्या दशकातला तो काळ. त्या वेळी राजकारणातली स्पर्धा आताइतकी तीव्र नव्हती. सामान्य लोक राजकारणाच्या भानगडीत पडायचे नाहीत. राजकारण धोकादायक समजले जात असे; अशा काळात शेतकरी कामगार पक्षाची पूर्वपीठिका असलेल्या घरातून शरद पवार राजकारणात आले. त्या अर्थाने पवारांच्या घरातले ते पहिले काँग्रेसवाले. राज्याच्या राजकारणात तेव्हा यशवंतराव चव्हाण सर्वोच्च स्थानी होते. विरोधी पक्षातल्या लोकांवर ते बारीक नजर ठेवून असत. त्या वेळी गमतीने असे म्हटले जायचे की, विरोधात आक्रमक काम केले की काँग्रेसमध्ये चांगली संधी मिळते. त्या मानाने काँग्रेसमधल्या पुढाऱ्यांना काम करायला मर्यादा होत्या. यशवंतरावांनी शरद पवारांना काँग्रेसमध्ये आणले.

युवक काँग्रेसमध्ये काम करत असताना पवारांनी महाराष्ट्र पिंजून काढला. महाराष्ट्राची बारीकसारीक माहिती जाणणारा पवारांसारखा दुसरा नेता नाही. काही नेत्यांना पश्चिम महाराष्ट्र माहिती असतो. काहींना मराठवाडा समजतो. काहींना विदर्भाचा आवाका असतो. परंतु भौगोलिक सीमांपलीकडे जाऊन उभ्या-आडव्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय तपशिलाची जाण असलेला आणि त्या-त्या ठिकाणच्या प्रश्नांची माहिती ठेवणारा नेता म्हणून फक्त पवारांचे नाव घ्यावे लागते. यशवंतराव आणि शरद पवार यांच्यातील हे साम्यस्थळ म्हणता येईल. बाकी या दोघांची तुलना करू नये. कारण दोघांच्या राजकारणाची शैली भिन्न आहे. यशवंतरावांनी दिलेल्या संधीमुळे पवारांना कमी वयात काम करता आले. यशवंतरावांनंतर कन्नमवार, वसंतराव नाईक, शंकरराव चव्हाण, वसंतदादा पाटील राज्याचे मुख्यमंत्री होते. या सगळ्या लोकांबरोबर पवारांनी काम केले. या कालावधीत त्यांचे प्रशासकीय प्रशिक्षण झाले. पवारांची नोकरशाहीवरची पकड मजबूत झाली, त्याचा पाया हा असावा; पण पवारांचा नुसता धाक कधीच नव्हता. अधिकारी वर्गाला त्यांच्याबद्दल विश्वास वाटायचा. हुकूमशाही प्रवृत्तीतून हे घडू शकत नाही. कोणाला काय काम लावले पाहिजे आणि कोठे थांबवले पाहिजे, याचे भान पवारांना होते. त्यामुळेच ‘अधिकारी माझे ऐकत नाहीत,’ असे म्हणण्याची पाळी त्यांच्यावर कधी आली नाही. संयमाने समोरच्याचे ऐकून घेणे हाही पवारांचा गुण आहे. त्यांची आकलनक्षमता प्रचंड आहे. त्यांना विषय चटकन समजतो. त्यांच्याकडे निर्णयक्षमता आहे.

यशवंतरावांनी महाराष्ट्राच्या राजकारणाची एक चौकट घालून दिली होती. सत्तेच्या माध्यमातून लोकांची कामे करायची. सर्वांना सोबत घेऊन सत्ता टिकवायची. हा ‘पॅटर्न’ पवारांनी नेमका उचलला. यशवंतरावांनंतरच्या इतर मुख्यमंत्र्यांना हे जमले नाही. वसंतरावांचे राजकारण साचेबद्ध होते. वसंतदादांना मर्यादा होत्या. यशवंतरावांनी विरोधी पक्षातला एकेक माणूस वेचून काँग्रेसमध्ये आणला. त्याला ‘बेरजेचे राजकारण’ म्हटले गेले. कारण त्यांच्या काळात काँग्रेसला संख्याबळाची चिंता नव्हती. चांगली माणसे पक्षात आणणे, दमदार विरोधक संपवणे यावर त्यांचा भर होता. पवारांना संख्याबळाची गरज होती. त्यामुळे त्यांनी इतर पक्षांमधले, विरोधी विचारांचे गटच्या गट स्वतःबरोबर आणले. शिवसेना, रिपब्लिकन गटांचे उदाहरण देता येईल. यशवंतरावांच्या बेरजेच्या राजकारणाच्या पुढे ते गेले. याला मी पवारांचे ‘तेरजे’चे राजकारण म्हणतो.

महाराष्ट्रात जेवढे मुख्यमंत्री झाले, त्यात पवारांएवढी धाडसी पावले कोणीच टाकली नाहीत. महिला आरक्षण तर आहेच, पण हमीद दलवाईंना आश्रय देणे असेल, ‘घाशीराम कोतवाल’चा संच परदेशी पाठवणे असेल, नामांतराचा मुद्दा असेल यांसारखे अनेक निर्णय फक्त पवारच घेऊ शकले. स्वत:च्या हिमतीवर घेतलेल्या अशा धाडसी निर्णयांचे तोटेही त्यांनी वेळोवेळी सहन केले. नंतरच्या टप्प्यात त्यांच्यामध्ये जो सावधपणा आला, तो कदाचित या निर्णयांमुळे आलेल्या अनुभवाचा परिपाक असावा, असे मला वाटते. राजकारणातले सगळे अवघड निर्णय आपणच पुढाकार घेऊन घेतो. त्याला यश आले तर वाटेकरी खूप; मात्र प्रतिकूल परिणामांना सामोरे जायची वेळ आली की मग एकट्यावरच जबाबदारी पडते, असे त्यांना जाणवले असेल. यात फार चूक आहे असे म्हणता येणार नाही. त्यांची मुळातली जडणघडण मात्र पुरोगामी, प्रागतिक आहे, हे मात्र निश्चित. ‘खंजीर’चा आरोप चुकीचा महाराष्ट्र इतिहासात रमणारा आहे. त्यामुळे पवारांनी ‘खंजीर’ खुपसला वगैरे शब्दांमध्ये वर्णन केले जाते. खरे म्हणजे याकडे निव्वळ राजकीय घटना म्हणून पाहायला हवे. काँग्रेस मुळात फोडली ती यशवंतरावांनी. काँग्रेसमध्ये असताना ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते. त्यांच्या ज्येष्ठत्वामुळे इंदिरा गांधींचा कोंडमारा व्हायचा. त्या दोघांमधल्या संघर्षाची परिणती दोन काँग्रेसच्या निर्मितीत झाली. रेड्डी-यशवंतराव काँग्रेस आणि इंदिरा काँग्रेस. त्या वेळी पवार यशवंतरावांसोबत राहिले. १९७८ च्या निवडणुकीत इंदिरा काँग्रेसला चांगले यश मिळाले. यशवंतरावांनी पश्चिम महाराष्ट्रात वर्चस्व राखले; परंतु विदर्भाने इंदिरा काँग्रेसला अनपेक्षितरीत्या हात दिला. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी दोन्ही काँग्रेसना एकत्र यावे लागले. वसंतदादा मुख्यमंत्री झाले. नासिकराव तिरपुडे उपमुख्यमंत्री झाले. संघर्ष सुरू झाला. खऱ्या काँग्रेसचा अवमान होत असल्याचे चित्र निर्माण झाले आणि त्या खळबळीतून ‘पुलोद’ स्थापन झाले. मात्र, यात यशवंतरावांची भूमिका नेमकी काय होती, हे आजही स्पष्ट झालेले नाही. ‘पुलोद’चे खरे शिल्पकार एस. एम. जोशी होते. या लोकांनी काँग्रेस संपवण्याचा चंग बांधला होता. त्यासाठी त्यांनी नको त्या लोकांना एकत्र केले. त्यामुळे यशवंतराव पवारांचे गुरू असतील, तर ‘एस.एम.'ना उपगुरू मानावे लागते. एकुणातच "पुलोद'ची निर्मिती आणि शरद पवारांना मिळालेले मुख्यमंत्रिपद याकडे राजकारण म्हणूनच पाहिले पाहिजे. तो केवळ राजकीय घटनाक्रम होता. सर्वोच्च पदाची महत्त्वाकांक्षा असण्यात गैर काय? त्यामुळे ‘पवारांनी विश्वासघात केला’ किंवा ‘खंजीर खुपसला’ असे म्हणणे योग्य नाहीच.

इंदिरा गांधींच्या नेतृत्वात काँग्रेसच्या राजकारणाची शैली बदलली. त्यांनी राज्याराज्यांतल्या प्रादेशिक नेतृत्वाचे पंख छाटायला सुरुवात केली. राजकीयदृष्ट्या सजग समूहाला कमी महत्त्व देऊन छोट्या समूहांना संधी देण्याचे धोरण त्यांनी स्वीकारले होते. यामागे राजकीय वर्चस्व टिकवून ठेवण्याची भूमिका होती, जातीय नव्हे. परंतु महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचे तर आपल्याकडच्या मराठा नेतृत्वाला काबूत ठेवण्याला इंदिरा गांधींनी प्राधान्य दिले. साहजिकच पवारांना हे सहन होणे शक्य नव्हते. यातूनच वेगळ्या काँग्रेसची निर्मिती त्यांनी केली असावी. पुढे राजीव गांधी यांच्या काळात चित्र बदलू लागले आणि ते काँग्रेसमध्ये परतले.
पवारांच्या दोन चुका
राष्ट्रीय स्तरावरच्या सर्वच राजकीय घडामोडी अभ्यासकांपुढे येत नाहीत, तरीही ढोबळमानाने वाटते की पवार काँग्रेसमध्येच राहिले असते तर पंतप्रधान झाले असते. राजीव गांधी व पवार यांच्यात सामंजस्य होते. ते अचानक गेल्याने राजकारण बदलले. त्यानंतर त्यांनी पी. व्ही. नरसिंहराव यांच्याविरोधात पक्षांतर्गत निवडणूक लढवली. पुढे सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाबद्दल प्रश्न उपस्थित करत काँग्रेसमधून बाहेर पडले. नरसिंहरावांच्या विरोधात लढवलेली निवडणूक आणि काँग्रेस सोडण्याचा निर्णय या मला पवारांच्या दोन राजकीय चुका वाटतात. यशवंतरावांचे इंदिरा गांधींबद्दलचे आकलन चुकले. तसेच पवारांना सोनिया गांधी समजल्या नाहीत, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
महाराष्ट्रव्यापी नेतृत्व
पवार फक्त पश्चिम महाराष्ट्राचे आणि काही अंशी मराठवाड्याचे नेते राहिले. त्यांचे नेतृत्व संपूर्ण महाराष्ट्रव्यापी कधीच होऊ शकले नाही, या आरोपात मला तथ्य वाटत नाही. अगदी लोकमान्य टिळक, कॉम्रेड डांगे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही जुनी माणसे थोर होती, तरीही ही मंडळीसुद्धा संपूर्ण महाराष्ट्राचे नेते कधीच होऊ शकली नव्हती. यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब ठाकरे यांना संपूर्ण महाराष्ट्राने कधी स्वीकारले नाही. संपूर्ण महाराष्ट्राचा एकमुखी पाठिंबा असणारा नेता आपल्याकडे तयार नाही, याचे मला वैषम्य वाटत नाही. उलट हे मराठी लोकांच्या राजकीय सजगतेचे लक्षण आहे.
डॉ. सदानंद मोरे
इतिहासकार आणि
साहित्य संमेलनाचे अध्यक्ष
(शब्दांकन : सुकृत करंदीकर)