आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr.Avinash Bhondwe Editorial Column Selie Patient By Doctor, Divya Marathi

डॉक्टर-रुग्ण संबंधांचा "सेल्फी'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुणाच्याही आयुष्यात खुट्ट काही झाले, तरी त्याचा फोटो फेसबुक, ट्विटर नाही तर व्हॉट्सअॅपवर टाकला जातो आणि तो काही वेळात ‘व्हायरल’ होऊन त्याला शेकडो लाइक्स येतात. यामध्ये स्वतःचे विविध पोझेसमधले, वेगवेगळ्या ठिकाणचे आणि वेगवेगळ्या व्यक्तींसोबत वैयक्तिक फोटो टाकणे म्हणजे ‘सेल्फी’. हा नवा ट्रेंड चिमटीत पकडून ‘महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स’ (मार्ड) या वैद्यकीय महाविद्यालयात उच्च शिक्षण घेणाऱ्या निवासी डॉक्टरांच्या संघटनेने ‘सेल्फी विथ डॉक्टर’ हा अनोखा उपक्रम काही दिवसांपूर्वी साजरा केला. डॉक्टर आणि रुग्णांमधील परस्पर संबंध अधिक दृढ व्हावेत या उद्देशाने हे अभिनंदनीय पाऊल त्यांनी उचलले होते. महाराष्ट्रासह भारतातील बहुतांश राज्यात डॉक्टरांना रुग्णांनी मारहाण केल्याच्या बातम्या कायमच येत असतात. हे असे वारंवार का घडते अाहे, याचाही विचार व्हायला हवा.

व्यवसायाचे बदलते रूप
दोन-तीन दशकांपूर्वी प्रत्येक कुटुंबाचा एक फॅमिली डॉक्टर असायचा. तो कुटुंबाचा डॉक्टरच नव्हे तर मित्र, मार्गदर्शक, हितचिंतक, सल्लागार अशा विविध भूमिका बजावायचा. बदलत्या काळात एकत्र कुटुंबपद्धती नाहीशी होऊन विभक्त कुटुंबे निर्माण झाल्यामुळे शहरातले फॅमिली डॉक्टर इतिहासजमा झाले. त्यातच वाढत्या औद्योगिकीकरणामुळे आणि भांडवलशाही आर्थिक बदलांमुळे विशेषज्ञांचे युग सुरू झाले. वैद्यकीय व्यवसाय केवळ डॉक्टरांच्या हातात न राहता औषध उत्पादक कंपन्या, विविध तपासण्या करणारी डायग्नोस्टिक सेन्टर्स, पंचतारांकित कार्पोरेट हॉस्पिटल्स आणि विमा कंपन्यांच्या हातात तो गेला. परिणामतः डॉक्टर-रुग्णसंबंध सर्वस्वी औपचारिक आणि व्यावसायिक स्वरूपाचे झाले. १९९५ मध्ये डॉक्टर व रुग्ण यांच्या नात्यात ग्राहक संरक्षण कायद्याने रीतसर प्रवेश केला आणि रुग्ण हा डॉक्टरांचा गिऱ्हाईक झाला तर डॉक्टर हा वैद्यकीय सेवा देणारा विक्रेता बनला. साहजिकच रुग्णांच्या कुटुंबातील एक घटक मानला जाणारा आणि देण्या-घेण्यापलीकडचे नाते असलेला फॅमिली डॉक्टर पक्का व्यावसायिक बनला. परिणामतः डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील सुसंवादच हरवला. वैद्यकीय शास्त्रातील अफाट प्रगतीमुळे सुपर स्पेशलायझेशन वाढत चालले आहे आणि त्याच बरोबर अनाठायी वारेमाप तपासण्या, अनेकविध ऑपरेशन्स, हृदयाच्या अँजिओप्लास्टी, स्टेन्टच्या अवास्तव किमती, महागडी औषधे, कट प्रॅक्टिस यासारख्या गोष्टींच्या संशयामुळे डॉक्टर-रुग्ण यांच्यातला दुरावादेखील वाढत चालत आहे. रुग्णांच्या मनात असलेला डॉक्टरांबद्दलचा विश्वास डळमळीत झाल्याने, अनेक छोट्या-मोठ्या, खासगी-सरकारी, शहरी-ग्रामीण इस्पितळात डॉक्टरांना मारहाण करणे, शिवीगाळ करणे, हॉस्पिटलची तोडफोड करणे अशा घटनांचा सुळसुळाट झाला.

रुग्णांचे हक्क
रुग्णांच्या मनातला डॉक्टरांवरचा लोप पावलेला विश्वास अशा ‘सेल्फी’ काढण्याने कितपत परत येईल याची शंकाच आहे. निवासी डॉक्टरांच्या संघटनेत बावीस ते अठ्ठावीस वयाचे तरुण डॉक्टर असा आभासी जगतातला हा प्रकार नक्की प्रचलित करू शकतील, पण वयाची पन्नाशी उलटलेल्या बहुसंख्य ज्येष्ठ वैद्यकीय व्यावसायिकांना हा तरुणाईचा अाविष्कार कितपत शक्य आहे? त्यातही सरकारी रुग्णालयात येणारे किती लोक यामागची रुग्णसंवाद सुधारण्याची भावना समजतील याबाबतही खात्री देता येईल का? तसा हा उपक्रम स्तुत्य आहे, पण बिघडलेल्या डॉक्टर-रुग्ण नातेसंबंधांना यामुळे फार तर वरवर मलमपट्टी होईल. भारतीय राज्य घटनेने प्रत्येक व्यक्तीला जगण्याचा मूलभूत हक्क दिलेला आहे. दर्जात्मकरीत्या रास्त वैद्यकीय सेवा मिळण्याचा हक्क त्यातच अंतर्भूत आहे. मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाच्या आचारसंहितेप्रमाणे काही गोष्टी निर्विवाद आहेत. रुग्णावर उपचार करताना, त्यांचा विनय, आत्मसन्मान आणि त्याच्या आजाराची गोपनीयता डॉक्टरांनी जपली पाहिजे. उपचारादरम्यान पुरेपूर काळजी आणि कौशल्य वापरलंच पाहिजे. रुग्णाच्या आजाराचे निदान, त्यावर करावयाचे उपचार, औषध योजना, उपचारातील धोके, मर्यादा, त्याचे तात्कालिक आणि कायमस्वरूपी दुष्परिणाम, उपचाराचा खर्च इत्यादीची माहिती रुग्णाला उपचार सुरू करण्यापूर्वीच डॉक्टरांनी द्यायला लागते. शस्त्रक्रिया करणे आवश्यक असल्यास रुग्णाला किंवा त्याच्या जवळच्या व जबाबदार व्यक्तीला सारी माहिती, त्याच्या भाषेत समजावून त्याची शस्त्रक्रियेकरिता लेखी संमती घेतली पाहिजे. शस्त्रक्रिया सुरू असताना रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी किंवा काही गुंतागुंत झाल्यामुळे ऐनवेळी काही बदल करावा लागला आणि त्यावेळी रुग्ण संमती देण्याच्या अवस्थेत नसेल, तर त्याच्या सोबतच्या जबाबदार व्यक्तीची त्यासाठी लेखी संमती घेतली पाहिजे. उपचारादरम्यान दुसऱ्या डॉक्टरचे मत घ्यावे किंवा डॉक्टर बदलावा, अशी रुग्णाची अथवा त्याच्या कुटुंबीयांची इच्छा असल्यास, उपचार करणाऱ्या डॉक्टरच्या संमतीने तसे करण्याचा रुग्णाला हक्क आहे. हॉस्पिटलमधून रजा देताना रुग्णाला त्याचे उपचार, तपासण्यासंबंधीच्या सर्व कागदपत्रांच्या छायाप्रती सशुल्क मिळविण्याचा कायदेशीर हक्क आहे. रुग्णाने घ्यावयाच्या औषधांची यादी, घ्यावयाची काळजी याबद्दल लेखी सूचना आणि उपचाराचे तपशिलासह बिल देणे इस्पितळाना बंधनकारक आहे. अपघात किंवा तत्सम कारणामुळे रुग्णाला तातडीने उपचार मिळण्याची गरज असेल, तर कोणत्याही औपचारिकतेची अट न घालता किमान प्रथमोपचार मिळविणे हा हक्क प्रत्येक नागरिकाला आहे.

रुग्णांची कर्तव्ये
या हक्कांबरोबरच रुग्णांनीही काही कर्तव्ये पाळणे अपेक्षित आहे. उदा. डॉक्टरांच्या सूचना काळजीपूर्वक पाळणे, उपचार पूर्ण होईपर्यंत सहकार्य करणे. उपचारासंबंधी काही तक्रार असल्यास प्रथम डॉक्टरांशी किंवा हॉस्पिटल व्यवस्थापनाशी बोलून नंतर लेखी निवेदन द्यावे. तक्रारीचा निकाल लागेपर्यंत पाठपुरावा करावा. हॉस्पिटल किंवा डॉक्टर बदलावयाचे असल्यास त्यांना तशी पूर्वसूचना द्यावी. उपचाराचे शुल्क वेळेवर द्यावे. डॉक्टर, नर्सेस, संबंधित कर्मचारी हीसुद्धा माणसेच आहेत. त्यांच्याकडून किरकोळ चुका होऊ शकतात याची जाणीव ठेवावी. डॉक्टर आणि रुग्ण संबंध ही दोन्ही हातांनी वाजणारी टाळी आहे. या बिघडत्या संबंधांना ‘सेल्फी’ हे चांगले प्रतीकात्मक उत्तर आहे, पण प्रत्यक्षात यापेक्षा भरीव कार्याची दोन्ही बाजूने आवश्यकता आहे.
(avinash.bhondwe@gmail.com)