आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सेंद्रिय शेतीचे भाजपकृत गौडबंगाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्याचे सेंद्रिय शेतीविषयक धोरण लवकरच जाहीर करण्याविषयीच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. कुठल्या तरी मठात एक एकर शेतीवर लखपती होण्याचे प्रयोग यशस्वी झाल्याची पुस्तीही या बातमीला जोडण्यात आली आहे. या प्रयोगाचा व सेंद्रिय शेतीचा काही संबंध आहे का, हे मात्र जाहीर झाले नाही. राज्याचे कृषिमंत्री या धोरणाचा आराखडा तयार करताहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. त्याचबरोबर सेंद्रिय शेतीची कास धरताना विज्ञानवादी दृष्टिकोनाचा उल्लेख करत कर्मकांड करणारा समाज रसातळाला जातो हे सांगायलाही ते विसरले नाहीत. सेंद्रिय शेती म्हणजे नेमके काय? या मूलभूत पातळीवरचा प्रचंड गोंधळ नमनालाच दिसत असताना शेतकर्‍यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन पत्करायचा की केवळ निसर्गाच्या लहरीवर उगवणार्‍या सेंद्रिय शेतीचा पुरस्कार करायचा हे मात्र त्यातून स्पष्ट झालेले नाही.

एकंदरीत नव्या सरकारांचा, मग ते केंद्रातील असो की राज्यातील, शेतीकडे पाहण्याचा कर्मकांडी दृष्टिकोन बर्‍याचदा उघड झाला आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा जगाच्या बाजारपेठात सेंद्रिय शेतमालाला प्रचंड बाजारपेठ असल्याचे सांगतात तेव्हा तर भारतातील सार्‍या कोरडवाहू शेतकर्‍यांना आनंदाचे भरते यायला हवे. कारण आजची कोरडवाहू शेती व सेंद्रिय शेती यात तसा फारसा फरक करता येणार नाही. रासायनिक खते व कीटकनाशकांचा जेवढा वापर नगदी व बागायती पिकांवर होतो, त्याचा सरळ संबंध उत्पादनाच्या प्रमाणाशी व त्यातून होणार्‍या फायद्याशी जुळत असल्याने तो करणे क्रमप्राप्त ठरते. मात्र कोरडवाहू शेतकर्‍यांना जेथे सुधारित वाणदेखील घेणे परवडत नाही व आपल्या पारंपरिक वाणावरच अवलंबून राहत जसे पीक हाताशी येईल तसे पदरात पाडून घ्यावे लागते. आपल्या व्यवस्थेने लादलेली सेंद्रिय शेती, असेच या कोरडवाहू शेतीचे स्वरूप आहे. म्हणजे अतिरिक्त उत्पादनासाठी कुठलेही हस्तक्षेपी प्रयत्न न करणे हा सेंद्रिय शेतीचा गाभा असताना या मुक्त शेतीसाठी कृषिमंत्री काय वेगळा आराखडा करताहेत हे मात्र कळत नाही.

खरे म्हणजे आजची कोरडवाहू शेती वा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हरितक्रांती येईपर्यंतचा काळ हा सेंद्रिय शेतीचा सुवर्णकाळ समजला पाहिजे. म्हणजे शेती सेंद्रिय, पण सारा देश उपाशी. अमेरिकन मिलो त्या काळी भारतीयांचे प्रमुख खाद्य होते. मात्र शेतीतील विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनाला चालना देणारी सुधारित वाणे वा प्रसंगी रासायनिक खते का होईना वापरून हरितक्रांती आली तेव्हा कुठे भारतीयांची भूक शमू शकली. आपली अन्नधान्याची गरज भागवतानाच त्याच वैज्ञानिक शेतीच्या जोरावर भारत आज जगातील प्रमुख अन्न निर्यातदार ठरला आहे हे मात्र विसरता येणार नाही.

आज या सेंद्रिय शेतीचा जेवढा बोलबाला दिसतोय त्या मानाने बाजारातील त्याचे अस्तित्व नगण्य आहे. या दोन्ही सरकारांना सेंद्रिय शेतीचे एवढे अप्रूप असताना या सेंद्रिय शेतमालासाठी काही वेगळी बाजारपेठ असावी असेही प्रयत्न कुठे दिसत नाहीत. म्हणजे आहे त्या बाजारातच हा शेतमाल विक्रीला आणावा लागेल. शेतमाल बाजारात अगोदरच प्रचंड प्रमाणात तयार होणार्‍या शेतमालाची दैना आज बाजार समित्यांमधील कार्यपद्धतीमुळे पाहवत नसताना या सेंद्रिय मालाला कुठे जागा करून देणार हाही प्रश्नच आहे. त्यातून भेसळीसारखे गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण होऊ शकतात. या सेंद्रिय मालाचे भाव त्यांच्या समजल्या जाणार्‍या गुणधर्मानुसार इतर मालापेक्षा जास्तच असतात. तो घेत असताना महाग असल्याचीही ओरड सयुक्तिक ठरत नाही. तो सेंद्रिय आहे की आणखी काही, हे तपासण्याची परिमाणे ना ग्राहकाकडे आहेत ना सरकारकडे. शेतकर्‍याने तो प्रमाणित करायचा व आम्ही तो सेंद्रिय म्हणून घ्यायचा, अशी आजच्या सेंद्रिय बाजारपेठेची गत आहे. तसे पाहायला गेले तर आजच्या कोरडवाहू शेतीतील सारे उत्पादन हे सेंद्रिय म्हणून स्वीकारायला काही हरकत नाही. आजच्या बाजारात या शेतमालाला मिळणारे भाव जर त्याला सेंद्रियत्वाच्या नावाने वाढणार असतील तर कोरडवाहू शेतकर्‍यांसाठी ते एक वरदानच ठरावे.

मुळात भारतीय ग्राहक हा किमतीबाबत फार संवेदनशील असतो. दहा रुपये किलोचा कांदा त्याला पंधरा रुपयांनी झालेला चालत नाही. सेंद्रिय पद्धतीने काढलेला कांदा उत्पादन खर्च काढता बाजारात विक्रीला आणला तर तो कोण घेईल इथपासून सुरुवात होणार आहे. आज काही शेतकरी सेंद्रिय गहू प्रदर्शनात विक्रीला आणतात. बरेचसे ग्राहक त्याच्या सेंद्रियत्वाबाबत साशंक असतात. त्यामुळे विक्री पाहावी तेवढी सुलभ ठरत नाही. पिवळाजर्द रासायनिक गूळ व काही कारणाने काळा पडलेला गूळ सेंद्रिय म्हणून समजला जातो. या सार्‍या सेंद्रिय मालाचे एकंदरीत शेतमाल बाजारातील प्रमाण लक्षात घेता ते आजच्या शेतीतील दुरवस्थेवर काही परिणाम करू शकेल असे वाटत नाही. आजसुद्धा बाजारात सेंद्रिय शेतमाल विकला जात असला तरी या सेंद्रिय मालाचे सर्वसाधारण बाजारपेठेतील भवितव्य फार चांगले आहे असे म्हणता येणार नाही. तो आजच्या अडचणीत सापडलेल्या कृषी क्षेत्राला ऊर्जितावस्थेला आणू शकण्याचा विचार तर काल्पनिकच समजला पाहिजे.

आज सार्‍या जगातील अन्नधान्याचे उत्पादन हे अन्न सुरक्षेशी जोडले जात आहे. म्हणजे अन्नाचे उत्पादन हे सरळ लोकसंख्येशी जोडले जाते. उपजाऊ जमीन जर तेवढीच राहणार असेल तर तिच्यातूनच वाढीव उत्पादनाचे प्रयोग, जे आज शास्त्रीय वा वैज्ञानिक पद्धतीने केले जातात ते गैर आहेत असे म्हणता येणार नाही. रासायनिक खते वा कीटकनाशके यांचा अतिरेकी वापर समर्थनीय नव्हेच, पण त्यामुळे त्यांना अव्हेरत सार्‍या जगाला परत भुकेच्या खाईत लोटणारा सेंद्रिय पर्याय सक्षम ठरेल असे मानणेही चुकीचे ठरेल. आज सारे जग हे रासायनिक खते वा कीटकनाशकांच्या पलीकडे जात जनुकीय बियाण्यांच्या क्षेत्रात सुरक्षित व वाढीव उत्पादनाचे प्रयोग करीत आहे. अन्न हे केवळ ऊर्जादायी नसून त्यातील पोषक घटकांचे महत्त्वही सार्‍यांना पटू लागले आहे. या पार्श्वभूमीवर मर्यादित उत्पन्न हेच गुणविशेष असलेला सेंद्रिय शेतीचा पर्याय कितपत टिकाव धरेल याची शंका कुणाही वास्तववादी वा वस्तुनिष्ठ विचाराला येईल हे अगदी स्वाभाविक आहे. शेवटी सर्वांना विज्ञानवादी दृष्टिकोनातून पुढे जात यातून मार्ग काढावा लागेल, मागे येऊन परंपरागत शेतीचा अवलंब भाजपमान्य ठरला तरी जगात कोठेही अशा सेंद्रिय शेतीला व्यापक समर्थन प्राप्त झालेले नाही.

खरे म्हणजे भाजपचा हा वारेमाप आश्वासने देण्याच्या नीतीचा एक भाग आहे. भाकरी मागणार्‍याला केकचे आश्वासन देण्यासारखे आहे. ज्या सरकारला साधे शेतकर्‍यांच्या नुकसानीचे पंचनामे वेळेत करता येत नाहीत, जाहीर झालेली साधी सरकारी मदत शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवता येत नाही, त्यातील दोषांवर उचित उपाययोजना शोधण्याचा प्रयत्न होत नाही, शेतमाल बाजारातील साधे आडतीसारखे प्रश्न, जे बांधावरच्या शेतकर्‍यांना समजतात, पण पणन खात्याला समजून घेता येत नाहीत, पॅकेजेस हडप करणार्‍या कृषी अधिकार्‍यांवरच्या कारवाईचा कुठे पत्ता लागत नाही, अनेक न्यायालयीन निर्णय अंमलबजावणीची वाट बघत असताना ती कुठे होत असल्याचे दिसत नाही, असे अनेक विषय तातडीने हाती घेऊन मार्गी लावणे आवश्यक असताना सेंद्रिय शेतीसारखी दुःस्वप्ने अगोदरच बेजार झालेल्या कृषी क्षेत्राला दाखवावीत ही मुळातच चुकीची प्राथमिकता आहे. भारतीय शेती हा एक अगम्य व क्लिष्ट विषय आहे व त्याचे सारे प्रश्न हे उत्पादन, व्यापार, आयात-निर्यात अशा तांत्रिक व आर्थिक विषयांशी गुंतलेले आहेत. हे प्रश्न सोडवण्याच्या अशा या प्रयत्नात ते अधिकाधिक क्लिष्ट न होत जावोत, हीच अपेक्षा करणे आपल्या हाती आहे.
डॉ. गिरधर पाटील, कृषितज्ज्ञ
girdhar.patil@gmail.com