आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr Kishor Pathak Article About Homeopathy, Divya Marathi

सलत सूर होमिओपॅथीचा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र शासनाने होमिओपॅथिक डॉक्टरांना अ‍ॅलोपॅथिक औषधोपचार म्हणजेच प्रॅक्टिस करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी औषधशास्त्राचा एक छोटेखानी अभ्यासक्रम दिला जाईल, असे जाहीर केले. तोच अनेक अ‍ॅलोपॅथिक संघटना, काही आमदार, खासदार यांचा पोटशूळ उठला. एका आमदारांनी संतप्त उद्गार काढले, ‘आता पशुवैद्यकीय डॉक्टर आणि औषध विक्रेत्यांनाही तुम्ही अ‍ॅलोपॅथिक परवानगी द्यावी!’ इंडियन मेडिकल असोसिएशन म्हणजे आयएमएनेसुद्धा हा प्रकार धोकादायक असल्याचे म्हटले आहे.

एक तर बर्‍याच जणांचा गैरसमज असा आहे की, होमिओपॅथिक डॉक्टरांनी फक्त होमिओपॅथिक औषधी वापरावी. त्यांना इतर अ‍ॅलोपॅथिक औषधांचे ज्ञान नसेल. मात्र, होमिओपॅथिक डॉक्टर हा साडेचार वर्षांचा अभ्यासक्रम व एक वर्षाची इंटर्नशिप करूनच बाहेर पडतो. होमिओचा अभ्यासक्रम हा एमबीबीएसच्या समान आहे. फक्त उणीव अशी आहे की, शरीरशास्त्र, प्रक्रियाशास्त्र, एफएमटी, रोग व रोगनिदान शास्त्र डॉक्टरांना शहरातील विविध रुग्णालयांतून स्त्रीरोगशास्त्र, कान-नाक-घसाशास्त्र, सामान्य रोगशास्त्र, शस्त्रक्रिया, अत्यावश्यक रुग्णसेवा, औषधांचा वापर या विषयीची आवश्यक माहिती रोगनिदान तज्ज्ञ डॉक्टरांकडून प्रत्यक्ष दिली जाते.

तात्पर्य, होमिओपॅथी डॉक्टर्स म्हणजे काही कंपाउंडर्स नव्हेत. एक तर संपूर्ण डिग्री डॉक्टर्स आहेत. जसे एमबीबीएस म्हणजे बॅचलर आॅफ मेडिसिन व सर्जरी त्याचप्रमाणे बीएचएमएस म्हणजे बॅचलर ऑफ होमिओपॅथी व मेडिसिन आणि सर्जरी होय. एक वर्षाच्या इंटर्नशिप कालावधीत प्रत्येक होमिओपॅथिक डॉक्टर हा औषधशास्त्रातल्या महत्त्वाच्या गोष्टी, जसे औषधीचा डोस, वापर, दुष्परिणाम हे तज्ज्ञांंकडून शिकून घेत असतो. तेव्हा विनाकारण होमिओपॅथीच्या नावाने ओरड करून अथवा बाऊ करून होमिओ डॉक्टरांची बदनामी करू नये. अनेकांना माहिती नसते, आपण वर्षानुवर्षे सर्दी-पडशांसाठी ज्या डॉक्टरांकडे जात आहोत तसेच साध्या आजारापासून इतर मोठ्या आजारांवर अ‍ॅलोपॅथी उपचार घेत आहोत, ते डॉक्टर बीएचएमएस आहेत. कारण वर्षानुवर्षे हे डॉक्टरच अ‍ॅलोपॅथीची प्रॅक्टिस व्यवस्थितपणे करत आहेत. कारण 70 टक्के डॉक्टर्स अ‍ॅलोपॅथिक प्रॅक्टिस करत असतात. बीएचएमएस हा डिग्री अभ्यासक्रम असल्याने आरोग्याच्या साध्या आजारापासून जुनाट रोगावरसुद्धा सर्व सेवा होमिओपॅथी डॉक्टर्स सेवा देऊ शकतात. आरोग्यसेवा देणे महत्त्वाचे असते. आज महाराष्ट्रात 57 हजार होमिओपॅथिक डॉक्टर शहरात आणि खेड्यापाड्यात प्रॅक्टिस करत आहेत.

आयएमए यासारख्या आक्षेप घेण्याचे कारण म्हणजे शहरात रात्री-अपरात्री आरोग्यसेवा देणारे होमिओपॅथी डॉक्टर्सच आहेत. गडचिरोली येथे वर्षानुवर्षे वैद्यकीय सेवा देणार्‍या डॉ. राणी बंग यांनी नुकतेच सांगितले आहे की, खेडोपाडी, तांड्यांवर वैद्यकीय सेवा देणारे होमिओपॅथीचेच डॉक्टर्स आहेत. कावीळ, मेंदूज्वर, रक्तस्राव, मलेरिया, पक्षाघात, हृदयविकार अशा आपत्कालीन व तत्काळ उपचार लागणारा रुग्ण दवाखान्यात आल्यास त्यावर अ‍ॅलोपॅथिक उपचार जरुरी असतात. या आजारांसाठी होमिओपॅथीचे उपचार योग्य ठरत नाहीत. अशा वेळी होमिओपॅथिक डॉक्टर्स अ‍ॅलोपॅथिक प्रॅक्टिस करण्याची वाट पाहत बसले, तर गंभीर परिणाम होतील. रुग्ण जर रक्तस्राव, सर्पदंश किंवा विंचू दंश, पक्षाघात, अतिसार या आजारांचा असेल, तर तत्काळ अ‍ॅलोपॅथीचे उपचार रुग्णास वाचवू शकतात. एक डिग्री डॉक्टर या नात्याने उपचार केल्यास कसली परवानगी पाहिजे? शासकीय रुग्णालयात थंडी-तापाच्या प्रत्येक रुग्णास मलेरिया प्रतिबंधक औषधी दिल्या जातात. शहरातही एमबीबीएस, एमडी, एमएस डॉक्टर्स रुग्णांना एकाच वेळी दोन-दोन प्रतिजैविके, वेदनाशामक गोळ्या, महागडी औषधे यांचा सर्रास वापर करतात.

बहुतांश आजार हे विषाणुजन्य असतात. त्यावर प्रतिजैविके काम करत नाहीत. अशा रुग्णांची प्रतिकारक्षमता वाढल्यास आजार बरा होत असतो, म्हणून भरमसाट औषधांचा मारा करून काही फायदा होत नसतो. याकडे तज्ज्ञ मंडळी लक्ष देत नाहीत. याउलट होमिओपॅथिक डॉक्टर्स कमी खर्चात उपचार करत असतात. आजही वैद्यकीय व्यवसाय अत्यंत मानाचा आणि पवित्र मानला जातो. त्याच पवित्रतेने आणि त्यागाने रुग्णसेवा करण्यासाठी होमिओपॅथीचे डॉक्टर्स सदैव तयार आहेत. एकमेकांच्या पॅथीविषयी वाद निर्माण करून काही साध्य होणार नाही, तरी होमिओपॅथीबद्दल विनाकारण कोणी गैरसमज करून घेऊ नये.