Home | Magazine | Pratima | dr-mohan-agashe-life-time-achivment

मराठी रंगभूमीला समर्पित नाट्यकर्मी

जयश्री बोकील | Update - Nov 05, 2011, 05:13 AM IST

डॉ. आगाशे यांना जाहीर झालेला अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुणे शाखेचा जीवनगौरव पुरस्कार कुणाही नाट्यप्रेमीला सुखवणारा आहे.

 • dr-mohan-agashe-life-time-achivment

  काही वर्षांपूर्वी एका दिवाळी अंकासाठी कलाक्षेत्रातील डॉक्टर असा विषय हाताळत असताना डॉ. मोहन आगाशे हे नाव अग्रक्रमाने असल्याची आठवण झाली. कलाक्षेत्र आणि वैद्यकीय व्यवसाय या दोन अगदी भिन्न डगरींवर एकाच वेळी पक्की मांड बसवलेले दुसरे उदाहरण दुर्मिळच म्हणावे लागेल. कला क्षेत्रात अत्यंत अष्टपैलू अभिनेते म्हणून परिचित असणारे डॉ. मोहन आगाशे ज्येष्ठ मनोविकारतज्ज्ञ म्हणूनही प्रसिद्ध आहेत. आजही ते वैद्यकीय व्यावसायिक या नात्याने प्रॅक्टिस करतात. वैद्यकीय सल्ला-सेवा पुरवतात.
  या पार्श्वभूमीवर डॉ. आगाशे यांना जाहीर झालेला अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुणे शाखेचा जीवनगौरव पुरस्कार कुणाही नाट्यप्रेमीला सुखवणारा आहे. गेली सुमारे 35 ते 40 वर्षे डॉ. आगाशे मराठी, हिंदी, इंग्रजी रंगभूमी तसेच मराठी, हिंदी चित्रपटसृष्टी, छोट्या पडद्यावरच्या विविध
  मालिका तसेच जाहिराती, लघुपट येथे सातत्याने कार्यरत आहेत. अतिशय संवेदनशील तरीही समतोल अभिनय ही त्यांची खासियत आहे. उत्तम व्यक्तिमत्त्व, कमावलेला आवाज, प्रत्येक भूमिकेचा त्यांनी केलेला अभ्यास, त्यांचा स्वत:चा रंगभूमी आणि कलाविश्वाचा व्यासंग, प्रभावी संवादकौशल्य आणि जगभरात प्रस्थापित केलेले संपर्कविश्व, म्हणजे डॉ. मोहन आगाशे असे सहज म्हणता येते.
  साधारणत: जीवनगौरव पुरस्कार हा विशिष्ट क्षेत्रातील कार्याचा, योगदानाचा सन्मान म्हणून दिला जातो. यादृष्टीने डॉ. मोहन आगाशे यांचे काम अतिशय चतुरस्र आहे, असे म्हणावे लागते. त्यांच्या कलाविश्वातील योगदानातही वैविध्य आहे आणि एक निष्णात वैद्यकीय व्यावसायिक म्हणूनही त्यांचे नाव आदराने घेतले जाते. ससून सर्वोपचार रुग्णालयातील मनोविकार विभागाचे ते प्रमुख होते. अनेक शासकीय जबाबदाºयाही त्यांनी पार पाडल्या आहेत. मनोविकारतज्ज्ञ म्हणून त्यांनी विविध प्रकारचे लेखनही केले आहे, व्याख्याने, परिसंवाद, चर्चासत्रे यात ते सहभागी असतात. त्याचवेळी कलाकार म्हणूनही ते त्याच सहजतेने रंगमंचावर आणि कॅमेºयासमोर वावरत असतात. डॉ. मोहन आगाशे हे नाव आणि घाशीराम कोतवाल नाटकातील नाना फडणविसांची व्यक्तिरेखा, हे समीकरण बनून गेले आहे. अनेक वर्षे हे नाटक डॉ. आगाशे यांनी गाजवले. केवळ राज्यातच नव्हे, मराठी भाषेतच नव्हे तर अन्य राज्यात आणि विदेशांतही या नाटकाचे अनेक प्रयोग झाले आहेत. भारतीय आणि जागतिक रंगभूमीवरही या नाटकाचा माइलस्टोन असाच उल्लेख केला जातो.
  व्यावसायिक रंगभूमी आणि चित्रपट-मालिकांमध्ये अभिनय एवढ्यापुरतेच डॉ. आगाशे यांचे कर्तृत्व सीमित नाही. प्रायोगिक रंगभूमीवरही त्यांचे कार्य मोलाचे आहे. विशेषत: लहान मुलांसाठीची ग्रिप्स नाट्यचळवळ महाराष्ट्रात सुरू करण्यात आणि ती वाढवून तिचा प्रसार करण्यात त्यांचे योगदान अनन्यसाधारण आहे. हे सारे डॉ. आगाशे यांनी सुमारे तीस वर्षांपूर्वीपासून केले आहे, याची नोंद घेणे आवश्यक आहे. बालरंगभूमी हा उपेक्षित घटक असताना त्यांनी केलेल्या या कामाचे मोल मोठे आहे. आज ग्रिप्स थिएटरने जे बाळसे धरले आहे, त्याचे श्रेय डॉ. आगाशे यांचेच आहे.
  बहुतेक वेळा कलावंत व्यावसायिक रंगभूमीवर यशस्वी झाले की जिथून ते पुढे आले त्या प्रायोगिक रंगभूमीचा त्यांना सोयीस्कर विसर पडतो, असा अनुभव आहे. त्याला एक सन्माननीय अपवाद डॉ. आगाशे यांच्या रूपाने निर्माण झाला आहे. आजही ते मनापासून नव्या दिग्दर्शकांसाठी प्रायोगिक रंगभूमीवर काम करतात. एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांच्या लघुपटात दिसतात. सर्व माध्यमांतील सहजता हा त्यांच्या अभिनयाचा विशेष पैलू आहे. डॉ. आगाशे यांच्यासारख्या अष्टपैलू प्रतिभेच्या कलावंत वैद्यकीय व्यावसायिकाने थोडे लक्ष आता कलाविषयक लेखनाकडेही वळवावे, असा एक सूर उमटताना दिसत आहे. त्याचा विचारही ते करतील, या अपेक्षेने त्यांचे या पुरस्काराबद्दल अभिनंदन.Trending