आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेमेचि येतो आणि येत राहणार...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दरवर्षी भारतात दाखल होणारा मान्सून ही जागतिक पातळीवरील एक वातावरणीय घटना असते. या घटनेत वातावरणाच्या अनेक जागतिक प्रक्रियांचा समावेश असतो. या सर्व प्रक्रिया एकत्रितरीत्या अनुकूल होतात, तेव्हा देशात उत्तम मान्सूनचा अनुभव येतो. काही घटक पुढे-मागे झाले, की मान्सूनच्या वाटचालीवर त्याचा परिणाम होतो आणि मान्सूनची टक्केवारीही कमी-अधिक होते.

मान्सून म्हणजे पाऊस, हे आपले समीकरण
देशात ठरावीक काळात पाऊस पडत असल्याने आपण मान्सून हा पावसाचा समानार्थी शब्द मानतो. प्रत्यक्षात मान्सून याचा अर्थ दिशा बदलणारे वारे, असा आहे. उष्णबंधीय प्रदेशात समुद्र आणि जमीन यांच्यातील तापमानातील तफावतीमुळे मान्सूनचे वारे वाहतात. तसेच हे वारे वर्षातून दोन वेळा दिशा बदलतात. ही प्रक्रिया पुढीलप्रमाणे घडते -
उन्हाळ्यात उत्तर गोलार्धात जमीन खूप तापते, पण तेव्हा दक्षिण गोलार्धातील समुद्र तेवढा तापत नाही. हिवाळ्यात उत्तर गोलार्धात जमीन थंड होते, पण त्या तुलनेने दक्षिण गोलार्धात समुद्र उबदारच राहतो. यामुळे वातावरणीय प्रक्रियेने मान्सूनचे वारे उन्हाळ्यात दक्षिणेकडून उत्तरेकडे तर हिवाळ्यात उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहतात.

मान्सून वार्‍यांचा प्रवास : मान्सूनचे वारे उष्ण कटिबंधातील ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया, आफ्रिका येथील अनेक देशांवर वाहतात, पण भारतीय भूप्रदेशावरून वाहणार्‍या वार्‍यांचे अनन्यसाधारण वैशिष्ट्य असते - ते म्हणजे भारतीय भूप्रदेशावरून वाहणारे हे वारे सोबत बाष्प आणि ढग घेऊन येतात. त्यामुळेच ठरावीक काळात आपल्या देशात भरपूर पाऊस पडतो. हा पाऊस जून ते सप्टेंबर असा चारच महिने पडतो. कारण उर्वरित काळात या वार्‍यांची दिशा बदललेली असते. गंमत म्हणजे त्या काळात देशात फक्त तामिळनाडूमध्ये पाऊस पडतो. अशी अपवादात्मक परिस्थिती जगात फक्त आपल्या देशात आढळते.

मान्सूनचा प्रवास : नैर्ऋत्य मोसमी वारे सर्वप्रथम अंदमानच्या समुद्रात व नंतर केरळमध्ये दाखल होतात. येथूनच मान्सून दक्षिण व पश्चिम भारतात प्रवेश करतो. त्यामुळे केरळला मान्सूनचे प्रवेशद्वार म्हणतात. वार्‍यांचा हा प्रवास एप्रिल-मे महिन्यापासूनच सुरू असल्याने आपल्याकडे एप्रिलपासूनच मान्सूनच्या वाटचालीकडे लक्ष केंद्रित झालेले असते. या वातावरणीय घटनेचे हवामानशास्त्रीय अनुमानही यामुळेच शक्य होते. भारतीय हवामानशास्त्र विभाग मान्सूनचा पहिला अंदाजही एप्रिलमध्येच वर्तवतो. त्याला आपण दीर्घकालीन अंदाज म्हणतो. त्यानंतर ठरावीक काळाने आयएमडी मान्सूनचे अंदाज वर्तवत असते.

अंदाज मागेपुढे होतात : मान्सून जोवर केरळमध्ये दाखल होत नाही, तोपर्यंतचे अंदाज हे जागतिक वातावरणीय प्रक्रियांनुसार व सांख्यिकीय निष्कर्षांतून वर्तवले जातात. मात्र एकदा मान्सूनचे केरळमध्ये अधिकृत आगमन झाले, की या जागतिक प्रक्रियांचे महत्त्व मान्सूनच्या पुढील वाटचालीत कमी होत जाते. एक जूनच्या सुमारास मान्सून केरळमध्ये आला, की दहा जूनच्या सुमारास त्याचे महाराष्ट्रात आगमन होते. मात्र देशाच्या विशिष्ट भौगोलिक स्वरूपामुळे मान्सूनची केरळपासून पुढची वाटचाल अनियमित पद्धतीची ठरू शकते. ही अनियमितता सतत बदलत असल्याने मान्सून राज्यात आला तरी कोणत्या जिल्ह्यात वा तालुक्यात तो कोणत्या दिवशी आणि किती प्रमाणात पडेल, हे अचूक सांगणे कठीण बनते. त्यामुळेच देशात आलेल्या मान्सूनचे अंदाज हे बहुधा 24, 48 वा 72 तासांच्या कालावधीचे असतात.

मान्सूनची विषमता : देशात चार महिने पाऊस पडतो, हे खरे असले तरी हा पाऊस सर्वत्र एकसमान पडत नाही. कुठे जास्त तर कुठे कमी अथवा अजिबात नाही, असे घडत असते. हे निसर्गाने मान्सूनला दिलेले स्वातंत्र्य आहे. आपण मात्र त्याला मान्सूनचा लहरीपणा म्हणतो. मान्सूनचे असे पुढे-मागे होणे विपरीत नाही, हे लक्षात ठेवले पाहिजे. पाऊस सगळीकडे एकसारखा पडत नाही त्याला भौगोलिक प्रदेशवैशिष्ट्ये कारणीभूत असतात. तसेच पाऊस अधूनमधून विश्रांती घेतो. तीही आवश्यकच असते. सुरुवातीच्या चांगल्या पावसानंतर पिकांना सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. ही निसर्गानेच केलेली व्यवस्था आहे. आपण मात्र सारे खापर मान्सूनवर फोडून मोकळे होतो.

मान्सून ट्रफ : पावसाळ्याच्या अगदी सुरुवातीपासून उत्तर भारतावर मान्सून ट्रफ नावाचा एक कमी दाबाचा पट्टा बनतो आणि पावसाळा संपेपर्यंत तो टिकून राहतो. हा पट्टा थोडा दक्षिणेकडे सरकला तर महाराष्ट्रात व मध्य प्रदेशात खूप पाऊस पडतो, पण हा पट्टा उत्तरेकडे सरकला की पावसाचा जोर मंदावतो - यालाच मान्सून ब्रेक म्हणतात. असा खंडित काळ अधिक राहिला तर देशभर पावसाचे प्रमाण कमी होते. मान्सून ट्रफचे एक टोक राजस्थानवर तर दुसरे टोक बंगालच्या खाडीवर असते. अधूनमधून बंगालच्या खाडीवर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होते. कधी त्याची तीव्रता वाढून त्याचे डिप्रेशन बनते. या डिप्रेशनच्या पूर्व-पश्चिम मार्गावर मग मुसळधार वर्षाव होतो. पावसाळ्याच्या चार महिन्यांत असे डिप्रेशन किती बनते, त्याचा मार्ग कोणता, तीव्रता किती याचा प्रभाव पर्जन्यमानावर होत राहतो.

असा बरसतो मान्सून : भारताच्या पश्चिम किनार्‍यावर ठरावीक काळात वाहणारे नैर्ऋत्य मोसमी किंवा पश्चिमी वारे, हा आपल्याकडे पडणार्‍या पावसासाठी कळीचा मुद्दा असतो. अरबी समुद्रावरून येणार्‍या या वार्‍यांशिवाय पावसाचा जोर टिकून राहू शकत नाही. या पश्चिमी वार्‍यांना सह्याद्रीच्या उंच पर्वतरांगा प्रतिरोध करतात. तेव्हा हवेचे तरंग उंच चढत जातात. त्यामध्ये भरपूर बाष्प असते. उंचीवर चढत गेल्याने या बाष्पाचे ढगांत रूपांतर होते आणि मग केरळ, कर्नाटक, गोवा, कोकण किनारपट्टीच्या प्रदेशात चार महिने दमदार वर्षाव होतो.

यापैकी जे पश्चिमी वारे सह्याद्रीच्या रांगा ओलांडून जातात, त्यांचा जोर ओसरलेला असतो. त्यांच्यात पुरेसे बाष्पही नसते. त्यामुळेच कोकणात 250 सेंटीमीटर तर मध्य महाराष्ट्रात फक्त 50 सेंटीमीटर, असे पावसाचे विषम प्रमाण दिसते. मराठवाड्यासारखे पर्जन्यछायेचे प्रदेश त्यामुळेच मुसळधार पर्जन्यापासून अनेकदा वंचित राहतात. पुढच्या प्रवासात अरबी समुद्रावरून आलेले मान्सूनचे वारे भारतीय द्विपकल्पाचा पठारी प्रदेश पार करून बंगालच्या उपसागरावर येतात. येथे एक महत्त्वाचा बदल घडतो. वातावरणाचा दाब कमी असल्याने हे वारे दिशा बदलतात. समुद्रावर आल्यावर ते पुन्हा बाष्प गोळा करतात आणि पुन्हा जोर पकडतात व पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहू लागतात. हा प्रवाह प. बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा व राजस्थानपर्यंत वर्षाव करत पोहोचतो. तोपर्यंत 15 जुलै उजाडलेला असतो आणि पावसाचे प्रमाण राजस्थानात 10 सेंटीमीटरपर्यंत घसरलेले असते.

मान्सूनचे नियोजन हाच उपाय : आपल्या देशात मान्सून हाच पाण्याचा एकमेव स्रोत आहे. मान्सूनमुळेच नद्या वाहतात, धरणे भरतात. तेच पाणी दैनंदिन वापर, शेती, उद्योगाला वापरले जाते. जमिनीत मुरून हेच पाणी आपण बोअरवेल, विहिरींतून उपसतो. हा स्रोत मर्यादित आहे. त्यामुळे या पाण्याचा योग्य वापर करणे, वापराचे काटेकोर नियोजन करणे हाच प्रभावी उपाय आहे. कितीही मागेपुढे, कमी अधिक झाला तरी मान्सून मी येणारच, असा ठाम विश्वास देतो. तो दरवर्षी येत राहणारच आहे. प्रत्येक वर्षी त्याचे रूप निराळे असते. तो नवा उत्साह देतो. नवे जीवन घेऊन येतो. नवी आशा निर्माण करतो म्हणून त्याचे आपण स्वागतच केले पाहिजे.

डॉ. रंजन केळकर
( निवृत्त महासंचालक, भारतीय हवामानशास्त्र विभाग)