आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वारकरी संप्रदायाची ‘आध्यात्मिक लोकशाही’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात विविध धर्म आणि धर्मसंप्रदाय यांचं अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. हिंदू धर्माबरोबरच बौद्ध, जैन, वीरशैव हे धर्म आणि हिंदू धर्मातील नाथ, महानुभाव, वारकरी, नागेश हे धर्मसंप्रदाय यांचा यासंदर्भात उल्लेख करता येईल. यांतील वारकरी संप्रदायाचा उद्गम पौराणिक काळातील पुंडलिकापासून झाला असला तरी तेराव्या शतकात ज्ञानदेव आणि नामदेव या संतद्वयामुळं वारकरी संप्रदायाच्या तत्त्वज्ञानात आणि आचारधर्मात लक्षणीय परिवर्तन झालं. या संतद्वयांनी नवचैतन्य ओतलं. त्यामुळं त्याला जणू नवीन संजीवनी लाभली. तसेच उजाळा मिळाला व तो अधिक लोकाभिमुख झाला. ज्ञानदेव आणि नामदेव यांनी केलेल्या तीर्थयात्रेमुळं त्यांना तत्कालीन समाजजीवनाचं अत्यंत बारकाईनं निरीक्षण करता आलं.

चातुर्वर्ण्य व्यवस्थेमुळे समाजात उच्चवर्णीय आणि अन्यवर्णीय अशी विषमाधिष्ठित व अन्यायमूलक, त्याचप्रमाणं समाज दुभंगणारी विभागणी झाली. स्त्रीवर्गाला व काही वर्णीयांना नाकारलेला भक्ती नि मुक्तीचा अधिकार, तसेच कर्मसिद्धांताच्या पोलादी चौकटीमुळे स्त्रियांची पिळवणूक चालू होती. कर्मकांडाचं अनावश्यक स्तोम या व अशा कितीतरी बाबींमुळे वाढले. या धर्मव्यवस्थेचा व समाजव्यवस्थेचा पुनर्विचार करून त्यांचं पुनर्व्यवस्थापन करण्याची निकड ज्ञानदेव आणि नामदेव या संतद्वयांना भासली. तिच निकड तेराव्या शतकात व त्यानंतरच्या काळात वारकरी संप्रदाय उत्तरोत्तर अधिकाधिक लोकाभिमुख व्हायला कारणीभूत ठरली. त्यांचे प्रतिबिंब ज्ञानदेव-नामदेवांच्या भोवती, वारकरी संप्रदायाच्या छत्राखाली आलेल्या प्रभावळीत आपल्याला नेमकेपणानं उमटलेलं दिसतं.

यात सावता माळी, गोरा कुंभार, नरहरी सोनार, चोखा मेळा, सेना महाराज या संतांप्रमाणेच जनाबाई, कान्होपात्रा, सोयराबाई (चोखोबांची पत्नी), निर्मळा (चोखोबांची बहीण), भागू यांच्यासारख्या स्त्री संताचा समावेश होतो आणि हीच परंपरा पुढं आपल्याला संत एकनाथ, तुकोबा, निळोबा आणि बहिणाबाई यांच्यापर्यंत म्हणजे मध्ययुगाच्या अखेरीपर्यंत आढळते. वारकरी संप्रदायाच्या या बदललेल्या भूमिकेमुळे समाजातील सर्वच (शूद्रवर्णीयांसहित) घटकांना, त्याचप्रमाणे स्त्री वर्गालाही आत्मभान आले. भक्ती करण्याचा व मुक्ती प्राप्त करण्याचा आपल्याला जन्मसिद्ध अधिकार आहे, याचेही भान त्यांना या आत्मभानाबरोबरच आले. त्यामुळे वारकरी संप्रदाय महाराष्ट्राच्या तळागाळापर्यंत पोहोचला. तो संघटितही झाला. हे आज आपल्याला महाराष्ट्रभर विखुरलेल्या वारकरी फडामध्ये दिसते. एका अर्थाने, महाराष्ट्रात स्थापन झालेली ही ‘आध्यात्मिक लोकशाही’च होय. वारी आणि जागोजाग होणारे अखंड हरिनाम सप्ताह याचंच प्रतीक होय.

अद्वैत मत हा वारकरी संप्रदायाच्या तत्त्वज्ञानाचा जसा गाभा आहे, त्याचप्रमाणे ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीत विस्ताराने प्रतिपादलेला चिद्विलासवाद हाही एक तत्त्वज्ञानाचा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. त्याचे प्रत्यंतर आपल्याला ‘सर्वां भूती भगवद्भाव’ आणि ‘जे जे भेटे ते भूत । ते मानिजे भगवंत ।।’ यासारख्या वारकरी संतांच्या उक्तीत व ज्ञानदेवांच्या ‘अलंकारातें आले, तरि सोनेपण काइ गेले?’ या प्रश्नात आढळते.
वारकरी संप्रदायात साधना, उपासना किंवा भक्ती करण्याचा अधिकार (स्त्रियांसह) सर्वांना आहे. अनेक वारकरी संतकवी नि संतकवयित्री यांच्या लेखनात याचे दाखले आढळतात. जनाबाई म्हणतात,
‘स्त्रीजन्म म्हणवुनी न व्हावे उदास ।
साधुसंता एैसे मज केले।
संताचे घरची दासी मी अंकिली
विठोबाने दिली प्रेमकळा’
मुक्ताबार्इंचा हा अभंग लक्षात घेण्याजोगा आहे,
‘मने मन चोरी, मनोमन धरी ।
कुंडली आधारी सहस्रदळी ।।
मन हे वोगरू, आदि हरिहरू ।
करी पाहुणेरू आदिरूपा ।।’
तर सोयराबाई असा परखड प्रश्न विचारतात,
‘वाडग्या ब्रह्मज्ञाना कोण पुसे?
वाडग्या व्युत्पत्ती, वाडग्या शब्दआटी ।
वाडग्या ज्ञानगोष्टी, बोलून कायी?
वाडगे ते बोल, बोलणे तोवरी ।
म्हणत असे महारी चोखियाची ।।’

वारकरी संप्रदायात बहुजन समाजातील व शूद्रवर्णातील संतांची परंपरा आहे. ती 13 व्या शतकापासून सुरू झालेली आहे. याची अनेक उदाहरणे देता येतील. गोरोबा म्हणतात -
केशवाचे ध्यान धरूनि अंतरी ।
मृत्तिकेमाझारी नाचतसे ।।
विठ्ठलाचे नाम स्मरो वेळोवेळा।
नेत्री वाहे जळ सद्गदित।।
कुलालांचे वंशी जन्मले शरीर ।
तो गोरा कुंभार हरिभक्त।।
संत नरहरी महाराज यांचा ‘देवा मी तुझा सोनार।’ हा अभंग तर प्रख्यातच आहे. त्याचप्रमाणे सावता माळी म्हणतात -
नामाचिया बळे न भिऊ सर्वथा।
कळिकाळांच्या माथा सोटे मारु ।।
वैकुंठींचा देव आणूं या कीर्तनी ।
विठ्ठल गाऊनी नाचो रंगी ।।
सुखाचा सोहळा करूनी दिवाळी ।
प्रेमे वनमाळी चित्ती धरुं ।।
सावता म्हणे ऐसा भक्तिमार्ग धरा ।
नेणे मुक्तिद्वार वोळंगती ।।
संतकवी चोखा मेळा यांच्या अभंगात तर वारकरी संप्रदायामुळं चातुवर्ण्याधिष्ठित विषमतावाद नाहीसा झाला, याचं वर्णन आढळतं. -
बहु दुर्लभ होते, ते सुलभचि झालें ।
तेथे मन गुंतले सर्वभावे ।।
ते रूप ‘अरूप,’ रूपाचि वेगळें ।
हृदयी बिंबले सर्वकाळ ।।
नामगोष्टी अवघी भरली हे सृष्टी ।
द्वैतभावपोटी नाहीसा झाला ।।
चोखा म्हणे, ज्याचा उपदेश मला ।
सहज निरसला भेदाभेद ।।

हे बहुजनातले संत व साधक स्त्रिया तर परमेश्वराशी इतक्या एकरूप झाल्या की, परमेश्वर सतत त्यांच्या बरोबर आहे, असं त्यांना वाटतं. तो जनाबार्इंच्या बरोबर दळतो-कांडतो, सडासारवण करतो. त्यांची वेणीफणीही करतो, असं त्यांनी स्वत:च आपल्या अनेक अभंगांत लिहिलं आहे. तर पांडुरंग आपल्याच घरी येऊन भोजन मागतो व त्यांच्या घरचं जे ओलंसुकं आहे, ते गोड मानून घेतो. अशा आशयाचे अभंग चोखोबा आणि सोयराबार्इंनी लिहिले आहेत. ते वाच्यार्थाने घेतले नाहीत, तर लक्ष्यार्थानं तरी घ्यायलाच हवेत. यातून वारकरी संप्रदायाला काय अभिप्रेत आहे, हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. त्यासाठी पू. सानेगुरुजी यांना हरिजनांना मंदिरात प्रवेश देण्यासाठी उपोषण करावे लागले.

डॉ. आंबेडकरांच्या संदर्भातील काळाराम मंदिराची घटनाही सर्वज्ञात आहे. सुदैवाने आता समाजाची मानसिकता बदलू लागली असून संप्रदायाची आध्यात्मिक लोकशाहीची संकल्पनाही मान्य झाली आहे. वारीत जातीपातीचा व स्त्री-पुरुष असा भेद नसतो. सर्व जण वारीत सहभोजन घेतात. कोणत्याही जातीचे स्त्री-पुरुष उपासना/भक्ती/ साधना करतात, इथपर्यंत समाजाची मानसिकता प्रगत झाली आहे. त्यापुढचे टप्पे गाठून समाजातील सर्व घटकांना जीवनाचे अंतिम उद्दिष्ट साध्य करता यावं, इथं ईश्वरनिष्ठांची मांदियाळी व्हावी व त्यांचे कल्याण व्हावे, हे ज्ञानदेवांनी मागितलेले ‘पसायदान’ प्रत्यक्ष परमेश्वरानंच ‘हा होईल दानपसावो’ असं म्हणून मान्य केल्यामुळे ज्ञानदेव ‘सुखिया जाले’ आहेत, हे लक्षात घेऊन त्यात अडसर न आणता पुढील वाटचाल करणं सर्वांच्याच हिताचे नाही का? आता घड्याळाचे काटे मागे कसे सारता येतील?