आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ड्रॅगनची पाचवी पिढी सक्रिय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चीनमध्ये अलीकडेच नेतृत्वबदल घडले, पण त्यामानाने त्याचा गवगवा झाला नाही. नोव्हेंबर 2002 मध्ये हू जिंताओ यांची कम्युनिस्ट पक्षाच्या 16 व्या राष्‍ट्रीय काँग्रेस अधिवेशनात पक्षाच्या सरचिटणीसपदी आणि देशाच्या अध्यक्षपदी तसेच चिनी लष्करी सर्वोच्च मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाली तेव्हा ते 59 वर्षांचे होते. आता त्यांची जागा घेणारे नवे अध्यक्ष शी जिनपिंग (चिनी मँडरिन परिभाषेत ‘एक्सआय’चा उच्चार ‘शी’ असा होतो आणि प्रथमच आपण काहीतरी विनोद करतो आहोत, असे समजून काही पाश्चिमात्यांनी त्यांच्या नावावर कोटी केली की, ते जरी ‘ही’ असले तरी ते ‘शी’ आहेत.) हेही 59 वर्षांचे आहेत. शी यांची निवड एकमताने झालेली नाही. 2952 विरुद्ध एक अशा मतांनी ते निवडले गेले आहेत.

त्यांच्याविरोधात एक मत पडले आणि तिघे तटस्थ राहिले. चीनमध्ये अशा मतदानातून झालेली ही दुसरी निवड आहे हेही लक्षात घेण्याची गरज आहे. कालपर्यंत चीनच्या पंतप्रधानपदी असलेले वेन जिआबाओ यांची जागा घेणारे ली कुचियांग हे 57 वर्षांचे आहेत. शी हे चिनी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस, पक्षाच्या मध्यवर्ती लष्करी मंडळाचे अध्यक्ष आणि पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना म्हणजेच चिनी प्रजासत्ताकाचे अध्यक्ष आहेत. प्रथेप्रमाणे त्यांचे अध्यक्षपद हे त्यांच्या आधीच्या दोन पदांपेक्षा तिस-या स्थानावर आहे. म्हणजे ते कमी महत्त्वाचे आहे, असे मात्र नाही.

या नेतृत्वबदलानंतरच्या प्रतिक्रियांचा अदमास घेता चीनच्या नव्या अध्यक्षांना ज्या देशांकडून अभिनंदनाचे संदेश गेले त्यांची नावे ‘चायना डेली न्यूज’च्या बातमीत प्रसिद्ध झालेली आहेत. मला त्यात भारताचे नाव हा लेख लिहून होईपर्यंत आढळलेले नव्हते. सांगायचा मुद्दा हा की, त्या यादीत पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांचे नाव सर्वप्रथम झळकलेले आहे. शिवाय नामिबियापासून व्हिएतनामपर्यंत अनेक देशांच्या प्रमुखांची नावे आहेत. आपल्या पहिल्याच भाषणात चीनच्या दृष्टीने सर्वार्थाने पासंगालाही नसणा-या पाकिस्तानच्या मैत्रीबद्दल आणि परंपरेने आलेल्या चांगल्या संबंधांविषयी नवनिर्वाचित अध्यक्ष शी जिनपिंग भरभरून बोलले हेच पाकिस्तानचे बळ अधिक वाढवणारे आहे. भारताचे परराष्‍ट्रधोरण निश्चित करणा-यांनी त्याचा विचार करायला हवा. बराक ओबामा यांनी सर्वप्रथम शी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून दोन्ही देशांमध्ये असलेल्या महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चाही केली. भारतीय नेते आपल्या राजशिष्टाचारात कमी पडतात हे यानिमित्ताने माझ्या मनात अधिकच ठळकपणे अधोरेखित झाले. असो.

चिनी कम्युनिस्ट पक्षात आता हे पाचव्या पिढीचे सत्तांतर आहे. माओ झेडाँग, दंग श्याओ पिंग, चयांग जमीन, हू जिंताओ आणि आता शी जिनपिंग ही ती नेत्यांची पिढी. माओ झेडाँगच्या पिढीत अर्थातच झाऊ एन लाय, लिऊ शाओ की, झू दे, चेन यून, लिन बिआओ ही त्या वेळी कुप्रसिद्ध असलेली चौकडी होती. माओ, झाऊ आणि झू दे हे तिघेही एकाच काळात जवळपास निवर्तले. हे सर्व 1960 च्या प्रारंभीच्या काळापर्यंत सामुदायिक नेतृत्वाचे पुरस्कर्ते म्हणून ओळखले जात होते. 1966 मध्ये लिऊ शाओ की याला अटक करण्यात आली आणि तुरुंगात त्याचा छळ करण्यात येऊन तो 1969 मध्ये मरण पावला. लिऊच्या निधनानंतर माओ झेडाँग यांनी लिन बिआओला महत्त्वाची भूमिका बजावायची संधी दिली तेव्हा त्याने चांडाळचौकडीला हाताशी धरले आणि माओचे अंतवासी म्हणून काम पाहायला सांगितले. त्यांनी घातलेला गोंधळ चीनला बेबंदशाहीकडे नेणारा ठरला.

नवनिर्वाचित अध्यक्ष शी जिनपिंग यांची निवड गृहीत धरण्यात आली होती, तरी त्यांच्या निवडीचा तसाही वेगळा धक्का आहे. त्यांचे वडील शी झोंगशून हे बौद्ध धर्म मानणारे होते. हा कम्युनिझमच्या प्रभावाखाली असलेल्यांना तसा पहिला धक्का होय. पण त्याही पलीकडे त्यांचे आणि दलाई लामा यांचे जवळचे स्नेहबंध होते हा चिनी जनतेला दुसरा धक्का होय! शी झोंगशून हे कम्युनिस्ट गनिमी लढ्याचे काही काळ सूत्रधार होते आणि नंतर ते शांघाय कम्युनिस्ट पक्षाचे चिटणीस होते. शी पंधरा वर्षांचे असताना सांस्कृतिक क्रांतीच्या काळात 1968 मध्ये त्यांच्या वडलांना तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र, वडलांचे पाठबळ नसताना ते शिक्षण घेत राहिले. सांस्कृतिक क्रांतीत आपल्याला सर्व काही मृगजळाप्रमाणे भासत असे, हे नंतर त्यांनी एका मुलाखतीत स्पष्ट केले होते.

1975 ते 1979 या काळात बीजिंगच्या चिंघ्वा विद्यापीठातून त्यांनी केमिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली. ज्यांनी आपल्या वडिलांच्या हाताखाली काम केले त्या गेंग बिआओ यांचे सचिव म्हणूनही शी यांनी काही काळ काम केले. ते केंद्रीय लष्करी मंडळावर असल्याने त्यांना त्या कामाचाही अनुभव मिळाला. 1985 मध्ये ते अमेरिकेत प्रथमच आयोवामध्ये मुस्कातीनमध्ये शेतीचा अभ्यास करायला गेले. 1999 मध्ये ते फ्युजियन प्रांताचे डेप्युटी गव्हर्नर आणि नंतर लगेचच ते त्या प्रांताचे गव्हर्नर बनले. या काळात त्यांनी चीनचा कट्टर पारंपरिक वैरी असलेल्या तैवानची आपल्या प्रांतात अधिक गुंतवणूक व्हावी यासाठी प्रयत्न केले आणि त्यास यशही आले. 2002 मध्ये ते चेचँग प्रांतात आले आणि काही काळापुरते त्यांनी तिथे गव्हर्नरपदाचेही काम पाहिले.

त्याच सुमारास त्यांच्याकडे बीजिंग ऑलिम्पिक्सचीही जबाबदारी सोपवण्यात आली. विशेष हे की, त्या प्रांताचा विकासाचा दर त्यांनी चौदा टक्क्यांवर नेऊन दाखवला. शी जिनपिंग यांना पक्षाच्या केंद्रीय राजकीय मंडळात 2007 मध्ये स्थान मिळाले. त्याच वेळी ते उपाध्यक्ष बनले. त्यांना ली कुचियांग यांच्या वरचे स्थान देण्यात आले. त्या वेळीच ते हू जिंताओ यांचे वारस ठरतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येऊ लागली.

ली कुचियांग हे आता क्रमांक दोनचे चिनी नेते आहेत. वर सांगितल्याप्रमाणे ते हू जिंताओ यांना गुरुस्थानी मानणारे आहेत, तरी ते कम्युनिस्ट पक्षाच्या सरचिटणीस पदापर्यंत पोहोचू शकलेले नाहीत. पण त्याचे वैषम्य वाटून घेणारे ते नाहीत. सांगायचा मुद्दा हा की, पुन्हा ‘तिआनमेन चौक’ होणार नाही याची शाश्वती म्हणजेच ली यांचे नेतृत्व आहे. त्यांना भारताने लवकरात लवकर समजून घेतले तर ते उपयुक्त ठरू शकेल. पुन्हा अगदी ‘हिंदी-चिनी भाई-भाई’ अशी घोषणा जरी दिली गेली नाही तरी त्याच्या जवळपास जाता येईल अशी परिस्थिती निर्माण करायला काय हरकत आहे?