दारू पिण्याचे वय / दारू पिण्याचे वय

divyamarathi

Jun 25,2011 04:20:11 AM IST

शासन नेहमीच सर्वज्ञ, सर्वेसर्वा आणि मदोन्मत्त असते. जसे दारुड्याच्या फार नादी लागू नये, तसे शासनाच्याही फार नादी लागू नये.

पिणाºयाला कोणतेही निमित्त आणि कोणतीही बाटली चालते. विदेशी मिळाली नाही तर देशी आणि ती न मिळाल्यास गावठी हवीशी वाटते. फेणी किंवा मोहाची; ब्रँडी किंवा रम; बिअर किंवा आणखी काही; पण कधीही कुठेही कोणालाही दारू हवीच. जो दारू पीत नाही तो या जगात जगण्यास नालायक आहे. जे पाणी पितात किंवा दूध पितात किंवा कोल्ड ड्रिंक पितात ते भोळे किंवा खुळे असतात. ड्रिंक म्हटले म्हणजे हॉटच हवे. परवा उत्तरेतल्या तीन शाळकरी मुलींनी पाण्याच्या बाटलीत व्होडका दारू भरून आणली आणि वर्गात पाणी पिण्याचे नाटक करत त्या गुपचूप दारू पिऊ लागल्या. मग बोलण्याऐवजी बरळू लागल्या आणि चालताना झोकांड्या खाऊ लागल्या, तसा शिक्षिकेला संशय आला. ती जवळ जाऊन पाहते तोवर तिघींपैकी एकीला ओकारी झाली आणि त्या घमघमाटाने शिक्षिकेला शिसारी आली! तात्पर्य, दारू पिण्याला वयाचे बंधन नसते... किंवा नसावे. घोट घोट घशाखाली रिचवून हलकेच हवेत तरंगण्याचा तो स्वर्गीय आनंद सर्वांनी सर्वकाळ अवश्यमेव घ्यावा. एनी टाइम इज ड्रिंकिंग टाइम, अँड एनी एज इज ड्रिंकिंग एज! मग तान्ह्या मुलाला दुधाच्या बाटलीऐवजी दारूची बाटली का देऊ नये? किंवा मृत्युशय्येवरच्या वृद्धाला औषधाच्या सलाइनऐवजी अल्कोहोलचे सलाइन लावले तर काय बिघडते? असला वावदूक काथ्याकूट उगाच कोणी करू नये. त्याऐवजी आपल्या महाराष्ट्र शासनाला विचारावे. त्याला इतर बाबतीत फारशी गती नसली तरी याबाबतीत पहिल्या धारेची गुणवत्ता आहे. म्हणून तर पंचविशीच्या आतल्या कच्च्या वयात कोणीही दारू पिऊ नये, असा नवा कायदा त्याने केला आहे आणि पंचविशीच्या पुढच्या सर्वांना पिण्याची मुभा दिली आहे!
पण पंचविसाव्या वर्षी माणसाला पिण्याची प्रगल्भता प्राप्त होते, हे राज्य शासनाला कोणी सांगितले? पुढच्या आयुष्यात जर तो दारूचे चार घोट घेत राहिला तर त्याचा तोल जाणार नाही, गडबड-गोंधळ करणार नाही, दारूचे घातक परिणाम त्याच्या आरोग्यावर होणार नाहीत, व्यसनाच्या गटारगंगेत वाहत जाऊन तो स्वत:च्या संसाराची धूळधाण करणार नाही, हा नशापाण्याचा घात समाजाला संकटात टाकणार नाही, असे शासनाला कसे उमजले? असे उथळ प्रश्न शासनावर उगारण्यात अर्थ नाही. शासन नेहमीच सर्वज्ञ, सर्वेसर्वा आणि मदोन्मत्त असते. जसे दारुड्याच्या फार नादी लागू नये, तसे शासनाच्याही फार नादी लागू नये. एखादा अठरा वर्षांचा माणूस दारू प्याला आणि वीस वर्षांचा प्याला आणि बावीस वर्षांचा प्याला आणि पंचवीस वर्षांचा प्याला, तर त्यांच्या वयोमानामुळे त्यांच्यावरचा दारूचा प्रभाव वेगवेगळा असेल काय? शासन म्हणते, होय. आपला इतरेजनांचा तुटपुंजा अनुभव सांगतो, नाही. ते तज्ज्ञ तर अशा वेळी काही बोलतच नाहीत. घुटके गिळून गप्प बसतात. परिणामी आपल्या डोळ्यांपुढे शासनाचा बडगा येतो आणि आपणही मूग गिळतो!
... पण या शासनालाही येऊन-जाऊन कायदा करायला दारूच दिसली? तिथे ‘आदर्श’चा घोळ चाललाय, काळा पैसा बोकाळलाय, पत्रकारांचे खून होतायत, मुंबईतली गर्दी अक्राळविक्राळ वाढतेय, शेतकºयांच्या आत्महत्या थांबत नाहीयेत... ते सगळे राहिले बाजूला आणि शासन नशापाण्याच्या नव्या वयोमानात झिंगतेय, याला काय म्हणावे? आपण तर काही म्हणत नाही. म्हणालो तर ‘कालचा गोंधळ बरा होता’ एवढेच म्हणतो.
पण देशातला बलाढ्य वृत्तपत्र समूह हात धुऊन या मद्यधुंद प्रश्नाच्या मागे लागला आहे. काही झाले तरी २५ वर्षे वयाचा नवा कायदा महाराष्ट्र शासनाने मागे घेतलाच पाहिजे, असा विडा त्याने उचलला आहे आणि तशी जोरदार मोहीम स्वत:च्या टीव्हीवरून आणि वृत्तपत्रांतून चालवली आहे. दारू पिऊन वाहन चालवण्याला आमचा विरोध आहे; पण निष्कारण ही मद्यपानाची वयोमर्यादा २१ वरून २५ वर नेणे आम्ही कधीही सहन करणार नाही, असे ते कंठशोष करून सांगताहेत. जगात न्यूटन, बिल गेट््स आणि इतर अनेक थोरामोठ्यांनी वयाच्या विशी-पंचविशीत प्रचंड कर्तृत्व गाजवलेले असताना, तुम्ही पंचविशीच्या आतल्या तरुणांना कच्चे समजता याचा अर्थ काय? ते काही नाही, हा नवा कायदा हाणून पाडलच पाहिजे! मत देण्यासाठी आणि वाहन चालवण्यासाठी १८ वर्षांची वयोमर्यादा आहे; लग्न करण्यासाठी मुलीला १८ तर मुलाला २१ वर्षांची मर्यादा आहे; तर मग मद्यपानासाठीच २५ ची मर्यादा का? असा मोठा कूटप्रश्न देशापुढे ठेवून हा वृत्तपत्र समूह सर्वांना हैराण करत आहे. त्याला सहा हजार वाचकांचा पाठिंबा आहे. शिवाय इम्रान खानसारख्या ताज्या दमाच्या अभिनेत्यांचाही. या सर्वांसाठी त्यापेक्षा मोठा प्रश्नच शिल्लक उरलेला नाही हे अर्थातच उघड आहे.
यावर अखेरचे मत म्हणून कोणी तरी मेधा पाटकरांना विचारले असे ऐकले. त्यांनी न बोलता हात उडवला म्हणतात. तो होकारार्थी होता की नकारार्थी हे विचारणाºयाला उमगले नाही. म्हणून मग तो अण्णांकडे वळला. ते ‘लोकपाल!’ एवढेच म्हणाले. आता लोकपाल आणि मद्यपान यांचा अर्थाअर्थी काय संबंध! ते रामदेव बाबांना विचारावे म्हणून प्रश्नकर्ता तिथे गेला, तर त्यांचे डोळे उघडे आहेत की बंद, आणि ती गुंगी कशामुळे, हे कोडे सुटेना. पण वाटेतल्या मद्यपानगृहापुढे पोलिसदादा दिसले. तेव्हा ‘कशासाठी? पैशासाठी!’ हे हुकमी उत्तर त्याने मिळवले आणि तो वाटेला लागला!

X
COMMENT