आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुष्काळावरून राजकारणासह अर्थकारणही जोरात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सा तारा, सांगली, सोलापूर या भागात दुष्काळावरून जेवढे राजकारण सुरू आहे ते राजकारण तसेच त्यावरून सुरू असणारे अर्थकारण 54 वर्षांत पदार्पण करणार्‍या महाराष्ट्राला फारसे भूषणावह नाही. दुष्काळाचा आगामी निवडणुकीत फायदा उठवायच्या व्यूहरचना दुष्काळी भागात सुरू आहेत. मानभावीपणे सगळे पुढारी, नेते दुष्काळग्रस्तांचा कळवळा दाखवत असले तरी दुष्काळग्रस्त नावाची नवी व्होट बँक या मंडळींना सापडली आहे.

गेली दोन वर्षे राज्यातील काही भागांत दुष्काळाची परिस्थिती आहे. पश्चिम महाराष्ट्रात कृष्णा खोरे महामंडळाची सुरुवात करून पंधरा वर्षे होऊ घातली आहेत. अशा परिस्थितीत कोयना धरणापासून शंभर किमी अंतरावरची गावे भकास, उदास, कोरडी ठणठणीत असताना नामधारी जलसंपदामंत्री रामराजे निंबाळकर किंवा दोन टर्म जलसंपदामंत्री म्हणून या खात्यावर आपली ‘आगळीवेगळी’ छाप उमटवणारे अजित पवार या दोन्ही शेजारी शेजारी राहणार्‍या मंत्र्यांच्या डोळ्याच्या कडा पाणावलेल्या कोणी पाहिल्या नाहीत. सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यांतील कायमस्वरूपी दुष्काळी तालुक्यांकडे हे मंत्रिद्वय कधी पाहणार हे कोडेच आहे. त्यातून पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना असल्यामुळे या दोघांनी कधी एकमेकांशी भांडायचे तर कधी प्रेमात थांबायचे असे तडजोडीचे समाजकारण सुरू असते. यात कधी कोणाची वाळू तस्करी निघते, तर कधी कोणाच्या चारा छावणीतला भ्रष्टाचार. माणमध्ये काँग्रेसच्या चारा छावण्यांत लाखो रुपये खाल्ल्याचे आरोप होतात, तर फलटणात राजे गटाने जमिनी बळकावल्याच्या आरोपांचा हल्ला होतो. या सगळ्यात पाणी, चारा, रोजगार यात अमाप पैसा दडलाय याची माहितीच नव्हे, तर खात्री सत्ताधारी मंडळींच्या दुसर्‍या-तिसर्‍या फळीतील कार्यकर्त्यांना व्हायला लागली आहे.

तहसीलदार कार्यालये पांढरेफेक कपडे घातलेल्या नेते कम दलालांनी गजबजत आहेत. त्यात दुष्काळ कमी व्हावा याऐवजी पैशाची साखळी योजना कायम राहावी आणि ती आपल्या ताब्यात राहावी याचे नियोजन होताना दिसते आहे. गेल्या वर्षी मुख्यामंत्री पृथ्वीराज चव्हाण, राहुल गांधी, शरद पवार, पंतप्रधानांनी नियुक्त केलेल्या समित्या, राज्याच्या-केंद्राच्या अनुषेशापासून दुष्काळ पाहणी समित्या, डझनभर मंत्री, विरोधी पक्षनेते, विरोधी पक्षाचे निरीक्षक या भागांना भेटी देऊन गेले. पत्रकार परिषदा झाल्या. आज परिस्थिती कायम आहे. यंदाचा चारा छावण्या पाहणीचा नारळ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फोडून आघाडी घेतली आहे. मनसेने चारा छावणी काढून आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत, असे दाखवण्यास सुरुवात केली. छावणीत व्यसनमुक्ती मोहीम, भजन, कीर्तन, समाजप्रबोधन असे उपक्रम राबवत चारा छावण्यांत जनावरांना चारा आणि छावणीत राहणार्‍यांना बौद्धिक खुराक देण्याचा सपाटा मनसेने लावला आहे. जनावरांचे खोटे आकडे, पाण्याच्या टँकरच्या जादा दाखवलेल्या खेपा, रोजगार हमीवर नसलेले मजूर यातून पैसे मिळत असल्याने दुष्काळ ही इष्टापत्ती आहे असाच समज राजकीय दलालांचा झाला आहे. या भागातील जनतेला हे संकट दुष्काळी आहे अशी समजूत करून दिली की आपल्या कर्तृत्वशून्यतेवर पांघरूण घालता येते आणि अपूर्ण प्रकल्प तसेच अपूर्ण ठेवण्यात वेळ काढता येतो हे राजकारण्यांना समजले आहे. गेल्या दहा वर्षांत पाण्याचा एक थेंबही दुष्काळी भागात आला नाही, पण प्रकल्पांच्या अव्वाच्या सव्वा वाढलेल्या किमती आणि त्याकरिता खर्च झालेला पैसा कुठे मुरला हे सांगायला इंजिनिअर नको तसाच जोतिषीसुद्धा नकोय. पश्चिम महाराष्ट्रात सहकार रुजला आहे. त्यात प्रत्येक बाबतीत एकमेकांना साहाय्य करत सुपंथ धरण्याच्या दुष्काळाच्या सोप्या सरळ हमरस्त्याचा राजकारणी मंडळी वापर करत आहेत. संधी मिळत नाही तोपर्यंत पुरुष चारित्र्यवान राहतो. मात्र, राजकीय मंडळी संधीच्या शोधात आहेत आणि या संधीचे सोने करण्याची कला त्यांना चांगलीच माहिती आहे. याबाबत पात्रता आणि योग्यतेचा प्रत्येक पक्षात सुकाळ आहे हे नक्की.