Home »Editorial »Columns» Drought Only Name

दुष्काळ केवळ निमित्तमात्र!

रेश्मा जठार | Jan 10, 2013, 02:00 AM IST

  • दुष्काळ केवळ निमित्तमात्र!


पुण्यापासून आग्नेय दिशेला सुमारे 90 किलोमीटर; तर साता-या पासून ईशान्येकडे सुमारे 70 किलोमीटर अंतरावर सातारा जिल्ह्यात फलटण आहे. दूरवर नजर पोहोचेल तिथपर्यंत पसरलेले माळरान हे या प्रदेशाचे वैशिष्ट्य. या माळरानावर दिसते वाळलेले गवत, अधूनमधून खुरटी काटेरी झुडपे आणि त्यामध्ये चारा मिळेल या आशेने शेळ्या-मेंढ्यांचे कळप घेऊन फिरणारे धनगर. यापूर्वीच्या खेपेतही या प्रदेशाचे रखरखीतपण डोळ्यांत खुपले होते. इथल्या निसर्गावर अवलंबून असलेला धनगर समाज कसा जगत असेल, असा प्रश्न पडला होता. या खेपेला हा प्रदेश अधिकच केविलवाणा झालेला दिसला.

तीन वर्षे सतत राहिलेल्या दुष्काळाचे व्रण फलटणच्या माळावर दिसत होते. शासनाने दुष्काळग्रस्तांसाठी उभारलेल्या छावण्यांतून हडकलेली गुरेढोरे दिसत होती. मोठ्या जमिनी आणि गाठीशी पैसे असलेल्या शेतक-यांनी खर्चिक उपाययोजना करून थोडीफार शेती सुरू ठेवलेली दिसते. पण यंदाही पाऊस झाला नाही तर निभाव लागेल का, अशी चिंता त्यांनाही भेडसावते आहे. जमिनीचे छोटे तुकडे असलेल्यांना शेती थांबवण्यावाचून काही पर्यायच उरलेला नाही आणि धनगर कुटुंबे एखाद-दोन महिन्यांत चा-या च्या शोधात इतरत्र जावे की काय, अशा विचारात पडली आहेत. आधीच खुरटे असलेले इथले रान त्यांच्या शेळ्यामेंढ्यांनी चरून आणखी खुरटलेले. चांगली गवते, झाडपाला जनावरांनी चरून फस्त केलेला. त्यामुळे सर्वत्र अगदी निकृष्ट असलेले कुसळी गवत पसरलेले दिसत होते. कुठेतरी सखल भागात क्वचित आढळणारे पाणीही आटून गेलेले. त्यामुळे जमिनीत ओलावा उरलेलाच नाही. अशा परिस्थितीत इथल्या परिसंस्थेत आढळणा-गवताच्या इतर जाती, इतर वनस्पती पाहायला मिळणार कशा? जाधववाडी ग्रामपंचायतीच्या जमिनीवर याचे उत्तर सापडले!

कोरड्या, ओसाड माळरानावरील विंचुर्णी गावाजवळ जमिनीचा एक लहानसा तुकडा- साधारणपणे 20 एकरांचा- त्यावर वाढलेल्या वनस्पतींमुळे वेगळा भासत होता. या जमिनीत ओल टिकून राहिलेली दिसत होती आणि इतकेच नव्हे तर इथल्या दोन तळ्यांमध्ये पाणीही शिल्लक होते. इथे कुसळी गवताखेरीज गवताच्या इतर काही जातीही दिसत होत्या. या गवतांची उंची, हिरवाईही आजूबाजूच्या जमिनीवरील गवताहून अधिक होती. याचे कारण, कोण्या एका संस्थेने गेल्या दशकात इथे ‘निसर्गाच्या पुनरुज्जीवना’चा प्रयोग केला होता. ग्रामपंचायतीकडून जमीन भाडेकरारावर घेऊन सुमारे 20 एकर जमिनीला कुंपण घातले होते. चराई आणि तोड थांबवणे हा मुख्य हेतू; त्याखेरीज मृदा संधारणासाठी पाणी अडवण्या-जिरवण्याचे प्रयत्न केले होते. वेगवेगळी गवते, स्थानिक वनस्पती वाढतील असे पाहिले होते. परिणामी ओसाड माळावर एक लहानसे हिरवे क्षेत्र विकसित झाले होते. इथे चराईला बंदी घातली होती; पण प्रयोगादरम्यान दुष्काळ पडला तेव्हा काही काळापुरते हे क्षेत्र शेळ्यामेंढ्यांकरता खुले केले होते. दुष्काळ संपल्यावर पुन्हा चराईबंदी लागू झाली.

आता पडलेला दुष्काळ पाहून मनात विचार आला, 20 एकरांच्या जागेत जे एका संस्थेने केले, तसे मोठ्या प्रमाणावर करता येईल का? फलटणच्या माळावरील निसर्ग विविध प्रकारच्या गवतांच्या वाढीसाठी पूरक आहे. गवत ही खास वनस्पती आहे. इतर वनस्पतींच्या तुलनेत गवते झपाट्याने वाढतात. गवताची जाळीदार, नाजूक पण चिवट मुळे उथळ जमिनीतही गच्च धरून राहू शकतात. कमी पाण्यात जगताना पानाच्या पृष्ठभागावरून बाष्पीभवनामुळे उडून जाणारे पाणी वाचवता यावे, अशा पद्धतीने गवताची पाने विकसित झालेली असतात. मात्र, अनिर्बंध चराई आणि तोड यामुळे फलटणच्या माळावर इतक्या साध्यासोप्या वनस्पतीच्या वाढीलाही वाव राहिलेला नाही. तेव्हा इथे गवते वाढवायची तर इथल्या माळरानावर आधी माती राखून ठेवावी लागेल. त्यासाठी सर्वात आधी या माळरानावर चराईबंदी आणि कु- डबंदी लागू करावी लागेल. पण मग स्थानिक लोकांची सरपणाची गरज आणि त्यांच्या शेळ्यामेंढ्यांचे काय? तर; सुरुवातीला या गरजा लक्षात घेऊन टप्प्याटप्प्याने नियोजन करावे लागेल. एकदा का मानवी हस्तक्षेपापासून या माळाला संरक्षण पुरवले की मृदा संधारणाच्या उपाययोजना कराव्या लागतील. माती आल्यावर लहानमोठे बांधबंधारे घालून, लहानसहान तळी खोदून पाणी अडवण्याची व्यवस्था करता येईल. तळ्या-डबक्यांमध्ये जसे पाणी अडेल, तसे ते मातीतही झिरपेल. ओलावा पसरला म्हणजे गवत, छोट्या वनस्पतींच्या बिया रुजतील. छोट्या वनस्पतींचे जीवनचक्र सुरू झाले म्हणजे मातीचा कस आणखी सुधारेल, तिची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढेल. मग थोड्या मोठ्या वनस्पती- झाडेझुडपे वाढू लागतील. वनस्पती वाढू लागल्या म्हणजे त्याच्या आस-या ला किडे-कीटक, त्यांच्यावर जगणारे पक्षी, पुढे त्यांच्यावर जगणारे शिकारी पक्षी येतील. पाण्याच्या आसपास राहणारे पाणपक्षी, झाडाझुडपांच्या निवा-या ला किंवा बिळे खणून राहणारे प्राणी येतील. हळूहळू अन्नसाखळी पूर्ण होईल आणि अशा अनेक अन्नसाखळ्या मिळून चांगली गवताळ परिसंस्था तयार होईल.

हे काही एकट्यादुकट्याचे काम नव्हे; तसेच जमिनीच्या लहानशा तुकड्यावर करून भागणार नाही. संपूर्ण फलटणचा माळ परिसंस्था म्हणून विकसित करावा लागेल. काम कठीण खरे; पण अशक्य नाही. शेकडो एकर पसरलेल्या फलटणच्या माळावरील सर्व ग्रामपंचायतींनी मनावर घेतले तर स्थानिक लोक आणि स्थानिक निसर्ग या दोहोंच्या गरजांचा समतोल साधणारे गवताळ प्रदेशाचे व्यवस्थापन इथे घडवून आणता येईल. त्यासाठी शासनाच्या ग्रामविकासाच्या, मृदा संधारणाच्या, पाणी व्यवस्थापनाच्या, सामाजिक वनीकरणाच्या आणि रोजगार हमी योजनांमार्फत ही कामे करवून घेण्याच्या शक्यताही आजमावून पाहता येतील. त्यातून पावसाअभावी शेती थांबवून घरी बसलेल्या इथल्या लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. पुढे जशी चांगली गवताळ परिसंस्था तयार होईल, तसा स्थानिक धनगरांना चांगल्या दर्जाचा चारा मिळेल. इथे काही पशुपालन केंद्रे आहेत, त्यांना इथून चा-या ची विक्री करता येईल किंवा मग स्थानिकांना प्राधान्य देऊन नवी पशुपालन केंद्रेही उभारता येतील. अर्थात, हे हळूहळू शक्य होईल, निसर्गाला बहरण्यासाठी पुरेसा वेळ द्यावा लागेल. त्यामुळे या उपाययोजनेमुळे सध्या सुरू असलेल्या दुष्काळावर लागलीच मात करता येईल, अशा भ्रमात कुणीही राहू नये. पण तात्कालिक उत्तरे शोधण्यात पैसे आणि श्रम घालवण्यापेक्षा या दुष्काळाकडे पुढच्या दुष्काळासाठी तयारी करून ठेवण्याची संधी म्हणून पाहता येईल.

होय, पुढचा दुष्काळ! पुन्हा दुष्काळ पडणार नाहीच अशी खात्री देता येत नाही. किंबहुना, या प्रदेशाला पावसापाण्याची कमतरता नवीन नाही. सह्याद्रीच्या पूर्व-पश्चिम पसरलेल्या शंभूमहादेव डोंगररांगेच्या उत्तरेकडे दख्खनच्या पठारावर फलटण वसलेले आहे. आपल्या पश्चिम किना-या ला पाऊस देणा-नैर्ऋत्य मोसमी वा-या ंच्या पर्जन्यछायेचा हा प्रदेश. घाटमाथ्यावर पाऊस ओतून रिते झालेले ढगच या प्रदेशाच्या वाट्याला येतात. जेमतेम दहाबारा इंच पाऊस आणि तोही वर्षभरात विखरून पडतो. अशा प्रदेशात भरपूर पाणी लागणारी नगदी पिके घेण्याची स्वप्ने बाळगली; तर दुष्काळ पडतो म्हणून नशिबाला दोष देण्याखेरीज बहुसंख्यांच्या हातात काहीच उरणार नाही.

reshma.jathar@gmail.com

Next Article

Recommended