आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आखाडा परिषदेचा डाव ( अग्रलेख )

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अखिल भारतीय आखाडा परिषद ही देशातील साधुसंतांची सर्वोच्च संघटना मानली जाते. याला काही सरकारी मान्यता नाही. या संघटनेत देशातील १४ प्रमुख आखाडे आहेत व त्यांनी सर्वसंमतीने आपली परिषद स्थापन केली आहे. रामजन्मभूमी आंदोलनात सकल हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपने या आखाड्यांना राजकारणात ओढले आणि या आखाड्यांची स्वत:ची अशी राजकीय ताकद निर्माण होत गेली. गेली काही वर्षे आपण कुंभमेळ्याच्या निमित्ताने विविध आखाड्यांच्या महंतांचा मानापमान, कुरघोडी, लहरीपणा अनुभवला आहे. साधु-संतत्वाचा मार्ग स्वीकारूनही या आखाड्यातील ‘संतांना’ सत्तेचा व मायेचा मोह मात्र सोडवता आलेला नाही हे दिसून आले आहे. तर या आखाडा परिषदेने देशातील १४ भोंदूबाबांची एक यादी जाहीर केली असून या भोंदूबाबांवर सरकारने कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. आखाडा परिषदेने अशी भूमिका घेण्यामागचे एक कारण म्हणजे त्यांना धर्मसत्तास्पर्धेतील अत्यंत प्रभावशाली विरोधक हटवायचे आहेत. ती कुरघोडी आहे असेही म्हणण्यास वाव आहे. कारण आखाड्याने जाहीर केलेल्या यादीत फक्त १४ भोंदूबाबा आहेत, अन्य भोंदूबाबांची नावे नाहीत. आपल्या देशात अंधश्रद्धा पसरवून लुबाडणाऱ्या बाबाबुवांची संख्या कमी नाही. पण या बुवांची नावे किती घेणार हाही प्रश्न आखाड्याला पडू शकतो. त्यामुळे ती का नाहीत हा प्रश्न विचारण्यापेक्षा जी नावे जाहीर केली आहेत ती समाजात खूप प्रभावशाली आहेत. त्यांच्याकडे कोट्यवधी रुपयांची माया आहे, राजकीय पातळीवर त्यांनी सगेसोयरे बनवले आहेत व त्यांचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आखाड्यांच्या साम्राज्याला आव्हान आहे. केवळ गरीब नव्हे तर समाजातील उच्चभ्रू लोकांमध्ये अशा बाबांची रोजची ऊठबस आहे. असे भोंदूबाबा आखाडा परिषदेने अचूकपणे टिपले आहेत. या यादीतल्या भोंदूबाबांवर एक नजर टाकल्यास सर्व बाबा हे आपल्या दैनंदिन परिचयातले आहेत. एका बाबांचे पहाटे टीव्हीवर रोज शो असतात, ‘आप पर कृपा रहेगी’ म्हणत ते बँकेत आपल्या खात्यावर पैसे टाकल्यास आपले दु:ख दूर होईल, असे सांगतात.

एक बाबा ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोमध्ये आपल्या विचित्र कारनाम्याने चर्चेत आले होते. ते बुवांपेक्षा सुंदर बायांसोबत भक्तांना दर्शन देत असतात. दोन बाबांवर तर बलात्काराचे गंभीर आरोप असून ते सध्या तुरुंगात खितपत पडले आहेत. एक संन्याशीण भक्तांच्या मांडीवर बसण्यासाठी पैसे घेते. तर एका बाबाचा थेट संघ परिवाराशी संबंध असून ते अजमेर बॉम्बस्फोटातील एक आरोपी आहेत. या अशा भोंदूबाबांची सध्याच्या समाजातील लोकप्रियता, त्यांचे हजारोंच्या संख्येतील भक्तगण व त्यांची स्वत:ची तयार झालेली जहागिरी आखाडा परिषदेच्या डोळ्यात खुपत असावी. आखाडा परिषदेतील साधूंचे कारनामे या भोंदूबाबांच्या तुलनेत कमी असले तरी विविध आखाड्यांचेही स्वत:चे सुभे, जहागिऱ्या अशी आर्थिक सत्तास्थाने प्रबळ आहेत. प्रत्येक आखाड्याच्या स्वत:च्या शेकडो एकर जमिनी आहेत, त्यांचे स्वत:चे कायदेकानून, नियम आहेत. एखाद्या आखाड्याचा प्रमुख महंत बनणे हे म्हणजे आमदार होण्यासारखे असते. आपल्या समर्थकांना भुलवणे व दांडगाईने आखाड्याचा कारभार हाती घेणे याच्या सुरस कथा प्रसिद्ध आहेत. अशी पार्श्वभूमी असताना कोणत्या नैतिक अधिकाराने आखाडा परिषदेने १४ भोंदूबाबांवर सरकारने कारवाई करावी ही मागणी केली आहे?  


आपल्याकडे श्रद्धा व अंधश्रद्धा यांच्यातील सीमारेषा पुसली गेल्याने बाबाबुवांचा एक मोठा आर्थिक उद्योग देशभर फैलावला आहे. या उद्योगात आर्थिक व राजकीय हितसंबंधांचे एक जाळे तयार झाल्याने त्याचाच फायदा बाबाबुवा, आखाडा परिषदेसारख्या संघटना घेताना दिसतात. काही आखाड्यांनी पूर्वी याच भोंदूबाबांचे समर्थन केले होते. आता या बुवांच्या कारवाया समोर आल्याने आपल्याला उपरती आल्याचे त्यांचे म्हणणे असले तरी धर्मसत्तेवर आपला अंकुश असावा, अशी त्यांची छुपी भूमिका आहे. म्हणून भोंदूबाबांवर कारवाई करावी, अशी मागणी करताना यापुढे आखाडेच योग्य व्यक्तीला संतपद देणार व त्याची नियमावली जाहीर करणार, असे त्यांनी जाहीर केले आहे. हा प्रकार हास्यास्पद आहे. म्हणजे संतपद जनतेने नव्हे तर आखाडा परिषदेकडून ठरवले जाणार व त्यातून वाद उत्पन्न होणार हे सांगण्याची गरज नाही. एकुणात समाजाला त्याच्या आर्थिक, मानसिक उन्नतीसाठी स्थितिशील नव्हे तर क्रियाशील बनवणे हे आधुनिक समाजाचे लक्षण असते. आधुनिक संतांकडून तशा कामाची अपेक्षा आहे. आखाडा परिषद वा भोंदूबाबा हे काही समाजाच्या आध्यात्मिक प्रगतीचे मार्गदर्शक नाही. समाजाने म्हणून अशा वावदूक, दांभिक मंडळींपासून दूर राहावे. त्यातच हित आहे.

बातम्या आणखी आहेत...