आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देव देव्हा-यात नाही! (अग्रलेख)

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तीन दशकांपूर्वी ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांनी देवाला ‘रिटायर’ करण्याची कल्पना मांडली होती. त्या वेळी निश्चितपणे सचिन तेंडुलकर त्यांच्या नजरेसमोर नव्हता. सचिन तेंडुलकरला त्या वेळी देवत्व प्राप्त झाले नव्हते. मात्र भारतीय क्रिकेटला कणाकणाने हा देव गवसत गेला आणि सतत पराभवाच्या छायेत असणा-या भारतीय क्रिकेटवरचे पराभवाचे ढग हळूहळू दूर व्हायला लागले. कालांतराने भारतीय क्रिकेटने या देवाच्या बॅटीतून निघालेल्या धावांमुळे विजयाचे कितीतरी चमत्कार अनुभवले. एकीकडे क्रिकेटमधील या चमत्काराची पुनरावृत्ती होत गेली आणि एका मध्यमवर्गीय, मराठमोळ्या कुटुंबातील युवकाला देवत्व प्राप्त होत गेले. तो लहान मुलांचा देव बनला. युवा पिढीचा आयकॉन बनला. कुटुंबवत्सल माणसांचा लाडका बनला. आजी-आजोबांना त्याच्या चेह-यात नातवाची प्रतिमा दिसायला लागली. हे सगळे केवळ क्रिकेटच्या मैदानावरील पराक्रमाचे परिणाम नव्हते, तर मैदानापलीकडच्या प्रतिमेचा तो खोलवर प्रभाव होता.

चारचौघांतले त्याचे वागणे मर्यादापुरुषोत्तम रामासारखे होते. आचार, विचार, वागणे छाप पाडणारे होते. यशाच्या शिखरावर असतानाही त्याचे पाय जमिनीवरच होते. हिणकस शेरेबाजी, अपमान, टीका यासारखे हलाहल तो सहज आणि निर्विकार चेह-याने पचवत होता. ते हलाहल पचवताना त्याचा कंठ कधी निळा झाला नाही; मात्र त्याच्या नजरेतील प्रखर दाहकता कधी लपली नाही. त्या दाहकतेच्या प्रभावाखाली अनेक गोलंदाज भस्म झाले. टीकाकार नामशेष झाले. सचिनने तोंड कधीच उघडले नाही. त्याची बॅटच कायम बोलत राहिली. शालेय क्रिकेटमध्ये जेव्हा त्याने धावांची टाकसाळ उघडली होती, तेव्हा टीकाकार म्हणायचे, वरच्या क्रिकेटमध्ये कठीण आहे. पाकिस्तानात कराची कसोटीत चेंडूचा ओठावर आघात झाल्यानंतर वकार युनूस म्हणाला होता, पोराचे दुधाचे दात अद्याप पडले नाहीत. पण तशाच अवस्थेत खेळपट्टीवर उभे राहून वकारला दोन सणसणीत चौकार हाणल्यानंतर, हे पाणी वेगळेच असल्याची जाणीव तमाम विश्वाला झाली. त्याच मालिकेत एका प्रदर्शनीय सामन्यात मुश्ताक अहमदच्या फिरकीवर षटकारांची बरसात केल्यानंतर पाकिस्तानी प्रेक्षक बोलायला लागले, मुश्ताक बच्चा आहे, आपल्या अब्दुल कादीरच्या पुढे हा पोरगा टिकणार नाही. या भावना त्याच्यापर्यंत पोहोचल्या आणि डोळ्यात अंगार फुलला.

मुश्ताकच्या गोलंदाजीपेक्षाही अधिक धुलाई अब्दुल कादीरच्या गोलंदाजीची झाली. एकाच षटकात चार षटकार आणि एक चौकार. कादीरच्या गोलंदाजीचे त्या क्षणापर्यंत एवढे वस्त्रहरण कुणीच केले नव्हते. संथ कसोटी क्रिकेटच्या जमान्यातील त्या स्फोटक फलंदाजीत क्रिकेटच्या या देवाचा अंश सर्वप्रथम दिसला, ऑस्ट्रेलिया दौ-यात. पर्थच्या वेगवान खेळपट्टीवर भारतीय फलंदाजीचे पानिपत होत असताना. या वामनावताराची शतकी खेळी त्याच्या देवपणाची साक्ष देत होती. ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा खरा संघर्ष त्या क्षणापासून सुरू झाला होता. परदेशांमधील शतकांनी त्याचे सार्वभौमत्व तमाम क्रिकेटविश्वाने मान्य केले. शारजातील वाळवंटातल्या क्रिकेटने भारतीयांवर जावेद मियाँदादच्या षटकारांची कायम भीती निर्माण केली होती. सचिन अवतरला आणि वाळवंटात त्याच्या तडाखेबंद फलंदाजीची वादळे वारंवार घोंगावू लागली. न्यूझीलंडच्या थंडीत गलितगात्र झालेल्या भारतीयांना त्याने ऑकलंडमधील एका झंझावाती खेळीने विजयाची धग निर्माण करून दिली.

इंग्लंडमध्ये तर त्याला पाहायला चक्कआजीबाई मैदानावर यायला लागल्या. एवढे त्याच्या फलंदाजीचे आणि प्रतिभेचे वेड सर्वसामान्यांना लागले. कॅरेबियन बेटांवर त्याच्या फलंदाजीमुळे ‘कॅलिप्सो’ची रंगत वाढली. तोच चमत्कार दक्षिण आफ्रिकेतही घडला. जय-पराजयाच्या पलीकडे जाऊन क्रिकेट या खेळाच्या निखळ आनंदाची नवी व्याख्या त्याने लिहिली. प्रतिस्पर्धी संघाचे पाठीराखेही त्याचा खेळ पाहण्यासाठी आवर्जून उपस्थित राहू लागले. देवदुर्लभ असे स्वागत सर्वत्र व्हायला लागले. कसोटी क्रिकेटपासून दूर पळणा-या प्रेक्षकांना त्याने पुन्हा स्टेडियमकडे वळवले. क्रिकेट या खेळाचा तो राजदूत बनला. जाहिरातदारांच्या गळ्यातला ताईत बनला. ‘बूस्ट’ उत्पादकांनी तर त्याची साथ कधीच सोडली नाही. अनेक उत्पादनांवर त्याची छबी झळकली. शतकांच्या शर्यतीत जसा तो पुढे राहिला, तसाच धावांच्या रेसमध्येही त्याने आघाडीचे स्थान कधीच गमावले नाही. पण प्रसिद्धी, पैसा, सुबत्ता, ऐश्वर्य पायाशी लोळण घेत असतानाही तो मातला नाही. कोणत्याही मोहाला, आमिषाला, अभिलाषेला बळी पडला नाही. म्हणूनच चाहत्यांनी त्याला देवत्व दिले. कसोटी क्रिकेटचे द्विशतक पूर्ण करताना त्याची खेळाबाबतची ओढ किंचितही कमी झाली नाही. अर्जुनाच्या एकाग्रतेने त्याने क्रिकेटची आराधना केली.

एको देव:।। एको धर्म:।। एको व्रत:।। एको तप:।। याप्रमाणे क्रिकेट हा एकमेव धर्म त्याने पाळला आणि अखेरपर्यंत आचरला. क्रि केट खेळायला सुरुवात करतानाची त्याची आवड आज निवृत्तीचा निर्णय घेतानाही कायम होती. आपल्या खेळावर एवढ्या निष्ठेने व श्रद्धेने प्रेम करणारा अन्य क्रिकेटपटू झाला नाही. प्रत्येक क्षण क्रिकेटसाठी जगला, म्हणूनच तो या पदाला पोहोचला. खेळावर जशी त्याची श्रद्धा होती, तेवढेच प्रेम त्याने आपल्या क्रिकेट आयुधांवरही केले. स्वत:च्या ‘किट बॅग’मध्ये सँड पेपर, छोटा रंधा, ब्लेड आणि क्रिकेट साहित्याची डागडुजी करण्यास आवश्यक असणारे साहित्य बाळगणारा तो जगातील एकमेव क्रिकेटपटू असावा. सरावासाठी सर्वांच्या आधी येणारा आणि सराव संपल्यानंतर सर्वात शेवटी जाणारा असा क्रिकेटपटू दुसरा होणे नाही. सरावादरम्यान मिळालेल्या मोकळ्या वेळेत, ज्या आयुधांनी त्याला देवत्व दिले, त्या आयुधांची डागडुजी करणारा, पूजा बांधणारा असा क्रिकेटपटू होणे नाही. त्यामुळे त्याला देवत्व प्राप्त झाले असले तरीही निवृत्त होण्याचा मानवधर्म त्याने पाळला. त्यामुळेच आपण म्हणू शकतो, क्रिकेटचा देव अखेर निवृत्त झाला. आता या देवाच्या जागेसाठी चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजीसाठी ‘व्हेकन्सी’ झाली आहे. ती जागा भरली जाणे जवळजवळ अशक्य गोष्ट आहे. देवांच्या राज्यात घराणेशाही नसावी. नाही तर रामानंतर लव-कुश यांनाही देवत्व प्राप्त झाले असते. सुनील गावसकरांची जागा रोहनने घेतली असती. अर्जुनला आपल्या आसनावर बसवूनच मग सचिन निवृत्त झाला असता! म्हणूनच आज क्रिकेटचा देव्हारा रिकामा झाला आहे. क्रिकेटचा देव आज देव्हा-यात नाही!!