आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वंग प्रदेशातील रंग! ( अग्रलेख)

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘अच्छे दिन आने वाले हैं’ ही भाजपने मतदारांना भुलवण्यासाठी दिलेली रणघोषणा. अवघ्या तीन महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये या घोषणेला देशभरातील मतदार भुलला आणि नरेंद्र मोदी यांचे सरकार केंद्रात स्थानापन्न झाले. भाजपचा मित्रपक्ष (?) शिवसेनेच्या भाषेत या विजयामुळे अवघा देशच भगवामय झाला. निवडणुकांमध्ये मिळालेल्या विजयाला स्वत:चा एक रंग असतो, हे या भारतवर्षात सर्वात प्रथम जर कोणामुळे कळले असेल, तर ते डाव्या पक्षांमुळे.
पश्चिम बंगाल, केरळ, त्रिपुरा या आपल्या बालेकिल्ल्यांमध्येच ‘नेमेचि येतो पावसाळा’ या उक्तीप्रमाणे विजय मिळाला की डाव्या पक्षांना हर्षवायू होत असे. हा विजय म्हणजे क्रांतीच्या लाल रंगाला मिळालेली सलामी आहे, अशा छापील प्रतिक्रिया डावे पक्ष व्यक्त करत असत. या वाक्याचा उल्लेख भूतकाळात जाऊन अशासाठी केला की, पिवळे रेशनकार्ड धारण करणारी व्यक्ती जशी आपल्या भवतालात दुर्मिळपणेच सापडते, तसेच डाव्या पक्षांना दणदणीत विजय वगैरे मिळण्याचे दिवस सध्याच्या काळात खूप खूपच धुसर झाले आहेत! लोकसभा निवडणुकांनंतर मोदी यांच्या निवडणुकरूपी अश्वमेध यज्ञाचा अश्व अाता या भरतखंडात कोणीच रोखू शकत नाही, अशी ग्वाही व द्वाही तमाम साधू-संतांच्या आखाड्यांतूनही देण्यात येत होती; पण या अश्वाला लंगडे करण्याचे काम गेल्या आॅगस्टमध्ये झालेल्या विधानसभेच्या काही पोटनिवडणुकांनी केले होते. त्याच इतिहासाची पुनरावृत्ती आता विविध राज्यांतील लोकसभा व विधानसभा जागांच्या पोटनिवडणुकांत झाली आहे.
या पोटनिवडणुकांचा निकाल हा भाजपसाठी जसा सावधानतेचा इशारा आहे, तसेच विविध राज्यांत सत्ताधाऱ्यांनी कारभारात दाखवलेल्या निष्क्रियतेमुळे जो उरलासुरला पर्याय समोर दिसत होता, त्याच्या पदरात विजयाचे यश मतदारांनी टाकले आहे. काँग्रेस, समाजवादी पक्ष यांना या पोटनिवडणुकांत जे यश मिळाले ते अशा प्रकारचे आहे. वाईटातूनही काहीतरी चांगले निघते, असे म्हणतात. बुडत्याला काडीचा आधार या न्यायाने पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या पोटनिवडणुकीत एका जागेवर आपल्याला जो विजय मिळाला, त्याचा भाजपने गवगवा करण्यास सुरुवात केली आहे. पश्चिम बंंगाल, केरळ, त्रिपुरा या राज्यांत आपल्या कोकणात असते तितकी लाल माती असते की नाही, माहीत नाही; परंतु या तीनही ठिकाणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने (माकप) लाल मातीच्या निवडणुकरूपी कुस्तीत नेहमीच प्रतिस्पर्धी पहिलवानांना पराभवाची लाल माती खायला लावली होती. पश्चिम बंगालमध्ये तर माकपने आपला सत्तेचा बालेकिल्ला तब्बल तीन दशकांहून अधिक काळ मजबूत व शाबूत ठेवला होता; पण तृणमूल काँग्रेसच्या झंझावाती नेत्या ममता बॅनर्जी यांनी या गडाला पायापासून सुरुंग लावले व सत्तेचा किल्ला हस्तगत केला.
ममता बॅनर्जी या झंझावात असल्या, तरी शेवटी तो हवेचाच प्रकार... सदैव अस्थिर, हेलकावणारा. त्यामुळे ममता बॅनर्जींच्या तृणमूलचा झेंडा कधी भाजपच्या रोखाने झुकला, तर कधी काँग्रेसच्या बाजूने... या सगळ्याचा उद्देश एकच तो म्हणजे माकपचे नाक कापणे. माकप, काँग्रेस यांच्याशी भांडून भांडून थकल्यानंतर आता ममता बॅनर्जी यांना नळावर भांडण्यासाठी भाजप हा नवा शत्रू मिळाला आहे. भाजपलाही अखिल भारतवर्षावर आपला झेंडा रोवण्याची घाई असल्याने त्या पक्षाने पश्चिम बंगालमध्ये आपल्या पक्षाचा विस्तार व्हावा याकरिता आक्रमक पावले गेल्या दोन वर्षांपासून उचलली आहेत. त्याची परिणती म्हणजे २०१२ पासून तृणमूल काँग्रेस व भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये चकमकींचे प्रमाण एकदम वाढीला लागले आहे. आधी याच हाणामाऱ्या अगदी जोशात माकप व तृणमूल कार्यकर्त्यांत होत असत. कोणत्याही पक्षाचा विस्तार हा डोकेफोडीतूनच व्हायला पाहिजे, असा काही नियम नाही; पण तसे होणे हे पश्चिम बंगालच्या राजकारणाचे व्यवच्छेदक लक्षण आहे.
इतक्या साऱ्या लटपटी-खटपटींनंतर पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या दोन जागांकरिता झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये एका जागेवर भाजपने विजय मिळवला. या राज्यातील बशिहरात दक्षिण या विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार शम्मिक भट्टाचार्य यांनी तृणमूलचे उमेदवार दीपेंदू विश्वास यांचा पराभव केला. सुमारे १५ वर्षांनंतर भाजपच्या आमदाराने पश्चिम बंगालमधील विधानसभेत प्रवेश केला आहे. कर्नाटकमध्ये सरकार स्थापन केल्यानंतर तो दक्षिण दिग्विजय असल्याची दवंडी भाजपने पिटली होती. आता पश्चिम बंगालमधील आपल्या एकमेव आमदाराला पुढे करून भाजपने ‘एकलाच चाललो रे’ अशी आरोळी ठोकायला हरकत नाही. कोणाला कशात सुख वाटेल, सांगता यायचे नाही. पश्चिम बंगाल वंगभंगातून निर्माण झाला होता. तेथे भाजपने फार स्वप्नरंजन भविष्यात केले, तर या पक्षाच्या उत्साहाचा रंगभंग होण्यास वेळ लागणार नाही!