Home | Editorial | Agralekh | editorial

'इमेज ट्रॅप'चे बळी

divya marathi | Update - Jun 02, 2011, 04:06 AM IST

मागणी वाढली की दर्जाही खालावतो. दर्जा खालावला की विश्वासार्हताही कमी होते, हे व्यापार-व्यवहाराचे तर्कशा मेधा पाटकर या व्यक्तीबाबतही दुर्दैवाने खरे ठरले आहे.

 • editorial

  मागणी वाढली की दर्जाही खालावतो. दर्जा खालावला की विश्वासार्हताही कमी होते, हे व्यापार-व्यवहाराचे तर्कशास्त्र मेधा पाटकर या व्यक्तीबाबतही दुर्दैवाने खरे ठरले आहे.
  अमिताभ बच्चन, लालकृष्ण अडवाणी आणि मेधा पाटकर या तिघांमध्ये विलक्षण साम्य आहे. 'जंजीर', 'दीवार'सारख्या चित्रपटांनी अमिताभ बच्चनला अँग्री यंग मॅनची इमेज दिली. या इमेजमध्ये तो इतका अडकला की, एकेकाळी 'इंद्रजित', 'मृत्युदाता', 'लाल बादशाह'सारख्या दर्जाहीन चित्रपटांत काम करून त्याने स्वत:चे हसे करून घेतले. भाजपचा 'मुखवटा' बनलेले अटलबिहारी वाजपेयी राजकारणातून निवृत्त झाल्यावर अडवाणी समर्थकांनी तुम्हीच देशाचे भावी पंतप्रधान असा त्यांचा (गैर) समज करून दिला. अडवाणीसुद्धा पंतप्रधानाच्या रूपात स्वत:ला बघू लागले. संघ परिवारात देशाचे भावी पंतप्रधान अशी त्यांची इमेज तयार झाली, मात्र वास्तवात हा योग कधीच जुळून न आल्याने (भविष्यातही न येण्याची शक्यता असल्याने) त्यांचेही हसे झाले. नर्मदा बचाव आंदोलनामुळे मेधा पाटकरांची एक अभ्यासू, झुंजार आणि संवेदनशील सामाजिक कार्यकत्र्या अशी ओळख बनली. इतर अनेक पुरस्कारांसोबतच प्रतिष्ठेच्या मॅगेसेसे पुरस्काराने त्यांनासुद्धा एक इमेज मिळवून दिली. पण याच इमेजमुळे पीडित समाजाकडून त्यांना असलेली मागणीही वाढत गेली. मात्र, मागणी वाढली की दर्जाही खालावतो.
  दर्जा खालावला की विश्वासार्हताही कमी होते, हे व्यापार-व्यवहाराचे तर्कशा मेधा पाटकर या व्यक्तीबाबतही दुर्दैवाने खरे ठरले आहे. नर्मदा खो:यातल्या आदिवासींमध्ये अंगार फुलवण्याचे काम मेधा पाटकरांनी केले. दोन दशकांहून अधिक काळ मस्तवाल नोकरशहा आणि राजकारण्यांशी संघर्ष करण्याची ङ्क्षहमतही त्यांनी दाखवली. एका अर्थाने 'एनबीए'ने मेधा पाटकरांच्या जगण्याला ध्येय-उद्दिष्ट मिळवून दिले. परंतु नर्मदा बचावचा भर ओसरल्यानंतर मेधा पाटकर आज येथे, उद्या तेथे, कधी खरोखरच्या तर कधी कथित अन्याय-अत्याचारांविरोधात आवाज उठवताना नजरेस पडू लागल्या. थेट संबंध असो वा नसो, जेथे म्हणून अन्याय होत आहे, तेथे आपण व्यक्त झालेच पाहिजे, हा अट्टहास त्यांच्या प्रतिक्रियांमधून जाणवू लागला. याच त्यांच्या समाजकार्याच्या 'फ्री लाङ्क्षन्सग'ने त्यांना 'इमेज ट्रॅप'मध्येही अडकवले. वस्तुत: अमिताभ बच्चन आणि अडवाणींपेक्षाही मेधा पाटकरांचे कार्य तळागाळातल्या अन्यायग्रस्त माणसाशी थेट नाते सांगणारे होते, म्हणूनच त्यांतून आलेल्या विश्वासार्हतेची जातकुळीही निराळी होती. मात्र याचे भान त्यांना राहिले नसावे, हे त्यांच्या इन्स्टंट आंदोलनांवरूनही वेळोवेळी दिसून आले आहे. गेल्या वर्ष-दोन वर्षांत मेधा पाटकरांचा सर्वव्यापी संचार पाहता त्या लवासाप्रकरणी झालेल्या आंदोलनात, दिल्लीत अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचारविरोधी मोहिमेत आणि मुंबईतल्या वेगवेगûया ठिकाणच्या झोपडपट्टीवासीयांच्या सरकारविरोधी उपोषणातही दिसल्या. मात्र, मुंबईतल्या गोळीबार टेकडी विभागातील जवाहर नगर पुनॢवकासाविरोधात पुकारलेल्या आंदोलनांमुळे त्यांच्या विश्वासार्हतेला एकदा, नव्हे अनेकदा तडे गेले. गोळीबार पुनॢवकासाला स्थगिती मिळावी वा सरकारने तेथील रहिवाशांची पर्यायी व्यवस्था करावी, या मागणीसाठी गेल्या वर्षी पाटकरांनी परिसरातील पीडितांना घेऊन वादग्रस्त आदर्श इमारतीच्या तळमजल्यावर ठिय्या मांडला होता. जी इमारत भ्रष्टाचारी मार्गाने उभारली आहे, त्या इमारतीत गरिबांना का होईना, पण जागा मिळावी, हा एरवी भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात हिरीरीने सहभागी होणा-या तत्त्वनिष्ठ मेधा पाटकरांचा हट्ट न समजण्यासारखा होता.
  आता याच गोळीबार पुनॢवकास प्रकरणात सरकारकडून बांधकाम पाडण्याच्या प्रक्रियेला स्थगितीचे आश्वासन त्यांनी मिळवले असताना ज्यांना या जागी नव्याने घरे मिळणार अशा जवळपास साडेसात हजार रहिवाशांनी मेधा पाटकरांविरोधातच जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेला. यात राजकारणी, बिल्डर आणि दलाल यांचे छुपे हितसंबंध गुंतले असतीलही, पण ज्या पीडितांसाठी पाटकरांनी आंदोलन केले त्यांच्यातल्या एका वर्गाला पाटकरांविरोधातच आंदोलन करावे लागणे, हे त्यांच्या विश्वासार्हतेला मोठा तडा जाण्यासारखेच आहे. मेधा पाटकरांच्या नर्मदा बचाव आंदोलनाने मध्य प्रदेशातील ओंकारेश्वर धरण विस्थापनप्रकरणी सरकारवर बेकायदेशीररीत्या पाच गावे ताब्यात घेतल्याचा एका प्रतिज्ञापत्राद्वारे आरोप केला होता. परंतु अयोग्य आणि दिशाभूल करणारी माहिती दिल्याचे उघड झाल्याने सर्वोच्च न्यायालयाने गेल्याच मे महिन्यात 'एनबीए'वर नोटीस बजावली होती. मात्र, संघ परिवाराच्या छुप्या स्वयंसेवकांप्रमाणेच समाजवादी विचारांचे कूळ सांगणा-या साथींचाही मीडियात मोठा भरणा असल्याने विश्वासार्हतेबद्दल शंका निर्माण करणा:या या प्रकरणाची वाच्यता झाली नाही.
  अर्थात, पीडितांच्या एका वर्गाला मेधा पाटकरांचा आधार वाटत असेलही, पण त्यांच्या 'फ्री लाङ्क्षन्सग' वृत्तीमुळे त्यांची आंदोलने, उपोषणे यांची सरकारदरबारी किती गांभीर्याने दखल घेतली जात असेल, या विषयी शंका घेण्यास नक्कीच वाव आहे. आक्रमकता हा पाटकरांच्या आंदोलनांचा स्थायीभाव राहिला आहे. परंतु बरेच वेळा त्या आक्रमकतेचे रूपांतर आक्रस्ताळेपणात होते. किंबहुना त्या आक्रस्ताळेपणालाच आक्रमकता असे म्हणण्याची पद्धत त्यांच्या अनुयायांनी पाडली आहे. परिणामी याच आक्रमकतेने विकासाच्या प्रक्रियेला विरोध करताना पर्यायी मॉडेल मात्र त्या अभावानेच मांडताना दिसल्या. तसे करण्याने इमेज पुसली जाण्याचा धोका त्यांना कदाचित वाटत असावा. परंतु या इमेज ट्रॅपमध्ये अडकून राहण्याने भविष्यात जितके व्यक्तिश: नुकसान स्वत: पाटकरांचे होणार आहे, त्याहून कितीतरी मोठे नुकसान त्यांच्या आधाराची नितांत गरज असलेल्या अन्याय-अत्याचारग्रस्त समाजाचेही होणार आहे.

Trending