Home | Editorial | Agralekh | editorial

योगी आणि कोमिसार

diyya marathi | Update - Jun 04, 2011, 04:41 AM IST

कोणत्याही परिस्थितीत आमरण उपोषण खरोखरच अखेर मरणापर्यंत जाऊ दिले जाणार नाही. पण समजा, वाटाघाटी पुन्हा फिसकटल्या तर रामदेवबाबांना खरोखरच मरणाला सामोरे जावे लागेल.

 • editorial

  कोणत्याही परिस्थितीत आमरण उपोषण खरोखरच अखेर मरणापर्यंत जाऊ दिले जाणार नाही. पण समजा, वाटाघाटी पुन्हा फिसकटल्या तर रामदेवबाबांना खरोखरच मरणाला सामोरे जावे लागेल. तसे अघटित काही घडले तर सरकार अडचणीत येईल, कारण बाबांचे तथाकथित १ कोटी अनुयायी हंगामा करतील.
  सुमारे ६५ वर्षांपूर्वी ऑर्थर कोस्लर या जगप्रसिद्ध हंगेरियन विचारवंत लेखकाने एक निबंध लिहिला होता. त्या निबंधाचे नाव होते, 'द योगी अॅण्ड द कोमिसार'. याच नावाने पुढे त्यांचा निबंधसंग्रह प्रसिद्ध झाला. या निबंधाचे स्मरण होण्याचे कारण अर्थातच योगी रामदेवबाबा यांनी जाहीर केलेले आमरण उपोषण. कोस्लर यांच्या निबंधाचा संदर्भ घेतला तर आताच्या परिस्थितीत डॉ. मनमोहन सिंग हे 'कोमिसार' ठरतील. वस्तुत: कोमिसार हा कम्युनिस्ट पक्षाचा क्रांतिकारक कार्यकर्ता असतो. प्रत्येक व्यक्तीच्या अंतरंगात परिवर्तन घडवून आणून जगात बदल होईल, असा योग्याचा विश्वास असतो. याउलट 'कोमिसार'च्या मते परिस्थिती बदलूनच क्रांती होते आणि ती आजूबाजूची परिस्थिती बदलण्यासाठी संघर्षाचीही तयारी ठेवावी लागते.
  त्या अर्थाने भ्रष्टाचार, काळा पैसा आणि ज्या भांडवलशाहीतून ही विकृती निर्माण होते ती व्यवस्था बदलण्याचा प्रयत्न नक्षलवादीही करीत आहेत. म्हणजे ते खरे कोमिसार, असेही कुणी म्हणू शकेल. परंतु योगी रामदेवबाबांनी नक्षलवाद्यांना पर्याय दिलेला नाही, तर प्रस्थापित सरकारच्या विरोधात उपोषणाचे आंदोलन जाहीर केले आहे. पंतप्रधान मनमोहन सिंग, अर्थमंत्री प्रणव मुखर्जी व अन्य काही मंत्रिगण रामदेवबाबांचेच मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करीत आहेत! परंतु योगी तर स्वत:च स्वत:मध्ये परिवर्तन घडवून आणू शकतो. त्यातून भ्रष्ट व्यवस्थेचे प्रतिनिधी व मुखंड मंत्रिमहोदय हे रामदेवबाबांचा निर्णय कसा बदलू शकणार? तरीही हा योगी त्या लोकशाहीवादी कोमिसारांबरोबर वाटाघाटी करीत आहे. वाटाघाटी यशस्वी झाल्या तर रामदेवबाबा उपोषण रद्द करतील; पण वाटाघाटी फिसकटल्या तर बाबा उपोषणाला बसणार. तेही आमरण.
  उपोषण चालू झाल्यावरही वाटाघाटी होणारच. कोणत्याही परिस्थितीत आमरण उपोषण खरोखरच अखेर मरणापर्यंत जाऊ दिले जाणार नाही. पण समजा, वाटाघाटी पुन्हा फिसकटल्या तर रामदेवबाबांना खरोखरच मरणाला सामोरे जावे लागेल. तसे अघटित काही घडले तर सरकार अडचणीत येईल, कारण बाबांचे तथाकथित १ कोटी अनुयायी एकच हंगामा करतील. या १ कोटी अनुयायांपैकी किमान काही १ लाख तरी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे काळा व्यवहार करतातच - म्हणजे करीत असले पाहिजेत. कारण त्यांच्यात व्यापारी, भांडवलदार धनाढ्य मंडळी, उच्च मध्यमवर्ग आहे. वकील, डॉक्टर, बिल्डर, कॉन्ट्रॅक्टर असेही व्यावसायिक आहेत. या व्यावसायिकांनी जर छातीठोकपणे सांगितले की, आपण कधीही 'पापी' माणसाची वकिली केली नाही, कोणत्याही प्रकारच्या काûया पैशाला हात लावला नाही वा कोणत्याही बहुराष्ट्रीय कंपनीकडून कशाही प्रकारचा लाभ घेतलेला नाही, तर खुद्द बाबांचाही त्यावर विश्वास बसणार नाही. बाबांच्या उपोषणाची जी पंचतारांकित तयारी चालू आहे ती पूर्णपणे 'पांढ-या' पैशातून आणि चारित्र्यसंपन्न व्यक्तींच्या देणगीतूनच होत आहे यावर खरे म्हणजे कुणाचाही विश्वास बसणार नाही. परंतु तोही मुद्दा नाही. खुद्द रामदेवबाबांनाच आमरण उपोषण परवडणारे नाही. दुर्दैवाने त्यांचाच अंत झाला तर काही वर्षांनी त्यांचा पक्ष जी देशव्यापी निवडणूक लढविणार आहे, ती पक्षासकट अगोदरच संपेल. एका अर्थाने ती एका उदात्त चळवळीची भ्रूणहत्या ठरेल. शिवाय मग असा योग्याचा अंकुश न उरल्याने आपला समाज व सरकार अधिक भ्रष्ट होईल. योगी जरी अनंतात विलीन झाला तरी त्याचा आत्मा अमर असल्याने रामदेवबाबांचा आत्मा तसा या भारतवर्षात घुटमळतच राहील. पण आत्मा सदेही असणे आणि देहविरहित असणे यांत खूप फरक आहे. रामदेवबाबा नसले तरी त्यांचा आत्मा आपल्यात आहे हे त्यांच्या अनुयायांना कळले तरी वळणे कठीण आहे. शिवाय जरी अण्णा हजारेंसारखे चारित्र्यसंपन्न समाजनेते आणि महायोगी श्री श्री रविशंकर यांनी भ्रष्टाचारविरोधी चळवळ पुढे चालवायची ठरविली तरी त्यांनाही रामदेवबाबांची उणीव जाणवणारच. भारतात एका बाबाला दुसरा बाबा इतक्या सहजपणे 'रिप्लेस' करू शकत नाही.
  रामदेवबाबांनाही याची, आणि आपल्या मत्र्यत्वाची व आत्म्याच्या अमत्र्यत्वाची जाणीव असणारच. त्यामुळे घोषणा जरी आमरण उपोषणाची असली तरी ते मरणाला सामोरे जाण्यापूर्वीच संपणार - निदान संपावे अशीच सर्वांची इच्छा असेल! जर पुढील लोकसभा निवडणुकीत रामदेवबाबांना ५४३ पैकी ३ खासदार त्यांच्या पक्षाचे निवडून आणता आले तर ते स्वत:च पंतप्रधान होतील. (कदाचित म्हणूनही पंतप्रधानपद लोकपालाच्या कक्षेबाहेर असावे, असे त्यांचे मत असण्याची शक्यता आहे.) असो. ऑर्थर कोस्लर यांच्या निरूपणानुसार योगी कितीही प्रामाणिक वा तळमळीचा असला तरी कोट्यवधी लोकांचे मन व चारित्र्य त्याला आमूलाग्र बदलता येणार नाही. (गांधीजींना त्यांच्या काळात आणि त्यांच्या हत्येनंतर त्यांच्या अनुयायांना साधी दारुबंदीही अमलात आणता आली नाही!) त्याचप्रमाणे कोमिसारला क्रांती करून संपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण ठेवणेही रशियात वा चीनमध्ये जमले नाही- झेपलेही नाही. मग उरला लोकशाही कोमिसारचा म्हणजे डॉ. मनमोहन सिंग यांचा मार्ग. बहुपक्षीय सरकार चालविताना हा चारित्र्यसंपन्न लोकशाही कोमिसारही कसा मेटाकुटीला येतो हे आपण पाहतच आहोत. समजा, रामदेवबाबांच्या पक्षालाही चक्क आघाडीचेच सरकार बनविण्याचा प्रसंग २१४ मध्ये आला, तर मात्र योगी आणि कोमिसार दोघांनाही जे आसन करावे लागेल त्याचा विचार साक्षात पतंजलींनीही केला नसणार! अशा परिस्थितीत योगी रामदेवबाबा व कोमिसार डॉ. मनमोहन सिंग दोघांनाही आमच्या शुभेच्छा - मरणापेक्षा वाटाघाटींनाच सामोरे जाणे देशाच्या हिताचे आहे म्हणून!

Trending