मराठी पाऊल अडखळते / मराठी पाऊल अडखळते कुठे?

divya marathi team

Jun 05,2011 03:51:31 AM IST

आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजल्या गेलेल्या नोबेल, मॅगसेसे, राइट लाइवलीहूड बुकर, ऑस्कर, पुलिट्झर, अशा विविध पुरस्कारविजेत्या भारतीयाच्या नावांमध्ये आपल्या बुिद्धवादी वारशाचा, प्रागतिक विचारसरणीचा, साहित्यिक कर्तृत्वाचा, वैज्ञानिक परंपरेचा आणि सामाजिक कार्याच्या परंपरेचा अभिमान बाळगणार्‍या मराठी भाषिकांपैकी एकाचेही नाव नाही.
सामाजिक क्षेत्रात मराठी नेतृत्वाने काहीशी बाजी मारलेली असली तरी या यादीतले शेवटचे मराठी नाव 1996 सालचे पांडुरंगशास्त्रींचे आहे. त्यानंतर परत मराठी नाव नाही. प्रतिनोबेल मानला गेलला ‘राइट लाइवलीहूड पुरस्कार’ 1991 मध्ये मेधा पाटकर आणि बाबा आमटेंना नर्मदा आंदोलनाकरता मिळाला. तिथेही त्यानंतर मराठी नाव नाही. नोबेल, बुकर किंवा पुलिट्झर आत्तापर्यंत दोन-पाच वेळा भारतीयांना मिळाले. पण त्यात भानू (राजोपाध्ये) अथय्या हे एक मराठी नाव वगळता कोणीच नाही. तेही 1982 मध्ये मिळालेले. त्यानंतर परत मराठी नाव नाही. मध्ये एकदा मराठी ‘श्वास’ ऑस्करपर्यंत धडक मारून आला. नाही म्हणायला एक क्रिकेट असे क्षेत्र आहे की जिथे गावस्कर, वेंगसरकर, तेंडुलकर अशी आंतरराष्ट्रीय दर्जाची परंपरा आहे.
कोणताही प्रांतीयवाद, भाषावाद वा या सगळ्याविषयीचा दुराभिमान वगैरे न बाळगताही 1960 पासून सुवर्णमहोत्सवी वर्षापर्यंत महाराष्ट्राची उत्तरोत्तर अशी पीछेहाट का झाली आहे, किंवा अजूनही सुरू आहे याचा शोध घेण्याची गरज आहे.

भारतीय सिनेमा तर महाराष्ट्रातच जन्मला, परंतु बंगालमध्ये (व नंतर केरळमध्ये) समृद्ध झाला. राष्ट्रीय पातळीवरही 1952 मध्ये ‘श्यामची आई’ला मिळालेल्या पुरस्कारानंतर परत तो पुरस्कार मिळायला मराठी सिनेमाला (श्वास) 2004 पर्यंत वाट पाहावी लागली.
देशपातळीवरील कोणतेही महत्त्वाचे नियतकालिक उघडून पाहिले तर प्रत्येक लेखात ज्या तज्ज्ञ वा महत्त्वाच्या लोकांचे कोट्स (अवतरणे) दिलेली असतात, त्यात महाराष्ट्राशी संबंधित विषय सोडले तर इतर राष्ट्रीय विषयांत मराठी तज्ज्ञांची अवतरणे अभावानेच आढळतात. तेच टीव्हीत. राष्ट्रीय पातळीवरील विषयांबाबतच्या चर्चांमध्ये अभावानेच मराठी नाव सहभागी करून घेण्यात आल्याचे दिसते. (अपवाद टाइम्स ऑफ इंडियाचे माजी संपादक दिलीप पाडगावकरांचा). दोनेक वर्षांपूर्वी एका नियतकालिकाने परदेशातील प्रभावी भारतीयांवर विशेषांक काढला. त्यात एकही मराठी नाव नव्हते. किमान सिटीबँकेचे विक्रम पंडित, बोईंगचे दिनेश केसकर आणि फिशमन प्रभूचे सुधाकर प्रभू यांची नावे त्यात यायलाच हवी होती. तिथे मराठी कर्तृत्व मागे नाही. पण मग इतरांच्या तुलनेत ही मंडळी अशा नियतकालिकांपर्यंत, त्यांच्या पत्रकारांपर्यंत पोचण्यात कमी पडतात का? असे करणे म्हणजे पुढे पुढे करणे म्हणून ते टाळतात का? का ते नेटवìकगमध्ये कमी पडतात? तसे तर मराठी माणूस नेटवìकगमध्ये कमी पडतो (किंवा खरे तर तो ते करणे कमीपणाचे वा चुकीचे मानतो) ही सार्वत्रिक तक्रार आहे. की आपली आपल्यालाच किंमत नाही तर इतरांना ती का वाटावी?पण प्रश्न केवळ नेटवìकग वा प्रेझेंटेशनचा नाही. या पोहर्‍यांचा उपयोग करायला मुळात आधी आडात काहीतरी असायला हवे. तेच नाही असा काहीतरी प्रकार बर्‍याच बाबतींत सुरू नाही ना? अनेक ठिकाणी आपली बौद्धिक क्षमताच कमी पडते आहे आणि काही वेळा ती असली तरी ती दाखवण्यात आपण कमी पडतो. इंग्रजी लिहिणे आणि बोलणे, हा आपला मोठा वीक पॉइंट आहे आणि बर्‍याचदा आपल्याला मराठी भाषिक वतरुळाबाहेर घेऊन जाण्यातला तो मोठा अडथळा ठरतो. एखाद्या बहुभाषिकांच्या इंग्रजी चच्रेत महत्त्वाचा काहीतरी मुद्दा मांडण्याचा आत्मविश्वास वाटत नाही, तो केवळ इंग्रजीमुळे. आपल्या या भाषेच्या अज्ञानाला किंवा आत्मविश्वास नसण्याला काही वेळा मराठीच्या अभिमानाचे टोक दिले जाते.

आपापले कोंडाळे करून राहणे हा आपला आणखीन एक दोष. आपली सर्व, हुशारी, बुद्धिमत्ता, स्मार्टनेस, कॉमेंट्स करण्याची चमक हे सर्व आपापसातच असते. एकदा एका पाकिस्तानी शिष्टमंडळासमवेत जेवायला बोलावले असताना, तेथे असलेले दोन-तीन मराठी पत्रकार त्या पाकिस्तानी लोकांबरोबर गप्पा मारण्याऐवजी शेवटच्या रांगेत बसून आपापसात गप्पा मारत होते. एकूणच आपण फार बाहेर जायला तयार नाही, नवीन काही ऐकायला, पाहायला, करायला तयार नाही. त्यामुळे वेगळे जरी काही करीत असलो तरी त्या क्षेत्रात एखाद-दुसरा अपवाद वगळता मराठी नावे टॉपला नाहीत. एका आशियाई माध्यम संघटनेच्या फेलोशिप निवड समितीवर असल्याने एका भारतीयाला दिली जाणारी ही फेलोशिप मराठी पत्रकाराला मिळावी, असा माझा प्रयत्न होता. त्याकरता मी स्वत: विविध मराठी संपादकांना फोन करून त्यांच्या वर्तमानपत्रांत ही बातमी छापावी, कार्यालयात त्याची नोटीस लावावी व त्यांच्याकडील इच्छुक पत्रकारांना अर्ज करायला सांगावे म्हणून प्रयत्न केले. मराठी पत्रकाराने अर्जच न केल्याने अखेर सुमारे 75,000 रुपयांची ही फेलोशिप बेंगळुरूच्या एका पत्रकाराला मिळाली.
आंतरराष्ट्रीय पातळीवर वावरताना मराठी भाषिकांचा अभाव आणि बंगाली, तामिळ, मल्याळम भाषिकांची हजेरी प्रकर्षाने जाणवते. काही अपवाद वगळता राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर पारितोषिकांमध्ये आपण नाही, राष्ट्रीय प्रश्नांत न्यूज मॅगझीन्समध्ये नाही, टीव्हीवर नाही, परिषदांमध्ये नाही, महत्त्वाच्या जागांवर नाही. मग आपण आहोत तरी कुठे? कुठे लोप पावला आहे तो मराठी इंटलेक्च्युअलिझम, कलासक्तपणा, वैचारिक क्षेत्रातील आपला दबदबा आणि नाव? का सगळीकडे होते आहे आपली पीछेहाट?
महाराष्ट्राच्या पुढच्या 25 वर्षांची विकासाची ब्ल्यूपिंट्र तयार करणार्‍या पक्षाने इतर विकासाबरोबर याही विकासाकडे लक्ष देण्याची गरज आहे. त्याचीही एक ब्ल्यूपिंट्र तयार केली पाहिजे. इतर सर्व विकासाप्रमाणेच परत एकदा आपला वैचारिक दबदबा निर्माण करणे हेही महत्त्वाचे आहे. तोही एक प्रकारचा विकासच आहे. त्याकरता नसलेल्या क्षमता कशा निर्माण करायच्या आणि असलेल्या क्षमतांचे कसे प्रोजेक्शन करायचे ते ठरवणे महत्त्वाचे आहे. हे केले आणि त्याचे काही चांगले परिणाम दिसू लागले तर राज्याचे सुवर्णमहोत्सवी वर्ष कारणी लागले असे म्हणायला हरकत नाही
मिलिंद कोकजे

कार्यकारी संपादक, भाषा विभाग, इंडिया डॉट कॉम.
[email protected]

X
COMMENT