Home | Editorial | Agralekh | editorial

एका पत्रकाराचे हौतात्म्य

divya marathi | Update - Jun 06, 2011, 04:27 AM IST

सलीम शहजादच्या शोधपत्रकारितेतून एक गोष्ट स्पष्ट होत होती की तालिबानी व अल कायदाच्या दहशतवादाचा धोका भारत वा अमेरिकेपेक्षाही पाकिस्तानलाच अधिक आहे. कारण त्या दहशतवाद्यांना तेथील संपूर्ण नियंत्रण हवे आहे.

 • editorial

  सलीम शहजादच्या शोधपत्रकारितेतून एक गोष्ट स्पष्ट होत होती की तालिबानी व अल कायदाच्या दहशतवादाचा धोका भारत वा अमेरिकेपेक्षाही पाकिस्तानलाच अधिक आहे. कारण त्या दहशतवाद्यांना तेथील संपूर्ण नियंत्रण हवे आहे.
  पाकिस्तानमधील पत्रकारिता म्हणजे थेट विस्तवाशी खेळ आहे. दहशतवादाने पोखरलेल्या त्या देशात त्याच दहशतवादाच्या विरोधात लिहिणे वा बोलणे, आणि तालिबानी वा अल कायदासारख्या संघटनांचे प्रशासनात वा पाकिस्तानी सेनादलात कसे जाळे विणलेले आहे हे जाहीर करणे जिवावर उदार होऊनच करावे लागते. बहुसंख्य भारतीयांना आणि पत्रकारांनाही, पाकिस्तानमधील पत्रकारांची ही स्थिती पुरेशी माहीत नाही. किंबहुना असेही म्हणता येईल की बहुसंख्य भारतीयांना पाकिस्तानमधील सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक जीवनशैलीची तर अजिबात कल्पना नाही.
  पाकिस्तानमधील सर्वच्या सर्व 16-17 कोटी लोक हे जणू कायम भारताच्या विरोधात आहेत आणि तेथील प्रत्येकाचा दहशतवादी कारवायांना पाठिंबा आहे, असेच बहुतेक भारतीयांना (विशेषत: हिंदूंना) वाटते. गेल्या आठवड्यात सलीम शहजाद या पत्रकाराची निर्घृण हत्या केली गेली आणि तेथील पत्रकारितेचा लोकशाही व लढाऊ चेहरा पुन्हा एकदा जगाला दिसला. सलीम शहजाद हा पाकिस्तानातील दहशतवादाचा पहिला पत्रकार-हुतात्मा नव्हे. परंतु त्याची हत्या ज्या पार्श्वभूमीवर झाली तिच्याकडे पाहिले की पाकिस्तानात काय चालू आहे याचा वेध घेता येतो. आपली हत्या होण्याची शक्यता आहे, आपल्याला तशा धमक्या येत आहेत, हे गेले वर्षभर सलीमने तेथील सरकारला व मानवी हक्क संघटनेच्या पाकिस्तानमधील शाखेला कळविले होते. मुंबईवर 26/11 रोजी झालेल्या हल्ल्यानंतर गेल्या सुमारे अडीच वर्षांत खुद्द पाकिस्तानमध्ये त्यापेक्षा कितीतरी पटींनी जास्त लोक दहशतवादी हल्ल्यात मारले गेले आहेत. त्यात स्त्रिया, शाळेतली मुले, वृद्ध माणसे आणि पोलीस, सैनिक वा राजकारणी लोकही मारले गेले आहेत. महिनाभरापूर्वी ओसामा बिन लादेन याची अमेरिकन सैनिकांनी-कमांडोंनी हत्या केली. त्या हत्येसंबंधातील गूढ अजून पूर्णपणे उकलले गेलेले नाही. म्हणजे ओसामा त्या अबोटाबादमध्ये किती काळ वास्तव्य करून होता, पाकिस्तानी सेनादलातील नक्की कोणाकडून त्याला किती मदत होत होती, अमेरिकन हेरखात्याला ओसामाविषयीची माहिती कोण पुरवीत होते, आयएसआयला आणि सीआयएला किती माहिती होती आणि त्यांच्यापैकी कोण ‘डाल एजंट’ होते या वा अशा अनेक प्रश्नांची उत्तरे अजून मिळालेली नाहीत. परंतु केवळ हेच नव्हे तर एकूणच दहशतवादाची मुळे पाकिस्तानी सैन्यात व नोकरशाहीत किती पसरली आहेत याचा शोध सलीम शहजाद घेत होता.
  पाकिस्तान, अफगाणिस्तानातील दहशतवाद हा इतरही अनेक गोष्टींशी निगडित आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर चालणारी गर्दची तस्करी, त्याच अनुषंगाने होणारे शस्त्रास्त्रांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार, त्यातून निर्माण होणारा प्रचंड काळा पैसा आणि त्या पैशाने पोखरले गेलेले राज्य व्यवस्थापन अशी ती मोठी साखळी आहे. ती साखळी तोडायची तर त्याविषयीची माहिती असणे आवश्यक आहे. सलीम शहजादच्या शोधपत्रकारितेतून एक गोष्ट स्पष्ट होत होती की तालिबानी व अल कायदाच्या दहशतवादाचा धोका भारत वा अमेरिकेपेक्षाही पाकिस्तानलाच अधिक आहे. कारण त्या दहशतवाद्यांना तेथील संपूर्ण शासन, सेनादल, मीडिया,न्यायव्यवस्था, अण्वस्त्रे अशा सर्वांवर नियंत्रण हवे आहे. ओसामाच्या हत्येनंतर काही दिवसांतच पाकिस्तानी नौदलावर अल कायदा व तालिबानी संघटनांनी हल्ला चढविला. त्यात किती लोक मरण पावले यापेक्षासुद्धा हा हल्ला किती नियोजनपूर्वक केला गेला हे अधिक महत्त्वाचे होते. कारण त्या नियोजनात जर सेनादलातील उच्चपदस्थ व मध्यमस्तरीय अधिकारी सामील नसते तर तो हल्ला होऊच शकला नसता. अशा सैनिकी तळांना संरक्षण सेनेचे व हेरखात्याचेच असते. पण त्यांच्यापैकी काही जण जर ‘मानवी बॉम्ब’ व्हायला तयार होऊन दहशतवाद्यांना मदत करीत असतील, तर दहशतवादाविरुद्धची ती लढाई थेट ‘घरात’च करावी लागणार हे उघड आहे. सलीम शहजादचे काही ‘कॉन्टॅक्ट्स’ सेनादलात व प्रशासनात होते.
  ज्या अधिकार्‍यांनी दहशतवादाचे हे हिंस्र स्वरूप पाहिले आहे ते अधिकारी सलीम शहजादला आतून माहिती पुरवीत होते. त्यामुळेच जगाला कळले की तो हल्ला तशा घरभेद्यांनी केला होता, ज्यांनी दहशतवाद्यांना मदत केली त्यांची नावे वा त्यांचे लागेबांधे जाहीर झाले की ते जाळे तुटायला मदत होईल हे उघड आहे. सलीमच्या शोधपत्रकारितेचा तो ‘धोका’ तालिबानी व अल कायदा संघटनांनी ओळखला होताच. पण मुख्य धसका घेतला होता तो घरभेद्या अधिकार्‍यांनी. म्हणूनच त्या अधिकार्‍यांच्या मदतीनेच सलीम शहजादला प्रथम ‘किडनॅप’ केले गेले, नंतर दीर्घकाळ त्याचा भयानक शारीरिक छळ केला गेला आणि त्यानंतर त्याला ठार मारण्यात आले. हा एक प्रकारचा इशारा होता - असे धाडस करू पाहणार्‍या पत्रकारांना आणि दहशतवाद्यांच्या विरोधात माहिती पुरविणार्‍या कर्मचारी वा अधिकार्‍यांना. डॅनिएल पर्ल या अमेरिकन पत्रकाराला पकडून त्याचा छळ करून त्याला ठार मारले गेले, या घटनेला चार वर्षे होऊन गेली. पण तो इशारा मुख्यत: परदेशी-पाश्चिमात्य पत्रकारांना होता. त्यानंतर अनेक पत्रकारांनी - पाकिस्तानी व परदेशी-दहशतवाद्यांचे जाळे भेदण्याचा प्रयत्न केला. किंबहुना त्यामुळेही ओसामा बिन लादेन याची हत्या करणे अमेरिकेला शक्य झाले. जर अशीच शोधपत्रकारिता सुरू राहिली तर दहशतवाद्यांचे बेत, त्यांची कट-कारस्थाने आणि त्यांचे जागतिक नेटवर्क उघडकीला येईल. म्हणजेच एका दृष्टिकोनातून असे म्हणता येईल की हत्या जरी सलीमची झालेली असली तरी त्याच्या हौतात्म्यामुळे, दहशतवादीच बचावात्मक पवित्र्यात गेले आहेत. पाकिस्तानमधील लोकशाही लढय़ांना सर्व शांततावादी आणि स्वातंत्र्यवादी भारतीयांनी पाठिंबा द्यायला हवा. विशेषत: पत्रकारांनी - कारण तो आपल्याही हिताचा आहे!

Trending