Home | Editorial | Agralekh | editorial

पाखंडी संन्याशाचे राजकारण

divya marathi | Update - Jun 07, 2011, 11:41 PM IST

जयप्रकाश नारायण यांच्या एक टक्काही नैतिकता नसलेल्या रामदेव बाबांपासून भाजपपर्यंतच्या सगळ्यांचेच अंतिम लक्ष्य देशाचे शुद्ध चारित्र्य नव्हे, राजसत्ता आहे.

 • editorial

  जयप्रकाश नारायण यांच्या एक टक्काही नैतिकता नसलेल्या रामदेव बाबांपासून भाजपपर्यंतच्या सगळ्यांचेच अंतिम लक्ष्य देशाचे शुद्ध चारित्र्य नव्हे, राजसत्ता आहे.
  रामदेवबाबांनी आपले संपूर्ण राजकीय अवकाश व्यापावे आणि मीडियातील सर्व चर्चा याच योगी माणसाच्या आत्मनिष्ठ आंदोलनावर जवळजवळ एक आठवडाभर चालू राहावी यावरून आपले राजकारण किती सवंग आणि संदर्भहीन झाले आहे, हे लक्षात येईल. त्यांनी उपस्थित केलेले भ्रष्टाचाराचे व काळ्या पैशाचे प्रश्न महत्त्वाचे आहेत; पण त्याबद्दलची त्यांची मांडणी शुद्ध अडाणीपणाची व त्यांच्या समर्थकांची भाबडी आहे. संघपरिवाराचे समर्थन मात्र अडाणीपणाचे नाही वा भाबडेपणाचेही नाही. ते शुद्ध मतलबीपणाचे आहे. भाजपला वाटते आहे की, ते देशात बोफोर्ससदृश हंगामा करून प्रशासन खिळखिळे करू शकतील आणि वातावरण तापवून मध्यावधी निवडणुका घेण्यासारखी परिस्थिती निर्माण करतील. अस्थैर्य आणि अराजक माजविण्याची उजव्यांची व डाव्यांची राजनीती काही नवीन नाही. यापूर्वी १९६९, १९७४, १९८३, १९८८-८९, १९९२ अशा अनेक वेळा त्यांनी याच नीतीचा वापर केला आहे. काँग्रेसच्या आत्मसंतुष्ट व आपमतलबी राजकारणामुळे ते व त्यांचे सरकार नेहमी त्या सापळ्यात सापडले आहेत. पण रामदेवबाबा कोण आणि त्यांच्या भजनी डावे-उजवे का लागले आहेत? आपल्या आजूबाजूच्या राष्ट्रांमध्ये किती स्फोटक परिस्थिती निर्माण झाली आहे याचे भान न ठेवता अख्खा देश वेठीस धरला जात आहे याची जाणीव मीडियालाही नाही. रामदेवबाबा बोलूनचालून संन्याशी! त्यांची नैतिकता वादातीत (!). त्यामुळे पंधरा-वीस वर्षांतच त्यांनी ११ हजार कोटींचे योगसाम्राज्य उभारण्याचा चमत्कार कसा साधला, हे त्यांना विचारण्याची हिंमत कोणी दाखविलेली नाही. पण रामदेवबाबा आणि त्यांच्या भगव्या सहानुभूतिदारांनी मात्र भ्रष्टाचारी लोकांचा स्वीस बँकेतला काळा पैसा भारतात आणा, नाही तर परिणामांना सामोरे जा, अशा धमक्या दिल्या आहेत. ब्लॅकमेल करण्याचा मनसोक्त खेळ खेळायचा; स्वत:चे महत्त्व वाढविण्यासाठी एक नव्हे, चार मंत्र्यांना मनधरणी करण्यासाठी बोलावण्याची चालाखी दाखवायची; खोटी शपथपत्रे लिहून द्यायची हे नेपथ्य एकदम कसे सिद्ध झाले? बाबांचा योगसाधनेतील मास-बेस खूप मोठा म्हणून धास्तावलेल्या सरकारने त्यांच्यापुढे झुकायचे. कशासाठी?
  कोणतीही विचारसरणी आणि दूरदृष्टी नसताना क्रांतीचे स्वप्न बघणाºया बाबांचे काही अनुयायी सध्या ट्रान्समध्ये, तर काही कोमामध्ये गेले आहेत. जो गृहस्थ समोर पोलिसांचा फौजफाटा बघताच स्टेजवरून उडी टाकून पळतो, महिलेचा वेश धारण करून सटकण्याचा प्रयत्न करतो, तो भविष्यात आपल्या पाठीशी कसा उभा राहील, असा प्रश्नही त्यांना सध्याच्या सैरभैर अवस्थेत पडणार नाही. वस्तुत: बाबांचे नैतिक बळ मोठे होते, हेतू शुद्ध होता आणि निर्धार पक्का होता, तर बाबांनी पळ काढलाच कसा? कुठे गेला त्यांचा धीरोदात्तपणा? एका बाजूला हे आंदोलन राजकारणविरहित आहे असे म्हणायचे आणि दुसरीकडे साध्वी ऋतंभरांसारख्या धर्माच्या नावाने आग ओकणाºया साध्वीला स्टेजवर जागा करून द्यायची. माझे काही बरे-वाईट झाले तर त्याची जबाबदारी सोनिया गांधींची (धर्माने ख्रिश्चन असलेल्या) आहे, अशी सरळसरळ राजकीय हेतू ठेवून बोंब ठोकायची. उपद्रवमूल्य सिद्ध करण्याची पुरेशी संधी न मिळाल्याने थयथयाट करीत ‘काँग्रेस का नाश कर दूँगा’ अशी शापवाणी उच्चारायची, हे सर्व कशाचे लक्षण आहे?
  धर्मसत्तेच्या बळावर राजसत्ता काबीज करण्याचा रामदेवबाबांचा उद्देश लपून राहिलेला नसताना, ‘मास हिस्टेरिया’च्या शोधात असलेल्या संघपरिवाराने तलवारी परजल्या नसत्या तरच नवल. पण काँग्रेसवाल्यांच्या हे लक्षात का नाही आले? नव्वदच्या दशकात विश्व हिंदू परिषदेचा राममंदिराचा अजेंडा भाजपने हायजॅक केला. तशीच संधी आता बाबा रामदेवांच्या रूपाने चालून आल्याने निवृत्तीकडे झुकलेल्या लालकृष्ण अडवाणींपासून अडगळीत गेलेल्या राजनाथ सिंगांपर्यंतच्या सगळ्यांनाच चेव चढला आहे. अशा वेळी नरेंद्र मोदींसारखे नेते आक्रस्ताळेपणा करत न चुकता स्वत:चे अस्तित्व दाखवून देण्यात पुढे असतात. पण, गंभीर आव आणत समाजाच्या भावना भडकविण्यात अडवाणींचा हात धरणारा भाजपमध्ये दुसरा नेता नाही. ब्रिटिश राजवट काय, जालियनवाला बाग हत्याकांडाची आठवण काय, वाट्टेल ती भडकावू वक्तव्ये अडवाणी देत आहेत. उद्या समजा खरोखरच बाबा रामदेवांच्या उपोषणात घातपाताची घटना घडली असती, त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला असता, तर याच अडवाणी आणि त्यांच्या कंपनीने गंभीर चेहरा करून मनमोहनसिंग सरकारच्या निष्क्रियतेचे वाभाडे काढले असते.
  संन्याशाचा पाखंडीपणा व भाजपचे ढोंग यांत जनता सैरभैर झालेली आहे. देशभक्तीचे ढोंग करणा-या रामदेवबाबांना एवीतेवी दिल्लीबाहेर हुसकावण्यात आलेच आहे, तेव्हा त्यांनी पुकारलेले आंदोलन हायजॅक करून आणीबाणीच्या काळाची पुनरावृत्ती घडवून आणण्याचा भाजप नेत्यांचा डाव असला, तरीही सत्तरच्या दशकातील झापडबंद जनता आणि आताचा जगाचे भान आलेला, कधी सरळ तर कधी भ्रष्ट मार्गाने सुबत्ता मिळविलेला उच्च मध्यमवर्ग यात जमीन-अस्मानाचा फरक पडलेला आहे. जयप्रकाश नारायणांसारखा स्वच्छ चारित्र्य व सर्वव्यापी नैतिक धाक असलेला नेता असूनही क्रांतीच्या घोषणेने त्या वेळी लोकांची फसवणूक झाली होती. जेपींच्या एक टक्काही नैतिकता नसलेल्या रामदेवबाबांपासून भाजपपर्यंतच्या सगळ्यांचेच अंतिम लक्ष्य देशाचे शुद्ध चारित्र्य नव्हे, राजसत्ता आहे. त्या अर्थाने त्यांच्या भजनी लागणाºयांची यापुढेही फसवणूक कैक पटींनी मोठी असणार आहे.

Trending