Home | Editorial | Agralekh | editorial

आभासाचे राजकारण

divya marathi | Update - Jun 11, 2011, 12:56 AM IST

भांडवलशाही व्यवस्था आभास निर्माण करते असे म्हणतात. त्या अर्थाने आठवले आणि पवार दोघेही प्रस्थापितांचेच प्रतिनिधी आहेत.

  • editorial

    भांडवलशाही व्यवस्था आभास निर्माण करते असे म्हणतात. त्या अर्थाने आठवले आणि पवार दोघेही प्रस्थापितांचेच प्रतिनिधी आहेत.
    गेल्या दोन दिवसात सेना-भाजप अधिक रिपाइं यांचा ‘महायुती’ मोर्चा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनादिनानिमित्ताने झालेली सामाजिक परिवर्तन हक्क परिषद ही मुंबईत झालेली दोन शक्तिप्रदर्शने या शहराच्या इतिहासाला साजेशी आहेत. परंतु त्यात सामाजिक परिवर्तन किती आणि त्याचा आभास किती हे लोक प्रत्यक्षात अनुभवीत आहेतच. रामदास आठवले हे धर्मांध शक्तींच्या विरोधात लढणारे काँग्रेस-राष्ट्रवादीचे परवापर्यंतचे एक विश्वासू साथीदार थेट धर्मांध शक्तींच्याच मांडीवर जाऊन बसल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खूप मोठी उलथापालथ होणार नसली तरी घुसळण होणारच होती. त्या घुसळणीलाच आता सुरुवात झाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले होते की, कुठलीही सामाजिक वा राजकीय क्रांती होण्याआधी वैचारिक क्रांतीची सुरुवात होत असते. भारतासारख्या जातिप्रथामूलक समाजात ती सुरुवात जातिअंताच्या विचारधारेतून सुरू होते. डॉ. आंबेडकरांच्या विचारांना मानणारे आणि त्याच रिपब्लिकन पक्षाच्या एका गटाचे नेतृत्व करणारे आठवले हे प्रत्येक निवडणुकीच्या आधी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याबरोबर युती जाहीर करताना आवर्जून सांगत असत की, देशातील जातीयवादी शक्तींचा बीमोड करण्यासाठी आम्ही काँग्रेससोबत जात आहोत. जातीयवादविरोधी विचारांची क्रांती ही जातिअंताशिवाय पूर्णत्वाला जाणार नाही, असे डॉ. आंबेडकरांनी म्हटले आहे. मग आठवले नेमके कोणत्या कारणासाठी सेना-भाजपबरोबर गेले आहेत, हा प्रश्न अनेकांना पडू शकतो. काही जणांच्या मते शिर्डीत हरलेल्या आठवलेंना राज्यसभेत जायचे आहे म्हणून ते तेथे गेले आहेत. मात्र, राज्यसभेत तर त्यांना राष्ट्रवादी किंवा काँग्रेसने नक्कीच पाठवले असते. त्यामुळे केवळ राज्यसभेची जागा हे आठवलेंच्या भगव्या राजकारणाला साथ देण्याचे कारण असू शकत नाही. राष्टÑवादी काँग्रेस वा तिचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या गळ्यातील ताईत असलेले आठवले नेमके स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या मुहूर्तावर महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदांवर भगवा फडकावण्याच्या भूमिकेतून सेना-भाजपकडे गेले आहेत. बरे, तिथे जातानाही त्यांनी शरद पवार यांचे आमच्यावर उपकार आहेत हे जाहीर केले आहेच. आठवले यांची रिपब्लिकन पक्षाच्या अगणित गटांपैकी एका गटावरच पकड असली तरीही त्यातल्या त्यात त्यांच्या मागे ब-यापैकी जनाधार आहे. त्यामुळे सेना-भाजपला आठवलेंच्या येण्यामुळे किती फायदा होईल किंवा कसे हे माहीत नसले तरीही तोटा मात्र काहीच नाही. मुंबई, ठाणे महापालिकांमध्ये झाला तर या महायुतीचा फायदाच होऊ शकतो. मग राजकीय नुकसान दिसत असतानाही काँग्रेस-राष्ट्रवादीने आठवलेंना रोखण्याचे प्रयत्न का केले नाहीत, असा प्रश्न उपस्थित होतो.
    जशी आठवले यांना स्वत:च्या राजकीय अस्तित्वाची चिंता आहे, तशीच ती महाराष्टÑात राज्य करणा-या काँग्रेस-राष्ट्रवादीलाही आहे. महाराष्टÑातील बडे शेतकरी आणि मराठा समाज या जनाधारावरून या दोन्ही पक्षांची आपापसात प्रचंड स्पर्धा आहे. या निवडणुकीत ज्याचा आलेख चांगला राहील तो विधानसभा निवडणुकीत जास्त दादागिरी करणार. आघाडीतील पक्षासोबतच्या जागावाटपापासून ते पक्षांतर्गत गटांना नामोहरम करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांचे निकाल खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. ग्रामीण महाराष्टÑावर चांगली पकड असलेल्या राष्टÑवादीतील अजितदादांचे नवे नेतृत्व तर या निवडणुकांची आतुरतेने वाट पाहत आहे. मात्र, राष्टÑवादीचा मुंबई शहरातील पाठिंबा अगदीच नगण्य आहे. विधानसभेच्या ३६ जागा असलेल्या या शहराच्या जीवावर काँग्रेस पक्ष राष्टÑवादीवर प्रचंड दादागिरी करत असतो. त्यातच जर मुंबई महानगरपालिका काँग्रेसच्या हातात गेली तर राष्टÑवादीला विधानसभेत काँग्रेसशी युती करताना लोखंडाचे चणे चावावे लागतील. नेमक्या याच वेळी शरद पवार यांच्या गळ्यातील ताईत म्हणविणारे आणि आजही शरद पवार यांचे उपकार न विसरणारे आठवले आता धर्मांध शक्तींसोबत गेले आहेत. शरद पवारांनी मात्र आठवलेंच्या ‘दगाफटक्या’ची दखलही न घेता त्यांच्या पक्षाचे १२ वे अधिवेशन नेमके आंबेडकरी मुद्द्यांवरच भरविले आहे. आपण आठवलेंपेक्षाही अधिक आंबेडकरी विचारांचे आहोत, असे भासविण्याचा पवारांचा प्रयत्न आहे की आठवलेंना ‘महायुती’त पाठवून त्यांनीच केलेली ही गनिमी राजकीय खेळी आहे, हे कदाचित काही काळानंतर लक्षात येईल. या सगळ्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची भूमिका किंवा रणनीती काय हे कोणत्याही काँग्रेस नेत्याला माहीत नाही. आठवले गेले तरी गवई आहेत ना! प्रचाराच्या गाडीवर एक निळा झेंडा असला की पुरे, इतक्या सवंग पातळीवर जाऊन काँग्रेसजनांच्या चर्चा सुरू आहेत.
    दुसरीकडे समाजवादी परंपरेत वाढलेले काँग्रेसचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मोहनप्रकाश यांनी या पार्श्वभूमीवर डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्या अध्यक्षतेखाली मागासवर्गीयांसाठी समिती बनवून त्यांनी पक्षाला याबाबत दिशा द्यावी, असे संकेत दिले आहेत. त्यामुळे एकीकडे निळा झेंडा असलेल्या छोट्या-मोठ्या रिपाइं गटाच्या शोधात आणि दुसरीकडे हस्तिदंती मनोºयातील विचारवंतांच्या सल्ल्यांवर स्वप्ने पाहणा-या काँग्रेसला अद्याप या नव्या राजकीय सापळ्यातून मार्ग सापडलेला दिसत नाही. चळवळी आणि आधुनिकतेची परंपरा असलेल्या मुंबई शहरात सत्तेच्या साठमारीतून केलेल्या विधिनिषेधशून्य भंपक युत्या आणि जन आंदोलनाच्या नावाखाली सुरू झालेले राजकीय शक्तिप्रदर्शन यातून निवडणुकांची समीकरणे विस्कटता येतील किंवा नवीन बेरजा-वजाबाक्या तयार करता येतील. पण आठवलेंनी काय किंवा पवारांनी काय, दादर स्थानकाचे नामांतर करून आंबेडकरी परिवर्तनाचा आव आणला तरी तशी सामाजिक क्रांती हा आभासच ठरेल. भांडवलशाही व्यवस्था आभास निर्माण करते, असे म्हणतात. त्या अर्थाने आठवले आणि पवार दोघेही प्रस्थापितांचेच प्रतिनिधी आहेत; क्रांतीचे प्रणेते नव्हे!

Trending