Home | Editorial | Agralekh | editorial

शिवसेनेचा नवा ‘माऊथपीस’

divya marathi | Update - Jun 21, 2011, 12:42 AM IST

शिवशक्ती आणि भीमशक्तीच्या युतीमुळे सामाजिक समरसतेला चालना मिळणार असेल, तर कोणीही आक्षेप घेण्याचे कारण नाही; पण विळ्या-भोपळ्याचा हा नवा राजकीय अवतार लोकांच्या अजूनही पचनी पडलेला नाही.

  • editorial

    शिवशक्ती आणि भीमशक्तीच्या युतीमुळे सामाजिक समरसतेला चालना मिळणार असेल, तर कोणीही आक्षेप घेण्याचे कारण नाही; पण विळ्या-भोपळ्याचा हा नवा राजकीय अवतार लोकांच्या अजूनही पचनी पडलेला नाही. राज्यात आपणच सर्वात शक्तिशाली दलित नेते आहोत हा आठवले यांनी फुगवलेला फुगा फुटणार आहेच; पण या राजकीय जुगाराचा शिवसेनेला फार फायदा होईल, अशीही परिस्थिती नाही.
    शिवसेनेचा विद्यापीठाच्या नामांतराला कधीही विरोध नव्हता, असे प्रमाणपत्र खुद्द रामदास आठवले यांनीच दिल्यामुळे कदाचित शिवसेनाही संभ्रमात पडली असेल! शिवसेनेच्या ४५व्या वर्धापनदिन सोहळ्यात फटकेबाजी करताना आठवले यांनी शिवसेना जातीयवादी नसल्याचा निर्वाळा देत काँग्रेस आणि राष्टÑवादी काँग्रेसवर त्यांच्या नेहमीच्या शैलीत आगपाखड केली. यात अनपेक्षित असे काहीही नव्हते; पण एकूणच शिवशक्ती-भीमशक्तीच्या राजकारणामुळे राज्यात नामांतराचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शिवसेनेने नामांतराला विरोध केला नव्हता, असे एक वेळ मानले तर मग नेमका विरोध कोणाचा होता, असा प्रश्न पडतो. वास्तविक, शिवसेना मराठवाड्यात रुजली ती याच मुद्द्यावर. ज्या काळात मुंबईबाहेर शिवसेनेला फारसे कोणी ओळखतही नव्हते, त्या वेळी जवळचे नाशिक, पुणे सोडून ती थेट मराठवाड्यात कशी स्थिरावली? मराठवाड्यात प्रामुख्याने डावी आणि समाजवादी चळवळ त्या वेळी जोमात होती. काँग्रेसला शेतकरी कामगार पक्ष, जनता पक्ष आव्हाने उभी करीत होता. शेतकरी संघटनाही सक्रिय होती. अशा वेळी शिवसेनेला मराठवाड्यात पाय रोवण्यासाठी एक भक्कम मुद्दा हवा होता आणि त्या पक्षाची ही गरज नामांतराच्या चळवळीने पूर्ण केली. अर्थात, एवढ्या एका मुद्द्यावर शिवसेना मराठवाड्यात पसरत गेली, असेही मानता येत नाही. मराठवाड्याला निझामी राजवटीची पार्श्वभूमी असली तरी या भागात गावपातळीपर्यंत मुस्लिमद्वेष औषधालाही नव्हता. हिंदू समाजाला मुस्लिमांविरुद्ध भडकावल्याविना येथे पाय रोवता येणार नाही, याची शिवसेनेलाही कल्पना होती. त्यामुळे या मुद्द्यावर १९८६-८७च्या सुमारास शिवसेनेने औरंगाबादपासून मराठवाडा प्रवेशाला सुरुवात केली. मुस्लिमद्वेषाचे विष पसरविण्यासाठी शिवसेनेला औरंगाबादच्या महापालिका निवडणुकीसारखे मुद्दे वेळोवेळी मिळत गेले; पण विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे पारंपरिक गड सर करण्यासाठी बहुसंख्याक हिंदू आणि ओबीसी वर्गाला आकर्षित करणे शिवसेनेला अपरिहार्य होते. त्यामुळे मुस्लिमद्वेषाबरोबरच दलितद्वेष ही शिवसेनेची त्या वेळची गरज होती. वडील काँग्रेसमध्ये आणि त्यांची तरुण मुले शिवसेनेत, असेच तेव्हाचे चित्र होते. या तरुणाईला भडकावण्याची क्षमता असलेले नेते शिवसेनेकडे होते. खुद्द बाळासाहेब ठाकरे वेळोवेळी औरंगाबाद आणि मराठवाड्याचे दौरे करून तरुणांमधील द्वेषाची आग पेटती ठेवत होते. त्यामुळे काँग्रेसच्या हातातून एकएक मतदारसंघ निसटत गेला आणि शिवसेनेला बळकटी मिळत गेली. नामांतराच्या आंदोलनात तर बाळासाहेबांनी उघडपणे नामांतरविरोधी भूमिका घेतली होती. नगरच्या एका सभेत त्यांनी ‘घरात नाही पीठ अन् मागतात विद्यापीठ’ अशी घोषणाच दिली होती. नामांतर अटळ आहे हे जेव्हा शिवसेनेच्या लक्षात आले तेव्हा ठाकरे यांनी विद्यापीठाच्या नावात ‘मराठवाडा’ असलाच पाहिजे, अशी भूमिका घेतली. अर्थात, शिवसेनेने केवळ नामांतरालाच नव्हे, तर गायरान जमिनींपासून आरक्षणापर्यंतच्या प्रत्येक मुद्द्याला आक्रमकपणे विरोध केला आहे. मागासवर्गीयांच्या आरक्षणाचा विषय मंडल आयोगाच्या निमित्ताने चर्चेत आला तेव्हा या पक्षाने आर्थिक निकषांवर आरक्षण देण्याची मागणी लावून धरली. गायरान जमिनी जाती-पातींकडे पाहून नव्हे, तर आर्थिक दुर्बलतेनुसार गरजूंना दिल्या पाहिजेत, अशी भूमिका घेतली. त्यामुळे राजकीय गरजेतून राज्यात तयार झालेले हे नवे समीकरण कसे योग्य आहे, हे पदोपदी जनतेला पटवून देण्याची धडपड उभय पक्षांनी चालविली आहे. जनस्मृती अल्पायुषी असते त्यांनी गृहीत धरलेले असले तरी नामांतरासारख्या विषयांच्या बाबतीत हा नियम लागू करता येणार नाही. नामांतरासाठी आत्मदहन करणा-या नांदेडच्या गौतम वाघमारेची, नांदेड, परभणी, जालना जिल्ह्यांत दलितांवर झालेल्या अत्याचारांची आठवण मराठवाडा विसरू शकेल, हा त्यांचा भ्रम ठरू शकतो. मराठवाड्यात जे घडले त्याची तमा न बाळगता एकत्र आलेल्या या शक्तींची मानसिकता तेव्हा जी होती, तीच आजही आहे; पण ती बदलली असल्याचा देखावा त्यांच्या दृष्टीने राजकीय फायद्याचा ठरणार असल्यामुळे प्रत्येक सभेत शिवसेना किती निधर्मी, पुरोगामी, प्रगल्भ आणि प्रामाणिक आहे हे जनतेवर बिंबवण्याचा विडा आठवले यांनी उचलला आहे. त्यामुळे शिवसेनेला फार काही करण्याची गरज उरलेली नाही. षण्मुखानंदमधील मेळाव्यात तर त्यांनी प्रबोधनकार ठाकरे यांचाही उल्लेख करून शिवसेनेला समाज प्रबोधनाचा किती समृद्ध वारसा आहे, हे सांगून टाकले. अर्थात, त्यांनी काँग्रेस आणि राष्टÑवादी काँग्रेसबद्दल केलेली काही विधानेदेखील मुळीच चुकीची नाहीत. शरद पवार हे माझा फोटो बॅनरवर निवडणूक होईपर्यंत स्वत:च्या फोटोशेजारी लावतात आणि निवडणूक संपताच माझा फोटो अडगळीत टाकतात, हा त्यांचा आक्षेप नाकारता येण्याजोगा नाही; पण विद्यापीठ नामांतराचा ठराव मुख्यमंत्री असताना पवारांनीच नागपूर अधिवेशनात १७ वर्षांपूर्वी घेतला होता, हेही लोक विसरलेले नाहीत. शिवशक्ती आणि भीमशक्तीच्या युतीमुळे महाराष्टÑात सामाजिक समरसतेला चालना मिळणार असेल, तर कोणीही आक्षेप घेण्याचे कारण नाही; पण विळ्या-भोपळ्याचा हा नवा राजकीय अवतार लोकांच्या अजूनही पचनी पडलेला नाही. राज्यात आपणच सर्वांत शक्तिशाली दलित नेते आहोत, हा आठवले यांनी फुगवलेला फुगा निवडणुकीत फुटणार आहेच; पण या राजकीय जुगाराचा शिवसेनेला फार फायदा होईल, अशीही परिस्थिती नाही. नामांतराचा प्रश्न एका विद्यापीठाच्या नामविस्तारानंतरही पूर्णपणे सुटलेला नाही. आता दादर स्थानकाच्या नामांतरप्रश्नी शिवसेनेची कोंडी होऊन बसली आहे. सर्वच पक्षांच्या राजकीय भूमिका सोयीनुसार बदलत असतात. ‘आऊटगोइंग’चे प्रमाण वाढत चाललेल्या, राजकीय कार्यक्रमासाठी चाचपडत असलेल्या शिवसेनेलाही एखाद्या प्रयोगाची गरज होतीच; पण पवारांचे निष्ठावान म्हणून ओळखल्या गेलेल्या आठवले यांचीच त्या प्रयोगासाठी शिवसेनेने निवड का केली असावी, हे लोकांना पडलेले कोडे आहे.

Trending