नि:स्पृह अर्थतज्ज्ञ!
जन्म कोल्हापूरचा, शिक्षण पुणे येथे, डॉक्टरेट अमेरिकेमध्ये आणि जवळजवळ बहुतेकसे व्यावसायिक आयुष्य दिल्लीमध्ये; पण त्यांचा स्वभाव मात्र अस्सल साध्यासुध्या मराठी माणसाचा होता.
-
जन्म कोल्हापूरचा, शिक्षण पुणे येथे, डॉक्टरेट अमेरिकेमध्ये आणि जवळजवळ बहुतेकसे व्यावसायिक आयुष्य दिल्लीमध्ये; पण त्यांचा स्वभाव मात्र अस्सल साध्यासुध्या मराठी माणसाचा होता. अनेकदा मराठी माणूस स्वत:ची ओळख ‘मोडेन पण वाकणार नाही’ अशी करून देतो. तेंडुलकर तशा प्रकारच्या अभिनिवेशातही कधी नव्हते. त्यांनी त्यांचा स्वाभिमान आणि व्यासंग जपला तो एखाद्या ज्ञानतपस्व्याप्रमाणे. असे तपस्वी आताच्या चमको विश्वात विरळाच!
बहुतेक मराठी माणसांना सुरेश तेंडुलकर यांचे नाव माहीत नव्हते. ते विजय तेंडुलकर यांचे भाऊ होते हे साहित्यिक वर्तुळातही कित्येकांना माहीत नव्हते. परंतु सुरेश तेंडुलकर हे विजय तेंडुलकर आणि मंगेश तेंडुलकर (व्यंगचित्रकार) यांचे भाऊ, ही त्यांची खरी ओळख नव्हे. तरीही सुरुवातीलाच ती करून देण्याचे कारण वाचकांना काही संदर्भ जोडता यावेत म्हणून. सुरेश तेंडुलकर हे एक व्यासंगी अर्थतज्ज्ञ होते; परंतु ते कधीही टेलिव्हिजनवर चमकले नाहीत, कुठेही वृत्तपत्रांमध्ये झळकले नाहीत, वादग्रस्त सभांमध्ये त्यांनी भाग घेतला नाही वा त्यांच्या वक्तव्यांनी कुठे वादळ निर्माण केले नाही. प्रकाशझोतापासून दूर राहून अर्थशास्त्र आणि संख्याशास्त्र या दोन ज्ञानखाशांमध्ये त्यांनी प्रचंड प्रमाणावर काम केले, संशोधन केले आणि आर्थिक धोरण ठरविणाºया देशाच्या महत्त्वाच्या समित्यांचे अहवाल लिहिले. त्यांच्या व्यासंगाची आणि चिकित्सकतेची, त्याचप्रमाणे त्यांच्या नि:स्पृहतेची आणि सचोटीची पावती त्यांना थेट डॉ. मनमोहन सिंग यांच्याकडूनच मिळाली. पंतप्रधानांनी अर्थविषयक सल्लागार समिती नियुक्त केली होती आणि त्या समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांना नेमले होते. त्या समितीचा कार्यकाळ संपल्यावरही ते अनौपचारिकपणे डॉ. सिंग यांच्या चिंतन बैठकीचे एक प्रकारचे पदसिद्ध सदस्य होते. पंतप्रधान सिंग यांच्या स्वभावशैलीशी पूर्णपणे मिळतीजुळती अशी सुरेश तेंडुलकर यांचीही शैली असल्याने कदाचित त्यांचे सूर अधिकच जुळले असतील. तसे त्यांचे मृत्युसमयी वय फार नव्हते.
जेमतेम ७२ वर्षांचे त्यांचे वय होते आणि त्यांचा गाजावाजा फार नसला तरी ते सतत कामात मग्न असत. त्यांचे काम म्हणजे अभ्यास आणि आर्थिक धोरणविषयक अहवाल. त्या अहवाल व सूचनांमध्ये मात्र ते अतिशय स्पष्ट आणि धाडसीही असत. आपल्या देशाने १९९१ मध्ये आर्थिक उदारीकरणाचे धोरण स्वीकारले तेव्हा ते ‘दिल्ली स्कूल आॅफ इकॉनॉमिक्स’मध्ये प्राध्यापक होते. पण मुद्दा हा की, तेव्हा त्या नव्या आर्थिक धोरणाचे पूर्ण समर्थक होते. तेव्हा अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांच्या विरोधात विचारवंतांची मांदियाळी प्रचार करीत असे. पंतप्रधान नरसिंह राव यांच्या नेतृत्वाखाली नवे आर्थिक धोरण आले; पण त्याचे शिल्पकार डॉ. सिंग होते. साहजिकच डॉ. सिंग यांनाच संसदेत व मीडियात शिव्याशाप खावे लागत. तोपर्यंत, म्हणजे १९९१ पर्यंत भारतातील अर्थकारण ब-याच अंशी ‘कोंडलेले’ असे. ती कोंडी होती जाचक धोरणातून आणि करकचलेल्या नोकरशाहीतून आलेली; परंतु देशातील डाव्यांचा जसा त्या उदारीकरणाला विरोध होता, तसाच उजव्यांचाही होता. कम्युनिस्ट आणि संघपरिवार, तसेच समाजवादी व पारंपरिक काँग्रेसवाल्यांनी नव्या आर्थिक धोरणाला विरोध केला.
त्या परिस्थितीत विचारवंतांची खिंड ज्यांनी लढविली त्यांच्यापैकी एक सुरेश तेंडुलकर. विशेष म्हणजे ते त्यांच्या तरुण वयात मार्क्सवादाने प्रभावित झालेले होते आणि भांडवलशाही हाच मुख्य अर्थशत्रू असल्याचे ते मानत असत; पण त्यांनी जेव्हा भारतातील आर्थिक प्रगतीचा (आणि अधोगतीचा व स्थितिगततेचाही) बारकाईने आढावा घेतला तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, देशात एक प्रचंड प्रमाणावरची अव्यक्त ऊर्जा आहे. लोकांमध्ये सर्जनशीलता आहे. उद्योजकांमध्ये उपक्रमशीलता आहे; परंतु त्या सर्व लोकांना तथाकथित समाजवादी नोकरशाहीने ‘कोंडून’ ठेवले आहे. ती ऊर्जा मुक्त केली की देश झपाट्याने पुढे जाईल. गेल्या २० वर्षांत देशातील सर्व पक्ष (अगदी कम्युनिस्टसुद्धा) पुनर्विचार करू लागले आणि आर्थिक उदारीकरणाचा पुरस्कार करू लागले. सुरेश तेंडुलकर अशा प्रकारच्या डाव्या-उजव्या झोक्यांवर गेले नाहीत. ते ‘डावे’ नव्हते आणि ‘उजवे’ही नव्हते. ते वास्तववादी आणि व्यवहारवादी होते. खरे पाहिले तर अगदी साधी मध्यमवर्गीय जीवनशैली असलेल्या सुरेश तेंडुलकरांना नव्या आर्थिक धोरणातून अपरिहार्यपणे आलेल्या चंगळवादाचे काडीइतकेही आकर्षण नव्हते. ते चंगळवादी नव्हते आणि दिल्लीत राहूनही ‘करिअरवादी’ नव्हते. त्यांच्याइतके वा त्यांच्याहूनही कमी कर्तृत्व असलेल्या अनेक दिल्लीस्थित विचारवंतांनी ‘चमकोगिरी’ आणि ‘चमचेगिरी’ करून बडी बडी पदे, पुरस्कार आणि प्रसिद्धी संपादन केली आहे. तेंडुलकरांनी तसला प्रयत्नही कधी केला नाही; पण ख-या जाणकारांना हिरा कोणता हे कळतेच.
अमेरिकेतील प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ, विचारवंत आणि भारतात एकेकाळी राजदूत असलेले जॉन केनेथ गालब्रेथ यांनी तेंडुलकर या ‘हि-या’ची किंमत ओळखली होती. त्यांनी तेंडुलकर यांना अमेरिकन नागरिकत्व स्वीकारण्याची विनंती केली. ती जर तेंडुलकरांनी स्वीकारली असती तर आज ते एक नामवंत ‘एन आर आय’ झाले असते आणि कदाचित वर्ल्ड बँक सोडून परत यायच्याऐवजी अमेरिकेतच, तशाच एखाद्या संस्थेत अगदी वरच्या पदापर्यंत पोहोचले असते; पण त्यांना जसे डॉलर मिळविण्याचे आकर्षण नव्हते, तसेच पद-प्रतिष्ठेचेही नव्हते. म्हणूनच ते जागतिक बँकेतली संशोधन विभागातली मोठी जबाबदारी सोडून भारतात प्राध्यापक म्हणून ‘दिल्ली स्कूल आॅफ इकॉनॉमिक्स’मध्ये रुजू झाले. तसे पाहिले तर जन्म कोल्हापूरचा, शिक्षण पुणे येथे, डॉक्टरेट अमेरिकेमध्ये आणि जवळजवळ बहुतेकसे व्यावसायिक आयुष्य दिल्लीमध्ये; पण त्यांचा स्वभाव मात्र अस्सल साध्यासुध्या मराठी माणसाचा होता. अनेकदा मराठी माणूस स्वत:ची ओळख ‘मोडेन पण वाकणार नाही’ अशी करून देतो. तेंडुलकर तशा प्रकारच्या अभिनिवेशातही कधी नव्हते. त्यांनी त्यांचा स्वाभिमान आणि व्यासंग जपला तो एखाद्या ज्ञानतपस्व्याप्रमाणे. असे तपस्वी आताच्या चमको विश्वात विरळाच!