आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धोक्याचा बावटा

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लालूप्रसाद यादव हे रेल्वेमंत्री असताना भारतीय रेल्वेच्या व्यवस्थापनाचे बरेच गुणगान गायले जात असे. भारतातील व्यवस्थापनशास्त्राची पंढरी समजल्या जाणा-या आयआयएम अहमदाबाद या संस्थेत तर लालूप्रसाद यांची व्याख्याने ठेवली जात असत. या व्याख्यानांमध्ये एकाच विषयावर चर्चा केंद्रित होत असे आणि ती म्हणजे रेल्वेच्या अवाढव्य व्यवस्थापनावर. अमेरिका, चीन, रशिया या तीन देशांनंतर भारतीय रेल्वेचे जाळे सर्वात मोठे असून ते हजारो किलोमीटर अंतरापर्यंत पसरले आहे. देशाच्या कानाकोप-यातील गावे, शहरे जोडणारी, दररोज सुमारे तीन कोटी प्रवाशांची, लाखो टन मालाची ने-आण करणारी ही रेल्वे अनेक अडथळे पचवून आजही नियमित धावते आहे, पण तिचे हे सर्व यश आहे तिच्यात दडलेल्या व्यवस्थापनकौशल्यावर. 1853 मध्ये भारतात पहिली रेल्वे धावल्यानंतर आजच्या घटकेला ही रेल्वे कधी थकली नाही, तिने आचके दिले नाहीत की ती कधी थांबलीही नाही. तिच्या प्रगतीत दैनंदिन अडचणी येत असतात. पण रोज नियमित, वेळापत्रकांमधील वेळा पाळत, अपघात टाळत ही रेल्वे अहोरात्र धावते आहे. मात्र अशा अवाढव्य पसरलेल्या रेल्वेच्या व्यवस्थापनाची प्रकृती वरून दिसते तितकी ठणठणीत नाही व तिला वेळीच इंजेक्शन देण्याची वेळ आली आहे. नाही तर तिची गत घाट्यात गेलेल्या एअर इंडियासारखी होईल, असा धोक्याचा इशारा देणारा अहवाल प्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखालील एका उच्चस्तरीय समितीने दिला आहे. या अहवालात रेल्वेच्या सध्याच्या एकंदरीत कारभारावर जळजळीत ताशेरे ओढले आहेत. रेल्वेचे हजारो किलोमीटर अंतरावरचे रूळ गंजले आहेत. रेल्वे सुरक्षेची पार दैना उडाली आहे. दरवर्षी सुमारे 15,000 प्रवासी रेल्वे अपघातात मरण पावत असून त्यापैकी 6,000 म्हणजे 40 टक्के प्रवासी मुंबईमध्ये रेल्वेमार्ग ओलांडण्याच्या प्रयत्नात मरण पावत असल्याची आकडेवारी त्यांनी दिली आहे. या समितीने 106 सुधारणा सुचवल्या आहेत. त्यानुसार सुमारे 1 लाख कोटी रुपयांचा निधी रेल्वेच्या केवळ सुरक्षा व्यवस्थेवर खर्च केला जावा, अशी प्रमुख सूचना त्यांनी केली आहे. रेल्वे अपघातांबरोबरच समितीने रेल्वेच्या सुमारे 43 हजार डब्यांमध्ये तातडीने शौचालये बसवण्यात यावीत वा ती दुरुस्त करण्यात यावीत, अशीही महत्त्वाची सूचना केली आहे. वस्तुत: रेल्वेमार्ग गंजण्याला प्रामुख्याने गलिच्छ शौचालये कारणीभूत असल्याचे समितीचे निरीक्षण आहे. अशा शौचालयांमुळे रेल्वेरूळ जोडणारे क्लिप, लायनर्स खराब होतात व त्यामुळे रूळ दुरुस्तीसाठी दरवर्षी लाखो रुपये नाहक खर्च करावे लागतात, याकडे समितीने लक्ष वेधले आहे. आपल्याकडील रेल्वेस्थानकांमधील शौचालये आणि रेल्वे रुळांमधील वाढती गलिच्छपणा हा व्यवस्थापनासाठी उत्तम अभ्यासाचा विषय ठरू शकतो. त्याकडे रेल्वेचे दुर्लक्ष आहेच, पण व्यवस्थापनशास्त्र शिकवणा-या मातब्बर संस्थांही कानाडोळा करताना दिसतात. देशातील अनेक व्यवस्थापन संस्थांचे विद्यार्थी मुंबईतील डबेवाल्यांचे कोडकौतुक करत असतात, पण देशातील सर्व रेल्वेस्थानकांमधील वाढती अस्वच्छता, गलिच्छपणा याकडे मात्र त्यांचे दुर्लक्ष होताना दिसते. आपल्याकडील प्रवाशांमध्ये सार्वजनिक स्वच्छतेबाबत फारच उदासीनता आहे, त्यापुढे रेल्वेसह सर्वच व्यवस्था हतबल झालेल्या दिसतात हे लक्षात घेतले पाहिजे. अशा परिस्थितीत काकोडकर समितीने आपल्या अहवालात रेल्वेस्थानक आणि रेल्वे डब्यातील शौचालय सुधारणा कार्यक्रमाला प्राधान्य दिल्याने त्यांचे अभिनंदन करावे लागेल. अशा मूलभूत प्रश्नांकडे लक्ष देण्याची आता वेळ आली आहे. प्रगल्भ नागर संस्कृती, उगवती महासत्ता अशी बिरुदे आपण मिरवत असताना सार्वजनिक स्वास्थ्य व ते नियंत्रण करणा-या यंत्रणा आतून किडलेल्या असतील तर प्रगती साधता येत नाही हे समजून घेतले पाहिजे. आपल्याकडे प्रवाशांकडून केल्या जाणा-या अस्वच्छतेला कायद्याने आवर घालण्याचे अनेक प्रयत्न आतापर्यंत केले गेले आहेत. पण कायदे कितीही कडक केले तरी ते कायदा राबवणा-या यंत्रणा कुचकामी ठरल्याने अस्वच्छता करणा-या प्रवाशांचे फावते आणि मूळ प्रश्न आहे तसा राहतो. काकोडकर समितीने मुंबईतील वाढत्या रेल्वे अपघातांबाबतही सरकारने गंभीरपणे लक्ष द्यावे असे सुनावले आहे. मध्यंतरी माहितीच्या अधिकारात मुंबईतील रेल्वे दुर्घटनांबाबत माहिती मागवण्यात आली होती. या माहितीत 2002 ते 2011 या मुंबईत सुमारे 40 हजार प्रवासी विविध रेल्वे अपघातात मरण पावले असल्याचे नमूद करण्यात आले होते. मुंबईतील अपघात प्रामुख्याने रेल्वे फाटक नसणे, फलाटांच्या उंचीतील अनियमितता, पादचारी पुलांची कमतरता, कमी रुंदीचे फलाट, टपावरून प्रवास आणि वाढती गर्दी यामुळे होतात अशी कारणे या अपघातांमागील होती. या कारणांमुळे रोजच्या रोज लाखो प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असेल आणि व्यवस्थांच्या कमतरतेमुळे प्रवाशांचे असे नाहक बळी जाणार असतील तर ही गंभीर घटना असल्याचे मत डॉ. काकोडकर यांनी या अहवालात व्यक्त केले आहे. आपले दैनंदिन आयुष्य सुधारण्यासाठी असे अनेक अहवाल यापुढेही येतील आणि जातील, त्यामध्ये सरकारला चार खडे बोल सुनावलेले असतील, पण ही अशी परिस्थिती येऊ नये याची काळजी घेण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. ही सामाजिक प्रगल्भता अंगी बाणवण्याची वेळ आली आहे. आपली रेल्वे आपला अभिमान आहे. ती यंत्रणा जपणे, वाढवणे हे आपले कर्तव्य आहे.