आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अडवाणींचा अपशकुन (अग्रलेख)

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोकसभा निवडणुका आणखी किमान 21 महिने दूर आहेत. म्हणजे त्या रीतसर वेळापत्रकानुसार मे 2014 मध्ये झाल्या तर सरकार तसे ‘ट्रॅपिझ’वर आहे. त्यामुळे यूपीएमधील एखाद्या पक्षाने पाठिंबा काढून घेतला तर सरकार मध्येच लटकेल. अन्य कुणा पक्षाने ‘हात’ दिला तर तगेल अशी स्थिती आहे. निवडणुका अगदी नजीक तर नक्कीच आलेल्या नाहीत, पण लालकृष्ण अडवाणींना आताच त्यांच्या ब्लॉगमधून भाजपला अपशकुन का करावासा वाटला हे समजायला कठीण आहे. त्यांच्या ब्लॉगवरील भाकिताप्रमाणे 2014 मध्ये जो पंतप्रधान होईल, तो काँग्रेस वा भाजप यापैकी कुणाचाच नसेल. कुणीतरी ‘तिसरा’च पंतप्रधान होईल. त्यांच्या मते हे तसे पूर्णपणे नवीन वा अघटित असेल असे नाही. यापूर्वीही चरणसिंग, चंद्रशेखर, देवेगौडा, इंदरकुमार गुजराल, विश्वनाथ प्रतापसिंग अशी मंडळी पंतप्रधान म्हणून राष्ट्रीय रंगमंचावर आलेली आहेत, असे अडवाणी यांनी म्हटले आहे. जो कुणी पंतप्रधान होईल त्याला काँग्रेस वा भाजपचा बाहेरून पाठिंबा घ्यावाच लागेल. नाही तर सरकारच बनू शकणार नाही असे अडवाणींना वाटते.
अडवाणींच्या या आकस्मिक व अपशकुनी ब्लॉगमुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजणे स्वाभाविक होते. परंतु संघ परिवारातच एकदम गडबड माजली. अडवाणींनी लिहिलेला ब्लॉग हा प्रत्यक्षात नितीशकुमार यांना अप्रत्यक्ष समर्थन देणारा आहे आणि नरेंद्र मोदींच्या पायाखालील जाजम खेचून घेणारा आहे, असे भाष्य लगेचच मीडियात सुरू झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (अघोषित पण निश्चित) पंतप्रधानपदाचा उमेदवार नरेंद्र मोदी आहे, हे सगळ्या जगाला एव्हाना माहीत आहे. 2014 ची लोकसभा निवडणूक नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी यांच्यात, अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणूक धर्तीवर होईल, असे अनेक मीडिया पंडितांनी ‘कव्हर स्टोरी’ करून जाहीर केले आहे. त्या दोघांमध्ये देशातील जनता मोदींनाच समर्थन देईल असे बहुसंख्य गुजराती जनतेला, संघ परिवाराला आणि अर्थातच मोदींना वाटते. युरोप-अमेरिकेत असलेल्या गुजराती लोकांना तर मोदी पंतप्रधान झालेच आहेत असे आताच वाटू लागले आहे. त्यांच्या मते काँग्रेस नावाचा भ्रष्ट आणि नतद्रष्ट पक्ष आणि सोनिया गांधी नावाची विदेशी दुष्ट महिला आता लयाला जाणार आणि मोदी नावाचा विकासपुरुष नवे युग सुरू करणार.
मोदी पंतप्रधान झाले की देशातील कालगणना ‘ख्रिश्चन’ कॅलेंडरनुसार होणार नाही. कदाचित शालिवाहन शकही रद्दबातल होईल. नरेंद्र मोदींच्या नावाने नवे पर्व सुरू होईल. मग फक्त पाचच वर्षांत देशात सर्वत्र 24 तास वीज, मुबलक पाणी, उदंड उद्योगधंदे, लाखो नोक-या, आर्थिक व औद्योगिक विकास, शेती क्रांती असे सर्व घडून येईल. देश सर्वार्थाने ‘सुजलाम सुफलाम’ होईल. मोदींच्या मते पंडित नेहरू-इंदिरा गांधी-सोनिया गांधींनी देशोधडीला लावलेल्या जनतेचे कल्याण होईल. मोदी कंपनी असे मनाचे मांडे खात असतानाच त्यांच्या भाजपमध्ये मात्र बंडाळीला सुरुवात झाली आहे. गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांनी भाजपमध्ये मोदींच्या विरोधात बंड केले अहे. एकेकाळी संघाच्या शिस्तीत वाढलेले आणि भाजपचे विश्वासू म्हणून ओळखले जाणारे पटेल यांनी केलेले बंड अनेक अर्थांनी महत्त्वाचे आहे. ते मुख्यमंत्री होते तेव्हा सुरुवातीला केंद्रात भाजप आघाडीचे सरकार होते. 2002 मध्ये नरेंद्र मोदींना त्या पदावर आणण्यात आले. मोदींच्या कारकीर्दीतच गुजरातमध्ये फाळणीसदृश हाहाकार माजला. मुस्लिमांना वेचून वेचून ठार मारले गेले. पंतप्रधान वाजपेयींनी तर मोदींनी ‘राजधर्म’ पाळला नाही म्हणून त्यांच्यावर थेट शरसंधान केले.
वाजपेयी व मोदी यांचे संबंध कधीच सौहार्दाचे नव्हते. मोदींचे समर्थक वाजपेयींवर अतिशय विषारी व निरर्गल टीका करीत. मोदींचे त्या वेळचे घनिष्ठ सहकारी प्रवीणचंद्र तोगडिया तर वाजपेयींवर इतके तुटून पडत की कुणाला वाटावे वाजपेयी काँग्रेसचे (व सोनियांचे!) निष्ठावान आहेत. तेव्हा तोगडिया सतत खासगी टीव्ही चॅनल्सवरून अतिशय विखारी भाषणे व मुलाखती देत. (आता एकदम तोगडिया अंतर्धान पावले आहेत. मोदींना कुणीही स्पर्धक नको म्हणून की संघाने त्यांना वाळीत टाकले? असे एखाद्याला वाळीत टाकणे ही खास संघपरंपरा आहे. पूर्वी बलराज मधोक यांना असेच वाळीत टाकले गेले होते आणि गेल्या महिन्यात संजय जोशींना. हरेन पंड्यांचा तर खूनच झाला. पंड्या मोदी सरकारमध्ये गृहमंत्री होते. त्यांचा खून मोदींच्या मार्गदर्शनाखालीच झाला असे पंड्या यांचे वडील जाहीरपणे सांगतात. मोदी जवळच्याच माणसांचा काटा काढतात आणि स्वत:चे अनभिषिक्त नेतृत्व प्रस्थापित करतात, अशी टीका आता केशुभाई पटेलच करीत आहेत. असो.) नरेंद्र मोदींच्या हुकूमशाही व अत्याचारी धोरणाकडे पाहून अमेरिकेने त्यांना व्हिसाही नाकारला आहे. तमाम अनिवासी गुजराती मोदींना व्हिसा मिळवून देण्यासाठी जंग जंग पछाडत आहेत. ‘टाइम’ या जगप्रसिद्ध अमेरिकन साप्ताहिकाने मोदींवर ‘कव्हर स्टोरी’ केली ही बाबसुद्धा त्याच प्रचारमोहिमेचा भाग असल्याचे बोलले जाते. खुद्द भाजपमध्ये मोदीवादी आणि मोदीविरोधी असे दोन तट आहेत. मोदींच्या नावाची पंतप्रधानपदासाठी चर्चा सुरू झाल्यावर त्यांच्याच पक्षातील इतर महत्त्वाकांक्षी नेत्यांची अस्वस्थता वाढू लागली. त्या अस्वस्थ आत्म्यांमध्ये सुषमा स्वराज आहेत आणि नितीन गडकरीसुद्धा. पण खरे अस्वस्थ झाले ते लालकृष्ण अडवाणी. अडवाणी 1999, 2004 आणि 2009 असे तीन वेळा बाशिंग बांधून तयार होते. त्यांच्या मते भाजप आघाडीचे सरकार 1998 मध्ये येऊ शकले तेच मुळी त्यांनी केलेल्या हिंदुत्वाच्या दणदणीत प्रचारामुळे, रथयात्रेमुळे आणि बाबरी मशीद उद््ध्वस्त केल्यानंतर देशभर झालेल्या उन्मादामुळे. अडवाणींच्या उग्र हिंदुत्ववादाचा आविष्कारच मोदींच्या गुजरातमध्ये झाला होता. किंबहुना म्हणूनच अडवाणींनी मोदींना ‘सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री’ असा किताब बहाल करून वाजपेयींच्या विरोधात जाहीर भूमिका घेतली होती. अडवाणींना वाटत होते की त्यांच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीला भरभक्कम पाठिंबा मिळेल तो त्यांचे पट्टशिष्य मोदींचा. परंतु मोदींनी त्यांच्या शैलीनुसार स्वत:चेच घोडे पुढे दामटून अडवाणींची अडचण केली. म्हणून आता अडवाणींनी भाजपचा पंतप्रधानच नसेल असे भाकीत करून पक्षाला व मोदींना अपशकुन केला आहे. आमचा शकुन-अपशकुनावर विश्वास नाही, पण संघवाल्यांचा असावा. म्हणून तर अडवाणींच्या ब्लॉगला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.