ग्लोबल मेल्टिंग पॉट / ग्लोबल मेल्टिंग पॉट (अग्रलेख)

दिव्य मराठी

Aug 09,2012 01:40:07 AM IST

जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये दळणवळण व स्थलांतर हे अध्याहृत असते. स्थलांतराच्या प्रक्रियेमुळे दळणवळणामध्ये बदल होतात व त्यामुळे जागतिकीकरणाला वेग मिळतो. स्थलांतर ही प्रक्रिया जेवढी रोजीरोटीशी निगडित आहे तेवढी ती उत्तमोत्तम संधींशीही निगडित असते. सध्या लंडन येथे सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत विविध देशांच्या खेळाडूंचे स्थलांतर हा चर्चेचा मोठा मुद्दा बनला आहे. अनेकदा स्पर्धेतील यश हे खेळाडूच्या राष्ट्रीयत्वाशी जोडले जाते व त्या माध्यमातून त्या देशाच्या सामर्थ्याचे चित्र जगापुढे उभे केले जाते. पण हा सगळा काळ शीतयुद्धाच्या आसपासचा होता. शीतयुद्धाच्या काळात ऑलिम्पिकमधील अमेरिका व तत्कालीन सोव्हिएत युनियन यांच्यातील जीवघेणी स्पर्धा जगावर प्रभुत्व दर्शवण्याच्या अनेक खेळीपैंकी एक खेळी असे. पण सोव्हिएत युनियनच्या पतनानंतर चीन ही नवी आर्थिक सत्ता उदयास आली व तिने ऑलिम्पिकमध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यास सुरुवात केली. पण जगाचे चित्र बदलत होते. जागतिकीकरणाच्या रेट्यामुळे व्यक्तीच्या देश, अस्मिता, स्वाभिमान, वंश या भावना आपोआप गळून पडल्या आणि नवा वैश्विक समाज तयार व्हायला सुरुवात झाली. या समाजात व्यक्तीचा जन्म वेगळ्या देशातला पण त्याने उभी हयात दुस-या देशात व्यतीत केलेली असे चित्र दिसू लागले. काही अर्थतज्ज्ञ असे म्हणतात की, युरोपमधील बहुतांश देशांच्या अर्थव्यवस्था खिळखिळ्या होण्यामागे युरो हे सामायिक चलन कारणीभूत आहे.
युरो हे युरोपसाठी सामायिक चलन स्वीकारल्यामुळे या खंडात स्थलांतराची प्रक्रिया वेगाने झाली व त्यामुळे वांशिक समस्याही निर्माण झाल्या. त्याचे प्रत्यंतर आपल्याला काही घटनांमध्ये दिसून येते. गेल्या वर्षी नॉर्वेमध्ये एका माथेफिरूने केलेले नृशंस हत्याकांड, भारतीय विद्यार्थ्यांवर ब्रिटनमध्ये होणारे प्राणघातक हल्ले, फ्रान्सच्या अध्यक्षीय निवडणुकांमध्ये उत्तर आफ्रिकेतून स्थलांतरितांच्या लोंढ्यावर झालेल्या टोकाच्या राजकीय चर्चा आणि ब्रिटनमध्ये ‘अँटी इमिग्रेशन लॉ’ वरून काही राजकीय पक्षांनी आशियाई-आफ्रिकी नागरिकांच्या विरोधातील भूमिका हे युरोपमधील वास्तव आहे. पण सध्या ऑलिम्पिक स्पर्धांमधील काही युरोपियन देशांचे, विशेषत: चीनचे काही खेळांमधील यश पाहता स्थलांतराच्या प्रक्रियेमुळे अनेक आश्चर्यकारक व सकारात्मक कामगिरी या देशांनी केलेली आढळते. युरोपमधील कझाकस्तान या देशाने विविध खेळांमध्ये सध्या आठ सुवर्णपदके मिळवली आहे. त्यांची ही अनपेक्षित कामगिरी चीनच्या डोळ्यात खुपत आहे. कारण कझाकस्तानच्या ज्या 6 खेळाडूंनी सुवर्णपदके मिळवली आहेत, त्यापैकी दोन महिला खेळाडू चिनी वंशाच्या आहेत.
चीनमधील काही प्रसारमाध्यमांनी ही सुवर्णपदके वास्तविक चीनचीच असल्याचा दावा करायला सुरुवात केली आहे. कझाकस्तानने अर्थात हे दावे फेटाळून लावत या महिला खेळाडू काही काळ चीनमध्ये राहत होत्या असे म्हटले आहे. अशीच बाब ब्रिटनबाबतही घडली आहे. ब्रिटनच्या मो फराह याने 10 हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून सर्वांनाच धक्का दिला होता. लांब अंतराच्या धावण्याच्या स्पर्धेत आफ्रिकन खेळाडूंचा दबदबा गेली कित्येक वर्षे आहे व त्यांची मक्तेदारी मोडून काढणे अनेकांना शक्य झाले नव्हते. मो फराह हा सोमालियाचा आहे पण त्याने चांगले प्रशिक्षण, प्रायोजकांसाठी ब्रिटनची वाट धरली होती व त्याने ब्रिटनचे नागरिकत्व पत्करून ऑलिम्पिकमध्ये ब्रिटनच्या नावाने पदक मिळवले. ब्रिटनची या ऑलिम्पिकमधील कामगिरी बघता ती गेल्या वेळेपेक्षा अनपेक्षित अशी आहे. या सुधारलेल्या कामगिरीमध्ये बहुतांश वाटा स्थलांतरित झालेल्या खेळाडूंचा आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. स्थलांतर आणि वांशिक संदर्भाचा विचार करता चीनचे चित्र अधिक इंटरेस्टिंग आहे. सध्या बॅडमिंटन व टेबल टेनिसमधील चीनच्या घोडदौडीला आवर घालणे हे मोठे आव्हान आहे. चीनने बॅडमिंटनमधील बहुतांश सर्व सुवर्णपदके पटकावली आहेत व टेबल टेनिसमध्येही ते हा चमत्कार करू शकतात. ऑलिम्पिकमध्ये भाग घेणा-या एकूण 173 टेबल टेनिसपटूंमधील 55 खेळाडू चिनी वंशाचे आहेत. त्यापैकी 45 खेळाडूंचा जन्म चीनमध्ये झाला आहे व ते 23 देशांचे प्रतिनिधित्व करत आहेत. या खेळाडूंनी चीनच्या टेबल टेनिस संघामध्ये संधी मिळत नसल्याने दुस-या देशाची मदत घेतली आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या टेबल टेनिस संघातून खेळणारी चिनी वंशाची खेळाडू व्हिव्हियन टॅन. व्हिव्हियनचा जन्म चीनमध्ये झाला व ती 1997 पर्यंत चीनतर्फे विविध स्पर्धांत खेळत होती. पण तिने काही काळ निवृत्ती घेऊन 2007 पासून पुन्हा खेळण्यास सुरुवात केली. त्या वेळी तिला चीनच्या संघात प्रवेश मिळाला नसल्याने तिने थेट सिडनीची वाट धरली व आज ती ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व करत आहे. अमेरिकेच्या टेबल टेनिस संघातील तीन खेळाडू जन्माने अमेरिकन असले तरी ते चिनी वंशाचे आहेत. फ्रान्सच्या टेबल टेनिस संघातील पी ह्याँगयाँगची कहाणीही अशीच आहे. तिनेही चीनकडून खेळण्याची संधी मिळत नसल्याने फ्रान्सचे नागरिकत्व घेऊन ऑलिम्पिकमध्ये उतरण्याचा निर्णय घेतला.
बॅडमिंटनमध्येही एकूण 173 खेळाडूंपैकी 50 खेळाडू चिनी वंशाचे आहेत. आपल्या ब्राँझपदक विजेत्या बॅडमिंटनपटू सायना नेहवालने ऑलिम्पिक स्पर्धेत एकूण सहा सामने खेळले होते. त्यापैकी चार सामने हे तिने चिनी वंशाच्या खेळाडूंविरुद्ध खेळले. या खेळाडूंपैकी एक बेल्जियम व एक नेदरलँड या देशांचे प्रतिनिधित्व करत होता. तैपेई, हाँगकाँग, सिंगापूरही यांचेही खेळाडू चिनी वंशाचे आहेत. मलेशियात काही चिनी वसाहती असल्याने त्यांचा टॉप सिडेड बॅडमिंटनपटू चिनी वंशाचा आहे. आपली आणखी एक बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टाची आई चिनी आहे. त्यामुळे तिच्यामध्ये भारतीय रक्त आहे असा दावा करता येत नाही. गेल्या दशकात चीनमध्ये क्रीडा क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर उत्तम दर्जाचे खेळाडू तयार झाल्याने खेळाडू अधिक व संधी कमी अशी परिस्थिती तेथे निर्माण झाली होती. त्याचा परिणाम असा झाला की आज ऑलिम्पिकमध्ये चिनी वंशाचे खेळाडू ब्राझील, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, तुर्कस्तान अशा देशांचे प्रतिनिधित्व करत आहेत व ते त्या देशांचे नागरिक आहेत. जागतिकीकरणात विविध भाषा, वंश, धर्म व संस्कृतीच्या अभिसरणामुळे देशीवाद, प्रांतवाद किंवा राष्ट्रवादाला बळ मिळत असले तरी ही स्थलांतराची प्रक्रिया बदलत्या जगाची अपरिहार्य प्रक्रिया आहे. स्थलांतरामुळे स्थानिक रोजगारावर गदा येते हा प्रचार केवळ चुकीचा नाही तर तो अधिक न्यूनगंड निर्माण करणारा आहे. आपल्या देशातील सध्या उदयास येणा-या महानगरांची वाढ किंवा तेथे उपलब्ध होणा-या रोजगार संधी हे जागतिकीकरणातील टप्पे आहेत. रोजगाराच्या आणि व्यक्तिविकसनाच्या संधी उपलब्ध नसतील तर उत्तमोत्तम खेळाडू, कलाकार, राजकीय नेते, व्यावसायिक कसे निर्माण होतील? लंडन ऑलिम्पिकच्या निमित्ताने बदलत्या जगाचे चित्र निश्चितच महत्त्वाचे आहे. ते समजून घेतले पाहिजे.

X
COMMENT