रामदेवबाबांची रोपट्रिक (अग्रलेख) / रामदेवबाबांची रोपट्रिक (अग्रलेख)

दिव्य मराठी

Aug 11,2012 02:29:17 AM IST

सुमारे अडीच-तीनशे वर्षांपूर्वी जे युरोपीय व्यापारी, खलाशी, प्रवासी भारतात यायचे, ते आपल्या देशातील लोक, संस्कृती, जीवनशैली पाहून हरखून जायचे. त्यांच्या तत्कालीन प्रवासवर्णनांमध्ये अनेकदा भारतीय उपखंडामधील साधू-बैरागी, चमत्कार-जादूटोणे आणि अद््भुत अनुभव संकलित केलेले आहेत. आजही युरोपातील असंख्य अनभिज्ञ लोकांना भारतातील योगीपुरुष, त्यांच्या सिद्धी, त्यांचे साक्षात्कार याबद्दल कुतूहल आहेच, पण भ्रामक कल्पनाही आहेत. परंतु विशेष म्हणजे, भारतातच असे कित्येक जण आहेत, की ज्यांचा योगीपुरुष, त्यांची आध्यात्मिकता आणि त्यांची अचाट व अलौकिक क्षमता यावर पूर्ण श्रद्धा आहे. भारताकडे ‘प्राचीन’ ज्ञान-विज्ञान इतके आहे की अवघ्या जगाला आपला देश मार्गदर्शन करू शकतो, नैतिकता शिकवू शकतो आणि आध्यात्मिक करू शकतो, असे वाटणारी जी अनेक मंडळी आहेत, त्यांच्यापैकी एक म्हणजे योगी रामदेवबाबा. रामदेवबाबांनी आपला देश भ्रष्टाचारमुक्त करण्याचा निर्धार केला आहे. काळा पैसा पूर्णत: नाहीसा करून राजकारण शुद्ध करायचे ठरवले आहे. या उद्देशानेच त्यांनी रामलीला मैदानावर सुमारे 50 हजार अनुयायांच्या साक्षीने लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे. भजन, प्रवचन, चिंतन, योगासन अशी साधने हाताशी घेऊन त्यांनी हा उपक्रम सुरू केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार आपला देश लवकरच संपूर्ण शुद्ध होणार आहे आणि त्याचे कारण त्यांची व त्यांच्या अनुयायांची योगसाधना. पूर्वीचे युरोपीय पर्यटक त्यांच्या प्रवासवर्णनात ‘इंडियन रोपट्रिक’वर भरभरून लिहीत असत. भारतातील, विशेषत: हिमालय परिसरातील वा गंगेच्या तीरावर बसलेल्या साधुपुरुषांना, ही ‘रोपट्रिक’ अवगत असे. त्यांच्याकडे दोरखंडाचे एक भलेमोठे भेंडोळे असे. कधी मंत्र म्हणून, कधी पुंगी वाजवून, तर कधी काही जादूटोणा करून हे साधुपुरुष तो दोरखंड हवेत फेकत. गुरुत्वाकर्षणाचे सर्व नियम झुगारून तो दोरखंड ऊर्फ सुतळ्याचा ‘रोप’ उंच उंच जाऊ लागे. मग तो साधू त्या दोरखंडावर आरूढ होऊन वर वर चढत असे.
नारळाच्या झाडावर चढतात त्याप्रमाणे. काही मिनिटांतच तो साधुपुरुष इतका उंच जात असे की खालून बघणा-याला त्या दोराचे टोक आणि तो साधू दोघेही आकाशात दिसेनासे होत. हीच ती जगप्रसिद्ध ‘रोपट्रिक’! त्या ट्रिकप्रमाणेच योगगुरू रामदेवबाबा आता आपला देश काळ्या पैशाच्या विळख्यातून मुक्त करणार आहेत! कसे, केव्हा व काय जादू करणार आहेत, हे विचारायचे नाही. जसे ‘रोपट्रिक’ करणा-या साधूला आपण गुरुत्वाकर्षणाचे नियम कसे भेदले हे विचारू शकत नाही, तसेच रामदेवबाबांना काळे पैसे कसे नष्ट होणार, स्वीस बँकेत ठेवलेले पैसे कसे आणणार आणि भ्रष्टाचार कसा संपवणार, हे विचारू शकत नाही. कारण हे सगळेच प्रकरण अध्यात्म आणि चमत्कार या क्षेत्रात आहे. रामदेवबाबा खुळे आहेत की मूर्ख, डँबिस आहेत की जोकर, योगी आहेत की स्वत:च भामटे, या वादात आम्ही जाऊ इच्छित नाही. त्यांचे एक पट्टशिष्य आणि सहकारी आचार्य बाळकृष्ण हे सध्या तुरुंगात आहेत. पासपोर्टमध्ये हेराफेरी करणे, खोटी कागदपत्रे सादर करणे, अशा गुन्ह्यांसाठी त्यांना अटक केली गेली आहे. तरीही रामदेवबाबांच्या मंचावर लावलेल्या महाचित्रात शिवाजी महाराज, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, जयप्रकाश नारायण आदींसमवेत या बाळकृष्णचे चित्रही होते. त्याबद्दल कुणीतरी आक्षेप घेतल्यानंतर सफाईने त्या लफंग्याचे चित्र त्यातून काढले गेले. परंतु त्या महाचित्रात हा ‘महापुरुष’ कसा अवतरला याचे रीतसर उत्तर अजूनही दिले गेलेले नाही. रामदेवबाबांची मोजणी झालेली स्थावर-जंगम संपत्ती अकराशे कोटी रुपयांची आहे. ती कशी जमा केली गेली, त्यावर योग्य ते कर भरले गेले की नाहीत, त्याचा जमाखर्च कसा ठेवला जातो, याबद्दल व्यवस्थित स्पष्टीकरण दिले गेलेले नाही. रामदेवबाबांकडे लाखो रुपयांची रोख रक्कम दिवसागणिक जमा होत असते. त्यांच्या योगाभ्यास केंद्रांकडे येणा-या देणग्या, वर्गण्या यातूनही कोट्यवधी रुपये जमा होत असतात. रामदेवबाबांच्या संस्थांनी स्वदेशी व विदेशी माध्यमातून प्रचंड प्रमाणावर परकीय चलन जमा केले आहे. या सर्व व्यवहारांबद्दल पुरेसा खुलासा केला गेलेला नाही. चौकशा चालू आहेत. असे सर्व गूढ असूनही हा योगीपुरुष देशाला भ्रष्टाचार व काळे धन यातून मुक्त करण्याचे उपाय सांगत आहे. परंतु त्या उपायांचा सविस्तर ढाचा मात्र तो सांगत नाही. रामदेवबाबांना दिग्विजसिंग यांनी ‘ठग’ म्हटले होते.
मणिशंकर अय्यर त्यांना ‘जोकर’ म्हणतात. आमच्या मते रामदेवबाबा हे ‘रोपट्रिक’सदृश चमत्कार करणारे साधुपुरुष आहेत. त्यांच्या उपोषण महोत्सवासाठी घातलेला मंडप नेहमी आलिशान असतो. ते अनेक प्रकारची औषधे बनवतात आणि विकतात. त्या औषधांनी कॅन्सरपासून एड््सपर्यंत सर्व रोग कायमचे बरे होतात, असे रामदेवबाबा सांगतात. त्या संबंधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या वृंदा करात यांनी अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. त्यांची उत्तरे अजून दिली गेलेली नाहीत. रामदेवबाबांचे उपोषण हा गेले दीड वर्ष चाललेल्या फार्सचा तिसरा अंक आहे, असे काहींना वाटते. अण्णा हजारेंचा रंगमंचही रामलीला मैदान येथेच होता. परंतु ते काही प्रयोग जंतरमंतर येथे करत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अण्णांच्या त्या नाटकांवर वैतागून एकदा म्हणाले होते की हा ‘वाकड्या तोंडाचा गांधी’ निष्कारण नको त्या ठिकाणी नाक खुपसतो. गेल्या दीड वर्षात हे अण्णा आणि रामदेवबाबा यांच्यात एक प्रकारची स्पर्धा चालू आहे. सुरुवातीला अण्णांच्या उपोषण समारंभांना प्रचंड गर्दी झाली. गेल्या वर्षी ऑगस्ट ते डिसेंबर ‘मी अण्णा आहे’ अशा टोप्या घातलेल्या अनेक भाबड्या, मूर्ख व डँबिस लोकांनी देशाला वेठीस धरले होते. पुढे पुढे अण्णांच्या फार्समधील हवा जाऊ लागली. मग रामदेवबाबांनी रामलीला मैदानात उडी घेतली. अनेक मंडळींच्या मते ही सर्व ‘भ्रष्टाचार विरोधी’ फौज संघ परिवाराने उभी केली आहे. लोकसभा निवडणुकीपर्यंत, म्हणजे 2014 पर्यंत वातावरण तापवण्यासाठी ही सर्कस चालवायची आणि त्या तापलेल्या तव्यावर आपली निवडणुकीची पोळी भाजायची असा भाजपचा डाव आहे, असेही बोलले जाते. त्यात खरे किती, खोटे किती, प्रचार किती, बदनामी किती, हे लवकरच दिसून येईल. तोपर्यंत ही ‘रोपट्रिक’ आपली करमणूक करत राहील!

X
COMMENT