आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेढा : आतला आणि बाहेरचा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्कल भारत नावाच्या एका राजकीय गटाबद्दल तुम्ही कोणी ऐकले आहे काय? नसण्याची शक्यता अधिक. म्हणूनच, प्रिय वाचक, त्याची ओळख करून देण्याचा माझा हा छोटासा प्रयत्न. उत्कल भारत हा ओडिशातील कटक शहरात असलेला एक लहानसा राजकीय गट. काही महिन्यांपूर्वी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या परिसरात एका भारतीय जवानाला ठार मारून त्याचे शिर धडावेगळे करण्याच्या पार्श्वभूमीवर सध्या भारताच्या दौ-यावर असलेल्या पाकिस्तानी महिला क्रिकेट संघाचा निषेध करण्याची जबाबदारी या गटाने घेतली आहे. म्हणजेच पाकिस्तानी महिला क्रिकेटपटू या जवानाच्या हत्येला कोणत्या तरी प्रकारे जबाबदार आहेत, असे उत्कल भारतला वाटत असावे. त्या जबाबदार नसतील, तर त्यांनी असले पाहिजे, असा या गटाचा आग्रह असावा.

या गटाच्या निषेधाची तीव्रता इतकी अधिक आहे की या क्रिकेटपटू कटकमधल्या त्यांच्या हॉटेलमधून बाहेर पडण्यास तयार नाहीत. त्या त्यांच्या घरी परत जातील, तेव्हा भारताविषयीच्या या आठवणी घेऊन जातील, याची आपण जाणीव ठेवायला हवी.

अतिथि देवो भव ही खास भारतीय शिकवण आपल्याला जणू आईच्या दुधातूनच मिळालेली असते. परंतु ही शिकवण असणा-यांना आज उत्कल भारतसारख्या गटांचा सामना करावा लागत आहे. हे लोक पूर्णपणे निर्दोष महिलांवर, त्याही परदेशी, चिखलफेक करत आहेत, निव्वळ त्या पाकिस्तानी आहेत म्हणून.

हा जो आक्रमक आणि प्रतिक्रियावादी भारतीय आहे, ती भारताची नवी ओळख होत चालली आहे. लोक छोट्या छोट्या गोष्टींचा निषेध करू लागले आहेत. तुम्ही विश्वरूपम नावाचा चित्रपट बनवलात वा तुमचे नाव सलमान रश्दी आहे आणि तुम्ही सॅटनिक व्हर्सेस नावाचे पुस्तक लिहिले असेल, वा तुम्ही एम. एफ. हुसेन नावाचे प्रतिभावंत असाल आणि तुम्ही देवी सरस्वतीचे नग्न चित्र काढले असेल - खजुराहोतल्या मंदिरांमध्ये अनेक हिंदू देवदेवतांची प्रणयाराधनेतील शिल्पे आहेत हे सत्य असले तरीही - तर तुम्ही निश्चितपणे एकटे आहात. किंवा तुम्ही चांगल्या बाजूकडेही पाहू शकता. पाकिस्तानच्या महिला क्रिकेटपटूंना निदान भारतात येऊ तरी दिले गेले! नियंत्रण रेषेजवळच्या तणावामुळे दोन आठवड्यांपूर्वी भारताच्या दौ-यावर असलेल्या पाकिस्तानी हॉकी संघाला तर परत पाठवण्यात आले होते. लाहोरहून आलेल्या रंगकर्मींनाही परत पाठवण्यात आले. वयाची पासष्टी ओलांडलेल्या पाकिस्तानी नागरिकांना भारताचा सुलभ व्हिसा मिळवून देण्याची सुविधा बंद करण्यात आली. पाकिस्तानी महिला क्रिकेट संघाचा दौरा रद्द करण्यात आला.

पाकिस्तानने त्याला जशास तसे प्रत्युत्तर दिले. पूंछ आणि रावळकोट यादरम्यानची प्रवासी बससेवा बंद करण्यात आली आणि चाकन दा बाग ठिकाणाहून होणारा या दोन देशांमधला व्यापारही बंद आहे. गेल्या काही दिवसांत मात्र परिस्थिती दोन्ही बाजूंनी काहीशी निवळली आहे. चाकन दा बाग पुन्हा खुले करण्यात आले आहे, प्रवासी बससेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे आणि पाकिस्तानी महिला क्रिकेटपटूंना भारतात खेळण्यासाठी व्हिसा देण्यात आला.
फाळणी आणि स्वातंत्र्यानंतरच्या 65 वर्षांत भारत व पाकिस्तानातील संबंधांचे दुर्दैव हेच आहे की, जर हे संबंध एक पाऊल पुढे गेले तर खात्री बाळगावी की ते दोन पावले मागे जातील.

या लेखातील मुख्य मुद्दा हा नाही की नियंत्रण रेषेजवळ भारतीय जवानाचा शिरच्छेद करण्यात आल्याने भारतीय अतिशय संतप्त आहेत. तर या निर्दयी घटनेनंतर आपण कसे वागतोय, त्यावरचा हा संताप आहे. डोके थंड ठेवून व विचाराने वागण्याऐवजी भारत सरकारने या दोन देशांतील जनतेमधील विश्वास कमी करणारी पावले उचलली, विशेषकरून व्यापारविषयक.

पाकिस्तानातून भारतात येणा-या ज्येष्ठ नागरिकांना वाघा अत्तारी सीमेवरच व्हिसा देण्याची भारत सरकारची एक अभिनव योजना होती. ती रद्द करून भारत सरकारने हेच दाखवले आहे की वयोवृद्ध पाकिस्तानी नागरिकांचे सैन्य भारताचा प्रेम व आपुलकी या हत्यारांद्वारे पराभव करेल, अशी भीती आपल्याला वाटते आहे.

पाकिस्तानने अशा प्रकारचा शिरच्छेद झाल्याचा पूर्ण इन्कार केला आहे. त्यामुळे भारतीय अधिक चिडले आहेत. कारण
आपला असा विश्वास आहे की आयएसआय या पाकिस्तानच्या गुप्तचर संघटनेने आणि लष्कर-ए-तोयबाने नियंत्रण रेषेच्या परिसरातील स्थानिक नागरिकांची मदत घेऊनच भारतीय सैन्यातील जवानाचा शिरच्छेद केला आहे.

परंतु परिस्थिती अशी आहे की या घटनेमुळे भारतातील रूढीवादी आणि उजव्या शक्तींना तोंड वर काढायची संधी मिळाली आहे. मुंबईवरच्या हल्ल्याच्या पाकिस्तानी चौकशीचा संबंध या दोन देशांमधील व्यापार वा पर्यटनाशी जोडण्याचे भारताने थांबवल्याने, गेल्या दोन वर्षांत जरा सुधारू लागलेले भारत-पाक संबंध, या घटनेमुळे पुन्हा एकदा डळमळीत झाले आहेत.
प्रश्न असा आहे की भारताला पाकिस्तानचे प्रतिबिंब बनायचे आहे का? त्या देशातल्या प्रश्नांकडे पाहिले तर कळेल की इस्लामी मूलतत्त्ववादी इस्लामच्या नावाखाली लोकांमध्ये दहशत पसरवत आहेत. पाकिस्तानी सैन्य कदाचित पडद्यामागून त्यांना मदतही करत असेल. परिणामी लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या पाकिस्तानी सरकारपुढेही या मूलतत्त्ववादी संघटनांचा सामना कसा करायचा, हा प्रश्न उभा आहे.

तरीही भारतीय नागरिक सरकारच्या नाकावर टिच्चून पाकिस्तानी नागरिकांपर्यंत पोचण्याचा, त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत, हा आशेचा किरण दिसतोय. लाहोरहून आलेल्या अजोका नाटक कंपनीला, फाळणीच्या दुष्परिणामांवर विस्तृत लिखाण करणारे प्रसिद्ध लेखक सआदत हसन मंटो यांच्या नाटकाचा दिल्लीत प्रयोग करण्यावर बंदी घालण्यात आली. पण नागरी हक्क कार्यकर्ते आणि दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील काही विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या परिसरात व राजधानीत इतरत्र हे प्रयोग घडवून आणले.

भारताला एक जबाबदार प्रादेशिक नेतृत्व बनण्याची इच्छा असेल तर खुद्द भारत आणि शेजारच्या राष्ट्रांचे वर्तन सुधारण्याची आवश्यकता आहे. तसेच या राष्ट्रांच्या, प्रामुख्याने पाकिस्तानच्या, असुरक्षितता सांभाळत आपण पुढे गेले पाहिजे. तरच तडजोडीतून दोन्ही बाजूंच्या हातात काहीतरी ठोस येईल. ठोशास ठोसा ही भारतीय वृत्ती नव्हेच. आणि जसे महात्मा गांधींनी म्हणून ठेवले आहे, ठोशास ठोसा दिला तर दोन्ही बाजूंना आंधळेपणाखेरीज काहीच हाती लागणार नाही.
(ज्योती मल्होत्रा या प्रख्यात पत्रकार व भाष्यकार आहेत.)