आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्रपटाच्या सर्जनशील शिल्पकाराचे चिंतन (अग्रलेख)

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगविख्यात चित्रपट दिग्दर्शक स्टीव्हन स्पीलबर्ग यांच्या चित्रपटाचे जगभर चाहते आहेत. गेली 40 वर्षे त्यांनी सायन्स फिक्शनपासून फँटसीपर्यंत, साहसापासून इतिहासापर्यंत अनेक विषयांना स्पर्श करणार्‍या चित्रपटांची निर्मिती केली आहे. हॉलीवूडमध्ये एवढ्या विषयांच्या ‘रेंज’मध्ये चित्रपट करणार्‍यांमध्ये स्पीलबर्ग यांच्या तोडीचा असा दिग्दर्शक कोणी नाही. वेगवेगळ्या विषयांची प्रयोगशीलता, जागतिक भान, पटकथांवर विचार करणारा दिग्दर्शक अशी त्यांची ओळख आहे.

स्पीलबर्ग यांच्या चित्रपटांनी 80-90च्या दशकातील प्रेक्षकांना जेवढा आनंद दिला, प्रेक्षकांचे मनोरंजन केले, तेवढा आनंद-मनोरंजन ते वयाच्या 66व्या वर्षी 21व्या शतकाच्या दुसर्‍या दशकातल्या पिढीला देत आहेत, ही त्यांच्या कर्तृत्वाची खरी ओळख आहे. त्यांचे ‘ड्युएल’, ‘द क्लोज एनकाउंटर्स ऑफ द थर्ड काइंड’, ‘ईटी’, ‘जॉज’, ‘शिंडलर्स लिस्ट’, ‘म्युनिक’ आणि आताचा ‘लिंकन’ हे केवळ चित्रपट नाहीत तर ती जिवंत चलत्चित्रपट शिल्पे आहेत. हॉलीवूडच्या ‘लाइमलाइट’मध्ये हा दिग्दर्शक नेहमीच झळकत असतो; पण चित्रपट निर्मिती मूल्यांशी प्रामाणिक राहिल्याने, त्यांच्या चित्रपटाचे विषय वादग्रस्त असले तरी एक दिग्दर्शक म्हणून स्पीलबर्ग यांचे स्थान नेहमीच आदराचे राहिले आहे. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘लिंकन’ या त्यांच्या चित्रपटाने जगभरात वाहवा मिळवली होती. भारतातही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली होती. या निमित्ताने स्पीलबर्ग चार दिवसांपूर्वी स्वत: भारतात आले होते व त्यांनी बॉलीवूडमधील दिग्दर्शकांशी, निर्मात्यांशी, अभिनेत्यांशी चर्चा केली. अमिताभ बच्चन यांनी त्यांची एक मुलाखतही घेतली होती.

या मुलाखतीत स्पीलबर्ग यांनी त्यांच्या चित्रपटनिर्मितीमागील प्रेरणा, पटकथांबाबत त्यांचा दृष्टिकोन, हॉलीवूडमधील दिग्गज दिग्दर्शकांसंदर्भातील त्यांची मते, बॉलीवूडमधील चित्रपट अमेरिकन प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नसल्याबाबतचे निरीक्षण मांडले. स्पीलबर्ग यांनी या मुलाखतीत मांडलेली मते व त्यांचा चित्रपट माध्यमांविषयीचा दृष्टिकोन बॉलीवूडमधील तारकांना, दिग्दर्शकांना, निर्मात्यांना विचारप्रवृत्त करायला लावणारा ठरला. कारण आपल्याकडे बॉलीवूडवाल्यांची अशी तक्रार असते की त्यांच्या चित्रपटांकडे हॉलीवूडमध्ये दुर्लक्ष केले जाते. तसेच बॉलीवूडमध्येही प्रचंड टॅलेंट असून या टॅलेंटची दखल हॉलीवूड घेत नाही, ती आता घेण्याची वेळ आली आहे. स्पीलबर्ग यांनी मात्र या प्रश्नांना उत्तर देताना हॉलीवूडच्या बाजारपेठेचे माहात्म्य किंवा तेथील प्रतिभावंत कलाकारांची वाहवा न करता हा सर्व खेळ चित्रपटांच्या गुणवत्तेबरोबरच प्रसिद्धिमाध्यमांच्या कार्यक्षमतेवर अवलंबून आहे; मात्र हॉलीवूडमध्ये व अमेरिकन प्रेक्षकांच्या पसंतीला उतरेल असे प्रयत्न बॉलीवूडकडून होत नाहीत, असे सांगितले. त्यांच्या म्हणण्याचा दुसरा अर्थ असा की, बॉलीवूड चित्रपटसृष्टीला 100 वर्षे पुरी होऊनही भारतात तयार होणारा चित्रपट केवळ हॉलीवूडच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही दखल घेण्याइतपत अद्याप मोठा झालेला नाही. स्पीलबर्ग यांनी बॉलीवूडवाल्यांना असे सुचवले की, ‘तुम्ही पाश्चात्त्य देशात चित्रपटविषयक अनेक वेगवेगळे इव्हेंट करा. फिल्म महोत्सवांचे आयोजन करा. नवनव्या प्रयोगांचे मार्केटिंग करा, येथील टॅलेंटला जगापुढे आणा.’ स्पीलबर्ग यांनी स्वत: हिंदी चित्रपट फारसे पाहिलेले नाहीत, त्यामुळे हिंदी चित्रपटांच्या दर्जाविषयी त्यांनी कोणतेही भाष्य केले नाही. त्या अर्थाने स्पीलबर्ग यांचा हा दृष्टिकोन आपल्या दृष्टिकोनाशी भिन्न असा आहे.

चित्रपट मार्केटिंगचा मुद्दा हा सकस पटकथा, दिग्दर्शन शैली, अद्ययावत तंत्रज्ञान व अभिनय गुणांशी निगडित असतो. आपला चित्रपट भिन्न संस्कृती व भाषा असणार्‍या परदेशी प्रेक्षकांनी का पाहावा, यावर बॉलीवूडमधून आजवर फारसे विचारमंथन झालेले नाही. आपले चित्रपट ब्रिटन-अमेरिकेत जातात, तेथे पाउंड-डॉलरमध्ये बक्कळ पैसा कमावतात, सिल्व्हर-गोल्डन ज्युबिली साजरे करतात किंवा कान चित्रपटाच्या रेड कार्पेटवर फोटोसेशनसाठी नट-नट्या उभ्या राहतात, याचा अर्थ हे चित्रपट ब्रिटिश-अमेरिकन प्रेक्षक नव्हे तर तेथे पिढ्यान्पिढ्या राहणारे भारतीय प्रेक्षक डोक्यावर घेत असतात. भारतीय चित्रपटांमध्ये येथील समाजाच्या संवेदना, व्यामिश्र संस्कृती, बदलता भारत यांचे चित्र दिसत असले, तरी पाश्चात्त्य सिनेरसिकाला हा चित्रपट पाहताना त्याच्याशी जोडून घेता येत नाही, या वास्तवाकडेही स्पीलबर्ग यांनी लक्ष वेधले.

स्पीलबर्ग यांनी अमिताभ बच्चन यांच्या एका प्रश्नाला उत्तर दिले की, ‘चित्रपट करताना मी प्रथम पटकथा तपासून बघतो. ती पटली तर मी पुढे जातो. आमच्याकडे मेगास्टार, कोणत्या नटाची सध्या चलती आहे, याला फारसे महत्त्व नसते.’ स्पीलबर्ग यांचा हा दृष्टिकोन मेगास्टार ‘बिग बी’ला जसा धक्का देणारा आहे, तसे बॉलीवूड निर्मात्यांच्याही डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा आहे. कारण चित्रपट निर्मिती हा काळा पैसा पांढरा करण्यासाठी, सरकारी अनुदाने लाटण्यासाठी, एकाच नटाला मोठे करण्यासाठी, नट-नट्यांच्या स्टारडमला कुरवाळण्यासाठी करायचा व्यवसाय आहे, असा समज आपल्याकडे मोठ्या प्रमाणात आहे. चित्रपट रसिकही चित्रपट हे केवळ मनोरंजनाचे माध्यम आहे, इतपत या माध्यमाकडे पाहतो.

हॉलीवूडमध्ये वाईट दर्जाचे चित्रपट होत नाहीत, असे नाही. तेथेही टुकार, मारधाड, बाजारू चित्रपट तयार केले जातात. या चित्रपटांवर समीक्षकांकडून जोरदार टीकाही केली जाते. पण हॉलीवूडने क्लासिक असे अनेक चित्रपट जगाला दिले आहेत (या क्लासिकच्या जवळ जाणारा एकही चित्रपट बॉलीवूडने निर्माण केला नाही), शिवाय तेथील चित्रपट व्यावसायिक उत्तम पटकथा, सकस दिग्दर्शन कौशल्य व उत्कृष्ट अभिनयासाठी संबंधितांकडून आग्रह धरतात. त्यावर मेहनत घेतात. नुकत्याच झालेल्या ऑस्कर सोहळ्यात नामांकन झालेल्या सर्व चित्रपटांनी 100 अब्ज डॉलरचा व्यवसाय केला आहे. हे सर्व चित्रपट पटकथा, अभिनय, दिग्दर्शन, संगीत यांच्या स्तरावर उत्तम चित्रपट ठरले आहेत. एकाही चित्रपटात फुटकळ कॉमेडी, सेक्स, मनोरंजनाचा मसाला नाही. बाजारपेठेचा विचार करता हॉलीवूड चित्रपट निर्मात्यांपुढील प्रेक्षक हा बॉलीवूड निर्मात्यांपेक्षा प्रचंड असा विस्तारलेला व वैविध्यपूर्ण असा आहे. एवढ्या कोट्यवधी प्रेक्षकांचे मनोरंजन करणे व त्यांच्या अपेक्षांना उतरणे ही खरी सत्त्वपरीक्षा असते. ही आव्हाने हॉलीवूडने पहिल्या महायुद्धापासून आतापर्यंत अंगावर घेतली आहेत. त्यांच्या चित्रपट व्यवसायाने मंदीच्या फेर्‍यात अनेक वेळा गटांगळ्या खाल्ल्या आहेत, पण व्यावसायिक गणिते आणि उत्तम चित्रपटनिर्मिती यांची कास त्यांनी सोडलेली नाही. स्पीलबर्ग यांच्या मुंबई भेटीतून बॉलीवूडने हे समजून घेणे गरजेचे आहे. एवढे साधले तरीही स्पीलबर्ग भेटीचे सार्थक झाल्याचे समाधान लाभेल.