आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झाकोळलेले सोने (अग्रलेख)

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोन्याच्या किमतीने प्रति दहा ग्रॅम एकाच दिवशी एक हजार रुपयांनी गटांगळी खाल्ल्याने सोन्याची गेले काही महिने सुरू असलेली घसरण यापुढेही अशीच सुरू राहील, अशी चिन्हे दिसत आहेत. सोने प्रथमच 29 हजार रुपयांच्या खाली जाऊन गेल्या वर्षातला नीचांक गाठला आहे. त्यामुळे गेल्या कित्येक वर्षांनंतर सोन्याचा वार्षिक परतावा आता नकारात्मक झाला आहे. जागतिक बाजारपेठेतही सोन्याच्या किमती गेल्या आठवड्यात सुमारे 5.3 टक्क्यांनी घसरल्या आहेत. सोन्याने सप्टेंबर 2011 मध्ये सर्वाेच्च किमतीचा टप्पा पार केल्यावर आता या किमतीत सुमारे 22 टक्क्यांनी घसरण झाली आहे.

त्यामुळे सोन्याच्या किमती आता घसरणीला लागल्या असून एक दशकानंतर सोन्याच्या किमतीत मंदी सुरू झाल्याचा दावा काही जण करीत आहेत. आपल्याकडे आता देशात लग्नसराईचा हंगाम सुरू झाला असल्याने या काळात नेहमी सोन्याच्या किमती सतत वाढत्या असतात. यंदा मात्र भिन्न चित्र आहे. हे काहीसे आश्चर्यकारकच म्हटले पाहिजे. परंतु भारतातील खरेदी ही जगात सर्वाधिक असली तरीही सोन्याच्या किमती आंतरराष्ट्रीय पातळीवर म्हणजे लंडनच्या सोने-चांदी बाजारात ठरतात. त्यामुळे सोन्याच्या किमतीमागे बर्‍याचदा आंतरराष्ट्रीय पातळीवरील घडामोडी मोठ्या प्रमाणावर कारणीभूत असतात.

गेली तीन-चार वर्षे अमेरिकेतील आर्थिक अस्थिरतेमुळे तेथील गुंतवणूकदारांनी रोख्यात वा समभागात गुंतवणूक करण्याऐवजी सोन्यात गुंतवणूक करणे पसंत केले होते. कारण सोन्यातील गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित असल्याने अस्थिरतेच्या काळात गुंतवणूकदारांचे पाय सोन्यातील गुंतवणुकीकडे वळतात. अमेरिकेतील मंदीच्या स्थितीत आता धिम्या गतीने का होईना, सुधारणा होत असल्याने तेथील गुंतवणूकदारांनी सोन्यातील गुंतवणुकीऐवजी रोखे किंवा समभागात गुंतवणूक करण्यासाठी पावले उचलली आहेत. यामुळे सोन्याची मागणी कमी होत चालली आहे. अमेरिकेत अशी सकारात्मक परिस्थिती निर्माण होत असताना युरोपातील अनेक देशांची अर्थव्यवस्था मात्र खालावत चालली आहे. आयर्लंड, स्पेन, ग्रीस या देशांच्या पाठोपाठ आता सायप्रस देशाला आर्थिक खाईतून बाहेर काढण्यात आले. अशा स्थितीत सायप्रसला मोठ्या रोख निधीची आवश्यकता असल्याने ते आपल्याकडील सोने विकण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी सोने युरोपातील बाजारात विक्रीस काढल्यावर सोन्याच्या किमती आणखीनच घसरणीला लागतील.

जागतिक पातळीवरील सल्लागार कंपनी ‘गोल्डमन सॅच’ यांच्या अंदाजानुसार सोने 2014 पर्यंत घसरून नवीन नीचांक गाठेल. गुंतवणूक गुरू म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो त्या जॉर्ज सोरोस यांनीदेखील आपली सोन्यातील गुंतवणूक गेल्या वर्षभरात कमी-कमी करीत आता शून्यावर आणली. सोन्यातील गुंतवणुकीच्या किमतीच्या वाढीचा बहर आता संपला असून यापुढे सोन्याच्या किमतीच्या वाढीला अनेक मर्यादा आहेत, असे सोरोस यांचे म्हणणे आहे. सोरोस यांनी सोन्यातील गुंतवणूक काढून घेतल्याचे समजताच अमेरिकेतील गोल्ड एक्स्चेंज फंडातून गेल्या वर्षात गुंतवणूकदारांनी सुमारे 7.7 अब्ज डॉलर एवढ्या रकमेचे सोने काढून घेतले. परंतु सोन्याच्या किमती मोठ्या प्रमाणावर घसरतील ही शक्यता सध्या तरी कमी वाटते. सध्या झाकोळलेली सोन्याची ही स्थिती हंगामी ठरावी असेच दिसते. अर्थात सोन्याबाबत निराशाजनक चित्र जागतिक पातळीवर असले तरीही सोने खरेदीत भारत व चीन या दोन देशांतील नागरिकांनी आपली आघाडी कायम राखली आहे. उलट सोन्याच्या किमती घटल्यास या दोन देशांत सोन्याची खरेदी वाढेल, असा अंदाज आहे.

आपल्यासारख्या मोठ्या देशात सोने हा एक उत्तम तरलता असलेला धातू आहे. कोणत्याही कानाकोपर्‍यात तुम्ही असाल तरी सोन्याचे रूपांतर तुम्हाला एका झटक्यात पैशात करता येऊ शकते. सोन्याच्या गुंतवणुकीचा आपल्याकडे हा सर्वात मोठा फायदा असून यामुळेच ग्रामीण भागातील जनतेला सोन्यातील गुंतवणुकीचा एक मोठा आधार वाटतो. मुंबईसारख्या महानगरात दक्षिणेतील एका मोठ्या सराफाने जोरदार जाहिरातबाजी करून प्रवेश केला. या सराफाने गेल्या दहा वर्षांत नऊ हजार कोटींची उलाढाल साध्य केली आहे. देशातील सोन्याच्या बाजारपेठेबाबत यातून अनेक प्रश्न उपस्थित होतात. यात काळ्या पैशाचाही वावर असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेक देश आपल्या अर्थव्यवस्थेसाठी एक सुरक्षितता म्हणून सोन्याची गुंतवणूक मध्यवर्ती बँकेमार्फत करीत असतात.

2000 ते 2012 या दोन वर्षात अनेक देशांनी सोन्यात सुमारे 12 ट्रिलियन डॉलर्सची गुंतवणूक केली. यात भारताचाही समावेश होता. याच काळात डॉ. मनमोहनसिंग सरकारने 200 टन सोन्याची खरेदी केली होती. दोन दशकांपूर्वीच भारत सरकारला स्वत:कडील सोने जागतिक बँकेकडे गहाण टाकण्याची पाळी आली होती. त्यानंतरच स्थापन झालेल्या नरसिंहराव यांच्या सरकारमध्ये डॉ. मनमोहनसिंग अर्थमंत्रिपदी नियुक्त झाले आणि त्यांनी उदारीकरणास प्रारंभ केला. यातून त्यांनी देशाची अर्थव्यवस्था सावरली आणि सोने खरेदी करण्याच्या स्थितीपर्यंत देशाला आणून ठेवले. या दोन्ही घटनांचे साक्षीदार डॉ. सिंग हे आहेत. सहा महिन्यांपूर्वी सरकारने सोन्याची आयात कमी व्हावी यासाठी आयात कर वाढवला आणि दहा टक्क्यांवर नेला. यामुळे सोन्याची खरेदी काही कमी होईल असे नाही, मात्र जागतिक पातळीवर सोन्याच्या किमती कमी झाल्यास देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लागणार आहे. कारण आपण पेट्रोलियम पदार्थांच्या खरेदीपाठोपाठ सोन्याच्या आयातीवर परकीय चलन खर्च करतो.

पेट्रोलियम पदार्थांची खरेदी आपण टाळू शकत नाही. मात्र सोन्याची खरेदी आपण केली नाही तर फार काही नुकसान होणार नाही. त्यामुळे देशाचे अमूल्य परकीय चलन वाचवण्यासाठी आणि आयात-निर्यातीतील तूट कमी करण्यासाठी लोकांनी सोने खरेदी कमी करावी, असा आयात कर वाढवण्यामागील सरकारचा हेतू आहे. सोन्याची किंमत कमी झाल्यास आपली आयात परकीय चलनात कमी होईल आणि सरकारला काहीसा दिलासा मिळेल.