आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अडवाणींची ‘हिट विकेट’(अग्रलेख)

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी हे भाजपचे अजूनही ‘लोहपुरुष’ आहेत, असे पक्षातील काही जणांना वाटते. राजनाथसिंह यांची पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर अडवाणी यांचे मार्गदर्शन घेऊनच भाजप पुढील रणनीती आखेल, असे वक्तव्य त्यांनी केले होते. लोहपुरुष हा भरकटलेल्या कुटुंबाला/पक्षाला दिशादर्शन करणारा असतो. पक्षातील मतभेद चव्हाट्यावर येऊ नयेत म्हणून सहमतीचे राजकारण करत असतो. परिस्थिती हाताबाहेर जात असेल तर कठोर होऊन हा लोहपुरुष शिस्तीचा बडगा दाखवतो. पण यूपीए सरकार केंद्रात लागोपाठ दोनदा आल्यानंतर अडवाणींची लोहपुरुषाची प्रतिमा वितळत निघाली आणि आता ते फक्त भाजपच्या होणार्‍या पराभवाची चिकित्सा करणारे राजकीय विश्लेषक म्हणून काम करतात.

अडवाणी यांनी कर्नाटकातील भाजपच्या दारुण पराभवाबद्दल आपल्या ब्लॉगमध्ये कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येदियुरप्पा यांच्यासाठी जे अश्रू ढाळले आहेत ते पाहता त्यांनी स्वत:ची ‘हिट विकेट’ घेतली आहे. याच येदियुरप्पा यांच्या विरोधात अडवाणी गेल्या वर्षी सक्रिय झाले होते. पण आपल्या ब्लॉगमध्ये त्यांनी येदियुरप्पा यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर दिल्लीतील भाजप धुरीणांनी हा विषय हाताळताना ज्या काही चुका केल्या, त्यामुळे भाजपला कर्नाटकाच्या मतदाराने नाकारले असे मत व्यक्त केले आहे. तसेच दक्षिणेतील कर्नाटक या एकमेव राज्यात भाजपचे सरकार पाच वर्षे सत्तेवर होते, आता हे राज्यही आपल्या हातातून गेल्याबद्दल अडवाणींनी खंत व्यक्त केली आहे. भाजपमध्ये अडवाणी यांचा स्वतंत्र गट आहे. या गटाला शह देणारे जेटली, मोदी, वाजपेयी, राजनाथसिंह, सुषमा यांचे इतर गट आहेत. सध्याचा भाजप हा अनेक गटातटात, वैयक्तिक महत्त्वाकांक्षेत अडकलेला पक्ष असल्याने नजीकच्या काळात या पक्षातील नेत्यांमधील ठासून भरलेल्या महत्त्वाकांक्षा संधी येताच बाहेर येऊ शकतात. अडवाणी यांची पंतप्रधानपदाची महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. त्यामुळे त्यांना 2014 च्या लोकसभा निवडणुका दिसत असून कर्नाटकाचे राजकीय गणित त्यांना पक्षापुढे नव्याने मांडायचे आहे व त्यासाठी त्यांना येदियुरप्पा यांची साथ हवी आहे.

केंद्रात एनडीएचे सरकार यायचे असेल तर दक्षिण राज्यांशिवाय पर्याय नाही असेही गणित सध्या मांडले जात आहे. कर्नाटकात लोकसभेच्या 28 जागा असून सध्याच्या मतदारांची मानसिकता पाहता काँग्रेसला 22 जागा मिळतील असे सांगितले जात आहे. अशा परिस्थितीत येदियुरप्पा यांना पक्षात परत घ्यावे म्हणून हा ब्लॉग अडवाणींचे लॉबिंग असू शकते. या ब्लॉगमध्ये अडवाणींनी कर्नाटक निवडणुकांमधील पराभवाचे खापर पक्षातल्या धुरीणांच्या निर्णयक्षमतेवर शिताफीने फोडले आहे. त्यांच्या मते भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर येदियुरप्पा यांच्यावर कारवाई अगोदरच व्हायला हवी होती. येदियुरप्पा यांच्यावरील आरोपांबाबत पहिल्यांदा पक्ष फारसा गंभीर नव्हता, पण त्यांच्याबाबत जेव्हा निर्णय घेण्यात आला, तेव्हा पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले होते. येदियुरप्पा यांच्या गच्छंतीच्या प्रकरणात अनेकांनी संधीसाधू राजकारण केले, असेही अडवाणी यांनी म्हटले आहे. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर भाजपच्या दिवाळखोर राजकारणाचा प्रत्यय दोन वर्षांपासून येत आहे. गेल्या वर्षी केंद्रातील यूपीए सरकारच्या विरोधात दिल्लीतील जंतरमंतर आणि रामलीला मैदानावर जो धांगडधिंगा घालण्यात आला होता, त्याला संघ परिवाराचे छुपे पाठबळ होते. पण नेमके त्याच वेळी कर्नाटकातही येदियुरप्पा यांच्याविरोधात खाण घोटाळ्याच्या निमित्ताने वातावरण तापले होते. त्या वेळी येदियुरप्पा यांची खुर्ची वाचावी म्हणून सुषमा स्वराज, जेटली यांनी प्रयत्न चालवले होते. जेटली गट तर भ्रष्टाचार आणि सुप्रशासन या मुद्द्यावर राजकीय निर्णय घेताना फार सावधपणा बाळगायला हवा या मताचा होता.

जेटली यांची येदियुरप्पा तसेच मोदींशी जवळीक सर्वश्रुत आहे. जेटली गटाने येदियुरप्पा यांच्या पारड्यात वजन टाकल्याने त्यांचे पक्षातील महत्त्व वाढू लागले. अशा वेळी अडवाणी यांनी येदियुरप्पा यांच्याविरोधात भूमिका घेण्यास सुरुवात केली. त्यातच स्वत:च्या पायावर धोंडा मारून घेण्याचे काम खुद्द येदियुरप्पा यांनी केले. त्यांनी थेट तत्कालीन अध्यक्ष नितीन गडकरी यांना दम द्यायला सुरुवात केली आणि आपण रस्त्यावरचे राजकारण करतो, असे दाखवून दिले. येदियुरप्पा यांची वाढलेली दांगटशाही जेटली यांचा काटा काढण्यासाठी सुयोग्य संधी आहे, हे ओळखून अडवाणी यांनी पक्ष कार्यकारिणीच्या बैठकीत येदियुरप्पा यांच्याबाबत कठोर पावले उचलायला हवीत अशी भूमिका घेतली. अखेर गडकरींना येदियुरप्पा यांना पक्षातून काढून टाकावे लागले. येदियुरप्पा यांचा पत्ता कट झाल्याने जेटली यांनी आगामी कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठ्या प्रमाणात लिंगायत मतांचा फटका बसेल, अशी भविष्यवाणी केली होती. येदियुरप्पा यांच्यासारखा लोकनेता भाजपातील सुंदोपसुंदीच्या राजकारणात बळी गेल्यामुळे कर्नाटकच्या निवडणुकांचे राजकीय चित्र बदलून गेले.

केंद्रातील यूपीए सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप होऊनही लोकांनी काँग्रेसला निवडून दिले. हा निकाल अडवाणींना अनाकलनीय वाटला नसता तर नवलच होते. म्हणून त्यांनी आपल्या ब्लॉगमध्ये भ्रष्टाचार या मुद्द्यावर कर्नाटकात सत्तांतर होऊ शकते, पण केंद्रात का होत नाही याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे. या आश्चर्यातून अडवाणी यांना भाजपमधील नेत्यांमध्ये कोणत्याच प्रश्नाविषयी एकवाक्यता राहिलेली नाही, असेही सुचवायचे आहे. सध्या देशातील राजकीय वातावरण पाहता हिंदुत्व हा मुद्दा राहिलेला नाही. अशा परिस्थितीत मोदींचे माजवलेले स्तोम पक्षाला खाईत घेऊन जाईल असेही अडवाणींना वाटते. आगामी लोकसभा निवडणुकांना सामोरे जाताना काँग्रेसच्या विरोधात कोणता मुद्दा घेऊन जायचे याबाबत भाजपमध्ये सुस्पष्टता नाही. पक्षातील हा सगळा आनंदीआनंद अडवाणींना सांगायचा आहे. त्यामुळे त्यांचा ब्लॉग ही ‘हिट विकेट’ आहे.