आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘ज्युरासिक पार्क’मधील स्वामी भाजपमध्ये (अग्रलेख)

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जनता पक्ष नावाचा एक राजकीय पक्ष देशात होता, हे किती जणांना माहीत आहे? ज्यांचे वय पस्तिशीच्या आत आहे त्यांना या पक्षाचे नावही आठवणे शक्य नाही. जनता पक्षाचा एकही खासदार लोकसभेत वा राज्यसभेत नाही. देशाच्या कोणत्याही राज्यात एकही आमदार वा नगरसेवक नाही. या पक्षाची कुठे शाखा नाही वा कुठे कार्यकर्तेही दिसत नाहीत. या पक्षाचा जन्म 1977 मध्ये झाला आणि तीन वर्षांच्या आतच तो पक्ष अनंतात विलीन झाला. पण त्या वेळेस म्हणजे 1977 मध्ये अनेक स्वयंभू विचारवंत (म्हणजे भ्रमिष्ट!) आणि स्वयंसिद्ध समाजवादी (म्हणजे राजकारणातील भटके-विमुक्त) असे मानत होते की, जनता पक्षाने देशाला ‘दुसरे’ स्वातंत्र्य मिळवून दिले! आपल्या सर्वांना पहिला, खराखुरा स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट 1947 माहीत आहे. भले आपला तेव्हा जन्मही झाला नसेल. आपल्याला 26 जानेवारी 1950 हा पहिला प्रजासत्ताक दिनही माहीत आहे. परंतु हा ‘दुसरा’ स्वातंत्र्य दिन त्या जनता पक्षाच्या तत्कालीन समर्थकांनाही आठवत नाही.

डायनासोर्स तर लक्षावधी वर्षांपूर्वी पृथ्वीतलावर संचार करीत होते. डायनासोर्स शेकडो वर्षांनंतर कायमचे लयाला गेले, पण तेही आपल्याला माहीत आहेत, कुणीही प्रत्यक्ष पाहिले नसताना! ‘ज्युरासिक पार्क’सारखा तीन भागांतील चित्रपट जगातील अनेक भाषांमध्ये प्रकाशित करणार्‍या स्पिलबर्गसारख्या महान दिग्दर्शकालाही डायनासोर्स आठवतात आणि लोकांनाही या विलक्षण प्राण्याबद्दल कुतूहल वाटते. पण केवळ 35/36 वर्षांपूर्वी भारतवर्षात उदयाला येऊन लवकरच अस्तंगत झालेल्या या महान पक्षाचे नावही कुणाला आठवत नाही, त्याने देशाला दिलेल्या दुसर्‍या स्वातंत्र्य दिनाची तारीख आठवत नाही आणि त्या स्वातंत्र्याचा शिल्पकार कोण होता हेही सांगता येत नाही. याला काय म्हणावे बरे? परंतु हा अज्ञानाचा अंधकार दूर करणारी एक घटना रविवारी दिल्लीत घडली. सुब्रमण्यम स्वामी नावाचे एक जनता पक्षाचे नेते रविवारी भारतीय जनता पक्षात येऊन त्यांनी त्या पक्षाने उरलेसुरलेले अस्तित्वही संपवून टाकले. डायनासोर्स आणि सुब्रमण्यम स्वामी या दोघांमध्ये थोडेफार साधर्म्य आहे. दोघेही हिंस्र, विषारी आणि बेभान धिंगाणा घालण्यासाठी प्रसिद्ध. परंतु बिचारे डायनासोर्स हे जीवसृष्टीच्या उत्क्रांतीच्या अगदी पहिल्या टप्प्यातील प्राणी होते. त्या काळी पृथ्वी ग्रहच आजच्या दृष्टिकोनातून मानवी जीवनाला पूरक नव्हता. त्या काळी माणूस नावाचा प्राणी उत्क्रांत व्हायचा होता.

‘ज्युरासिक पार्क’ चित्रपटात त्या विशाल व हिंस्र प्राण्याचे एक अंडे आजच्या संशोधकाला सापडते आणि त्यानंतर भूतलावर कसा हाहाकार उडतो याचे चित्रण आहे. पण सुब्रमण्यम स्वामी तर मानवी रूप धारण करून अवतरले आहेत. स्पिलबर्ग यांना हे स्वामी माहीत नव्हते, नाही तर त्यांनी मानवी रूपात अजून डायनासोर्सचा डीएनए आहे हे ओळखून तेवढाच चित्तथरारक चित्रपट बनवला असता. असो. तर हे स्वामी भाजपमध्ये पक्षासहित विलीन झाले आणि त्या ऐतिहासिक विलीनीकरण सोहळ्याला भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरीही हजर होते. भाजपचे आजचे अध्यक्ष राजनाथसिंह आणि त्यांच्या पक्षाचे एक नेते अरुण जेटली यांनी स्वामींना त्यांच्या पक्षाची दीक्षा (पुन्हा) देताना म्हटले की, आता पक्ष अधिक मजबूत होईल. स्वामींसारखा धैर्यशील, कर्तबगार, लढाऊ नेता भारतीय जनता पार्टीत येणे ही काळाचीही गरज आहे, असे त्यांनी म्हटले. स्वामींचा इतिहास ज्यांना माहीत आहे त्यांना हे माहीत असायला हवे की, स्वामी हे ‘काळाची गरज’च केवळ नाहीत, तर साक्षात ‘काळ’ म्हणूनच उभे राहतात आणि त्यांचे पक्षात येणे हे संघ परिवाराला अपशकुनही ठरू शकते. आमचा तसा शकुन-अपशकुनावर विश्वास नाही, पण संघ परिवाराचा आहे. म्हणूनच त्यांना हा सावधगिरीचा इशारा देणे आवश्यक आहे. स्वामी हे अटलबिहारी वाजपेयींच्या विरोधात होते. इतकेच नव्हे, तर त्यांनी त्यांच्याविरोधात एक मोहीमच उघडली होती.

भाजपची अब्रू चव्हाट्यावर आणून त्याची लक्तरे भारतीय राजकारणाच्या वेशीवर टांगण्यात स्वामी आघाडीवर होते. म्हणूनच त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आले होते. अगोदर भारतीय जनता पक्ष हाच मुळी त्या ‘ऐतिहासिक’ जनता पक्षाचा अनौरस वारस! जनता पक्ष हा एकूण चार पक्षांच्या विलीनीकरणातून जन्माला आलेला पक्ष! (असे अनैसर्गिक जन्म अनेक माणसांना महाभारतात मिळाले आहेत.) इंदिरा गांधींच्या विरोधात जन्माला आलेल्या या पक्षात जनसंघ, स्वतंत्र, सिंडिकेट ऊर्फ संघटना काँग्रेस आणि भटके-विमुक्त समाजवादी असे चार जण होते. या पक्षाने इंदिरा गांधी व त्यांच्या पक्षाचा 1977 मध्ये पराभव करून देशाला ‘दुसरे’ स्वातंत्र्य मिळवून दिले. या जनता पक्षाचे सर्व बाळंतपण ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक जयप्रकाश नारायण यांनी केले होते. त्यांना वाटले होते की, देशाला कायमचे भ्रष्टाचारमुक्त (आणि काँग्रेसमुक्त!) करण्याचे माध्यम म्हणजे जनता पक्ष! परंतु बिचार्‍या जेपींच्या हयातीतच 1977 मध्ये जन्माला आलेला पक्ष 1979 च्या जुलैमध्ये चिकुनगुण्याने आजारी पडला. त्यातून तो बरा झालाच नाही. पुढे सहा महिन्यांनी 1980 च्या जानेवारीत इंदिरा गांधी व काँग्रेस प्रचंड बहुमताने परत निवडून आले. दुसरे स्वातंत्र्य उष:काल होता होताच अस्तंगत झाले. पण त्या जनता पक्षातून बाहेर पडलेल्या संघ परिवाराने भारतीय जनता पक्ष स्थापन केला.

जनता पक्षातील विमुक्त समाजवाद्यांनी जनसंघवाल्यांना खडा सवाल केला होता, ‘तुम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे की जनता पक्षाचे?’ जनसंघाने संघाशी एकनिष्ठ राहायचे ठरवले. साहजिकच पक्ष फुटला. त्यातून मग भाजप, समाजवादी जनता, राष्ट्रीय जनता दल, सेक्युलर जनता दल, समता पक्ष अशी शेकडो शकले विभक्त झाली; पण स्वामी मात्र त्या ऐतिहासिक ‘ज्युरासिक पार्क’मध्ये एकटेच वणवण फिरत राहिले. टीव्ही चॅनल्सनी जर त्यांना आधार दिला नसता, तर स्वामी आणि त्यांचा पक्ष अजूनही भूतलावर धिंगाणा घालत आहेत हे कुणाच्या लक्षात आले नसते. असो. आता भाजपने या डायनासोर्सचा ‘व्हायरस’ पक्षात आणला आहे. ‘एक मच्छर भी आदमी को...’ असे म्हटले जाते. इथे तर चक्क स्वामीच भाजपच्या तंबूत घुसले आहेत. देश काँग्रेसमुक्त करण्याचे वचन पुन्हा एकदा देऊन भाजपने तिसरा स्वातंत्र्यलढा सुरू केला आहे. ‘ज्युरासिक पार्क’चा तिसरा भाग आता सादर होणार आहे!