आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बॅडमिंटनच्या उत्कर्षाची वैश्विक नांदी (अग्रलेख)

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काही माणसे जन्मानेच कणखर असतात. काही परिस्थितीने तशी बनतात. भारताच्या बॅडमिंटन क्षेत्राला अशाच अनुभवाच्या मुशीतून घडलेला पुल्लेला गोपीचंद मिळाला. अनुभवाची शिदोरी त्याने स्वत:पुरती वापरली नाही, ती दौलत त्याने भारताच्या उदयोन्मुख खेळाडूंवरही उधळली. बॅडमिंटनच्या खेळाने दिलेला पैसा, मानमरातब आदी मिळकत बँकेत किंवा तिजोरीत न ठेवता त्या पैशातून त्याने ज्ञानदानाची पाणपोईच उघडली. स्वत:च्या खिशात हात घालणारे भारतीय खेळाडू अभावाने पाहायला मिळतात. गोपीचंदने होतकरू खेळाडूंसाठी आपल्या खिशातच हात घातला नाही तर तो त्यांच्यासाठी रिता केला. हैदराबादच्या गच्चीबौली भागातील त्याची बॅडमिंटन अकॅडमी म्हणूनच तमाम क्रीडाविश्वात एक आदर्श उदाहरण बनून राहिली आहे. गोपीचंद यांच्या बॅडमिंटनच्या पर्णकुटीत शिरताना मनाचा कणखरपणा हवा. तो जपणारेच तेथे टिकले. सायना नेहवालच्या उदयानंतर गोपीचंदच्या प्रयत्नांची तमाम विश्वाने दखल घेतली. के. श्रीकांत, सौरभ वर्मा, साई प्रणीत, गुरू साईदत्त, एच. एस. प्रणव अशी भारताची बॅडमिंटन भविष्याची पिढी तेथे आकाराला येत आहे.

महिलांमध्ये सायना नेहवालपाठोपाठ पी. व्ही. सिंधू आली. अरुंधती पानतावणे (नागपूर), तन्वी लाड (मुंबई), रसिक राजे (नागपूर) ही महाराष्ट्राची बॅडमिंटनमधील गुणवत्ता गोपीचंदच्या अकादमीत आकार घेत आहे. महाराष्ट्राने देशाला बॅडमिंटनचे भावी विजेतेच दिले नाहीत तर जागतिक बॅडमिंटन लीगची पहिली संकल्पनाही दिली. महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष प्रदीप गंधे गेले वर्षभर जागतिक पातळीवरच्या या बॅडमिंटन लीगच्या आखणीत व्यग्र होते. त्यांची ही संकल्पना. ती पूर्णत्वास नेण्यासाठी ते झटत होते. स्पोर्टी सोल्युशनशी करार करताना त्यांनी आयपीएल क्रिकेटमधील वाईट गोष्टी कटाक्षाने टाळल्या. प्रत्येक गोष्ट लिखित स्वरूपात केली. महाराष्ट्राच्या बॅडमिंटन क्षेत्राला व्यावसायिक कलाटणी देणारे सोनेरी स्वप्न त्यांनी पाहिले. महाराष्ट्र आणि राष्ट्रीय संघटनेला कायमस्वरूपी आर्थिक लाभ या लीगमुळे मिळेल, असे करार केले. आयपीएलच्या हे अगदी उलट होते. स्पोर्टी सोल्युशनने 10 वर्षांत ठरावीक रक्कम राष्ट्रीय आणि महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेला द्यायची आहे. नफा-तोटा, खेळाडूंच्या खर्चापासून फ्रँचायझींचा लाभ, खर्च आदी जबाबदार्‍या असोसिएशनकडे ठेवल्याच नाहीत. त्यामुळे असोसिएशनमधील वादाचे मूळ ठरणारा खर्चाचा, भ्रष्टाचाराचा मुद्दाच त्यांनी नष्ट केला.

गोपीचंद आणि प्रकाश पदुकोण यांनी उभ्या केलेल्या अकॅडमीसारखी सोय-सुविधा महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या माध्यमातून उभी करण्याचे त्यांचे स्वप्न आहे. क्रिकेटसारख्या र्शीमंत खेळाला राज्यात सर्वत्र प्रचंड जागा देणार्‍या महाराष्ट्र शासनाने त्यासाठी मदतीचा हात देणे गरजेचे आहे. आज महाराष्ट्रातील मुले प्रगत प्रशिक्षणासाठी आंध्र, कर्नाटकात जाताहेत. हे चित्र कधीतरी बदलायला हवे. ते बदलण्यासाठी खारीचा वाटा उचलणार्‍या प्रदीप गंधे यांनी बुधवारपासून सुरू होणार्‍या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटूंच्या इंडियन बॅडमिंटन लीगची मुहूर्तमेढ रोवली. महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेच्या तिजोरीत सातत्याने करोडोंचा आर्थिक ओघ कायम राहील, याची तरतूद केली. महाराष्ट्राच्या एका माजी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटूच्या संकल्पनेतून जागतिक बॅडमिंटन क्षेत्रातील पहिल्या लीगची कल्पना प्रत्यक्षात साकारते आहे. साडेतीन कोटी रुपयांचा प्रथम पुरस्कार याआधी कोणत्याही बॅडमिंटन खेळाडूला मिळाला नव्हता. बॅडमिंटन स्पर्धेच्या निमित्ताने काम करणार्‍या व्यवस्थापन प्रशासन यंत्रणा, समालोचक, प्रशिक्षक, वैद्यकीय अधिकारी आदींना प्रथमच केलेल्या र्शमाचा मोबदला मिळणार आहे.

बॅडमिंटन या खेळाची जागतिक स्तरावरची दिशाच बदलली जाणार आहे. मलेशिया, इंडोनेशिया, युरोपीय देश आदी देशांमधील अव्वल खेळाडू या लीगमध्ये सहभागी झाले आहेत. चीनचे खेळाडू कुंपणावर आहेत. त्यांनाही या स्पर्धेत सहभागी व्हायचे आहे. मात्र त्या देशाचा कायदा आर्थिक लाभाच्या अशा स्पर्धा किंवा लीगमध्ये सहभागास परवानगी देत नाही. नजीकच्या काळात हेच खेळाडू आपल्या देशाचा कायदा बदलून भारतात येतील. त्या वेळी स्पर्धा आणि संघर्ष आणखी वाढलेला असेल. पहिल्या दोन आयपीएल स्पर्धांमध्ये तरी इंग्लंडचे खेळाडू कुठे आले होते? ऑस्ट्रेलियाच्या, विंडीजच्या विद्यमान खेळाडूंनीदेखील पाठ फिरवली होती. नंतर मात्र सर्वच खेळाडूंनी प्रचंड विरोध असतानाही आयपीएलमध्ये खेळणे पसंत केलेच. आयबीएल (इंडियन बॅडमिंटन लीग)देखील त्याला अपवाद ठरणार नाही. जगातील अव्वल खेळाडूंच्या सहभागामुळे भारतीय खेळाडूंना दज्रेदार खेळाडूंविरुद्ध किंवा सोबत खेळण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे अनेक उपयुक्त गोष्टी खेळाडूंना ज्ञात होणार आहेत. अव्वल खेळाडूंच्या खेळातील काही गुपिते उघडली जाणार आहेत. या खेळाडूंसोबत सातत्याने दोन हात करण्याची संधी मिळाल्यामुळे मोठय़ा स्पर्धेच्या प्रशिक्षण शिबिरापेक्षाही या स्पर्धेत खेळल्याचा होणारा लाभ प्रचंड असेल. या लीगने जगभर डंका पिटला आहे. त्या पार्श्वभूमीवर भारताच्या पुसर्ला वेंकटा (पी. व्ही.) सिंधू हिने सायनापाठोपाठ आपल्या आगमनाची वर्दी चीनच्या ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती ली शूरुईला हरवून दिली आहे.

सायना नेहवाललाही जे जमले नव्हते ते विश्व बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेतील पदक (कांस्य) सिंधूने पटकावले आहे. सायनाची तीच जिद्द, जिंकण्याचा हव्यास आणि उच्च ध्येय बाळगून सिंधू बॅडमिंटन कोर्टवर अवतरली आहे. 17 वर्षे पूर्ण झालेल्या या खेळाडूचे एवढय़ा कमी वयातील यश कौतुकास्पद आहे. 5 फूट 10 इंच उंचीचा ती पुरेपूर लाभ घेते. दोन्ही बाजूंचे तिचे हाफ स्मॅशेस जबरदस्त आहेत. क्रॉसकोर्ट फटके ती लीलया मारते. कोर्टवरच्या व्हॉलीज चांगल्या आहेत. फिटनेस अप्रतिम आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, मानसिक कणखरपणा. गोपीचंद यांच्या या शिष्येने आपल्या गुरूकडूनच तो गुण उचलला आहे. मागे गोपीचंदच म्हणाले होते, सिंधूचा ‘अँटिट्यूड’ व शेवटच्या क्षणापर्यंत हार न मानण्याची प्रवृत्ती तिला स्टार खेळाडू बनवेल. गोपीचंद यांचे शब्द आता खरे ठरताहेत. चीनच्या ऑलिम्पिक विजेत्या खेळाडूला हरवताना याची प्रचिती आली होती. ऑल इंग्लंड चॅम्पियन, वर्ल्ड नंबर दोनला तिने लीलया धूळ चारली. सिंधूचे आईवडील दोघेही राष्ट्रीय व्हॉलीबॉलपटू होते. वडिलांना तर त्या खेळासाठी अर्जुन पुरस्कारदेखील मिळालेला. घरात खेळास पोषक असे वातावरण होते. मात्र आईवडिलांनी सिंधूवर व्हॉलीबॉल खेळण्याची सक्ती केली नाही. उलट बॅडमिंटन खेळण्यासाठी दररोज 56 किलोमीटर प्रवास करणार्‍या आपल्या मुलीच्या आवडीला खतपाणीच घातले.

वयाच्या आठव्या वर्षी सिकंदराबाद येथील रेल्वे स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटमध्ये मेहबूबअली यांच्याकडून बॅडमिंटनचे धडे गिरवत गोपीचंद यांच्या अकॅडमीत आली तेव्हा सबज्युनियर खेळाडूंच्या बिरादरीत सिंधूचे नाव चर्चेत आले. राष्ट्रीय शालेय स्पर्धा, सबज्युनियर नॅशनल, ज्युनियर एशियन बॅडमिंटन, ज्युनियर वर्ल्ड बॅडमिंटन स्पर्धा अशा प्रगतीच्या एकेक पायर्‍या चढत आता सिंधूने सीनियर बॅडमिंटन क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. जगातील अव्वल, चिनी खेळाडूंना पराभूत करून तिने आपल्या आगमनाची वर्दी तमाम बॅडमिंटन विश्वाला दिली आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या महिला विभागाच्या पदकाचे खाते सिंधूने उघडून दिले. 150 पेक्षा पुढचे रँकिंग असणार्‍या सिंधूने वर्षभरातच चक्क 12 व्या स्थानावर झेप घेतली. तिच्या प्रगतीचा हा आलेख थक्क करणारा आहे. आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन क्षेत्रात पुढे येणारे अधिकाधिक भारतीय खेळाडू आणि आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनला ‘बॅडमिंटन लीगच्या’ नव्या आर्थिक झळाळीची ओळख करून देणारा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचे खेळाडू, या पार्श्वभूमीवर आजपासून सुरू होणारी लीग बॅडमिंटन क्षेत्राच्या उत्कर्षाची नांदी ठरो.