आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नियतिशरण ! (अग्रलेख)

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. मनमोहनसिंग यांचे पंतप्रधान म्हणून लाल किल्ल्यावरून दिलेले आजचे शेवटचे भाषण असेल. पुढील वर्षी लाल किल्ल्यावरून भाषण देण्याचा मान कुणाला मिळेल, हे सांगणे कठीण आहे. ज्या धडक पद्धतीने नरेंद्र मोदींनी त्यांचा अश्वमेध देशभर सोडला आहे, त्याला जर कुणी अडवले नाही तर लाल किल्ल्यावरून देशाला मोदी संबोधित करतील. जर भाजपला दोनशेपेक्षा कमी, पण काँग्रेसपेक्षा बर्‍याच जास्त जागा मिळाल्या तर भाजपचाच; पण मोदींऐवजी दुसरा कुणी तरी लाल किल्ल्यावरून भाषण देईल. एनडीएचे अध्यक्ष म्हणून अडवाणी, भाजपचे अध्यक्ष म्हणून राजनाथ सिंह, लोकसभेतील विरोधी पक्षाच्या नेत्या म्हणून सुषमा स्वराज यांचीही नावे, भाजपला 160 ते 180 जागा मिळाल्यास येऊ शकतील, परंतु काँग्रेस व भाजप यांना 10-20 च्या अंतरानेच 140 ते 160 अशा जागा मिळाल्या, तर त्या दोन्ही पक्षांपैकी कुणाचाच पंतप्रधान नसेल. कारण इतर बर्‍याच पक्षांनी असे जाहीर केले आहे, की त्यांना बिगर भाजप/बिगर काँग्रेस असे सरकार हवे आहे. म्हणजे ‘तिसर्‍या’ आघाडीचा उमेदवार पंतप्रधान होऊ शकेल, परंतु तिसर्‍या आघाडीत नक्की कोण आहे आणि कोण नाही, हे कुणीच सांगू शकणार नाही.

काही वर्षांपूर्वी तिसर्‍या आघाडीचे अध्वर्यू म्हणून कम्युनिट पक्ष ती जबाबदारी सांभाळत! 1996 मध्ये वाजपेयींचे पहिले सरकार 13 दिवसांत पडल्यानंतर पंतप्रधानांचा शोध सुरू झाला. ‘नाटककाराच्या शोधात सहा पात्रे’ या नावाचे एक नाटक आहे. त्याच चालीवर पंतप्रधानांचा शोध चालू होता. काहींनी विश्वनाथ प्रतापसिंग यांचेच नाव पुन्हा सुचविले, पण त्यांनी स्पष्ट नकार दिला. मग ज्योती बसूंचे नाव पुढे आले. ज्योती बसू तोपर्यंत सुमारे 20 वर्षे बंगालचे मुख्यमंत्री होते, परंतु ज्योती बसूंनीही नकार दर्शवला. (पुढे काही वर्षांनी त्यांनी जाहीर केले, की त्यांची तयारी होती पण पक्षाने परवानगी नाकारली, परंतु ते नाकारणे ही महाघोडचूक होती!) मग काहींनी सुचवले, की शरद पवारांनी काँग्रेस पक्षात बंड करून वेगळा पक्ष काढला तर त्यांचेही नाव पंतप्रधानपदासाठी सुचवता येईल. (तेव्हा काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष होते सीताराम केसरी). परंतु पवारांनी आपण पक्षाचे शिस्तबद्ध कार्यकर्ते आहोत, असे सांगितले. (पुढे 1999 मध्ये मात्र या शिस्तबद्ध कार्यकर्त्याने पक्षात बंडाचा झेंडा फडकावला. मात्र त्या वेळेस अध्यक्षपदी सोनिया गांधी होत्या.) त्यानंतर काहींनी मधू दंडवते यांचे नाव सुचविले, पण त्याही नावाला फारसे समर्थन मिळाले नाही. असे करत करत अखेरीस 1996 च्या जून महिन्यात कर्नाटकचे मुख्यमंत्री देवेगौडा यांच्या नावाने फासे पडले!
बिगर काँग्रेस आणि बिगर भाजप म्हणून तिसर्‍या आघाडीतर्फे देवेगौडांचे नाव निश्चित केले गेले. त्यामुळे 15 ऑगस्ट 1996 रोजी देवेगौडांनी लाल किल्ल्यावरून भाषण दिले, परंतु एप्रिल 1997 मध्ये देवेगौडांचे सरकार गडगडले. त्यांच्या जागी इंद्रकुमार गुजराल यांची पुन्हा राजकीय फासे टाकून निवड केली गेली. त्यामुळे 15 ऑगस्ट 1997 रोजी गुजराल यांनी लाल किल्ल्यावरून देशाला उद्देशून त्यांचे विचार मांडले, परंतु गुजराल यांचे सरकारही फार काळ टिकू शकले नाही. त्याच वर्षी म्हणजे 1997 च्या अखेरीस काँग्रेसने गुजराल यांना दिलेला पाठिंबा काढून घेतला आणि ते सरकारही पडले. त्याच लोकसभेतून कुणाला बहुमत प्रस्थापित करण्यासाठी आघाडी बनवता आली नाही. त्यामुळे निवडणुका अपरिहार्य झाल्या. मार्च 1998 मध्ये लोकसभा निवडणुका झाल्या आणि लोकसभेतील सर्वात जास्त जागा (180) भाजपला मिळाल्या. त्या आधारे त्यांनी एनडीए ऊर्फ राष्ट्रीय लोकशाही आघाडी निर्माण केली. जे भाजपला 1996 मध्ये जमले नव्हते ते 1998 मध्ये जमले आणि भाजपप्रणीत आघाडीचे सरकार येऊन अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले. त्यामुळे 15 ऑगस्ट 1998 रोजी लाल किल्ल्यावरून अटलबिहारी वाजपेयींचे भाषण झाले. आता सर्व स्थिरस्थावर झाले आहे, असे वाटत असतानाच वाजपेयींचे सरकार 13 महिन्यांनी एप्रिल 1999 मध्ये पडले.

फक्त एका मताने! पुन्हा निवडणुका अपरिहार्य झाल्या, परंतु त्याच वर्षी म्हणजे जून 1999 मध्ये पाकिस्तानने कारगिलमध्ये लष्करी कारवाई केली. साहजिकच निवडणुका ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलल्या गेल्या. त्यामुळे 15 ऑगस्ट 1999 रोजीसुद्धा वाजपेयींनीच लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबर 1999 मध्ये झालेल्या निवडणुकीत पुन्हा एनडीए ऊर्फ राष्ट्रीय लोकशाही आघाडी निवडून आली आणि परत वाजपेयी पंतप्रधान झाले. अशा रीतीने ऑगस्ट 1996 ते ऑगस्ट 1999 या चार वर्षांत देवेगौडा, गुजराल आणि वाजपेयी (दोन वेळा) यांनी लाल किल्ल्यावरून आपले विचार प्रगट केले- म्हणजे तीन वर्षांत चार सरकारे! त्या प्रकारची अस्थिरता आता देशात येऊ घातली आहे, असे सर्व पक्षांचे, सर्व वृत्तवाहिन्यांचे, सर्व पत्रकारांचे आणि भाष्यकारांचे भाकीत आहे. काँग्रेसप्रणीत यूपीए आणि भाष्यकारांचे भाकीत आहे.

काँग्रेसप्रणीत यूपीए आणि भाजपप्रणीत एनडीए यांपैकी कुणालाच स्पष्ट बहुमत मिळणार नाही, असा त्यांचा खात्रीलायक अंदाज आहे. म्हणजेच 2014 पासून आपण एका अस्थिरतेच्या पर्वात प्रवेश करणार आहोत. जर त्या पर्वातून आपण तावून-सुलाखून बाहेर आलो तर त्यानंतरच्या निवडणुका पाच वर्षांनी, 2019 मध्ये येतील. नाही तर त्या पाच वर्षांमध्ये किमान दोन निवडणुका होतील, परंतु प्रत्येक वेळेस इतिहासाची पुनरावृत्ती व्हायलाच हवी, असे विधिलिखित नाही. काही भाष्यकारांना वाटते, की पुढील वर्षी नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून भाषण देतील, तर काही जण म्हणतात, की राहुल गांधी! खुद्द राहुल गांधींनी जाहीर केले आहे, की त्यांना पंतप्रधान व्हायची इच्छा नाही. साहजिकच नितीशकुमार, जयललिता, मायावती, ममता, मुलायमसिंह, नवीन पटनाईक, शरद पवार, शिवराज चौहान, शीला दीक्षित अशी अनेक नावे त्या पदासाठी चर्चेत आली आहेत. नियतीच्या मनात काय आहे, हे कुणीच सांगू शकत नाही. पंडित नेहरूंनी 15 ऑगस्ट 1947 रोजी म्हटले होते, की भारतीय जनतेने नियतीशी करार केला आहे, परंतु नेहरूंना अभिप्रेत असलेली नियती आणि त्यांनी योजलेला करार आणि आपल्यासमोर आलेली नियती अगदीच वेगळी आहे. करार काय आहे वा होता, हेसुद्धा कळेनासे झाले आहे. आता नियतीशी करार करण्याऐवजी बहुसंख्य लोकांनी आपले भवितव्य आणि वर्तमानकाळही नियतीलाच टांगून ठेवला आहे. ही नियतीसमोरची शरणागती आहे- करार नव्हे!