आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्नायकी युक्रेन (अग्रलेख)

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोव्हिएत रशियाचे 1991 मध्ये विघटन झाले. त्यानंतर युक्रेनसहित बेलारुस, किरगिझिस्तान, उझबेकिस्तान, ताजिकिस्तान, अर्मेनिया, अझरबैजान, तुर्कमेनिस्तान असे भूतपूर्व सोव्हिएत रशियाचे अनेक प्रांत स्वतंत्र देश म्हणून जगाच्या नकाशावर अवतरले. रशिया हा आर्थिक व संरक्षणसामग्रीदृष्ट्या अमेरिकेइतका नसेल; पण अजूनही जगावर प्रभाव पाडण्याइतका प्रबळ असल्याने या नव्या नवलाईच्या देशांपैकी बहुसंख्य देश रशियाच्या उपकारांवर जगत आहेत. त्याला युक्रेन काहीसा अपवाद होता. भौगोलिकदृष्ट्या युक्रेन हा युरोपच्या जवळ आहे. त्यामुळे युरोपीय देश व रशिया अशा दोन्हींकडून युक्रेनला विविध प्रकारचे सहकार्य मिळत गेले. त्याचबरोबर युक्रेनचे राज्यकर्ते हे आपल्या मुठीत राहावेत, यासाठी रशिया व युरोपीय देश 1991 पासून सातत्याने डावपेच आखत होते, एकमेकांवर कुरघोडी करत होते. त्या सगळ्याचे टोक गेल्या काही दिवसांत युक्रेनमध्ये विलक्षण राजकीय अस्थिरता निर्माण होऊन गाठले गेले. युक्रेनचे सध्या परागंदा झालेले माजी राष्ट्राध्यक्ष व्हिक्टर यांकोविच यांनी आपली अवस्था एखाद्या लंबकाप्रमाणे करून घेतली होती. कधी त्यांचा कल रशियाकडे, तर कधी युरोपीय देशांकडे असे.

युक्रेनमध्ये दहा वर्षांपूर्वी झालेल्या क्रांतीनंतर यांकोविच यांची पंतप्रधान म्हणून नियुक्ती झाली होती. पण कालांतराने सत्तेची हवा त्यांच्या डोक्यात गेली. देशाची सारी सत्तासूत्रे आपल्या हातातच एकवटलेली हवी, असे त्यांना वाटू लागले. त्यानुसार युक्रेनच्या राज्यघटनेत स्वत:ला सोयीचे असलेले बदल करून घेतले. अध्यक्षीय पद्धत देशात लागू केली. त्यानंतर झालेल्या (अनेक गैरप्रकारांमुळे गाजलेल्या) सार्वत्रिक निवडणुकीत यांकोविच हे युक्रेनचे अध्यक्ष म्हणून निवडून येणे, यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीही नव्हते. लोकशाही राजवटीचा मुखवटा घेऊन हुकूमशाही वृत्तीने राज्यकारभार हाकणार्‍या स्वयंकेंद्री वृत्तीच्या राजकीय नेत्यांमध्ये यांकोविच यांचा बराच वरचा क्रमांक लागेल. यांकोविच यांच्या अध्यक्षीय पदाच्या कारकिर्दीत युक्रेनने विलक्षण प्रगती साधली, असेही काही घडलेले नाही. युक्रेनमध्ये उद्योगधंद्यांचा लक्षणीय विकास झालेला नाही, बेकारीचे प्रमाण मोठे आहे. त्या देशाची अर्थव्यवस्थाही डळमळीत आहे. सोव्हिएत रशिया अस्तित्वात असताना युक्रेनमध्ये संरक्षणविषयक सामग्रीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत असे. पण या प्रकारच्या उत्पादनाचे युक्रेनमधील प्रमाण सोव्हिएत रशियापासून वेगळे झाल्यानंतर घटले आहे.

पूर्वकमाईमुळे अण्वस्त्रांचा मोठा साठा असलेला देश, अशी युक्रेनची ओळख अजूनही कायम राहिली असली तरी त्यामुळे देशात रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होण्याची शक्यता नाही. त्यामुळे युक्रेनसाठी त्याच्याकडील अण्वस्त्रेही त्या देशाच्या प्रगतीसाठी अनुत्पादकच ठरली आहेत. यांकोविच यांनी आपल्या अध्यक्षीय कारकीर्दीत युक्रेनच्या विकासासाठी कोणत्याही ठोस योजना यशस्वीपणे न राबवल्याने त्या देशाला कायम युरोपीय देश किंवा रशियाकडे मदतीची याचना करण्याची पाळी आली. यांकोविच यांच्या ढिसाळ कारभाराची लक्तरे एकसारखी वेशीवर टांगली जाऊ लागल्याने युक्रेनमधील गरीब तसेच मध्यमवर्गातील नागरिक त्यांच्या कारभाराला कंटाळला होता. गेल्या दोन वर्षांपासून या नागरिकांमध्ये यांकोविच यांच्या विरोधात जो असंतोष धगधगत होता, त्याचा स्फोट गेल्या शनिवारी झाला. त्याची परिणती युक्रेनच्या पार्लमेंटने यांकोविच यांची अध्यक्षपदावरून बडतर्फी होण्यात झाली. त्यानंतर परागंदा झालेले यांकोविच यांचा कुठेही थांगपत्ता लागला नसून त्यांनी रशिया किंवा बेलारुस यांपैकी एखाद्या देशामध्ये आश्रय घेतला असावा, अशी शक्यता वर्तविली जात आहे. लोकशाही राजवटीचा बुरखा पांघरून यांकोविच यांनी युक्रेनमधील नागरिकांच्या अनेक हक्कांवर गदा आणली होती. त्यांना जगणे असह्य केले होते.

यांकोविच हे परागंदा झाल्यानंतर त्यांच्या अध्यक्षीय निवासस्थानाचा युक्रेनमधील आंदोलक नागरिकांनी ताबा घेतला त्या वेळी असे आढळून आले, की या महाशयांचे राहणीमान अतिशय विलासी होते. त्यांनी अध्यक्षांसाठी असलेल्या निवासस्थानात खासगी प्राणिसंग्रहालय उघडले होते. खास पार्ट्यांकरिता व खासगी वापरासाठी गेलॉन नावाचे रेस्टॉरंट सुरू केले होते. युक्रेनची राजधानी क्यीव्हमधील अध्यक्षीय निवासस्थानाचा ताबा घेतल्यानंतर आंदोलकांनी तेथे कुठल्याही प्रकारची नासधूस केलेली नाही. फिलिपाइन्सचा हुकूमशहा फर्निंडंड मार्कोस किंवा लिबियाचा सर्वेसर्वा गड्डाफी यांची सत्ता उलथवल्यानंतर या दोघांच्याही अध्यक्षीय राजप्रसादांमध्ये घुसून त्या त्या देशांतील आंदोलकांनी प्रचंड विध्वंस केला होता. हा अविचार युक्रेनमधील यांकोविच विरोधकांनी केलेला नाही. उलट यांकोविच पुन्हा हाती लागल्यानंतर जनतेची लुबाडणूक करून विलासी राहणीचा उपभोग घेतल्याबद्दल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा या आंदोलकांचा विचार आहे. तोवर पुरावा म्हणून अध्यक्षीय निवासस्थानातील यांकोविचकृत ‘सुविधा’ जशाच्या तशा जतन केल्या जाणार आहेत! तसेच हे निवासस्थान आता सर्वसामान्य नागरिकांना पाहण्यासाठीही खुले करण्यात आले आहे.

यांकोविच यांच्या पलायनानंतर त्यांनी याआधी बंदी बनविलेले युक्रेनचे तत्कालीन पंतप्रधान त्योमोशंको यांची मुक्तता करण्यात आली. तसेच त्या देशाच्या पार्लमेंटचे अध्यक्ष अ‍ॅलेक्झांडर तुर्चिनोव्ह यांची हंगामी राष्ट्राध्यक्ष म्हणून पार्लमेंटने रविवारी नियुक्ती केली आहे. युक्रेनमध्ये नवा अध्यक्ष निवडण्यासाठी आता येत्या 25 मे रोजी सार्वत्रिक निवडणुका होतील. युरोपीय समुदायाशी गेल्या वर्षी केलेल्या कराराची अंमलबजावणी करण्यास यांकोविच रशियाच्या कच्छपी लागून टाळाटाळ करू लागले होते. या करारामुळे युक्रेनला व्यापाराच्या दृष्टीने अनेक फायदे होणार होते. मात्र रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी युक्रेनला काही सवलती देऊन यांकोविच यांना पुरते आपल्या बाजूला वळवून घेतले. युरोपीय समुदायाबरोबरच्या व्यापारी कराराची अशी वासलात लागल्याने हे देश व युक्रेनमधील नागरिक चिडले होते. त्यातूनच यांकोविच यांची गच्छंती झाली. इजिप्तसह काही देशांमध्ये प्रस्थापित सत्ता उलथवून लोकशाही राजवट प्रस्थापित करण्यासाठी गेल्या दोन वर्षांत आंदोलने झाली. त्याला अरब स्प्रिंग असे म्हटले गेले. मात्र त्या देशांमध्ये सत्ताबदलानंतरही अस्थिर वातावरणाच्या उन्हाळ्यामुळे आलेला रखरखाट आजही कायम आहे. युरोपीय देश व रशिया यांच्या स्वार्थी हेतूंच्या कात्रीत युक्रेन पुरता अडकला आहे. त्यामुळे यांकोविच यांच्या बडतर्फीनंतरही त्या देशातील राजकीय अस्थैर्य लगेच संपेल, अशी शक्यता अजिबात दिसत नाही. भारतासारख्या लोकशाही देशांनीही युक्रेनमधील परिस्थितीपासून धडा घेण्याची गरज आहे.