आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माफीची उपरती (अग्रलेख)

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजकारणात वेळ आणि व्यक्ती या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. व्यक्ती योग्य आहे; पण वेळ योग्य नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली तर जुळवून आलेले गणित क्षणार्धात बिघडू शकते. तसेच वेळ योग्य आहे; पण व्यक्ती मात्र चुकीची आहे, असे जरी घडले तरीही महत्प्रयासाने जुळवून आणलेले समीकरण उधळले जाऊ शकते. ही दुसरी शक्यता गृहीत धरूनच कदाचित भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंह यांनी मुस्लिम समुदायापुढे विनम्रतेने हात जोडले आहेत. ‘मोदी फॉर पीएम-मिशन 272 + रोल ऑफ मुस्लिम’ उपक्रमांतर्गत नवी दिल्ली येथे आयोजित एका कार्यक्रमात राजनाथसिंह यांनी बाबरी मशीद उद््ध्वस्त करणे आणि गुजरातची दंगल या इतिहासात झालेल्या चुका मान्य करत जाहीरपणे माफी मागितलेली नसली तरीही आमचे चुकले होते, याची अप्रत्यक्ष कबुली मात्र नक्कीच दिली आहे.

भूतकाळात चुका झाल्या असतील तर माफी मागण्याची आमची तयारी आहे, काँग्रेसकडून केल्या जाणार्‍या अपप्रचाराकडे लक्ष देऊ नका, केवळ एकदाच आम्हाला संधी द्या. आम्ही तुमच्या अपेक्षा पूर्ण नाही करू शकलो तर पुन्हा आम्हाला मत देऊ नका, असा साधारण त्यांच्या म्हणण्याचा आशय आहे. कुणी या कृतीचे वर्णन ‘सौ चूहे खाकर बिल्ली हज को चली’ असे करतील; कुणी भाजपच्या ‘उदार, कनवाळू आणि सहिष्णू’ मनोवृत्तीचे जाहीर कौतुक करतील; कुणी उपरोधाने भाजपला उपरती झाली, असेही म्हणतील. कुणाला राजनाथसिंह यांची ही मोदींवर दबाब आणणारी पक्षांतर्गत चाल (गुजरातची दंगल आणि मोदी हे रूढ झालेले समीकरण या निमित्ताने पुन्हा अधोरेखित केले, अशा अर्थाने.) असल्याचाही साक्षात्कार होईल. अर्थात, राजनाथसिंह जे काही वदले ते योग्यच आहे, यात यापैकी कुणाचेही दुमत असणार नाही. मात्र, ज्यांच्याकडून अशा प्रकारचे वक्तव्य येण्याची जनतेला (मुख्यत: मुस्लिम जनतेला) प्रतीक्षा आणि अपेक्षा आहे, ते भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी अजूनही राष्ट्रीय पातळीवर थेटपणे या विषयावर भिडलेले नाहीत, हेही वास्तव यापैकी कुणाला टाळता येणार नाही.

राजनाथसिंहांच्या वक्तव्याला कडव्या हिंदुत्ववाद्यांकडून मिळणारा प्रतिसाद जोखून, आणि अर्थातच अचूक वेळ साधून येत्या काही दिवसांत मोदी कदाचित माफीसदृश वक्तव्य करतीलही; पण सध्या तरी वक्तव्य आणि वर्तणूक यामध्ये जाणीवपूर्वक अंतर ठेवण्यावर भाजप आणि संघ परिवाराने भर दिला आहे, हे नाकारून चालणार नाही. देशात कितीही मोठी ‘मोदी लाट’ आलेली असली तरीही, जवळपास 20 कोटी इतकी लक्षणीय जनसंख्या असलेल्या मुस्लिम समुदायाला टाळून सहजपणे सत्ता हाती येईल, या भ्रमात भाजप नाही, हेही या निमित्ताने दिसून आले आहे. अमेरिकेची आणि भारताची निवडणूक पद्धती भिन्न आहे. सामाजिक-सांस्कृतिक ताणेबाणे निराळे आहेत. तरीही नेत्यांपुढची सर्वसमावेशकतेची अपरिहार्यता वेगळी नाही. म्हणूनच अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीला सामोरे जाताना बराक ओबामांना मी कुणा एका धर्म-पंथाचा नव्हे तर सर्वांचा आहे, असे सर्वसमावेशकतेकडे निर्देश करणारे वक्तव्य करणे भाग पडले होते. भारताच्या संदर्भात या अपरिहार्यतेचे आकलन भाजपला उशिराने का होईना झाले, हे बरेच झाले म्हणायचे.

एकीकडे, मुस्लिमांना साद घालण्यामागे राजनाथसिंहांचा मन:परिवर्तनाबरोबरच मतपरिवर्तनाचा उद्देश उघड आहे. राजनाथसिंह ज्या प्रदेशाचे प्रतिनिधित्व करतात, तो उत्तर प्रदेश, शेजारचा बिहार आणि प. बंगाल ही तीन राज्ये येत्या लोकसभा निवडणुकीत अत्यंत मोलाची भूमिका बजावणार आहेत. मुस्लिम मतदारांची लक्षणीय संख्या ही या राज्याची वैशिष्ट्ये आहेत. पारंपरिकपणे या तिन्ही राज्यांतील मुस्लिम मतदार काँग्रेस, समाजवादी पार्टी, तृणमूल काँग्रेस, जदयू, राजद आदी पक्षांमध्ये विभागला गेला आहे. हा मतदार आपल्याकडे वळवण्यासाठी भाजपमध्ये कार्यकर्त्यांच्या पातळीवर जोरकस प्रयत्न होत असले तरीही शीर्षस्थ नेत्यांनी आश्वस्त केल्याशिवाय मुस्लिमांचे मन आणि मत परिवर्तन शक्य नाही, हेही तितकेच उघड आहे. ही उणीव भरून काढण्यासाठी राजनाथसिंह यांनी जाणीवपूर्वक पाऊल उचलले असले तरीही गुजरात दंगलीनंतर ‘हिंदूंचा मसिहा’ अशी ठसठशीत ओळख बनलेले नरेंद्र मोदी खुल्या दिल्याने मुस्लिम समुदायाला सामोरे जात नाहीत, तोवर मतपरिवर्तन शक्य नाही, हेही तितकेच खरे आहे. त्यात मोदींनी तसा प्रयत्न केलाच, तर संघ-भाजपशी संबधित कट्टर हिंदुत्ववादी संंस्था-संघटना स्वत:मध्ये बदल घडवू पाहणार्‍या मोदींचे उत्स्फूर्तपणे स्वागत करतीलच, असेही नाही. म्हणूनच कदाचित, अरुणाचल प्रदेशला गेल्यावर मोदी सहजपणे परंपरागत तुर्रेबाज अरुणाचली टोपी परिधान करतात.

पंजाबात गेल्यावर आनंदाने शीख फेटा बांधतात; पण उ. प्रदेश-बिहार वा प. बंगालमध्ये गेल्यावर मुस्लिम समुदायाची ओळख असलेली गोल टोपी घालण्याचे धाडस करत नाहीत. केलेच तर मुजफ्फरनगर दंगलीतल्या संशयित भाजप नेत्यांचा जाहीर सत्कार करतात; मात्र दंगलीबद्दल अवाक्षरही काढत नाहीत. दुसर्‍या बाजूला अशोक सिंघलांसारखे जहालमतवादी नेते, हिंदू लोकसंख्येचा दबाव वाढवण्यासाठी हिंदूंनी कमीत कमी पाच मुलांना जन्म द्यावा, अशा प्रकारे वक्तव्य करून जनतेला आणि अप्रत्यक्षपणे मोदींना हिंदू अजेंड्याची सारखी आठवण करून देत असतात. हे सगळे प्रकार मुस्लिमांमध्ये विश्वासार्हता नव्हे, संशय निर्माण करणारे आहेत. या पार्श्वभूमीवर, जहालमतवाद्यांची डोकी शांत ठेवून आपल्या कृती आणि विचारांमध्ये एकसूत्रता आणण्याचे मोठे आव्हान भाजपच्या पहिल्या फळीतल्या नेत्यांना पेलावे लागणार आहे. राजनाथसिंह यांना मुस्लिमांना साद घालण्याची झालेली सावध उपरती हा त्या दिशेने नेणार्‍या प्रयत्नांचा केवळ एक भाग आहे.