आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थयथयाट (अग्रलेख)

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुमारे तीन वर्षांपूर्वी अण्णा हजारे यांनी जेव्हा यूपीए-2 सरकारच्या विरोधात भ्रष्टाचारविरोधी आंदोलन उभे केले तेव्हा अरविंद केजरीवाल हे व्यक्तिमत्त्व देशाच्या मीडियाला ठाऊक नव्हते. महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीच्या काळातील अण्णांची भ्रष्टाचारविरोधातील आंदोलने मोठ्या प्रमाणात गाजली होती. युतीच्या काही मंत्र्यांना राजीनामेही द्यावे लागले होते. त्या अर्थाने अण्णा देशाला हळूहळू परिचित होत गेले होते. पण केजरीवाल यांचा प्रत्यक्ष राजकारणाशी संबंध नव्हता. प्राप्तिकर खात्यात क्लास वन अधिकारी असतानाही केजरीवाल यांनी माहिती अधिकार चळवळीद्वारे समाजाच्या प्रश्नांना हात घालण्याचा प्रयत्न केला होता. त्यांना या कामी उत्कृष्ट समाजसेवेचा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा प्रतिष्ठित असा रॅमन मॅगसेसे पुरस्कारही मिळालेला होता. तरीही या पुरस्कारामुळे केजरीवाल किंवा त्यांचे सामाजिक कार्य हे काही इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या दृष्टीने ‘बातमी मूल्य’ नव्हते. ते मीडियाचे डार्लिंग झाले अण्णांच्या जंतरमंतर व रामलीला मैदानावरील आंदोलनात केलेल्या अनेक प्रक्षोभक विधानांनंतर. त्या काळातील राजकारण्यांविरोधातील, संसदेविरोधातील, लोकशाही संस्थांविरोधातील त्यांची भडक व बेछूट विधाने इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या दृष्टीने दिवसभर बातमी म्हणून चंगळ होती. टीव्ही न्यूज चॅनलवाल्यांना जेव्हा केजरीवाल यांच्या निमित्ताने टीआरपी मिळत गेला, तेव्हा केजरीवाल यांनीही या खेळात सामील व्हायचे ठरवले. त्यानंतर सकाळ-संध्याकाळ न्यूज चॅनलचे बूम-कॅमेरे केजरीवालांच्या भरकटलेल्या राजकारणाचा पाठलाग करत होते. दिवसभर ते केजरीवाल यांच्या मागे जात व रात्री स्टुडिओमध्ये केजरीवाल यांच्या राजकारणावर मीडियातील पंडित चर्चा करत असत.

केजरीवाल हे जसे न्यूज चॅनलचे डार्लिंग झाले तसे ते उच्च मध्यमवर्गीय, मध्यमवर्गीयांचेही झाले. केजरीवालांकडे भ्रष्टाचार मुक्तीची गुरुकिल्ली आहे असा या सर्वांचा समज होऊ लागला. न्यूज चॅनलही भ्रष्टाचार हा देशापुढचा एकमेव प्रश्न आहे आणि केजरीवाल हा प्रश्न जनलोकपाल आणल्यास मिटवू शकतात, असा आभास देशभर करत होते. काही न्यूज चॅनलनी केजरीवाल पंतप्रधानांच्या स्पर्धेत आहेत, असाही त्यांचा प्रचार करण्यास सुरुवात केली. काहींनी तर केजरीवाल यांना कॉर्पोरेट उद्योग जगताशी संवाद साधण्यास भाग पाडले. सध्याच्या तंत्रज्ञानाच्या काळात लोकांमध्ये आपली राजकीय भूमिका घेऊन जाण्याची गरज उरलेली नाही. टेलिव्हिजनचा पडदा आणि सोशल मीडियातील ‘लाइक्स’ हे ताब्यात राहिल्यास राजकारण आपल्याला हवे तसे वळवता येऊ शकते अशी परिस्थिती आहे. ही कला दोन नेत्यांना साध्य झाली आहे. हे नेते म्हणजे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आणि दुसरे केजरीवाल. या दोघांनीही या माध्यमांची ताकद जोखली व आपला मतदार ओळखला. पण झाले असे की, केजरीवाल यांनी जेव्हा मोदींवरच राजकीय आरोप करण्यास सुरुवात केली, तेव्हा मात्र चॅनलवाल्यांची त्रेधातिरपीट उडू लागली. कारण आजपर्यंत टीव्हीच्या पडद्यावर मोदी विरुद्ध केजरीवाल असा सामना रंगला नव्हता व रंगवण्याचे प्रयत्नही झाले नव्हते. केजरीवाल व मोदींचा आमने-सामने सामना दाखवणे शक्य नव्हते. त्याऐवजी कुणा एकाच्या विरोधात भूमिका घ्यायची हा सोपा मार्ग न्यूज चॅनलवाल्यांनी निवडला. अर्थात त्याचे मोल केजरीवाल यांना चुकवावे लागले. त्यामुळे आपल्यावरील कॅमेरा हलल्याने केजरीवालांमध्ये एकाएकी नैतिकतेचा ज्वर चढला.

दोन दिवसांपूर्वी नागपूरमधील एका कार्यक्रमात त्यांनी मीडियातील पत्रकारांनाच तुरुंगात धाडण्याची वेळ आली असल्याचे वक्तव्य केले. त्यांच्या या कार्यक्रमात मीडियाच्या प्रतिनिधींना मज्जाव करण्यात आला होता. पण केजरीवाल यांच्या या वक्तव्याची मोबाइल क्लिप मीडियाच्या हाती लागल्यानंतर खरे काय ते बाहेर आले. केजरीवाल यांनी देशातील सर्व मीडिया कॉर्पोरेट कंपन्यांच्या दबावाखाली, मोदींच्या आदेशानुसार काम करत असल्याचा आरोप केला. पण नंतर केजरीवाल यांनी आपण असे काही म्हटले नसल्याचे सांगितले. त्यांचे सहकारी आशुतोष हे पूर्वी पत्रकार होते. त्यांनीही केजरीवाल यांचे समर्थन करताना सर्व नव्हे तर काही मीडिया हाउसेस पेड पत्रकारिता करत असल्याचे म्हटले होते. अर्थात या दोघांच्या आरोपात नवे असे काही नाही. पण असे आरोप करण्याअगोदर केजरीवाल यांनी पुरावे दिले असते तर मीडियालाच तोंड दाखवायला जागा राहिली नसती. सध्या देशातील खासगी न्यूज चॅनलची वाढती संख्या बघता व अशा चॅनलमधून दिसणारी पत्रकारिता पाहता या चॅनलचे मूल्यमापन करण्याची क्षमता प्रेक्षकांमध्ये आली आहे. हा प्रेक्षक टीव्हीवरच्या राजकीय प्रचाराला लगेचच बळी पडत नाही. तो स्वत:ची सदसद्विवेकबुद्धी शाबूत ठेवून कोणते चॅनल पाहायचे हे ठरवू शकतो. त्यामुळे काही चॅनल केजरीवाल यांच्यावर टीका करत असतील तर त्या टीकेला उत्तर देताना केजरीवाल यांनी स्वत:हून त्या चॅनलना सामोरे जायला हवे होते. ते लोकसभा निवडणुकांमध्ये उतरल्यामुळे त्यांच्यावर मीडिया वा राजकीय पक्षांकडून टीका होणार आहे. ही टीका त्यांना व त्यांच्या सहकार्‍यांना रुचणार नसेल तर ते राजकारणाच्या दृष्टीने असहिष्णुतेचे वर्तन ठरेल. केजरीवाल यांनी याअगोदर अनेक वेळा काही व्यक्तींची, संस्थांची पुराव्यांशिवाय प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला होता. या आरोपांचे पुढे काय झाले ते त्यांनाच माहीत.

खरे म्हणजे, लोकांच्या मनात एकूणच व्यवस्थेविरोधात असलेला संताप हा सध्याचा राजकारणातील कळीचा मुद्दा आहे. केजरीवाल यांनी या संतापाला वाट दिली होती म्हणून लोकांच्या त्यांच्याकडून अपेक्षा वाढल्या होत्या. दिल्लीच्या जनतेने त्यांना निवडूनही दिले होते. आता लोकांना निव्वळ आरोप नको आहेत, तर त्यांना केजरीवालांकडून ठोस राजकीय कार्यक्रमाची अपेक्षा आहे. लोकांना देशातील चोर कोण आहेत यापेक्षा केजरीवाल या चोरांना कसे पकडणार यामध्ये अधिक रस आहे. केजरीवाल यांचा आरोपांचा खेळ अधिक काळ चालला तर लोकच त्याकडे दुर्लक्ष करतील. संसदीय लोकशाहीत आरोप-प्रत्यारोप अध्याहृत असतात, पण आरोपांमध्ये गांभीर्य हवे व त्याची जबाबदारी घेण्याचे धार्ष्ट्य असायला हवे. ते असेल तरच या सगळ्याला अर्थ आहे.