आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘साहेबां’च्या गमती (अग्रलेख)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतात सर्वात जास्त नाडल्या गेलेल्या शेतकर्‍यांचे आपण नेते आहोत, असा दावा करणारे केंद्रीय कृषिमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेस असे भारदस्त नाव धारण केलेल्या पक्षाचे अध्यक्ष आणि गेली पन्नासपेक्षाही अधिक वर्षे राजकारणात असलेले बहुआयामी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना देश एक जबाबदार नेता म्हणून ओळखतो. खरे म्हणजे आता ओळखत होता, असे म्हणावे लागेल. अशा पवारसाहेबांना अचानक काय झाले आहे, हे कळायला मार्ग नाही. निवडणुका आल्या की, त्यांच्या अंगात येते आणि ते सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक गमती करायला लागतात, हे जनतेला सरावाने माहीत आहे. तसेच या वेळीही त्यांच्या अंगात आले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या काही निवडणुकांत त्यांनी जातीपातीवरून गमती केल्या होत्या. मात्र, वयोमानानुसार त्यांच्या गमती चालू निवडणूक प्रचारादरम्यान अधिकच वाढल्या आहेत. केवळ वाढल्याच नाहीत, तर त्या गमतीचे विषय या वेळी गंभीर होऊ लागले आहेत. वाशी येथील माथाडी कामगारांच्या सभेत त्यांनी ‘गावाकडे मतदान करा, बोटावरची शाई पुसा आणि मुंबईला येऊन पुन्हा मतदान करा’, असा डबल शिक्का ‘हाणण्याचा’ सल्ला आपल्या मतदारांना दिला आहे. आपण काही तरी चुकीचे बोललो, असे त्यांच्या नेहमीप्रमाणे लगेच लक्षात आले आणि त्यांनी लगेच खुलासा केला की ‘ही गंमत होती’, ‘ही टिंगल होती’; पण माध्यमांनी त्याचा विपर्यास केला.

‘आम्हालाही अस्सल शिव्या देता येतात’, ‘राजू शेट्टी विशिष्ट जातीच्या कारखानदारांविरोधात आंदोलन करत नाहीत’, ‘दुष्काळग्रस्तांना देण्यात येणार्‍या निधीबाबत राज्यपाल गंभीर नाहीत’ अशी काही वादग्रस्त विधाने त्यांनी गेल्या काही दिवसांत केली आहेत. त्याही गमती होत्या, असा खुलासा त्यांनी केलेला नाही. याचा अर्थ सिनेमाच्या पडद्यावर यशवंतराव चव्हाण यांच्या सुसंस्कृत राजकारणाचा उदो उदो चालला असतानाच व्यवहारात त्यांचा पराभव करण्याचा निर्णय राज्यातील ज्येष्ठ नेत्यांनी घेतलेला दिसतो आहे. जनतेने फक्त सिनेमा पाहायचा आणि या राज्यात किती सुसंस्कृत नेते होते, याची आठवण काढून रडत बसायचे! तसे नसते तर शरद पवार यांनी लोकशाहीत सर्वात पवित्र मानले गेलेले मतदान हा गमतीचा विषय केला नसता. अर्थात दोष एकाच साहेबांचा आहे, असेही नाही. मात्र, मोठे साहेब अशा गमतीपासून दूर राहतील, अशी अपेक्षा होती. ती फोल ठरली आहे. तिकडे भाजपच्या एका गटाचे साहेब - गोपीनाथराव असेच चुकून खरे बोलण्याच्या प्रयत्नात अडचणीत सापडले आहेत. त्यांचे म्हणणे आहे की 2009 च्या निवडणुकीत आपल्याला प्रचारासाठी आठ कोटी रुपये खर्च करावा लागला. प्रचार इतका महाग झाला आहे, असे त्यांना सांगायचे होते; पण चुकून त्यांनी आपल्याच मतदारसंघाचा दाखला दिला. अर्थातच त्यांना लगेच खुलासा करावा लागला. आता निवडणूक आयोग त्यावर काय निर्णय घेते, याची वाट पाहायची. खरे म्हणजे गोपीनाथरावांना चांगली संधी होती. यानिमित्ताने निवडणूक खर्चाचे आणि पर्यायाने तसा खर्च करून निवडून येणार्‍या नेत्यांचे जे ढोंग देशभर सुरू आहे, त्यावर देशात एक गंभीर चर्चा होऊन लोकशाहीच्या शुद्धीकरणाचे ऐतिहासिक काम सुरू झाले असते; पण गोपीनाथराव काही त्यासाठी राजकारणात गेले नाहीत, ते तर राजकारणातून राष्ट्रनिर्माणसाठी राजकारण करत आहेत. म्हणजे किती टक्के राजकारण आणि किती टक्के समाजकारण, हे त्यांना मोठ्या साहेबांनी सांगितलेच असेल.

निवडणूक खर्चाची ही चर्चा थांबत नाही तोच त्यांचे पुतणे, राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी असाच एक गौप्यस्फोट घडवून आणला आहे. 2009 च्या निवडणुकीत आपल्या काकांच्या म्हणजे गोपीनाथरावांच्या प्रचाराची सूत्रे आपल्याकडे होती आणि त्यांना एक लाख बोगस मतदान घडवून आणण्याची महान कामगिरी आपण केली होती, हे त्यांनी 2014 मध्ये बीडमध्ये म्हणजे आपल्या जन्म आणि कर्मभूमीत प्रांजळपणे सांगून टाकले! सभेला अर्थातच मोठे साहेब उपस्थित होते. पक्षातील तरुण पिढी आधीच आपल्या पुढे निघून गेल्याची जाणीव साहेबांना तेथे झाली असावी आणि म्हणूनच त्यांनी दोन दिवसांतच ‘डबल शिक्का हाणण्या’ची ‘गंमत’ केली असावी, असाही एक अंदाज आहे. कारण पक्ष कोणताही असो, तरुण पिढीला पुढे येऊ द्यायचे नाही, (आपल्या घरातील सोडून) यावर सर्व ज्येष्ठांचे एकमत आहे!

साहेबांचे पुतणे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे तर अशा गमतींसाठी प्रसिद्धच आहेत. ते दुष्काळी भागात जाऊन लघुशंका करू का, असा क्रूर प्रश्न तर विचारू शकतातच; पण अर्थसंकल्प मांडतानाच राज्याची तिजोरी रिकामी असल्याची एक वेगळीच गमतीदार माहिती देऊन सगळ्यांना चकित करू शकतात! गमतींचा हा सिलसिला असाच चालू राहो. कारण राजकारणातून समाजकारण किती होते, जनतेचे आयुष्य किती सुसह्य होते, भ्रष्टाचार किती कमी होतो, शिक्षण, आरोग्य, शेती या मूलभूत प्रश्नांची चर्चा किती होते, देशाचे आणि जनतेचे बिघडलेले अर्थकारण किती सुधारते, हे माहीत नाही. मात्र, राजकीय सभांतून हल्ली चांगले लाइव्ह मनोरंजन होते आहे, हे मात्र खरे आहे. जनतेला जर तेच पाहिजे असेल तर आपण ते करू शकतो, असा विश्वास ज्येष्ठ नेते देत आहेत, एवढेच. लोकहो, दोष त्यांचा नाही. ते तर राजकारणाकडे गंमत म्हणून पाहणार्‍या, क्षुल्लक गरजांसाठी लाचारीचे प्रदर्शन करणार्‍या भारतीय जनतेची मागणी पूर्ण करत आहेत! प्रश्न आहे, जनता त्याकडे आणखी किती काळ गंमत म्हणून पाहणार आहे?