आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नामुष्कीची गूढगर्भता (अग्रलेख)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मलेशियाची राजधानी क्वालालंपूर येथून चीनकडे झेपावलेले प्रवासी विमान आपला नियोजित मार्ग सोडून एकाएकी भरकटते काय... देशोदेशीच्या रडारनाही हुलकावणी देते काय... उपग्रहांद्वारे प्राप्त होणारे संदेशदेखील निरुपयोगी ठरतात काय... पंधरा दिवस चाललेल्या विविध देशांच्या शोधमोहिमा अपयशी ठरतात काय... अन् अखेर अंदाजपंचेच विमानाला जलसमाधी मिळाल्याचे जाहीर करण्याची वेळ येते काय... सारेच कसे अगम्य, अकल्पित आणि अतार्किक... जणू माणसाच्या आकलनापलीकडचे! तब्बल पंधरवडाभर विविध देशांतर्फे कसून शोध घेऊनदेखील या विमानाचा छडा तर सोडाच, साधा मागमूसदेखील लागू शकला नाही. अखेर उपग्रहांद्वारे प्राप्त छायाचित्रे व काही देशांच्या विमानांचे निरीक्षण याआधारे हे विमान हिंदी महासागरात कोसळल्याचे जाहीर करण्यात आले असले तरी त्यामध्ये अद्याप निश्चिती नाही. मात्र, आंतरराष्ट्रीय स्तरावर अविरत सुरू असलेल्या या गूढगर्भ चर्चेला स्वल्पविराम तरी मिळावा म्हणून मलेशियन सरकारने एकदाचे तसे जाहीर करून टाकले आहे. एखाद्या अद्भुत आणि कल्पनारम्य कथेचा किंवा थरारक हॉलीवूडपटाचा विषय वाटावा, अशा या घटनेला प्रारंभ झाला तो आठ मार्चला. त्या दिवशी मलेशिया एअरलाइन्सचे एमएच 370 हे प्रवासी विमान नेहमीप्रमाणे चीनची राजधानी बीजिंगकडे झेपावले. मात्र, उड्डाणानंतर सुमारे तासाभराने त्याचा संपर्क खंडित झाला.

विमान नियोजित स्थळी न पोहोचल्याने ते भरकटल्याचे स्पष्ट झाले आणि विविध पातळ्यांवरून त्याची शोधाशोध सुरू झाली. प्रथम ते अपघातग्रस्त झाले असावे, अशी शंका स्वाभाविकपणे व्यक्त झाली. पण प्राथमिक शोधमोहिमेत ते नेमके कोठे भरकटले त्याचा काहीच ठावठिकाणा लागू शकला नाही. त्यातच नियोजित हवाई मार्गावरील वा त्याच्या आसपासच्या एकाही देशाच्या रडारवर या विमानाची नोंद आढळली नाही. त्यामुळे विमान अपहरणाची भीती व्यक्त करण्यात येऊ लागली आणि तर्क-वितर्कांना ऊत आला. व्हिएतनामपासून एकाएकी या विमानाने आपला मार्ग बदलला, तत्पूर्वीच त्याच्यातली संपर्क यंत्रणा कुणीतरी जाणीवपूर्वक खंडित केली होती, संबंधित विमानातले दोघे जण बनावट पासपोर्टवर प्रवास करीत होते, रडारच्या टप्प्यात येऊ नये म्हणून ते मुद्दामहूनच खूप खालून म्हणजे कमी उंचीवरून नेण्यात आले, तालिबानच्या ताब्यातील प्रदेशात ते उतरवले असावे, अमेरिकेतील 9/11 प्रमाणे या विमानाद्वारे भारतावर हल्ल्याचा डाव असावा... अशा एक ना अनेक शक्यता आणि शंका-कुशंका व्यक्त होऊ लागल्या.

सगळ्या जगावरच दहशतवादाचे सावट असल्याने भीतीचा हा फुगा फुगतच चालला होता. ज्या देशांच्या प्रवाशांची संख्या त्यामध्ये अधिक होती, त्या देशांत प्रचंड अस्वस्थतेचे वातावरण होते. चीनचे सर्वाधिक प्रवासी या विमानात असल्याने चीन सरकारचेचांगलेच आकांडतांडव सुरू होते. दुसर्‍या बाजूला, सर्वच स्तरांवरून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आणि सक्षम यंत्रणांचा वापर करून शोधमोहिमेला गती देण्यात आली. त्याची व्याप्ती 26 देशांपर्यंत वाढली. तथापि, हे सारे प्रयत्न तोकडेच पडत होते. उपग्रहांद्वारे प्राप्त होणार्‍या संदेशांमध्ये अथवा छायाचित्रांमध्येही ठोस असे काहीच आढळत नव्हते. प्रथम फ्रान्स व मग चीन, ब्रिटनच्या यंत्रणांना हिंदी महासागरात अत्यंत दूरवर विमानाच्या अवशेषांसदृश वस्तू तरंगताना दिसल्या. हिंदी महासागराच्या दक्षिणेला ऑस्ट्रेलियातील पर्थपासून तब्बल अडीच हजार किलोमीटरवर हे अवशेष असल्याचे सांगण्यात येत होते. त्यानुसार शोधमोहिमेचा केंद्रबिंदू तेथे सरकला. ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनीदेखील आपल्या विमानांनी अशा काही वस्तू पाहिल्याचा दावा केला. परंतु फ्रान्सच्या विमानांनी जे काही पाहिले त्यापासून या वस्तू बर्‍याच अंतरावर म्हणजे साडेआठशे किलोमीटरवर असल्याने ते काही वेगळेच असल्याचा मतप्रवाह तेथे पुढे आला. विविध देशांच्या विमानांनी ज्या वस्तू पाहिल्या त्या नेमक्या बेपत्ता विमानाचेच अवशेष होते की काय, यालाही अद्याप नेमकी पुष्टी मिळालेली नाही. तशातच मलेशियाचे पंतप्रधान नजीब रझाक यांनी सोमवारी एमएच 370 हे विमान हिंदी महासागराच्या दक्षिणेला कोसळले आणि त्यातील सर्व म्हणजे 239 प्रवाशांना जलसमाधी मिळाल्याचे जाहीर केले. परिणामी तूर्त शोधकार्याला विराम मिळाला आहे, पण विमानाचे नेमके काय झाले त्याची स्पष्टता अजून होऊ शकलेली नाही. परिणामी त्यातील गूढ अधिकच गडद होऊन प्रचंड प्रगत म्हणवल्या जाणार्‍या सध्याच्या माणसाची हतबलता अधोरेखित झाली आहे. कारण हा काही असा पहिलाच प्रसंग नाही. यापूर्वीदेखील अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन आदी पुढारलेल्या देशांची विमाने एकाएकी बेपत्ता झाली आहेत. त्यातील काहींचे अवशेष मिळण्यासाठी अनेक वर्षे वाट पाहावी लागली आहे, तर काहींचे गूढ अद्यापही पूर्णपणे उकललेले नाही.

फ्लोरिडा, पोर्टरिका आणि बर्म्युडा यांच्यादरम्यानच्या बर्म्युडा ट्रँगल म्हणून ओळखल्या जाणार्‍या प्रदेशात तर असे प्रकार अनेकदा घडले असल्याने त्याला ‘डेव्हिल्स ट्रँगल’ असेही संबोधण्यात येते. नुकत्याच गायब झालेल्या या मलेशियाच्या विमानाचे गूढदेखील त्याचाच पुढचा अध्याय असल्याचे म्हणावे लागेल. कारण ज्या भागात संबंधित विमानाचे कथित अवशेष असल्याचे सांगितले जात आहे, तेथे जवळपास लँडिंगची कोणतीही सोय नाही, शिवाय अत्यंत प्रतिकूल हवामानामुळे तेथे प्रत्यक्षात पोहोचणे बरेच कठीण आहे. माणसाने तंत्रज्ञानाच्या जोरावर आज अवकाशात मोठी भरारी घेतली असली तरी त्यामानाने समुद्राच्या पोटात शिरण्याचे त्याचे आजवरचे प्रयत्न खूपच तोकडे आहेत. ही जशी त्याची मर्यादा आहे तशीच अत्यंत प्रगत तंत्रज्ञान व अत्याधुनिक यंत्रणा असतानासुद्धा एवढ्या प्रचंड विमानाचा निश्चित ठावठिकाणा लागू नये, हीसुद्धा एक प्रकारे स्वत:ला प्रगत, अत्याधुनिक व असे बरेच काय काय म्हणवून घेणार्‍या माणसाची आता नामुष्कीच असल्याचे म्हणावे लागेल.